
आपल्याकडे थंडीच्या दिवसांत तिळाचं महत्त्व सांगितलं आहे. संक्रांतीच्या निमित्तानं तीळगूळ आणि त्याचे पदार्थ आपण पारंपरिक पद्धतीनं खातोच. तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण मानले जातात आणि या दिवसांत शरीराला उष्णता मिळण्यासाठीच ते पूर्वापार आपल्या आहारात घ्यायला सांगितले असावेत. आयुर्वेदासारख्या पुरातन शास्त्रातही तिळाचं महत्त्व सांगितलेलं आहे.
खरंतर बहुगुणी तिळाचा उपयोग योग्य प्रमाणात वर्षभर केला पाहिजे. तिळाची पूड भाजीत टाकणे, फोडणीत तीळ घालणे, चटणी, वड्या, लाडू याद्वारे पोटात तीळ गेले तर उत्तम. काही प्रांतात तिळाचे तेल लोणच्यात घालतात. सलादवर फोडणीसाठी तिळाचे तेल वापरले जाते. विविध प्रांतात संक्रात विविध वैशिष्ट्यांनी साजरी केली जाते. पंजाबमध्ये लोहडी (लोडी) या संक्रांतसदृश्य सणासाठी रेवड्या मिठाई दिली जाते. गुजरातेत संक्रांतीला पतंगाची धामधुम असते. तिळाची चिक्की, उंधियो वैगेर पदार्थ बनविले जातात. घराच्या गच्चीवर पतंग उडविणे, एकत्र जेवणे, असे कार्यक्रम होतात. मध्यप्रदेशात गुळ आणि साखरेचे खुसखुशीत गजक (तिळाच्या वड्या) खाल्या जातात. त्याठिकाणी तिळाच्या साटोऱ्या बनविल्या जातात. एकूणच काय तर नववर्ष हे तीळ आणि गुळाच्या पदार्थांनी साजरे केले जाते. पूर्वी तिळाचे पदार्थ घरोघरी केले जात असत. आजकाल बाजारात तिळाचे पदार्थ रेडीमेड मिळतात. पण पदार्थ स्वत: बनविण्यात एक वेगळाच आनंद असतो.
तिळाची बर्फी
साहित्य- साध्या तिळाचे कूट- २ वाट्या (तीळ किंचित भाजून कूट करावा), खवा- १ वाटी, साखर- २ वाट्या, चारोळी- २ टे.स्पून (किंचित भाजावी), वेलची पूड किंवा रोझ इसेन्स
कृती- खवा पाच मिनिटे परतवून मोकळा करावा. साखरेत अर्धी वाटी पाणी घालून एकतारी पाक करावा. त्यात खवा, तिळकूट, चारोळी घालून ढवळावे. गॅसवरून उतरवून वेलची पूड/ इसेन्स घालून तूप लावलेल्या ट्रेमध्ये जाडसर थापावे. वाटले तर बदाम, पिस्ते काप लावावे. चौकोनी वड्या कापाव्या. (गुळाऐवजी साखर वापरून केलेल्या वड्या चवीला छान लागतात.)
तीळ-खजुराचे लाडू
साहित्य: पाव किलो तीळ भाजून बारीक दळलेली, अर्धा किलो पिंड खजूर धुऊन बारीक केलेले, एक कप खरबुजाच्या बिया, एक कप किसलेले ओले खोबरे, वेलदोडा पूड.
कृती: खजुराच्या पेस्टमध्ये तीळ, ओले खोबरे, वेलची पूड व खरबुजाच्या बिया मिक्स करून घ्या. लहान-लहान लाडू बनवून घ्या. खोबरे कीस वरून लावा. व लाडू सर्व्ह करा.
तीळ साटोरी
साहित्य : मैदा अर्धा किलो, पिठी साखर पाऊण किलो, खवा १२५ ग्रॅम, खसखस अर्धी वाटी, तीळ पाव किलो, तूप १२५ ग्रॅम, वेलची पूड, अर्धा टी स्पून मीठ.
कृती : तीळ, खसखस खमंग भाजून कुटावे. खवा भाजून त्यात पिठीसाखर घालून परतावे. त्यात तीळकूट व खसखस पूड घालावी. खाली उतरवून वेलची पूड घालावी, सारखे भाग करावे (त्यापूर्वी थोडे थंड होऊ द्यावे.) मैदा व मीठ घालून पाऊण वाटी कडकडीत तेलाचे मोहन घालून पीठ घट्टसर भिजवावे. तासाभराने कुटून किंवा फूडप्रोसेसरमधून काढून सारखे मोठ्या पुरीसाठी गोळे करावे. एका गोळ्याची वाटी करून त्यात पुरण (सारण) भरून बंद करून हलक्या हाताने साटोरी लावावी. साटोऱ्या थेट तळतात. पण त्या आधी तव्यावर हलक्या (दोन्हीकडून) बदामी भाजून, गार करून तळल्यास खूप खुसखुशीत होतात. अशाच प्रकारे पण करंजीचा आकार देऊन तळता येतात. त्याला ‘कोसला’ असे नाव विदर्भात आहे. साखरेऐवजी गूळही वापरता येतो.
