मानवतावादी मानसशास्त्रज्ञ

  वेगवेगळ्या विचारधारांद्वारे पाश्चात्य मानसशास्त्रामध्ये मनाविषयीची समजूत कशी प्रगल्भ होत गेली किंवा वेगवेगळ्या विचारधारांनी ‘मन’ ही संकल्पना कशी अधिकाधिक संपृप्त झाली, याविषयी आपण आत्तापर्यंत पाहत आलो आणि पाहत आहोत. साधारणतः १९५० पर्यंत मनोविश्लेषण वाद व वर्तनशास्त्र या दोन उपशाखा मानसशास्त्रामध्ये चांगल्याच रुजल्या. जरी या दोन्ही उपशाखा मनाविषयी वेगवेगळी समजूत असलेल्या होत्या, तरीही त्या दोन्हींवर आधारित अनेक प्रयोग, अनेक-विध लिखाण होत राहीले. परंतु पाश्चात्य जगतामध्ये किंवा संपूर्ण पाश्चात्य संस्कृतीमध्ये, मानवी जगामध्ये, दोन महायुद्धांमुळे जी काही उलथा-पालथ झाली, त्यामुळे संपूर्ण मानवी समाज, ढवळून निघाला, संस्कृतीला हादरे बसले. खूप साऱ्या मूल्यांचा, परंपरांचा ऱ्हास झाला. तरीसुद्धा काहीतरी नवीन, या सगळ्या घुसळणीतून जन्म घेत होते.

  “यांत्रिकीकरण”, “औद्योगिकीकरण” किंवा “गावांचे विकेंद्रीकरण”, “अति शहरीकरण” या सर्व आव्हानांमुळे व दोन महायुद्ध झाल्यामुळे, माणसांची मने दिग्मूढ झाली, पिचून गेली आणि या सगळ्यातूनच एक महत्त्वाची विचारधारा पाश्चात्य संस्कृतीमध्ये, मूळ धरू लागली ती विचारधारा म्हणजे “अस्तित्व वाद”. या संपूर्ण विश्वाच्या पसाऱ्यामध्ये प्राणी, पक्षी व जीवांच्या उतरंडीमध्ये, मानवाचे नेमके स्थान कोणते? त्याच्या जगण्याचे, इपसीत काय? त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे का? कोणत्या मूल्यांच्या आधारे त्यांनी त्याचे आयुष्य कंठावे? असे अनेक मूलभूत प्रश्न, माणसांना त्रास देऊ लागले. परात्मतेची जाणीव, विफलतेची जाणीव, नात्यांवरचा, मानवी चांगुलपणावरचा, उडून गेलेला विश्वास, या सगळ्यांमुळे, “अस्तित्ववादी जाणिवा” व “व्यक्ती केंद्र जाणिवा” मूळ धरू लागल्या. व्यक्तीचे जीवन-साफल्य हे, समष्टीनिष्ठ न राहता, अधिक व्यक्तिनिष्ठतेकडे जाऊ लागते. अर्थात, या जाणिवांमधून अनेक नवे विचारवंत, नवे विचार, नवीन कला-दृष्टी, नवनवीन विद्या शाखा तयार होऊ लागल्या. संपूर्ण युरोपमध्ये व इंग्लंड, अमेरिकेतही अर्थातच अस्तित्ववादाने १९५० पर्यंत चांगलेच मूळ धरले होते.

  आपण आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, साधारणतः फ्राईड, ॲडलर यांच्यापासूनच व्यक्तिनिष्ठ मानसशास्त्राला व मनाच्या आकलनाला सुरुवात झाली होती. अस्तित्ववादामुळे या व्यक्तीनिष्ठ समजूतीला अधिकच गहिरेपणा आला. प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असून, तिचे अबोध मन, तिचे बालपण, तिच्यावर होणारे संस्कार, तिचा स्वातंत्र्याचा अर्थ, हे सगळे निरनिराळे आहे, ही जाणीव अधिकाधिक महत्त्वाची ठरायला लागली. स्त्रिया घराबाहेर पडल्या. स्त्रीवाद नव्याने आपली जागा या पैसामध्ये शोधू लागला. या सर्वांमुळे व्यक्तीचे मन, एकेका व्यक्तीचे मन आणि तिचे भावनिक पॅकेज, हे समजून घेणे, मानसशास्त्राला महत्त्वाचे वाटायला लागले. अर्थात, जसे अनेकांना फ्राईडबद्दल वाटत होते, तो विचार कार्ल रॉजर्स यांच्याही मनात होता व त्यांनी मनोवश्लेषणाच्या सिद्धांताला मागे टाकून, आणखीन काही नवे वेगळे आयाम, मानवी मनाच्या जडणघडणीमध्ये कसे महत्त्वाचे आहे, हे मांडायला सुरुवात केली व मानसशास्त्रामध्ये तिसरी अत्यंत महत्त्वाची उपशाखा “मानवतावाद” उदयास आणली. “A Way of Being”, “On Becoming the Person : A Theorist’s view of Psychotherapy” अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली.

