cricket ground

आयसीसीचा ७० मीटर्सपेक्षा मोठ्या, दूरवरच्या सीमारेषेबाबतचा आग्रह आणि अट कशी पूर्ण केली जाईल; हेही एक कोडे आहे. कारण मुंबई, दिल्ली यासारख्या जुन्या कसोटी केंद्रांवरच्या सीमारेषांचे अंतर मर्यादित आहे. काही कोपरे ६०-६५ मीटर्स एवढ्याच अंतरावर आहेत. अशावेळी आयसीसी काय करू शकेल. मुळातच यंदाच्या, विश्वचषकात बीसीसीआय आयोजनाच्या बाबतीत नियोजित वेळेपेक्षा खूपच मागे आहे.

  म्हणता म्हणता विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तोंडावर आली देखील. ५ ऑक्टोबरला आरंभाचा ‘टॉस’ अहमदाबादला उडेल. दरम्यान एक वृत्त भारतात येऊन थडकलं आहे. म्हणे, आयसीसीने सर्व केंद्रावरच्या ‘क्युरेटर्स’साठी खेळपट्ट्या कशा असाव्यात यासाठी आदेश जारी केला आहे. नाणेफेकीचा कौल निर्णायक होऊ नये यासाठी हा फतवा आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर सामन्यांच्या उत्तरार्धात पडणाऱ्या ‘दवा’चा अवास्तव लाभ कुणालाही होऊ नये यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. त्यासाठी खेळपट्टीवर अधिक गवत ठेवण्यात यावे. सीमारेषा जी आयपीएल सामन्यात काही ठिकाणी बरीच आत आणण्यात येते. ती नियमानुसार किमान ७० ते ७५ मीटर्स अंतरादरम्यान असावी; आदी आदेश देण्यात आल्याचे कळते.

  प्रत्यक्षात, आयसीसीने असे खरोखरच केले आहे का? कारण आयसीसीकडे ॲन्डी ॲटकीन्सन नावाचा खेळपट्ट्यांबाबतचा एक सर्वोत्तम तज्ज्ञ आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, नियम बुकांमध्ये खेळपट्टी कशी असावी याबाबत अनेक गोष्टी अधिक स्पष्टपणे नमूद केलेल्या आहेत.

  आयसीसीला भीती का वाटावी?
  या भितीपाठीही कारणे आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या क्रिकेट संघाच्या इच्छेचा वाजवीपेक्षा अधिक आदर करतो हा आजवरचा अनुभव आहे. गेल्या दशकातील सर्वाधिक खराब दर्जाच्या खेळपट्‌ट्यांबाबतच्या तक्रारी भारतातील खेळपट्‌ट्यांबाबतच अधिक प्रमाणावर आल्या आहेत. आयसीसीनेही याबाबत बीसीसीआयला व त्या-त्या केंद्रांना निकृष्टदर्जाचे लेबल लावून, ताकीद दिली आहे. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कोणत्याही संघाला खेळपट्टीकडून अवाजवी, अवास्तव लाभ मिळू नये हे आयसीसीला वाटणे साहजिकच आहे.

  खेळपट्ट्या फिरकीला पोषक करण्यासाठी भारतात किती अघोरी प्रकार केले जातात याचा अनुभव दस्तुरखुद्द ॲन्डी अॅटकीन्सन यांना यापूर्वी आला आहे. यामुळे दोन देशांमधील मालिकेदरम्यान पुरविण्यात आलेले हे लाड, चोचले, विश्वचषकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पुरविले जाऊ नयेत असे आयसीसीला वाटणे साहजिकच आहे.

  आयसीसी किती अंकुश ठेऊ शकेल?
  मुळातच भारतासारख्या खंडप्राय देशात एकाच दर्जाच्या खेळपट्‌ट्या अपेक्षित करणे चुकीचे आहे. भारताला उत्तरेकडील, पूर्वेकडील, पश्चिमेकडील आणि दक्षिणेकडील, हवामान, भौगोलिक परिस्थिती मैदाने, खेळपट्‌ट्या यावर परिणाम करणारी आहे. मुळातच हा विश्वचषक आयोजित करण्याचा कालावधी चुकला आहे, असे अनेकांचे मत आहे.

  कारण ऑक्टोबर महिन्यात पश्चिम, उत्तर, पूर्व भारतातून मान्सून परतीच्या मार्गावर असतो. परतीचा तो प्रवास बऱ्याच वेळा लांबतो आणि ऐन दिवाळीपर्यंत महाराष्ट्रात देखील पावसाचा मुक्काम असल्याचे आपण पाहिले आहे. उत्तरेकडे आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती असते. याच वेळी दक्षिणेकडील राज्यांमध्ये दुसऱ्यांदा येणाऱ्या पावसाच्या आगमनाची सुरुवात होते. म्हणजे तामीळनाडू, कर्नाटक राज्यांमधील सामन्यांना त्यावेळी या पावसाचा फटका बसू शकतो. सारं काही निसर्गाच्या मेहेरबानीवर अवलंबून आहे.

  परतीच्या मान्सून काळात क्रिकेट मैदाने आणि खेळपट्‌ट्यांखालचे ‘वॉटर टेबल’ निर्णायक ठरत असते. म्हणजे खेळपट्‌ट्यांमधील ताजेपणा एखाद्या बलाढ्य फलंदाजीच्या संघाला देखील अल्प धाव संख्येत नेस्तनाबूत करू शकतो. एवढी अवाजवी मदत त्या काळात गोलंदाजांना मिळू शकते. काही सामान्य गोलंदाज देखील अचानक भेदक वाटू शकतात.

