india get gold medal weightlifters burst into the commonwealth games 2022 nrvb

बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतायत ते भारताचे वेटलिफ्टर्स... वेटलिफ्टिंगमध्ये तब्बल १० पदकं भारतीय खेळाडूंनी आपल्या नावावर केलीयेत. भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही कामगिरी आहे.

  गेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांची गोल्ड मेडलिस्ट, टोकियो ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानू हिच्याकडून यावेळीही बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा होतीच… मीराबाईनं अर्थातच देशवासियांची निराशा केली नाही. एवढंच कशाला, तिनं कॉमनवेल्थमध्ये भारताच्या पदकांचं खातंही उघडलं, तेदेखील चक्क गोल्ड मेडलनं… मीराबाईनं गोल्ड मेडलनं खातं उघडलं आणि त्यानंतर तिच्या टीम मेंबर्सनी तर मेडल्सचा रतीबच लावला… आतापर्यंत एकट्या वेटलिफ्टिंग प्रकारात भारतानं तब्बल १० पदकं जिंकत ऐतिहासिक कामगिरी केलीये. पण भारतासाठी पहिलं मेडल आणलं ते महाराष्ट्राच्या सुपुत्रानं…

  संकेत सरगर

  सांगलीमध्ये आई-वडिलांची वडा-पाव, भजी, चहाची गाडी… घरची परिस्थिती बेताचीच… अशा स्थितीत संकेत महादेव सरगर वेटलिफ्टिंगकडे वळला. आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचं फळ मिळालं बर्मिंगहॅममध्ये, सिल्व्हर मेडलच्या रुपानं… खरंतर ५५ किलो वजनी गटात संकेतला गोल्ड मेडल मिळण्याची शक्यता होती.

  मात्र, दुखापतीमुळे त्याचा शेवटचा चान्स हुकला आणि त्याला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं. विशेष म्हणजे घरात कोणतंही खेळाचं वातावरण नसताना संकेतनं वेटलिफ्टिंगचं करिअर निवडलंय आणि त्यात तो यशस्वीही होतोय. संकेतची बहिण, काजलही वेटलिफ्टर आहे. तिनं नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत महाराष्ट्रासाठी गोल्ड मेडल जिंकलंय. संकेतनं मेडलचं खातं उघडलं अन् मग भारतीय वेटलिफ्टर्सनी धडाकाच लावला…

  दस का दम…

  ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानूनं पहिलं गोल्ड जिंकलं. त्यानंतर ६७ किलो वजनी गटात जेरेमी लालरिंनुन्गा आणि ७३ किलो वजनी गटात अचिता शौली या दोघांनी गोल्ड मेडलची कमाई केली. ५५ किलो वजनी गटात बिंदियारानी देवी, ९६ किलो वजनी गटात विकास ठाकूर यांनी रजत पदक पटकावलं. तर ६१ किलो वजनी गटात गुरूराजा पुजारी, ७१ किलो वजनी गटात हरजिंदर कौर, १०९ किलो वजनी गटात लवप्रीत सिंग आणि १०९ प्लस किलो वजनी गटात गुरदीप सिंग यांनी ब्राँझ मेडल जिंकून आणलं. वेटलिफ्टिंगमध्ये ३ गोल्ड, ३ सिल्व्हर आणि ४ ब्राँझ अशी तब्बल १० मेडल्स भारतीयांनी पटकावलीयेत. अर्थातच ही वेटलिफ्टिंगमध्ये भारताची आतापर्यंतची सर्वाधिक चांगली कामगिरी राहिलीये. पण या यशाला एका छोट्या घटनेमुळे गालबोटही लागलंय…

  मॅनेजरविरोधात तक्रार

  कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजकांनी भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे मॅनेजर प्रदीप शर्मा यांच्याविरोधात तक्रार केलीये. आयोजकांशी शर्मांची वागणूक चांगली नसल्याचा शेरा लगावत भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) मेल करण्यात आलाय. शर्मांनी परवानगी नसताना एका चालकाला स्पर्धास्थळी सोडण्यास सांगितलं आणि त्याच्याशी वाद घातला, असा आरोप या मेलमध्ये करण्यात आलाय. त्यानंतर IOAनं शर्मा यांना समज दिली असून स्पर्धा संपेपर्यंत लो प्रोफाईल राहण्याचा सल्ला दिलाय. आपण आपल्या देशाचे प्रतिनिधी म्हणून बर्मिंगहॅममध्ये गेलो आहोत. त्यामुळे त्या पद्धतीनं वागणूक ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, अशा शब्दांत संघटनेनं शर्मांची कानउघडणी केलीये. अर्थात, ही एक घटना वगळली तर प्रत्यक्ष वेटलिफ्टिंग इव्हेंटमध्ये मात्र भारतीयांनी कमाल केलीये… पण म्हणून अन्य खेळांमधील चांगल्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही…

  ‘लॉन बॉल’ म्हणजे काय रे भाऊ?