  “कार्ल रॉजर्स” यांना मानवतावादी मानसशास्त्राचा जनक मानण्यात येते. “मनो-विश्लेषणशास्त्र” याबरोबरच त्यांनी “मानवतावाद”, मानसशास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रुजवला. त्यांचा सिद्धांत समजून घेण्यासाठी, त्यांनी मांडलेल्या मनाविषयीच्या काही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रथमतः कार्ल रॉजर्स यांच्या मते, “माणूस हा प्राणी बऱ्यापैकी चांगला, काहीसा शिस्तप्रिय व शांततेत जीवन जगू इच्छिणारा असा प्राणी आहे” सार्वत्रिकपणे बोलायचे झाल्यास, त्याचे “मन” हे बऱ्यापैकी सामान्य असे “मन” आहे. प्रत्येक मानवाच्या मनामध्ये आशा, आकांक्षा असतात, त्याहून अधिक चांगले जगण्याची जिजिविषा या सर्व गोष्टी निसर्गतःच असतात. परंतु केव्हातरी विचित्र परिस्थितीमुळे माणूस भांबावून जातो, स्वतःलाच कमी लेखायला लागतो किंवा त्याची स्वप्रतिमा डागाळून जाते आणि यातूनच तो मनोव्याधीग्रस्त होतो. त्याचे वर्तन सामान्यापासून (Normal), कुठेतरी असामान्य (Abnormal) होऊ लागते. ह्या अशा असामान्य (abnormal) वागण्याचे खरे म्हणजे, त्याच्या बालपणाशी किंवा त्याच्या दबून राहिलेल्या इच्छा व संघर्षांची संबंध असतोच असे नाही, किंबहुना तो तसा नसतो.
  हे नेमकं कसं घडतं? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

  कार्ल रॉजर्स यांनी माणसाच्या मनाची जडणघडण लहानपणी कशी होते? याविषयीचे एक ब्लू-प्रिंट किंवा नकाशा तयार केला. त्यांच्या मते, “बालक हे अवतीभवतीचे, त्याच्याशी कसे वागतात?, त्याच्याविषयी काय बोलतात? यावर आधारित आपली स्व-प्रतिमा घडवत असतो.” त्यांच्यामध्ये एकूणच मानवी व्यवहारांमध्ये, चार प्रकारचे Regards असतात.

  “१. negative unconditional regard”,
  “२. conditioner negative regard”,
  “३. conditioner positive regard”,
  “४. unconditional positive regard”

  बालक मोठे होत असताना किंवा नात्यानात्यांमध्ये अनेकदा काही पूर्व अटी बालकापर्यंत पोहोचवल्या जातात उदाहरणार्थ, शहाणा मुलगा नेहमी किंवा रोज अभ्यास करतो. शहाणी मुलगी कमी बोलते, यात होते असे की, यापैकी जर, बालक काही गोष्टी पूर्ण करत असेल, तरच त्याच्यावर प्रेमाचा, स्वीकाराचा वर्षाव केला जातो. परंतु कधी कधी असे दिसून येते की, जर का, यापूर्वी ते बालक पूर्ण करू शकले नाही तर मात्र त्याला रागवण्यात, ओरडण्यात किंवा त्याचा अस्वीकार करण्यात, या गोष्टीची परिणिती होते. चिंतेमध्ये (Anxiety) काही दुर्दैवी बालकांच्या बाबतीत तर असे घडते की, ते कसेही वागले, तरीही त्यांच्या वाट्याला वंचना व कधी-कधी दूर्वतन याच गोष्टी येतात. कार्ल रॉजर्स यांच्यामते, हे सगळे घडत असताना, प्रत्येक माणसाच्या मनात, स्वप्रतिमा उभी राहत असते परंतु, ही स्वप्रतिमा दोन पातळीवर किंवा दोन डायमेन्शनमध्ये असते. एक “वास्तववादी प्रतिमा” व दुसरी “आदर्श प्रतिमा”. अनेक पूर्वटी घालत गेल्यास, बालकाला स्वतःचा स्वीकार करणे कठीण होत जाते व त्यामुळे आदर्श प्रतिमावाद याच्यात दरी पडायला लागते व त्यामुळे एक प्रकारचा Incongruous किंवा स्व-मध्ये दरी निर्माण होते. मी नेमका कसा आहे? असा संभ्रम मनामध्ये मूळ धरू लागतो व यातूनच चिंता, उदासीनता, गोंधळ (anxiety, depression, confusion) अशा अनेक व्याधी मूळ धरू लागतात. कार्ल रॉजर्स हे नुसतेच मानवतावादी विचारवंत नव्हते, तर ते कृती विचारक होते. “संपूर्ण समुपदेशनात्मक मानसशास्त्र” ही त्यांची जगाला दिलेली देन् आहे.

