हॅपी बर्थ डे ‘फुलराणी’!

प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं. आपल्या आयुष्यात हे स्वप्न तो किंवा ती जन्मभर बघतात. पण सर्वांच्याच आयुष्यात ते स्वप्न पूर्ण होईल याची कुणालाही कधी खात्री देता येत नाही. मग त्यातले संवाद, स्वगतांची तरी जवळीक करतात शेवटी स्वप्नच ती. स्वप्नच राहाणार…

  प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं. आपल्या आयुष्यात हे स्वप्न तो किंवा ती जन्मभर बघतात. पण सर्वांच्याच आयुष्यात ते स्वप्न पूर्ण होईल याची कुणालाही कधी खात्री देता येत नाही. मग त्यातले संवाद, स्वगतांची तरी जवळीक करतात शेवटी स्वप्नच ती. स्वप्नच राहाणार…

  पुरुष कलाकार असेल तर त्याला आयुष्यात एकदा तरी किंवा वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांची नटसम्राटांची भूमिका करण्याचं आणि महिला कलाकार असेल तर पुल देशपांडे यांचे ‘ती फुलराणी’ करण्याचं स्वप्न असतं… येवढी जादू या दोन्ही नाटकात आहे. भूमिकेत भारावून सोडण्याचा चमत्कारच जसा भरलाय!
  डॉ.‌ श्रीराम लागू यांनी नटसम्राटाचा मुखवटा उतरविला त्यानंतर जवळजवळ बारा एक रंगकर्मींनी तो पेलण्याचा ‘प्रयोग’ केला. त्यात दत्ता भट, यशवंत दत्त, चंद्रकांत गोखले, सतीश दुभाषी, राजा गोसावी, प्रभाकर पणशीकर, प्रा. लक्ष्मण देशपांडे, उपेंद्र दाते, चित्रपटात नाना पाटेकर यांची प्रामुख्याने नोंद करता येईल, तर ‘ती फुलराणी’तली फुलराणी भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी, अमृता सुभाष, हेमांगी कवी यांनी सादर केली. आजही या भूमिकेमागलं ग्लॅमर हे कमी झालेलं नाही.

  येत्या २९ जानेवारी २०२३ या दिवशी ‘ती फुलराणी’ या नाटकाचा ४८ वा वाढदिवस. लवकरच हे नाटक आपल्या वयाची पन्नाशी पूर्ण करेल. शेवटच्या काही प्रयोगात ‘फुलराणी’चे आव्हान स्वीकारणाऱ्या हेमांगी कवी एका प्रदीर्घ मध्यंतरानंतर ‘थॅन्क डियर’ या नव्याकोऱ्या नाटकात रंगभूमीवर प्रगटल्या आहेत. त्यांची हलकी – फुलकी भूमिका बघून त्यांनी साकारलेल्या ‘फुलराणी’ची आठवण ही रसिकांना होणं स्वाभाविकच आहे. दर्दी रसिक एकेकाळी ‘फुलराणी’ साकारणाऱ्या अभिनेत्रीला भेटीसाठी गर्दी करतात. यातच सारं काही आलं.

  २०१६ साली ‘ती फुलराणी’ वाजत गाजत आलं होतं. त्यात हेमांगी समोर प्रा. अशोक जहागिरदारच्या भूमिकेत डॉ. गिरीश ओक होते त्याचे दिग्दर्शन राजेश देशपांडे यांचे तर निर्माते धनंजय चाळके होते. दोनदा या नाटकाचा प्रयोग बघण्याचा योग जुळून आला. नाटकाची ‘कॅसेट’ही निघाली. त्यात मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ नाट्यसंस्थेने पुढाकार घेतला आणि प्रा. वामन केंद्रे यांचे दिग्दर्शन, अनंत अमेंबल यांचे संगीत तसेच निर्मिती, प्रकाशयोजना आणि नेपथ्य हे वाघ यांचे होते. फॉन्टन कंपनीची सीडी आजही बाजारात उपलब्ध आहे; पुढे ‘फुलराणी’ या टायटलवर सिनेमा, मालिका, काव्यसंग्रहही आले. पण ते सारं नावापुरतं. मूळ ‘पुलं’ची संहिता आणि भक्ती बर्वे यांची मंजूळा ‘फुलराणी’ ही ग्रेटच! त्याची बरोबरी कुणाला करताही येणार नाही. कारण ते त्याचंही स्वप्न होतं. जे ताकदीने त्यांनी साकार केलं.

