सीमापार : चीनची तयारी बचावात्मक

चीनने १५ जून २०२० रोजी पूर्व लडाखमध्ये आक्रमण करून गलवान येथे २० भारतीय सैनिकांना ठार केल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याच रात्री प्रतिहल्ला करून शंभरावर चिनी सैनिकांना ठार केले व चीनला जशास तसे उत्तर दिले, एवढेच नाही तर त्यानंतर महिनाभरातच कैलास शिखरे ताब्यात घेऊन चीनच्या मोल्डो तळावर हल्ला करण्याची तयारी केली. या घटनेला नुकतीच २ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यानिमित्ताने हा खास लेख.

  गलवान खोऱ्यातील चिनी आक्रमणात २० भारतीय सैनिक ठार झाल्याच्या घटनेला गेल्या १५ जून रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. या घटनेनंतर लडाख व अरुणाचल भागात भारतीय व चिनी सैन्याची मोठ्या प्रमाणात जमवाजमव झाली असली तरी या सैन्यात संघर्ष घडलेला नाही.

  उलट भारतीय सैन्याने चिनी सैन्याला वाटाघाटीच्या टेबलावर ओढून चिनी सैन्याने २०२० साली काबीज केलेला बराचसा भूभाग सोडण्यास भाग पाडले आहे. आपले धाडसी आक्रमण विफल झाल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच भारताने मात दिल्यानंतर आता चीन सीमाभागात नव्याने पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या बातम्या येत आहेत.

  या पायाभूत सुविधा म्हणजे चीनच्या संभाव्य आक्रमणाची तयारी आहे, असा इशारा अमेरिकेचे संरक्षण मंत्री लाइड ऑस्टिन आणि अमेरिकन लष्कराच्या पॅसिफिक कमांडचे प्रमुख जनरल चार्ल्स फ्लिन यांनी दिला आहे. अर्थातच भारताची चिनी लष्कराच्या या हालचालींवर बारीक लक्ष आहे व भारत चीनच्या संभाव्य आक्रमणाला तोंड देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करीत आहे.

  चीनने १५ जून २०२० रोजी पूर्व लडाखमध्ये आक्रमण करून गलवान येथे २० भारतीय सैनिकांना ठार केल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याच रात्री प्रतिहल्ला करून शंभरावर चिनी सैनिकांना ठार केले व चीनला जशासतसे उत्तर दिले, एवढेच नाही तर त्यानंतर महिनाभरातच कैलास शिखरे ताब्यात घेऊन चीनच्या मोल्डो तळावर हल्ला करण्याची तयारी केली. त्यामुळे चीनला भारताशी चर्चा करून ताब्यात घेतलेला भूभाग सोडण्याची नामुष्की पत्करावी लागली.

  भारतीय सैन्य पूर्ण सज्ज अवस्थेत आहे व ते चीनचे कोणतेही साहस सहन करणार नाही हे लक्षात आल्यानंतर चीनला आता भारताच्या प्रतिआक्रमणाची भीती वाटत आहे. त्या भीतीपोटीच त्याने आपल्या भागात नव्याने संरक्षण मोर्चे भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. चीन आपल्या सीमाभागात नव्याने ज्या पायाभूत सुविधा निर्माण करीत आहे, त्या प्रामुख्याने सुरक्षात्मक आहेत.

  मोल्डो तळ हा कधीही भारतीय लष्कराच्या माऱ्यात येऊ शकतो व त्याचा बचाव करणे अवघड आहे, हे लक्षात आल्यानंतर आता भारतीय हल्ल्याच्या प्रसंगी या तळाला कुमक पोहचवणे शक्य व्हावे यासाठी चीनने पँगाँग सरोवराच्या फिंगर आठच्या उत्तरेस असलेल्या अरुंद भागावर दोन पूल बांधले आहेत. यातला एक पूल सैन्याच्या वाहतुकीसाठी तर दुसरा अधिक क्षमतेचा पूल अवजड युद्ध साहित्याच्या वाहतुकीसाठी बांधला आहे.

  पण हे दोन्ही पूल भारतीय नियंत्रण रेषेपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने ते भारतीय माऱ्याच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे मोल्डो तळ पुरेसा सुरक्षित झाला आहे, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे चीन आता भारतावर आक्रमण करण्यापेक्षाही भारतीय हल्ल्यापासून मोल्डो तळ व तिबेट झिंगझियांग महामार्गाच्या बचावासाठी मोर्चेबांधणी करीत आहे.

  चीनने २०२० मध्ये अचानक आक्रमण करून भारतीय सैन्याला बेसावध गाठले होते, पण आता भारतीय सैन्य पूर्णपणे सावध आहे व दररोज चिनी तयारीचा आढावा घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चीन सीमेला भेट देऊन भारतीय सैन्याच्या तयारीची पाहणी केली आहे व हे काम सतत चालू आहे.

  भारतीय सैन्याच्या तयारीला साथ देण्यासाठी हवाई दलानेही आपला सर्व ताफा सज्ज ठेवला आहे. हिमालयात भारतीय हवाई दल हे चिनी हवाई दलापेक्षा अधिक सक्षमपणे काम करू शकते. भारतीय हवाई दलाची विमाने ही सपाट प्रदेशातून उड्डाण करीत असल्यामुळे ती अधिक इंधन व शस्त्रसंभार घेऊन उड्डाण करू शकतात.

