भारताला सापडला वेगवान गोलंदाजीचा ‘परिस’ !

भारतीय संघ आत्तापर्यंतच्या सातही सामन्यात सहज जिंकलाय. त्याचे कारण भारताने अलिकडे सर्वच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मालिका खेळून त्यांचा अभ्यास केला आहे. त्यांचे कच्चे दुवे अचूक हेरले आहेत. आपल्या घरच्या मेदानाचा, खेळपट्‌ट्यांचा भारतीय संघाने पूर्ण लाभ उचलला.

  विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय. नऊपैकी सलग सात सामने जिंकून एखाद्या संघाने आघाडी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. सत्तरीच्या दशकातल्या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडिज संघालाही हे जमलं नव्हतं. पाचवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियालाही ते शक्य झालं नव्हतं. मात्र यंदाच्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाने ते शक्य करून दाखविले आहे. यजमानपदाच्या विश्वचषकात खरंतर दडपण अधिक येतं. मात्र या भितीचा लवलेशही संघातील कुणा खेळाडूवर झालेला दिसत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी स्वप्नवत होतेय. असा कोणता चमत्कार या आपल्या संघाबाबत घडलाय? प्रत्येक जण जेथे हात लावतोय त्याचं सोनं होतंय. भारतीय संघाला वेगवान गोलंदाजीचा परिसस्पर्श सापडला आहे.

  भारतीय संघाच्या या वर्चस्वाचे प्रमुख कारण आहे आपली गोलंदाजी. खरं तर आपली मध्यमगती गोलंदाजी हे आपले नेहमीच शक्तीस्थान राहीले आहे. विशेषत: भारतीय उपखंडात, उष्ण हवामानात जेथे खेळपट्‌ट्या अधिकाधिक कोरड्या असतात. जेथे खेळपट्‌ट्या फाटतात. तेथे चेंडू रिव्हर्स नेहमीच होतो. सुरुवातीला चेंडूची लकाकी वापरणारे गोलंदाज तुमच्याकडे हवेत. चेंडू जुना झाल्यावर रिव्हर्स स्वींग, चेंडू स्वींग करणारे, मध्यमगती गोलंदाज तुमच्याकडे हवेत. आणि त्यानंतर मधल्या षटकांमध्ये जुना चेंडू उत्तमरित्या वापरणारे फिरकी गोलंदाज हवेत. यावेळी या तिन्ही गोष्टींची पूर्तता करणारे गोलंदाज आपल्याकडे आहेत.

  झहीर खानचे मार्गदर्शक माजी कसोटीपटू सुधीर नाईक झहीरला नेहमी म्हणायचे, चेंडू नवा, लकाकी असणारा फक्त १०-१२ षटकेच असतो. पण त्यानंतर लकाकी गेलेला चेंडू वापरायचा असतो. त्यामुळे जुना झालेला चेंडू वापरता आला पाहिजे. जुना चेंडू कसा टाकायचा ते आधी शिकून घे. झहीर खानने आपल्या गुरूचा सल्ला कायम लक्षात ठेवला. एमआरएफ फौंडेशन येथे टि.ए. शेखर यांनी झहीरला ती कला शिकविली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या फॅनी डिव्हिलिअर्स याने झहीरला जुना चेंडू अधिक परिणामकारक कसा वापरायचा ते शिकविले. फलंदाजाला बाद करण्यासाठी कसा सापळा लावायचा ते शिकविले. फलंदाजाला बाद करण्यासाठी कसे सेट करायचे ते सांगितले. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच झहीर खानला हे शिकायला मिळाले. पाकिस्तानचा वासिम अक्रम हा रिव्हर्स स्वींग गोलंदाजीच्या कलेचा एक उत्तम नमुना होता. त्याने झहीर खानला चेंडू कसा रिव्हर्स करायचा, त्यासाठी काय काय करायचे ते शिकविले. जुना झालेला, खडबडीत पृष्ठभागाचा चेंडू कायम आपल्या बॅगेत ठेवायचा. गोलंदाजीचा नेट्समध्ये सराव करताना सर्वप्रथम नवा चेंडू घ्यायचा नाही, तर तो जुना, बॅगेत ठेवलेला चेंडू प्रथम गोलंदाजीसाठी घ्यायचा. त्या जुन्या चेंडूवर काही षटके टाकून झाली की मग नवा चेंडू टाकायचा.