  ‘ती फुलराणी’चा शुभारंभी प्रयोग २९ जानेवारी १९७५ रोजी इंडियन नॅशनल थिएटर या संस्थेने रवींद्र नाट्यमंदिर येथे केला त्याचे लेखक, दिग्दर्शक, पार्श्वसंगीत पु. लं. देशपाडे यांचे होते. पात्रयोजना याप्रमाणे : सुमा पटवर्धन (नयना भडभडे), सुभद्राबाई पटवर्धन (आशा गोगटे), नेरुरकर (कमलाकर कोठारी), वसंत पटवर्धन (अजित रेगे), डॉ. विश्वनाथ जोशी (अरविंद देशपांडे), प्रा. अशोक जहागीरदार (सतीश दुभाषी), पुणेकर (शशिकांत पाटील), धारवाडकर (अनंत मिराशी), टॅक्सी चालक (सुरेश चिखले), शामाबाई (मंगला पर्वते), दगडोबा साळुंखे (राजा नाईक), आईसाहेब (उषा लिमये) आणि मध्यवर्ती भूमिका – मंजुळा (भक्ती बर्वे)!!!
  १० सप्टेंबर १९४५ या दिवशी भक्तीने‌ या जगात जन्म घेतला आणि १२ फेब्रुवारी २००१ या दिवशी या भूतलावरून ती अदृश्य झाली. तिच्या जन्मदात्या आईलाही तिचे अखेरचे दर्शन घेता आले नाही. एखाद्या शापित यक्षकन्येने गंधर्व लोकातून भुतलावर वस्तीला यावे असेच तिचे आयुष्य होते. कालिदासाच्या यक्षाला ‘वर्षभोग्येण’ एक वर्षाचाच शाप होता. हिला आयुष्यभराचा ‘मनातली असुरक्षिततेची भीती’ हाच शाप. ‘ती फुलराणी’ ठरलेली अभिनयाच्या किमयेची जणू यक्षिणीची कांडी तिच्या हाती आली होती. या किमयेने तिने प्रेक्षकांना आयुष्यभर मंत्रमुग्ध केले.’ हे वर्णन केले आहे भक्ती बर्वे यांचे निकटवर्ती पुण्याचे मधू गानू यांनी. जे यथार्थच आहे!