  लॉन बॉल हा भारतीयांसाठी अत्यंत नवा क्रीडा प्रकार… आतापर्यंत असा एखादा खेळ आहे, हेदेखील आपल्या गावी नसेल. गोल्फ कोर्ससारख्या ओबडधोबड मैदानात एका छोट्या पिवळ्या चेंडूला दूर अंतरावरून दुसऱ्या चेंडूनं अचूक स्पर्श करायचा, असा हा साधारण खेळ आहे. लवली चौबे, रुपारानी तिर्की, नयनमोनी सायकिया आणि पिंकी या चौघींच्या संघानं या प्रकारात गोल्ड मेडल जिंकल्याची बातमी आली अन् हा खेळ भारतीयांना माहिती झाला. त्याच दिवशी पुरुषांच्या सांघिक गटात टेबलटेनिसमध्ये भारतीय संघानं गोल्ड मेडल खेचून आणलंय. लॉन बॉलप्रमाणेच ज्युडोमध्येही भारतीय खेळाडू प्रथमच चांगली कामगिरी करतायत.

  भारतीयांचा ‘चॉप’

  ज्युडोमध्ये ४८ किलो वजनी गटात एल सुशिला देवी हिनं, तर ७८ किलो वजनी गटात तुलिका मान यांनी सिल्व्हर मेडलची कमाई केली असताना ६० किलो वजनी गटात विजयकुमार यादव यानं ब्राँझ मेडलची कमाई केलीये. ज्युडोमध्ये गोल्डन परफॉर्मन्स करणं अद्याप शक्य झालं नसलं तरी प्रथमच ३ मेडल्सची कमाई भारतीय खेळाडूंनी केली, हे ही नसे थोडके… ज्युडोसोबतच स्क्वाश या भारतात फारशा प्रचलित नसलेल्या खेळात सौरव घोषालनं ब्राँझ मेडल पटकावलंय, तर उंच उडीमध्ये तेजस्विन शंकर यानंही ब्राँझ मेडलची कमाई केलीये. अर्थात स्पर्धा अद्याप संपलेली नाही…

  पिक्चर अभी बाकी है…

  हा लेख लिहून संपवेपर्यंत भारतानं बर्मिंगहॅममध्ये ५ गोल्ड, ६ सिल्व्हर आणि ७ ब्राँझ अशी १८ मेडल्स मिळवली आहेत. पदकतालिकेत अर्थातच ऑस्ट्रेलिया, यजमान इंग्लंड आणि कॅनडा हे पहिल्या ३ क्रमांकांवर आहेत. मात्र यंदा प्रथमच भारतीय खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे. कोणत्याही खेळात किंवा करिअरमध्ये आलेख उंचावता राहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजेच… आणि अद्याप बरीच संधी बाकी आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीचे दोन्ही संघ गेममध्ये आहेत, महिलांचा क्रिकेट संघही चांगली कामगिरी करतोय, शिवाय वैयक्तिक खेळांचे अनेक इव्हेंट अद्याप बाकी आहेत.

  त्यामुळे भारताचा गेम अद्याप संपलेला नाही. अजून बऱ्याच गोल्ड-सिल्व्हर-ब्राँझ मेडल्सची अपेक्षा करायला हरकत नाही. गेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे, २०२४मध्ये होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकची ही रंगीत तालिम आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू करत असलेली चांगली कामगिरी ही निश्चित समाधान देणारी आहे. आतापर्यंत देशासाठी मेडल्स जिंकणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन आणि ज्यांचे इव्हेंट बाकी आहेत, त्यांना गोल्डन परफॉर्मन्ससाठी शुभेच्छा…

  कौतुकाचा वर्षाव

  ३ गोल्ड मेडलसह तब्बल १० पदकांची कमाई करणाऱ्या भारतीय वेटलिफ्टर्सवर कौतुकाचा वर्षाव होतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडू, उद्योजकांनी ट्विटर-इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भारतीय खेळाडूंची स्तुती केलीये. त्यांनी आगामी काळात अशीच कामगिरी करून तिरंग्याचा मान वाढवावा, अशा शब्दांत बर्मिंगहॅममध्ये चांगली कामगिरी करणाऱ्यांना शुभेच्छाही देण्यात येतायत.

  sportswriterap@gmail.com