  योगायागाने झहीर खानने या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आंतरराष्ट्रीय गोलंदाजांकडून वेळीच शिकून घेतल्या होत्या. झहीरने त्या गोष्टी आपल्या सहकाऱ्यांकडे, सहकारी गोलंदाजांकडे ‘पासऑन’ केल्या. झहीर खान निवृत्त झाल्यानंतरही मुंबई इंडियन्स या आपल्या फ्रॅन्चायझीच्या गोलंदाजांना शिकवायचा. जसप्रिस बुमरा याला झहीरचे वेळीच मार्गदर्शन झाले. झहीरने बुमराला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे दुखापतींचे नियोजन कसे करायचे? दुखापती झाल्यानंतर त्यांचे पुर्न:वसन कसे करायचे.

  महंमद शामी हा भारताच्या मध्यमवर्ग गोलंदाजांचा कणा आहे. तो अनुभवी आहे. गोलंदाजांचे नेतृत्व करण्याची त्याची क्षमता आहे. नेमकी हीच भूमिका झहीर खानने काही वर्षांपूर्वी बजावली होती. झहीर खानने आपल्याकडचे ज्ञान या महंमद शामीला दिले. त्याला डिव्हिलिअर्सने फलंदाजांना कसे सेट करायचे ते शिकविले होते. चेंडूचा टप्पा खेळपट्‌टी पाहून कसा अचूक ठेवायचा ते सांगितले होते. महंमद शामी नेमके हेच करतोय. चेंडूचा टप्पा तो अचूक ठेवून तेथूनच चेंडू आत-बाहेर करतोय. त्यामुळे त्याला पायचीत आणि यष्टीपाठचे बळी मिळताहेत. महंमद शामी आज भारताच्या दोन ज्युनियर गोलंदाजांना मार्गदर्शक ठरतोय. तो गोलंदाजीच्या नेतृत्वाचा भार वाहतोय.

  बुमरा-सिराज यांनी नवा चेंडू टाकल्यानंतर तो गोलंदाजीस येतो. ज्यावेळी प्रतिपक्षाची सलामीची जोडी जमलेली असते, किंवा मधली फळी मैदानात उतरलेली असते. यावेळी प्रतिपक्षाला डाव सावरण्याची संधी द्यायची नाही; हे तत्व महंमद धामीने जपले आहे. तीन सामन्यात १४ बळी ही कामगिरी विंडिजच्या वेगवान गोलंदाजीच्या तोफखान्यातील गोलंदाजांनाही करणे जमले नव्हते. आज ते काम महंमद शामी सहजरित्या करतोय.

  कारण विकेट काढण्यासाठी, समोरच्या फलंदाजांचे कच्चे दुवे अभ्यासणे गरजेचे असते. त्याची मानसिकता कळून घेणे अत्यावश्यक असते. त्यासाठी त्याच्या आधीच्या डावांमधील बाद होण्याच्या पद्धतीचा अभ्यास करणे गरजेचे असते. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या फलंदाजांच्या कच्च्या दुव्याचा लाभ घेण्यासाठी चेंडूचा टप्पा अचूक ठेवणे गरजेचे असते. चेंडू वेगात टाकायच्या हट्‌टापाई आणि हव्यासापाई स्वैर गोलंदाजी करून समोरच्या संघाच्या फलंदाजांना धावा कूटण्याची संधी देण्यापेक्षा कमी वेगात पण अचूक टप्प्यावर चेंडू टाकणे महत्त्वाचे असते. तो अभ्यास शामीने केला. त्याने ती कला आत्मसात केली आणि ती कला आपल्या सहकाऱ्यांकडे पोहचविली. त्यामुळेच आज भारताचा मध्यमगती गोलंदाजीचा मारा अधिक भेदक वाटायला लागला आहे.