  अरुण आठल्ये यांनी या नाट्याचा प्रवास लिहिला आहे. तो नाट्य अभ्यासकांच्या दृष्टीने मैलाचा खडक म्हणावा लागेल. १९१२ या वर्षी मार्च ते जून या दरम्यान जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी ‘पिग्लेमियन – ए रोमान्स इन फाइव्ह ॲक्टस’ हे पाच अंकी नाटक लिहिले. पुढे ११ एप्रिल १९१४ या दिवशी ते आंग्ल रंगभूमीवर आणण्यात आले. १९३८ साली या नाटकावर ग्रेंबिल पास्कल या दिग्दर्शकाने चित्रपट आणला. त्यानंतर शॉ यांच्या मृत्यूनंतर गीतकार ॲलन जे लर्नर व संगीतकार फ्रेडरिक लोव या दोघांनी ‘माय फेअर लेडी – ए म्युझिकल प्ले इन टू ॲक्टस्’ नावाची मूळ ‘पिग्लेंलियन वर आधारित संगितीका रंगभूमीवर आणली. पुन्हा त्या संगीतिकेवर आधारित त्याच नावाचा चित्रपट १९६४ मध्ये प्रदर्शित झाला. रेक्स हॅरिसन व ऑड्री हेपबर्न या दोघांचा अभिनय गाजला. पुरस्कारही मिळाले. नंतर हिंदुस्थानात इंडियन थिएटर असोसिएशन तर्फे बेगम कुदासिया झैदी यानी ‘आझरका ख्वाब’ हे ऊर्दू नाट्य रंगभूमीवर १९७० मध्ये आणले. महिन्याभरातच इंडियन नॅशनल थिएटरचे ज्येष्ठ रंगकर्मी मधु राय यानी ‘संतु रंगीली’ हे गुजराथी नाटक रंगभूमीवर आणले. असा प्रवास करीत असलेले नाट्य १९७४ साली जानेवारी महिन्यात पहिले दोन अंक लिहून पूर्ण केले. हा नाट्यप्रवास म्हणजे नाट्यपूर्ण यादोकी सफरच!
  मुक्काम सातारा. थंडीचे दिवस. कूपर गेस्ट हाऊसमधली कोपऱ्याची खोली. दिवसभर वर्दळ. टांगे, बैलगाड्या, जिपगाड्या एस.टी.ची पळापळ, खमंग तिखट मिसळ, कटिंग चहा. या वातावरणात पुलंनी ‘ती फुलराणी’ लिहिण्यास सुरुवात केली. साताऱ्याचा ठसका त्यामुळेच नाट्यात जन्मला! ती फुलराणी नाट्याचा प्रारंभ हा पडदा उघडण्यापूर्वीच होतो. कारण त्यापूर्वी नांदी पेश होत होती. साक्षात पुलंनी लिहिलेली नांदी म्हणजे शब्दप्रभूंचा अनोखा आविष्कारच !

  ‘स्वरात व्यंजन घुसले हो… अन्ा् बंधनात मग फसले हो…
  स्वरास व्यंजन भिडले हो… नवीन कुंपण पडले हो….
  क का कि की … छ छा छि छी….
  ड डा डि डी डु डू ब बा बी बी…
  शब्द ही एक आहे.
  शब्द म्हणजे निखारा
  शब्द म्हणजे फुलोरा!

  कशावर तरी प्रेम जडावं… भक्ती जडावी… मग पहा… त्या शब्दाच्या निखाऱ्यांची सुंदर फुलं होतात! जो वाणीला ब्रह्म समजून उपासना करतो, तो वाणीच्या साम्राज्यात स्वतंत्र होतो. वाणीलाच ब्रह्म समजून जो तिची उपासना करतो. तो एखादे वेळी ब्रह्म घोटाळ्यात सापडतो. अशा ब्रह्म घोटाळ्यात सापडलेल्या एका भाषा पंडिताबद्द्लच ‘पिग्लॅगियन’ नावाचे नाटक जे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी इंग्रजीत लिहिले. पु.ल. देशपांडे यांनी त्याचे मराठीत रूपांतर केले. ‘ती फुलराणी’! पडदा उघडण्यापूर्वी गीत व स्त्री-पुरुष संवाद, नांदी यातून जी वातावरण निर्मिती पुलंनी केली, त्याला तोड नाही.