  हे असे मानवी मनात घडते, एवढे सिद्धांत मांडून ते थांबले नाहीत, तर ही जी दरी आहे किंवा मनाचा ढासळलेला जो तोल आहे, तो सावरण्यासाठी नेमक्या काय उपाय योजना असाव्यात, याविषयीचा विचार सुद्धा त्यांनी मांडला व तो प्रत्यक्ष कृतीतून घडवून आणला. कार्ल रॉजर्स यांच्या म्हणण्यानुसार, “समुपदेशनामध्ये समुपदेशक व सुभार्थी यांच्यात परस्पर विश्वासाचे, परस्पर समृद्धीचे, केवळ आणि केवळ दोन माणसांमधील संवादाचे, नाते निर्माण होते, त्यावेळेला शुभार्थीला, आपल्या मनातील खदखद आणि दरी स्वतःहून पाहायची हिम्मत निर्माण होते व त्यामुळे नेमक्या स्वतःच्या कुठल्या अपेक्षांमुळे किंवा जवळच्या लोकांच्या कुठल्या अपेक्षा वा परिस्थितीमुळे आपले मन असे बेताल होते, याचा त्याला अंदाज येतो व त्यातून एकदा का भावनिक गल्लीमध्ये निघून, वैचारिक गल्लीमधून ती व्यक्ती आली की, या दोघांमध्ये तयार झालेल्या तरल नात्यामुळे, विश्वासामुळे ती व्यक्ती शांत, आरामदायी (Relax) होऊन जाते व मनाचा ढळलेला तोल कशाप्रकारे सावरता येतो? याचा आपणच विचार करू लागते.” शुभार्थीचा संपूर्ण स्वीकार हा कार्ल रॉजर्स यांच्या उपचार पद्धतीचा गाभा आहे. किंबहुना नात्यांमध्ये असा स्वीकार असणे, माणसाचा “माणूस” म्हणून स्वीकार करणे किंवा आदर करणे हे त्यांच्यामते खूप महत्त्वाचे आहे आणि त्यातच मानसिक व्याधींचा उपचार सामावलेला आहे, असे त्यांनी त्यांच्या प्रॅक्टिसमधून सिद्ध केले.

  Unconditional positive regard याविषयी वाचताना व त्यांच्या एकूण समुपदेशनाबद्दलच्या कल्पना समजून घेताना अनेकदा मला संत तुकारामांची आठवण येते. संत तुकाराम म्हणत, “ऐसी कळवळ्याची जाती, करी लाभावे न प्रीती”. “लहानपणी आपल्या चुकल्या माकल्या लेकराला कुठल्याही अटी न ठेवता, जवळ घेणे काही फार गोष्टी त्याला जमत नसतील, तरी माफ करून टाकणे, ह्या गोष्टी पालकत्वामध्ये अपेक्षित आहेत”, असे कार्ल रॉजर्स यांना वाटते. आणि तरीसुद्धा अनेकदा नात्या-नात्यांमधील तणावांमुळे किंवा खरोखरच युद्ध किंवा निर्वासितता किंवा इतर अनेक मानवी दुःखमय परिस्थितीमुळे मनाचा तोल घडण्याची निश्चितच शक्यता असते, त्यावेळेस जर का, व्यक्तीला असे नाते मिळाले, उपचार पद्धती मिळाली तर ती व्यक्ती पुन्हा एकदा सकारात्मकतेकडे चालू लागते, असा विश्वास रॉजर्स यांच्या सिद्धांतामध्ये तसेच उपचार पद्धतीमध्ये आपल्याला ठाई-ठाई जाणवतो. पुढे जाऊन, “अब्राहम मास्लो”, “विक्टर फ्रैंकल” यासारख्या मानवतावादी मानसशास्त्रज्ञांनी या सकारात्मकतेवर तसेच स्वीकारावर माणसाला पुढे नेणाऱ्या, किंवा आशावादावर विलक्षण भर देणारे सिद्धांत मांडले. त्याविषयी पुढील लेखात बघू.

  – डॉ. सुचित्रा नाईक