  महंमद शामीने आणखी एक गोष्ट आपल्या सहकाऱ्यांसाठी केली. त्याने कुणावरही गोलंदाजीचा अधिक भार पडणार नाही याची काळजी घेतली. विकेट मिळत असल्या तरीही गोलंदाजीचे मोठे स्पेल देऊन त्यांना थकविण्याची चूक केली नाही. त्यामुळे जायबंदी होण्याचा धोकाही कमी झाला. आपल्यावर पडलेल्या ताणाचा आणि त्यामुळे झालेल्या दुखापतीमधून शामी शिकला, त्याने इतरांनाही आता शहाणे केले.

  आत्तापर्यंत भारताच्या फिरकी गोलंदाजीचा बोलबाला होता. फिरकी त्रिकूटाची हुकूमत चालायची. मात्र, यावेळी अॅन्डी अॅटकिन्सन या आयसीसीच्या खेळपट्‌टी विषयक तज्ज्ञांनी खेळपट्‌ट्या चांगल्या घोटून तयार करून घेतल्या आहेत, काही खेळपट्‌टींचे अपवाद वगळता. मात्र अॅंटकिन्सनने तयार करून घेतलेल्या खेळपट्‌ट्यांचा पॅटर्न आपल्या पथ्थ्यावर पडला. आपल्या तिन्ही मध्यमगती गोलंदाजांची गोलंदाजी या खेळपट्‌ट्यांवर अधिक परिणामकारक अशी ठरली. त्याचवेळी श्रीलंका संघाने याच खेळपट्‌टीचा लाभ घेण्याऐवजी हातची संधी घालविली. त्यांच्याकडे अनुभवी वेगवान गोलंदाज हीच त्यांची मुख्य समस्या होती. रोहित शर्माला बाद केल्यानंतर खरं तर त्यांना भारताची आघाडीची फळी लवकर गुंडाळता आली असती. त्याऐवजी, त्यांनी ढिसाळ क्षेत्ररक्षण करून संधी गमाविली. ८८ धावा काढणाऱ्या कोहलीचा झेल तो १० धावांवर असताना सोडला. त्यानंतर श्रेयस अय्यरलाही सेट होऊ दिले. श्रेयस अय्यर आखूड टप्प्याच्या गोलंदाजीला घाबरतो, हे सत्य त्यांनी डावपेचात पूर्णपणे ‘एक्सपोझ’ केले नाही. एका टोकाकडून आखूड टप्प्याची गोलंदाजी आणि दुसरीकडे फिरकी गोलंदाज आणला. या चुकीमुळे अय्यरने फिरकीवर मोठे फटके मारून स्वत:ची सुटका करून घेतली.

  भारतीय संघ आत्तापर्यंतच्या सातही सामन्यात सहज जिंकलाय. त्याचे कारण भारताने अलिकडे सर्वच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मालिका खेळून त्यांचा अभ्यास केला आहे. त्यांचे कच्चे दुवे अचूक हेरले आहेत. आपल्या घरच्या मेदानाचा, खेळपट्‌ट्यांचा भारतीय संघाने पूर्ण लाभ उचलला.
  प्रतिस्पर्धी संघ हे करण्यात कमी निश्चितच पडले आहेत. भारताचे उष्ण हवामान, संथ, फिरक्या खेळपट्‌ट्या यांच्याशीही त्यांना वेळेत जुळवून घेता आले नाही. खरं तर जे खेळाडू आयपीएल स्पर्धा खेळतात, त्यांनी चमक दाखवायला हवी होती. न्यूझीलंडसारख्या संघाला दुखापतीमुळे अचानक ब्रेक लागला आहे. पहिले चारही सामने जिंकणाऱ्या न्यूझीलंडने नंतरचे तिन्ही सामने गमाविले आहेत. कारण त्यांचे १५ पैकी ५ खेळाडू अनफिट आहेत. केवळ १० जणांनी हा संघ सध्या खेळत होता. ऑस्ट्रेलिया संघ वेळीच सावरला. इंग्लंड संघ तर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही अनफिट ठरला आहे. श्रीलंका संघाची देखील तीच अवस्था आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश संघ अंतर्गत दुहीमुळे बेजार झाले आहेत. त्यामुळे अंतिम चार संघ कोणते असतील हे चित्र आतापर्यंत जवळजवळ स्पष्ट झालेले असेल.

  – विनायक दळवी