एक स्वातंत्र्यदिन असाही…..

ट्रॅफिक सिग्नल वर भर उन्हात, पावसात थांबून विविध प्रकारचे झेंडे विकणारे ती मुले, गरीब माणसे या वर्षी दिसली नाही. शालेय स्तरावर नेहमी ऐकू येणारी गजबज यावर्षी ऐकू आली नाही. पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळा, कॉलेजेस, पतसंस्था शांत शांत दिसून आल्या.

ट्रॅफिक सिग्नल वर भर उन्हात, पावसात थांबून विविध प्रकारचे झेंडे विकणारे ती मुले, गरीब माणसे या वर्षी दिसली नाही. शालेय स्तरावर नेहमी ऐकू येणारी गजबज यावर्षी ऐकू आली नाही. पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शाळा, कॉलेजेस, पतसंस्था शांत शांत दिसून आल्या. या सर्वामागचे कारण फक्त एकच ते म्हणजे ‘कोरोना’. जगात थैमान घातलेल्या या कोरोना विषाणू ने भारतीय लोकांचे जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या या कोरोनाने देशाचे आर्थिक स्थरावर खूप नुकसान झाले आहे. आणि याच कोरोनाचे सावट पडले ते देशाचा स्वाभिमान उंचावणाऱ्या दिवसावर म्हणजे स्वातंत्र्यदिनावर.

शालेय स्थरावर स्वातंत्र्यदिन खूप उत्साहात साजरा केला जातो. मुलांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम, देशभक्तीपर गीते, प्रमुख पाहुण्यांचे भाषण या सगळ्याचे आयोजन १५ ऑगस्टला या आधी शाळेत करण्यात येत होते.  परंतु यावर्षी कोरोनाच्या या वाढत्या संकटामुळे हा स्वातंत्र्यदिन अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला गेला. या दिवशी शाळेत ना कोणत्या प्रकारचा गोंधळ होता,  ना विद्यार्थी. जवळपास सर्व शाळांची मैदाने विद्यार्थ्यांविना ओस पडलेली आज पाहायला मिळत होती. शाळेतील काही मोजक्या  शिक्षकांनी उपस्थिती दर्शवून हा दिवस साजरा केला. 

असे असले तरी सध्या काही शाळा ऑनलाईन शिक्षणावर भर देत असल्या कारणाने त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याकरता विविध  उपक्रम घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार त्यांना काही    अॅक्टिव्हिटीज देण्यात आल्या आणि त्याचे चित्रीकरण करून ते शाळेने विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपवर एक दिवस आधी प्रदर्शित करण्यास सांगितले होते. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला , एकांकिका, नृत्य, भाषणे याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या या व्हिडिओंचे एकत्रीकरण करून आज स्वातंत्र्यदिनानिमित्त या नव्याने तयार केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून शालेय स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षकांनी एक अनोख्या पद्धतीचा स्वातंत्र्यदिन साजरा केला. 

देशासाठी महत्त्वपूर्ण दिवस असाही साजरा केला जाऊ शकतो याचा या आधी कधी विचार देखील केला नव्हता. कोरोनाच्या या वाढत्या संक्रमणामुळे यंदाचा स्वातंत्र्यदिन अगदी साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. काही मोजक्या सहशिक्षकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

कल्याणी भालेकर(शिक्षिका)- गणेश इंटरनॅशनल स्कूल अॅण्ड सिध्दी कॉलेज ऑफ फार्मसी, चिखली