  सतीश दुभाषी एक अभ्यासू रंगकर्मी होता. आयएनटीच्या नाट्यांतून त्याचा सतत वावर होता. प्रचंड मेहनती आणि नाटकांवर प्रेम असणारा हा महत्त्वाकांक्षी अभिनेता. आय. एन. टी.च्या ‘कोंडी’ या नाटकात सतीश भूमिका करीत होता. काही प्रयोग बऱ्यापैकी झाले. तेवढ्यात सतीशला ती फुलराणीतल्या मुख्य भूमिका प्रा. अशोक जहागिरदारसाठी ऑफर आली. सतीश हा पुलंचा मामेभाऊ. ‘माझ्यासाठी एखादे चांगले नाटक लिहीना…’ असा आग्रह सतीशचा बरेच दिवस सुरू होता. अखेर योग जुळला. भक्ती बर्वे हिनेच मंजुळाची भूमिका करावी. भक्तीच त्या भूमिकेला पूर्णार्थाने न्याय देऊ शकेल, असे सुनीता ताईनी पुलंना वारंवार सांगितले, पण नाटकाची जुळवाजुळव सुरू झाली तेव्हा भक्ती ही परदेश दौ-यावर होती. ‘अजब न्याय वर्तुळाचा’ याचे प्रयोग तेव्हा फार्मात होते. पुलंनी भक्तीला काम करणार का? असे विचारले आणि तात्काळ भक्तीने होकार दिला. भक्ती बर्वेच्या नावापुढे मंजुळा ही भूमिका लागली. एका समर्थ अभिनेत्रीचा जन्म झाला. या नाट्यामुळे भक्ती बर्वे आणि सतीश दुभाषी यांच्यात जिव्हाळ्याचे भावनिक नाते खाजगी जीवनात नकळत जुळले. त्यावेळी दोघांबद्दल मीडियात खमंग बातम्यांना उधाणही येऊ लागले, पण काही प्रयोगांनंतर त्यांच्यात तणावही निर्माण झाला. १९८० सालचा गणेशोत्सव तोंडावर आला असतानाच सतीशचे निधन झाले. भक्ती पुरती कोसळली. पण नंतर सावरलीही, ‘सुयोग’च्या पुढाकाराने संजय मोनेला घेऊन चारशेच्या वर प्रयोग झाले. प्रयोग क्र.११११ शानदार साजरा झाला! तो जवळून बघण्याची संधी मिळाली.

  ‘ती फुलराणी’ यातील हळुवार असणारा संघर्ष हा दोन संस्कृतीमधला आहे. मंजुळा दगडू साळुंखे आणि प्रा. अशोक जहागिरदार या दोन व्यक्तिरेखांतील प्रेम, संघर्ष, संस्कृती याचे चित्रण पुलंनी आपल्या समर्थ लेखणीतून केले आहे. मूळ इंग्रजी नाट्यात इलायझा आणि हिगिन्स यांचे रूपांतर मंजुळा व प्रा. अशोक यांच्यात त्यांनी बेमालूमपणे केले ते थक्क करून सोडते.

  ‘असं काय म्हणता मास्तरसाहेब? गधडी काय? नालायक, हरामजादी?
  थांब.. थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा !
  मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
  तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वोंडात घालीन शान
  तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा
  तुला शिकवीन चांगलाच धडा!
  तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज
  माजी चाटत येशील बुटं, मी म्हनन, काय आज इकडं कुठं?
  हात पसरून मागशील भीक, मी म्हनन, जरा शुद्ध बोलायला शीक
  मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चल भाईर मुकाट ! ‘हे नाटकातलं स्वगतरुपी नाटक कुणी विसरू शकणार नाही.

  फुलराणीचा प्रयोग क्र. १ हा २९ जानेवारी १९७५ ला रवींद्र नाट्यमंदिरात झाला आणि ‘ती फुलराणी’ या नाटकाच्या संहितेचे प्रकाशन १२ जून १९९४ या दिवशी झाले. एकोणीस वर्षाच्या मध्यंतरानंतर नाटकाचे पुस्तक झाले. त्यादिवशी प्रयोग क्र. ११११ होता. नॉनस्टॉप १९ वर्षे ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकतंच राहिला. हे भाग्य विरळच! ‘एका कलाकृतीचा अक्षय यौवनाचा सोहळा’ असेही वर्णन त्यावेळी करण्यात आले.

  एका नाट्यकृतीला सलाम ! हॅपी बर्थ डे फुलराणी!!
  संजय डहाळे (sanjaydahale33@gmail.com)