नायिकाप्रधान चित्रपट हे मराठीचं वैशिष्ट्य…

आशय हा मराठी चित्रपटाचा हुकमी एक्का (स्टार) असं कायमच आपण म्हणतो. याचं कारण, 'चित्रपटातील गोष्ट कशी आहे', याला महाराष्ट्रीय रसिकांनी कायमच महत्व दिले आहे. असंच एक अतिशय दीर्घकालीन वैशिष्ट्य, नायिकाप्रधान चित्रपट.

  स्री व्यक्तीरेखांना केंद्रस्थानी असलेले चित्रपट हीदेखील मराठी चित्रपटाची खास ओळख. मोठीच ताकद.  सामाजिक, कौटुंबिक झालेच पण वैचारिक असो वा अगदी ऐतिहासिक चित्रपटाच्या बाबतीत हे वैशिष्ट्य आपण जपले आहे.
  झिम्मा (पहिला व आता दुसरा), बाईपण भारी देवा या चित्रपटातील महिलांच्या आनंद, सुख, दु:ख, भावविश्व या गोष्टींशी ससमाजातील विविध आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्तरातील महिला प्रेक्षक जोडला गेला हे विशेष उल्लेखनीय. काही खेळांना तर जवळपास नव्वद टक्के प्रमाणात महिला प्रेक्षकांची उत्फूर्त गर्दी. सिंगल स्क्रीन थिएटर्स ते मल्टिप्लेक्स (भविष्यात ओटीटी) असा हा मराठीतील नायिकाप्रधान चित्रपटांचा यशस्वी प्रवास व प्रभाव सुरु आहे.
  या परंपरेवर ‘फोकस’ टाकताना काही चित्रपट सांगायलाच हवेत. (त्यातील काही चित्रपटांच्या कथामूल्यावर आजच्या काळानुसार रिमेकही करता येईल.)
  भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘सूनबाई’ (१९४२) पासूनची नायिकाप्रधान चित्रपटांची वाटचाल तब्बल ८० वर्षांची आहे आणि त्यात तात्कालिक काळाचे प्रतिबिंब उमटले आहे. म्हणूनच त्या काळातील चित्रपट रसिक त्या चित्रपटांशी जोडला गेला. वसंत जोगळेकर दिग्दर्शित ‘साखरपुडा’ (१९४९), दिनकर द. पाटील दिग्दर्शित ‘शारदा’ (५१), शांताराम आठवले दिग्दर्शित ‘वहिनीच्या बांगड्या’ (५३), राजा परांजपे दिग्दर्शित ‘सुवासिनी’ (६१), गजानन जागीरदार दिग्दर्शित ‘वैजयंता’ (६१), अनंत माने दिग्दर्शित ‘मानिनी’ (६१), ‘पाहुणी’ (७६), ‘लक्ष्मी’ (७८), आणि ‘सुशिला’ (७८), यशवंत पेठकर दिग्दर्शित ‘मोलकरीण’ (६३), अशोक ताटे दिग्दर्शित ‘मंगळसूत्र’ (६८), राजा ठाकूर दिग्दर्शित ‘एकटी’ (६८), सदाशिव जे. राजकवी दिग्दर्शित ‘अन्नपूर्णा’ (६८), दत्ता माने दिग्दर्शित ‘कुंकवाचा करंडा’ (७१), व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘चानी’ (७७), दत्ता केशव दिग्दर्शित ‘भिंगरी’ (७७), वसंतराव जोगळेकर दिग्दर्शित ‘जानकी’ (७९), राजदत्त दिग्दर्शित ‘अरे संसार संसार’ (८१), मुरलीधर कापडी दिग्दर्शित ‘सावित्री’ (८३), के. जी. कोरगावकर दिग्दर्शित ‘महानंदा’ (८४), एन. एस. वैद्य दिग्दर्शित ‘लेक चालली सासरला’ (८४), सुषमा शिरोमणी दिग्दर्शित ‘गुलछडी’ (८४), विजय कोंडके दिग्दर्शित ‘माहेरची साडी’ (९१), कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘आहुती’ (९२), डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘उंबरठा’ (८०), ‘मुक्ता’ (९४), सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दोघी’ (९५), चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘बिनधास्त’ (९९), स्मिता तळवळकर दिग्दर्शित ‘सवत माझी लाडकी’ (१९९३), संजय सूरकर दिग्दर्शित ‘घराबाहेर’ (९९)… आणखीन अनेक…. सोशिक नायिका ते सूडनायिका असा हा नायिकाप्रधान चित्रपटांचा चौफेर प्रवास. कधी ग्रामीण नायिका तर कधी आजच्या ग्लोबल युगातील नायिका हादेखील एक महत्वाचा पैलू.  पडद्यावरील नायिकेचे दु:ख प्रेक्षकांनी (विशेषत: ग्रामीण भागात) आपलं मानलं. तिला प्रचंड सहानुभूती दिली. आणि आक्रमक नायिकेने दे मार पवित्रा घेत खलनायकाला मारधाड करताच टाळ्या शिट्यांनी थिएटर डोक्यावर घेतले.
  विशेष उल्लेखनीय गोष्ट, अनेक स्वरुपाच्या गोष्टी या नायिकाप्रधान चित्रपटात दिसल्या आणि या चित्रपटांना रसिकांचा उत्तम प्रतिसादही मिळाला. या यशोगाथेत आणखीन काही विशेष पैलू आहेत. ‘मानिनी’, ‘एकटी’, ‘महानंदा’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘घराबाहेर’, ‘मी सिंधुताई सकपाळ’ या चित्रपटाना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला. ‘एकटी’ या चित्रपटाची हिंदीत ‘प्यासी आँखे’, अशी रिमेक करण्यात आली. तर मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’वरुन (१९५७) ‘अरे संसार संसार’ निर्माण झाला होता. ‘उंबरठा’ चित्रपट एकाच वेळेस मराठी व हिंदीत निर्माण झाला. हिंदीत त्याचे नाव ‘सुबह’ होते. एका नवविचाराची नायिका हे त्याचे वैशिष्ट्य. हीच नायिकाप्रधान चित्रपटांची वाटचाल मी सिंधुताई सकपाळ, मणि मंगळसूत्र, हिरकणी, चंद्रमुखी अशी पुढेही सुरु आहे. या वाटचालीत चरित्रपट, ऐतिहासिक व्यक्तीरेखा अशी बहुस्तरीय भर पडतेय. ….आणि या विविध प्रकारच्या स्री व्यक्तीरेखा साकारण्याची गुणवत्ता आपल्या अभिनेत्रींत होती आणि आजही आहेच. त्यांच्या अभिनय क्षमता, भूमिकेची समज,  लोकप्रियता यातून हे नायिकाप्रधान चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहचताहेत.
  मराठी चित्रपटाच्या वैभवशाली वाटचालीतील ‘नायिकाप्रधान चित्रपट’ ही  सकारात्मक ठसा उमटवणारी, प्रचंड उर्जा असलेली अशी वाटचाल आहेच….

  –    दिलीप ठाकूर