अपेक्षाभंग!

भारताच्या संघनिवडीवरही निशाणा साधला जात आहे. सामन्याचा निकाल पालटवण्याची क्षमता असलेल्या तीन खेळाडूंची उणीव भारताला तीव्रपणे भासली. सिमरनप्रीत सिंगला गतवर्षी दुखापत झाली होती. परंतु यातून सावरल्यानंतर त्याला प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्या संघनिवडीत कोणतेही स्थान नव्हते. सुमीत आणि दिलप्रीत सिंग यांना वगळण्याची, तर ललित उपाध्याय, विवेक सागर प्रसार आणि निलम झेस यांच्या समावेशाचे परिणाम विश्वचषकात प्रकर्षाने दिसून आले.

    टोक्यो ऑलिम्पिकमधील उंचावलेला आलेख आशेची किरणे दाखवणारा होता. त्यानंतर गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पटकावलेले रौप्यपदक हेही सामर्थ्याची चुणूक दाखवणारे यश भारताने पटकावला. पण त्यानंतर हा आलेख खालावला. मायदेशात झालेल्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला आपल्या कामगिरीची पुनरावृत्तीही करता आली नाही. भारताचे जागतिक क्रमवारीत सहावे स्थान, परंतु क्रमवारीत ११व्या क्रमांकावरील न्यूझीलंडने क्रॉसओव्हर लढतीत भारताला नामोहरम केले. भारतीय खेळाडूंचे हताश चेहरे बरेच काही सांगत होते.

    १९२८ ते १९५९ हा भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ मानला जातो. १९६० ते १९८० या दोन दशकांत हे वर्चस्व भारताने टिकवले. पण १९८१ ते १९९७ या कालखंडात भारतीय हॉकीची अधोगती झाली. १९९८च्या आशियाई यशानंतर सावरण्याची चिन्हे दिसत होती. पण ती फोल ठरली. २००८ हा भारतीय हॉकीच्या आलेखाचा सर्वात खालावलेला बिंदू ठरला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ पात्र ठरण्यात अपयशी ठरला. एकेकाळी मर्दुमकी गाजवणाऱ्या भारतीय हॉकीला तो मोठा हादरा होता. त्यानंतर भ्रष्टाचार, संघटनात्मक दुही यामुळे भारतीय हॉकीचे आणखी अध:पतन झाले. ही वादवादळे २०१४पर्यंत घोंगावत होती. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताची मान्यता रद्द केली होती. यातून सावरत भारतीय संघाने पुन्हा यशाची कास धरली. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उपांत्य फेरीत मलेशियाने आश्चर्यकारक पराभव केला. परंतु पाकिस्तानला २-१ असे हरवून भारताने कांस्यपदक मिळवले. त्यानंतर आशियाई चॅम्पियन्स करंडक आणि पुरुषांच्या हॉकी मालिकेचे जेतेपद पटकावले. २०१८च्या विश्वचषकात भारताने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. परंतु नेदरलँड्सकडून पराभवामुळे भारताची वाटचाल मर्यादित राहिली.

    भारतीय संघाने ऐतिहासिक यश मिळवले ते ऑलिम्पिकमध्ये. जर्मनीचा ५-४ असा पराभव करून मिळवलेले कांस्यपदक म्हणजे तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवणारी यशोगाथा ठरली. त्यामुळेच यंदाच्या विश्वचषकात अपेक्षा उंचावल्या होत्या.
    यंदाच्या विश्वचषकात भारताने स्पेनविरुद्ध २-० अशी चांगली सुरुवात केली. पण गोल झळकावण्याच्या नामी संधी दवडल्यामुळे इंग्लंडविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. मग वेल्सला भारताने ४-२ असे हरवले. गटसाखळीत भारताच्या खात्यावर इंग्लंडइतकेच सात गुण जमा होते. परंतु गोलफरकाच्या बाबतीत इंग्लंडचा संघ भारतापेक्षा सरस ठरल्याने त्यांना थेट उपांत्यपूर्व फेरी गाठता आली, तर भारताला क्रॉसओव्हरच्या आणखी एका अडथळ्याला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडला आरामात हरवून भारत आगेकूच करील असे ठोकताळे बांधले जात होते. परंतु ते अयशस्वी ठरले. मुख्य सामन्यात भारताने दोनदा आघाडी घेतली होती. पण ती का गमावली, याचे विश्लेषण व्हायला हवे. सामन्याअंती ३-३ अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्येही बरोबरी कायम राहिली. मग सडन डेथमध्ये कर्णधार हरमनप्रीत सिंगचे लक्ष्य चुकले आणि विजयाची सुवर्णसंधी निसटली.