  पावसाच्या व्यत्ययानंतर आयसीसीला अधिक काळजी वाटते, ती सामन्याच्या उत्तरार्धात पडणाऱ्या दवबिंदूंची.
  आयपीएल स्पर्धेदरम्यान अनेक संघाना या गोष्टीचा फटका बसला होता. त्यावर उपाय म्हणून बीसीसीआयने एक विशिष्ट प्रकारचे रसायन संपूर्ण मैदानावर मारण्याचा प्रयोग करून पाहिला होता. सध्याही, दोन डावांच्या दरम्यान आणि सामन्याला सुरुवात होण्याआधी हे रसायन मैदानावर मारले जाते. त्यामुळे गवताच्या टोकावर दवबिंदू जेव्हा जमा होतात; ते सरळ खाली वाळूमिश्रीत मैदानाच्या तळाशी जातात. त्यामुळे दवाचा परिणाम किंवा फटका गोलंदाजी करणाऱ्या संघाला काही काळ बसत नाही. मात्र काही तासांनी, जेव्हा दवबिंदू अधिक प्रमाणावर पडायला सुरुवात होते, तेव्हा हे रसायण देखील फार काही करू शकत नाही. मैदानावरील तृणांकूर हार मानतात आणि मग दवाचा परिणाम मैदानाच्या पृष्ठभागावर दिसायला लागतो. चेंडू अधिक झपाट्याने ओलसर व्हायला लागतो. प्रत्येक ‘ग्राउंड शॉट’च्या वेळी चेंडू अधिकाधिक पाणी शोषून घेतो. आणि त्यानंतर तो स्वींगही फारसा होत नाही किंवा स्पिन गोलंदाजांनाही मदत करीत नाही. अशा वेळी सरळ बॅटने खेळणाऱ्या फलंदाजाला बाद करणे कठिण होऊन बसते. आणि त्यानंतर मात्र तोच फलंदाज परिस्थितीचा लाभ उठवून तूफान फटकेबाजी करायला लागतो आणि अचानक सामन्याचे चित्र पालटायला लागते.

  क्रिकेटने शोधून काढलेल्या या रसायनामुळे दव पडण्याची प्रक्रिया काही थांबविता येत नाही. त्यामुळे प्रत्येक सामन्याच्यावेळी सर्वांनाच निसर्गाच्या लहरीवरच अवलंबून रहावे लागते. अशा वेळी मानवाच्या मर्यादा निसर्गापुढे स्पष्ट व्हायला लागतात. क्रिकेट या खेळाची गुणवत्ता काही अंशी तेथेच पराभूत होताना दिसते.

  या पराभवाला सामोरे जाऊन त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न सध्या आयपीएलमध्ये पहावयास मिळतो. बऱ्याच संघांचे सर्व प्रमुख गोलंदाज, प्रामुख्याने फिरकी गोलंदाज नेट्समध्ये, पाण्यात भिजवून ठेवलेल्या चेंडूने गोलंदाजी करतात. काहींनी तर प्रत्यक्ष सामन्यात आपली पिटाई झालेले चेंडूच, पंचांकडून मागून घेलते आहेत. त्या चेंडूवर ते आपल्या संघाच्या प्रमुख फलंदाजांना गोलंदाजी टाकून फरक काय पडतो तेही पाहतात. प्रयत्न स्त्युत्य आहे. परंतु नैसर्गिक परिस्थितीनुरुप होणारे, वातावरणातील बदल, खेळपट्टीच्या पृष्ठभागावरचे बदल, खेळपट्‌टीच्या ओलसरपणामुळे होणारा गोलंदाजीवरचा परिणाम आदी गोष्टी, अलिखित आहेत. त्या परिस्थितीला त्या त्या वेळी तुम्ही कसे सामोरे जाता यावरच तुमचे यश अवलंबून आहे.

  आयसीसीचा ७० मीटर्सपेक्षा मोठ्या, दूरवरच्या सीमारेषेबाबतचा आग्रह आणि अट कशी पूर्ण केली जाईल; हेही एक कोडे आहे. कारण मुंबई, दिल्ली यासारख्या जुन्या कसोटी केंद्रांवरच्या सीमारेषांचे अंतर मर्यादित आहे. काही कोपरे ६०-६५ मीटर्स एवढ्याच अंतरावर आहेत. अशावेळी आयसीसी काय करू शकेल.

  मुळातच यंदाच्या, विश्वचषकात बीसीसीआय आयोजनाच्या बाबतीत नियोजित वेळेपेक्षा खूपच मागे आहे. नवनव्या समस्या उद्भवल्यास खेळाडू आणि प्रेक्षकांचे अधिक हाल होणार आहेत. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे म्हटल्यास, पुण्याचे विश्वचषक सामनेही धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण, आयोजन व्यवस्थेसाठी एकाच कंपनीने अर्ज केला आहे. आयोजनाबाबत आयसीसीच्या नियम-अटिंची पूर्तता ती कंपनी करू शकत नाही. या आधीच्या सामन्यांचे आयोजन करण्याऱ्या कंपनीने यावेळी स्वारस्य दाखविले नाही. याबाबत आता आयसीसी आणि बीसीसीआय काय करतात ते पाहूया!

  – विनायक दळवी