  याउलट चिनी विमाने ही तिबेटच्या अतीउंचीवरील कमी ऑक्सिजन असलेल्या प्रदेशातून उड्डाण करीत असल्यामुळे त्यांना इंधन अधिक लागते व शस्त्रसंभारही अधिक घेता येत नाही. शिवाय त्यांना अधिक लांबीच्या धावपट्ट्या लागतात. परिणामी चिनी विमानांना पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. त्यामुळे त्यांचे हल्ले हे भारतीय हद्दीत हिमालयाच्या पायथ्यापर्यंतच मर्यादित राहतात. त्यातच भारताने रशियन एस ४०० ही विमान व क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा तैनात केल्यामुळे चिनी विमाने सहज लक्ष्य केली जाऊ शकतात.

  या उलट भारतीय विमाने तिबेटमध्ये खोलवर मारा करू शकतात. भारताने नव्याने घेतलेल्या राफेल विमानांकडे चिनी रडारना चकविण्याची क्षमता आहे. त्यामुळे चीनने आपल्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात रडारचे जाळे उभारण्यावर भर दिला आहे. तसेच सीमाभागात अनेक धावपट्ट्या उभारण्याचे काम चीनने चालवले आहे.

  लडाखचा सीमा भाग हा वैराण व मनुष्यहिन आहेच शिवाय तो माणसाला राहण्यास अयोग्य आहे. हिवाळ्यात तेथे उणे ४० अंशापर्यंत तापमान जाते. पण आपल्या भागावरील दावा अधिक भक्कम करण्यासाठी चीनने या भागात नवी गावे वसविण्याची घोषणा केली आहे. काही भागात घरे बांधूनही झाली आहेत. पण या गावांत नागरी वस्ती होण्याची शक्यता खूप कमी दिसते.

  वस्ती झाली तरी ती तिबेटी लोकांचीच होऊ शकते, कारण या भागातील वातावरण सहन करण्याची त्यांची क्षमता आहे. पण तिबेटी ऐेन युद्धात भारताच्या बाजूने फिरण्याचा धोका आहे. त्यामुळे या भागात गावे वसविण्याची घोषणा सीमाभागावरील चीनचा दावा बळकट करण्यासाठी फारसा उपयोगी नाही.

  भारताने या भागात टेहळणीसाठी उपग्रहांबरोबरच ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केला आहे. त्यामुळे चिनी तयारीची माहिती मिळविण्याचे काम सोपे झाले आहे.

  भारताने गेल्या दोन वर्षात चीनला लक्ष्य करू शकणाऱ्या अनेक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्याचा धडाका लावला आहे. विशेषत: भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राला अडविण्याची क्षमता चीनकडे नाही. थोडक्यात चीनने कोणतेही साहस केले तर त्याला जबर किंमत मोजावी लागेल हे भारताच्या या तयारीतून स्पष्ट झाले आहे, त्यामुळे चीन हिमालयाच्या सीमेवर मोठे साहस करील असे वाटत नाही. अर्थात त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. सदैव सावध राहणे आवश्यक आहे.

  आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला आवरण्याची जी व्यूहरचना होत आहे, त्यात भारत सामील आहे. चीनविरोधी क्वाड या संघटनेचा भारत सदस्य आहे व या संघटनेचे अन्य तीन देश अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबर भारत हिंदप्रशांत क्षेत्रात नौदल कवायती करीत आहे. चिनी नौदलाला दक्षिण चीन सागरातून हिंदप्रशांत क्षेत्रात उतरू द्यायचे नाही, अशा हेतूने या नौदल कवायती चालू आहेत. त्यामुळे भारताच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत चिनी नौदल सहजासहजी पोहचू शकणार नाही.

  भारताने हिंदप्रशांत क्षेत्रातील काही महत्त्वाच्या देशांशी संरक्षण सहकार्य सुरू केले आहे. या क्षेत्रातील व्हिएतमान, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, मलेशिया या देशांशी चीनचा वाद आहे. त्याना चिनी आक्रमणाचा धोका वाटतो. त्यामुळे भारताने या देशांना संरक्षण साहित्य पुरविण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: फिलिपाइन्स व व्हिएतनाम या देशांना भारताने क्षेपणास्त्र व युद्धनौकांचा पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे. काही देश भारताकडून तेजस विमाने घेण्याचीही शक्यता आहे.

  चीनच्या आक्रमणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण पडला आहे हे खरे आहे. पण असाच ताण चिनी अर्थव्यवस्थेवरही पडला आहे व चीनला अनपेक्षितपणे सीमाभागावर मोठा खर्च करावा लागत आहे. चीनमध्ये आलेली नैसर्गिक संकटे, करोनाचा वाढता प्रसार आणि चीनशी व्यापार कमी करण्यासाठी अमेरिका, युरोप व भारत करीत असलेले प्रयत्न यामुळे चीनची अर्थव्यवस्था उतरणीकडे वाटचाल करीत आहे, त्याचाही परिणाम चीनच्या लष्करी तयारीवर होऊ शकतो.

  अमेरिकेने तैवानला चिनी आक्रमणापासून संरक्षण देण्याची घोषणा केल्यामुळे चीनला त्या आघाडीवरही तयारी करावी लागणार आहे. विशेषत: युक्रेन युद्धात रशिया अडकला आहे तसेच तैवान युद्धात चीनही दीर्घकाळ अडकून पडू शकतो, याचा चीनला विचार करावा लागणार आहे. एकंदरच चीनला त्याचे आक्रमक धोरण फायद्याचे ठरण्याऐेवजी नुकसानीचे ठरण्याची शक्यता अधिक निर्माण झाली आहे. यासर्व गोष्टींमुळे चीनला हिमालयात आक्रमण करण्यापूर्वी दहादा विचार करावा लागणार आहे.

  दिवाकर देशपांडे

  diwakardeshpande@gmail.com