
साहित्यिकांच्या अर्धांगिनी’ हे यामिनी पानगांवकर यांचे संधिकाल प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केलेले पुस्तक. या पुस्तकात राजकारणी व्यक्ती, कवी-लेखक, कलाकार अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या पत्नींचा हृदय परिचय लेखिकेने दिला आहे.
लहान असताना आई आणि पुढे लग्न झाल्यावर पत्नी या पुरुषाला साथ देणाऱ्या असतात. त्यामुळे जीवनातील एक बाजू भक्कम झाल्यानंतर तो यशाच्या पायऱ्या अत्यंत आत्मविश्वासाने आणि जोराने चढू शकतो. म्हणून यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री असते असे म्हटले जाते.
आधी मुलगी, मग अर्धांगिनी आणि शेवटी माता या तीन रूपांत स्त्रीचे जगणे विभागले गेलेले असते. मात्र एकदा तिचा विवाह झाला की आपल्याकडच्या पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये तिच्या कर्तबगारपणाला व हुशारीला खिळ बसते व त्यात तिच्या स्वतंत्र अस्तित्वाची ओळख धुसर होत जाते.
या पुस्तकात परिचित, अपरिचित अशा २४ अर्धांगिनींचा परिचय यामिनी पानगांवकर यांनी करून दिला आहे. पैकी डॉ. सरोजिनी वैद्य, कुसुमावती देशपांडे, कमल पाध्ये, सुमा करंदीकर, कृष्णाबाई सुर्वे, यशोदा पाडगांवकर, विद्याताई माडगूळकर, रागिणी पुंडलिक या स्त्रिया आधीच परिचित आहे. मात्र वहिदा काळे, (व. पुं.च्या पत्नी), मनोरमा शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकरांच्या पत्नी), शीलवती केतकर (श्री. व्यं. केतकर यांच्या पत्नी), उमा दळवी (जयवंत दळवींच्या पत्नी) अशा अपरिचित स्त्रियांचा परिचय आपल्याला हे पुस्तक वाचताना होतो.
शिष्यांमध्ये श्री रामकृष्ण परमहंस यांचा संदेश सतत जागृत ठेवण्यासाठी व तो सर्व जगभर पसरवण्यासाठी आपल्य देहावसनापर्यंत सतत ३४ वर्षे कार्यरत असणाऱ्या माता शारदादेवी; अत्यंत कणखर स्वभावाच्या कमला नेहरू; गो. ग. आगरकरांच्या मृत्यूनंतर १७ वर्षे सुधारकाचे व्रतस्थ जीवन जगणाऱ्या यशोदाबाई आगरकर; घर सजवण्याची हौस असलेल्या, भरतकाम-विणकाम यांची आवड असूनही पती माधवराव पटवर्धनांसाठी त्यांच्या पुस्तकांत व कवितांमध्ये रमणाऱ्या लीलाबाई पटवर्धन; लग्न होऊनही त्यांच्या भाऊ-बहिणी व आईपायी बालकवींच्या फार सहवासात न आलेल्या बालकवींच्या पत्नी पार्वतीबाई ठोंबरे; अनाथ, अपंगांना वाट दाखवणाऱ्या, अडल्या-नडल्यांना मदत करणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई कर्वे; स्वा. सावरकरांच्या कार्यामागची दैवी शक्ती असणाऱ्या साध्याभोळ्या यमुना सावरकर (माई); अत्यंत सुगरण, हजारो-लाखोंच्या जगाशी, श्रोत्यांशी आपल्या स्वागतशील वृत्तीने नाते जोडणाऱ्या मनोरमा शिरवाडकर; आचार्य अत्रे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या प्रत्येक आंदोलनात, लढ्यात सहभागी होणाऱ्या सुधाताई अत्रे; ज्ञानाची जबरदस्त अभिलाषा व वाचनाची प्रचंड भूक असणाऱ्या, ‘स्त्री कर्मसदन’ संस्थेच्या संचालिका, अनाथ, निराधाराप्रती आस्था दाखवणाऱ्या व मुला-मुलींना दत्त घेणाऱ्या एडिथ कोहन अर्थात शीलावती केतकर; राजकारणात चढउतार होत असताना ते प्रत्यक्ष अनुभवत असताना स्वत:च्या प्रकृतीची हेळंसाड करूनही संथ, शांत व संयतपणे यशवंतरावांची सदैव काळजी घेणाऱ्या वेणूताई चव्हाण; वपूंच्या लिखाणाच्या कठोर टीकाकर पण तेवढेच त्यांच्या साहित्यनिर्मितीबद्दल नितांत आदर व कौतुक करणाऱ्या वसुंधरा काळे; स्वत:मधले गुण बाजूला ठेवून महाकवी गदिमांच्या गुणांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या विद्या माडगूळकर; जयवंत दळवींच्या कथेच्या समीक्षक उमा दळवी; आयुष्यभर मास्तरांची सावली होऊन राहिलेल्या कृष्णाबाई नारायण सुर्वे; मूळच्या ख्रिश्चन असूनही पाडगांवकरांच्या कुटुंबात रमलेल्या यशोदा मंगेश पाडगांवकर आदी अर्धांगिनींच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय संक्षिप्तपणे पण अत्यंत आदराने लेखिकेने करून दिला आहे.
या पुस्तकातील स्त्रियांचा हा परिचय करून देताना लेखिकेने प्रचंड मेहनत घेतल्याचे जाणवते. कारण प्रत्येक परिचयानंतर संदर्भग्रंथ, प्रत्यक्ष संपर्क याची तळटीप दिली आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे लोकप्रिय साहित्यिकांबद्दल आजवर आपण अनेकदा वाचलंय. त्यांच्याबद्दल विपुल प्रमाणात माहिती मिळते व संदर्भग्रंथही आहेत. मात्र या सर्वांना आयुष्याच्या विविध टप्प्यावर मोलाची साथ करणाऱ्या त्यांच्या सहचारणींबद्दल छापून आलेलं साहित्य त्यामानाने मोजकेच आहे.
काही अपवाद वगळता साहित्यक्षेत्रांत त्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. हे ओळखूनच लेखिकेने या पुस्तकाची निर्मिती केली आहे. त्यांच्या या परिश्रमाला दाद द्यायलाच हवी.
अरुण म्हात्रे यांची प्रस्तावना या पुस्तकात समाविष्ट आहे. त्यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे आपल्या नवऱ्याच्या कर्तृत्वाकडे तटस्थपणे व अलिप्तपणे पाहणाऱ्या अनेक स्त्रियांना हे पुस्तक प्रेरणा देईल आणि आपल्या पतीच्या कर्तृत्वाचा आपणही एक छोटासा हिस्सा व्हावा असे वाटण्याला बळ देईल.
प्रथितयश प्रतिभावंतांच्या या अर्धांगिनी आयुष्यभर समईतल्या वातीप्रमाणे आपल्या कर्तृत्वान पतीराजांच्या पाठीशी सदैव तेवत राहिल्या. या सर्व स्त्रियांना यामिनी पानगांवकर यांनी दिलेली ही मानवंदना आहे.
– प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर
raghunathshetkar0@gmail.com