अध्यात्मिक : संबंधांमध्ये सुमधुरता

माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. फक्त रक्ताची नाती नाही तर प्रत्येक नाती जपायची आहेत. दररोज येणारे दूधवाले, पेपरवाल्यापासून ऑफिसपर्यंत सर्वांशी चांगले संबंध निर्माण करण्याची गरज आहे. आपण असे म्हणू शकत नाही की त्यांच्याशी चांगले वागण्याची काय गरज आहे? पण नाही, सर्वांनाच एक दुसऱ्याची गरज आहे.

    ज्यांना नात्याचे मोठेपण कळत नाही ते अगदी सहज म्हणतात की “मी एकटा राहू शकतो, मला कोणाची गरज नाही” पण त्यांना सर्वात जास्त गरज वाटते. प्रत्येक नात्याचा आदर केला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाचा आदर करणे आवश्यक आहे. कोणताही माणूस लहान किंवा मोठा नसतो, आपल्या दृष्टिकोनातून आपण त्याला लहान किंवा मोठा बनवतो. जसे हाताची पाच बोटे लढू लागली की सर्वात मोठं कोण? प्रत्येकाचे महत्त्व वेगळे असते, नाही का? सर्वात लहान, शेवटचे बोट नसेल तर काय फरक पडतो? परंतु व्यावहारिकतेमध्ये त्याची उपस्थिती या हाताचे सौंदर्य आहे. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाला आणि प्रत्येक काम करणाऱ्या लोकांचे महत्त्व आहे.

    “नात्यात भावनेची जोड असेल तर नातं टिकतं, पण स्वार्थ असेल तर ते तुटतं.” माणसाला माणसाशी जोडणारा हा स्नेहाचा पूल आहे. या भावनेचे रुपांतर स्वार्थात झाले तर नातेही बदलते. जेव्हा नाते नवीन असते तेव्हा सुसंवाद असतो. शब्द, भावना सर्व छान असतात. जसजसा पुढे जातो तसतसा त्यातून सु गायब होतो, मग संवाद उरतो. आणि काही काळानंतर सं देखील निघून जातो आणि फक्त वाद उरतो. प्रेमाच्या भावनांचे रूपांतर द्वेष, मत्सर, क्रोधात होते. एखादे नाते काही काळाने जुने होते, तुटते. फक्त छोटीशी चर्चा करा, समोरच्याला जाणीव करून दया की तुम्ही माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहात.

    आज प्रत्येक घरात हे दृश्य पाहायला मिळते की प्रत्येकजण आपापल्या जगात व्यस्त आहे. मोबाईलपासून दूर बसलेली व्यक्ती त्यांना आपलं बनवण्यात मग्न आणि जवळ आहेत त्यांच्यापासून दूर असतो. एकत्र राहणाऱ्यांना याची जाणीव करून देतो की आपण खूप व्यस्त आहोत, तुमच्यासाठी वेळ नाही. ही भावना जितकी खोलवर जाते, तितकाच नात्यात दुरावा येऊ लागतो. मग त्या व्यक्तीबद्दलची नाराजी वाढत जाऊन भिंत बनते. भावना समजून घेण्यासाठी वेळ दिला नाही तर तुटल्यावर जोडण्यासाठी वेळ द्यावा लागतो.

    संबंध आणि भावना यांचे खूप जवळचे नाते आहे. ज्या संबंधांमध्ये प्रेमाची भावना आहे, तिथे वेळ निघतोच पण जिथे कोणतीही भावना नाही तिथे वेळ काढण्याची इच्छा सुद्धा होत नाही. संबंधांमध्ये विश्वास, समजूतदारपणा, काळजी… या सर्वांचीच गरज आहे आणि त्याचबरोबर कोणताही संबंध एकतर्फा असून चालत नाही. दोन्ही व्यक्तीमध्ये त्या नात्याला सांभाळायची समज हवी. नाहीतर त्या नात्यांमध्ये फक्त तडजोडच दिसून येते.

    दुसरी गोष्ट अशी की आज संबंध हा वादाचा मुद्दा झाला आहे कारण त्यामध्ये संवाद नाही परंतु फक्त वाद दिसून येतो. ‘हम किसी से कम नही’ जर संबंधांमध्ये होत असेल तर हीच नाती युद्ध भूमि बनून जाते. संबंधांमध्ये सुमधुरता (Harmony) आणायची असेल तर कधी-कधी आपण हार पत्करावी. हार मानली म्हणून आपण हरलो असे मुळीच नाही पण वादाला संपवण्याची ही एक पद्धत. हे जर आपण शिकलो तर नक्कीच आपण संबंध टिकवण्यामध्ये जिंकू शकतो.

    कोणी किती ही धनवान असला तरी मायेचा हाथ फिरवणारा, पाठीवर शाबासकीची थपथपि देणारा, दुःखी झाले तर प्रेमाची कुशी देणारी व्यक्ती जवळ असेल तर खूप काही आपल्याजवळ असल्याचे समाधान मिळते. आज एकटेपणा (loneliness) ही खूप मोठी खंत आहे. जीवनामध्ये यशस्वी खरंतर त्याला म्हणू ज्याच्या जीवनामध्ये प्रेमळ माणसांची रेलचेल आहे. धन, पद या सर्व गोष्टींनी आयुष्यामध्ये सुख-सुविधा, आराम मिळवू शकतो पण प्रेम हे विकत घेऊ शकत नाही.

    आधुनिक यंत्रांच्या गर्दीमध्ये संबंधांची किंमत आपण कमी केली आहे. आज घरातली एखादी वस्तू कोणाच्या हातातून निसटली आणि तुटली तर त्या वस्तूच्या तुटण्याचे दुःख जास्त होते. त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीला रागाच्या भरामध्ये खूप काही बोलून जातो पण व्यक्तीबरोबरचे नाते किती महत्वाचे हे विसरतो. जीवनात सुखी किंवा दुःखी होण्याचे छोटे-छोटे नियम अनुभवले, समजले तर जगणे सहज होऊ लागेल. संबंधांमध्ये गोडवा असेल तर रोज सण आणि उत्सव नाहीतर आयुष्यामध्ये विरहाचे दुःखच अनुभवायला मिळेल म्हणून नात्यांना जपा.

    बीके. नीताबेन

    bkneetaa24@gmail.com