तीळ-खसखस-बदाम वडी
साहित्य : तीळ- एक वाटी, खसखस- एक वाटी, बदाम- अर्धी वाटी, साखर- दोन वाट्या, पिठीसाखर- दोन टे. स्पून, तूप- एक टे. स्पून, वेलची, जायफळ, केशर.
कृती : बदाम, खसखस, तीळ रात्री वेगवेगळे भिजवून बदामाची साले (सकाळी) काढून एकत्र बारीक वाटावे. वाटण्यापूर्वी चांगले निथळावे. तुपावर वाटलेला गोळा परतून घ्यावा. साखरेत अर्धी वाटी पाणी घालून दोनतारी पाक करावा. त्यात वरील परतलेला गोळा घालून घट्टसर शिजवावे. एकदम घट्ट गोळा नको. खाली उतरवून वेलची, जायफळाची पूड व केशर घालावे. पिठीसाखर लागेल तशी घालून वड्या थापाव्या. कोमट असताना वड्या कापाव्या.
तिळाची टोमॅटो रस घालून वडी
साहित्य : पॉलिश तीळ पाव किलो, लालबुंद टोमॅटो अर्धा किलो, साखर- पाव किलो, सुके खोबरे कीस- पाव वाटी, पिठी साखर- पाव वाटी, वेलची पूड.
कृती : तीळ धुऊन चोळून जमतील तेवढी साले काढून जरा ओलसर असतानाच गुलाबी भाजून अर्धवट कुटावे. पाणी न घालता टोमॅटो उकडून रस काढून गाळून घ्यावा. साखरेत टोमॅटो रस घालून दोनतारी पाक करावा. उकळून थोडा आणखी घट्ट झाला की, उतरवून तीळकूट, खोबरे कीस, वेलची पूड घालून घोटावे. थोडी पिठीसाखर घालून थापावे. लगेचच वडय़ा कापाव्यात. आंबटगोड वडी चांगली लागते.
बटाटे, ओला नारळ घालून तिळाची बर्फी
साहित्य : तीळ पाव किलो (भाजून कुटावे), नारळ अडीच वाट्या खवलेला, बटाटे तीन वाट्या किसून (उकडून किसावे), साखर पाऊण किलो, पिठी साखर, वेलची-जायफळ पूड, केशर वेलची सिरप/ केशर काडय़ा.
कृती : नारळाचा चव मिक्सरमधून किंचित दूध घालून वाटून घ्यावा. साखर, नारळ चव, बटाटा कीस शिजवत ठेवावा. जरा घट्ट झाल्यावर तिळाची पूड घालावी. घट्ट होऊन मध्ये गोळा झाल्यावर उतरवून थोडी पिठीसाखर भुरभुरून, वेलची-जायफळ घालून घोटून वडय़ा थापाव्या. वरून केशर-वेलची सिरप किंवा केशर काड्या लावाव्या. सुंदर दिसते. कोमट असताना बर्फी कापावी.
तिळाची चटकदार कचोरी
साहित्य : मैदा चार वाटय़ा, तूप मोहनासाठी पाऊण वाटी, मीठ, तीळकूट, एक वाटी, कोथिंबीर अर्धी वाटी चिरून, मिरचीचा ठेचा आवडीनुसार, धणे-जिरे पूड एक टे. स्पून, गरम मसाला एक टी. स्पून, मीठ व साखर, बारीक शेव अर्धी वाटी किंवा आवडीनुसार तळण्यासाठी तेल.
कृती : मैदा, मीठ एकत्र करून त्यात मोहनाचे तूप चोळून पीठ घट्टसर (कणकेप्रमाणे) भिजवावे. तीळकूट, कोथिंबीर, ठेचा, मीठ, साखर, धणे, जिरे पूड व गरम मसाला घालून सारण बनवावे. चटकदार झणझणीत करावे. यातच खोबरे, खसखस भाजून कुटून छान लागते. मैद्याचे लिंबाएवढे गोळे करून सारण भरून कचोऱ्या कराव्या. तेल चांगले तापवून कचोऱ्या गुलाबी तळाव्या.
– सतीश पाटणकर
sypatankar@gmail.com