    भारताने शूटआऊटसाठी हरमनप्रीत (१६७ आंतरराष्ट्रीय सामने) वगळता राज कुमार पाल (२५ सामने), अभिषेक (३१ सामने), समशेर सिंग (५० सामने) आणि सुखजीत सिंग (१९ सामने) या अननुभवी खेळाडूंची निवड केल्याबद्दलही ताशेरे ओढले जात आहेत. यापैकी फक्त राजकुमारला अपेक्षांची पूर्तता करता आली. परंतु संघात मनप्रीत सिंग (३१८ सामने), मनदीप सिंग (१९८ सामने) आणि आकाशदीप सिंग (२२२ सामने) यांच्यासारखे अनुभवी खेळाडू असतानाही युवा खेळाडूंवर टाकलेला विश्वास धोकादायक ठरला. सरावातील शूटआऊटची रणनीती किती कूचकामी होती, हेच यातून सिद्ध झाले.

    हरमनप्रीतवर भारताच्या गोलसामर्थ्यची भिस्त होती. टोक्यो ऑलिम्पिकमधील भारताच्या यशात हरमनप्रीतच्या सहा गोलचा सिंहाचा वाटा होता. गतवर्षी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्येही भारताला तिसरे स्थान मिळवून देण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. हरमनप्रीतने स्पर्धेतील सर्वाधिक गोल नोंदवले, शिवाय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील गोलशतकही साकारले. २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही भारताच्या रुपेरी यशात हरमनप्रीतचे नऊ गोलचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या वर्षातील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी त्याची निर्विवादपणे निवड झाली. कर्णधाराची जबाबदारी म्हणूनच या यशोवंतावर सोपवण्यात आली. पण नेतृत्वाच्या दडपणाखाली त्याचा खेळ खालावल्याचेच अधोरेखित होते आहे.

    भारताच्या संघनिवडीवरही निशाणा साधला जात आहे. सामन्याचा निकाल पालटवण्याची क्षमता असलेल्या तीन खेळाडूंची उणीव भारताला तीव्रपणे भासली. सिमरनप्रीत सिंगला गतवर्षी दुखापत झाली होती. परंतु यातून सावरल्यानंतर त्याला प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांच्या संघनिवडीत कोणतेही स्थान नव्हते. सुमीत आणि दिलप्रीत सिंग यांना वगळण्याची, तर ललित उपाध्याय, विवेक सागर प्रसार आणि निलम झेस यांच्या समावेशाचे परिणाम विश्वचषकात प्रकर्षाने दिसून आले.

    पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करणे, हे व्यावसायिक हॉकीमधील महत्त्वाचे अस्त्र. परंतु हीच भारताची डोकेदुखी पुन्हा वर आली. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताच्या वाट्याला २६ पेनल्टी कॉर्नर आले. यापैकी फक्त पाच भारताला गोलमध्ये रुपांतरित करता आले.

    म्हणजेच चार पंचमांश प्रयत्नांत अपयश. पेनल्टी कॉर्नरमुळेच भारताचा न्यूझीलंडविरुद्धही घात झाला. सामन्याच्या ५०व्या मिनिटाला भारताकडे आघाडी होती. परंतु, निलमने केलेल्या चुकीमुळे न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला. फाइंडलेने त्याचे गोलमध्ये रुपांतर करून सामना बरोबरीत आणला आणि निकाल पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेला.

    तूर्तास, विश्वचषकातील यजमान भारताची वाटचाल खंडित झाल्यानंतर असंख्य चुकांची चर्चा होत आले. यातून धडा घेणे महत्त्वाचे आहे. कारण पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी आता फक्त एक वर्ष उरले आहे.

    प्रशांत केणी
    prashantkeni@gmail.com