जामनगरची अस्मिता…

महाराज रणजितसिंग यांचा मुलगा म्हणजे श्रीदिग्विजयसिंहजी यांनी राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी ‘पुरातत्व मंडळ’ची स्थापना केली. १९४६ मध्ये, त्यांनी पुरातत्व संग्रहालयासाठी लखोटा कोठेवनचे वाटप केले. याशिवाय त्यांनी स्वतःच्या संग्रहातील काही कलाकृतीही संग्रहालय सुरू करण्यासाठी दान केल्या. अशाप्रकारे, जाम श्रीदिग्विजयसिंहजी यांच्या अंतर्दृष्टीने आणि आस्थेने, जामनगर येथील पुरातत्व संग्रहालयाची स्थापना १९४६ मध्ये झाली. ते आता १९६० पासून गुजरात राज्य सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे.

  जामनगरचे ‘लखोटा लेक पॅलेस’ हे शहराच्या एका टोकावर वसले आहे. या सरोवरात मध्यभागी एक विशाल आणि नेत्रदीपक आकर्षक संग्रहालय गुजरात राज्य पुरातत्व विभाग आणि जामनगर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेले असून ही जामनगरची ‘अस्मिता’ आहे असे गौरवपूर्वक म्हटले जाते. निसर्गरम्य तलावाच्या मध्यभागी असलेला पूर्वीचा किल्ला आता पुरातत्ववास्तु असलेले एक संग्रहालय आहे. मध्यभागी जामनगरचे संस्थापक जाम श्री रावलजी यांचा अश्वारूढ पुतळा असून महाराजा रणजितसिंग यांच्या प्रेरणेतुन साकारलेला आहे. त्या काळात दुष्काळातल्या लोकांना काम मिळावे म्हणून या सरोवराची निर्मिती करण्यात आली. ‘लाखो’ रुपये खर्च केले म्हणून याला ‘लखोटा पॅलेस’ म्हणतात अशी माहिती येथील प्रशासनाकडून प्राप्त झाली. सरोवरात असलेले हे भारतातील एकमेव गर्भश्रीमंत पुरातत्व संग्रहालय असावे.

  गुजरातचे जामनगर हे शहर  म्हणजे समुद्रकिनारी वसलेले नीटनेटके लहानसे सुंदर शहर. ढोकळा आणि फाफड्याचे हे सोळाव्या शतकातील शहर म्हणजे एक गूढ प्रदेश म्हणुनही ओळखले जाते. हे कासा आणि पितळेच्या उद्योगाचे प्रमुख केंद्र असून रिलायन्स आणि एस्सार या दोन प्रमुख तेल शुद्धीकरण कारखान्यांमुळे गेल्या काही वर्षात या शहरा “ऑइल सिटी” म्हणूनही ओळख आहे. तसे बघितले तर हे शहर पाच-सहाशे वर्षापासून राजे- महाराजे यांचेच आहे. पण या शहरात कुठल्याच राजे महाराजांनी प्रजेवर जुलूम आणि अत्याचार केल्याचा इतिहास नाही तर सर्वसमावेशक म्हणूनच राज्य कारभार केला. ऐतिहासिकदृष्ट्या नवानगर म्हणून ओळखल्या जाणार्‍या जामनगरची स्थापना जाम श्रीरावल यांनी १५४० मध्ये नागमती आणि रंगमती या नद्यांच्या काठावर केली. जाम व त्यांचा वंश यादवांशी म्हणजे भगवान कृष्णाच्या वंशाशी आहे असे मानले जाते. जाम रावलजीने याच समुद्रकिनारी असलेल्या प्रदेशात आपल्या नवीन राजधानीच्या  शहराचा पाया घातला आणि ‘नवानगर’ नावाचे शहर उदयाला आले. १५४० च्या सुरुवातीपासून ते १९४८ मध्ये भारतीय संघराज्यात सामील होईपर्यंत, नवानगर ही जडेजा घराण्याची राजधानी राहिली. या जडेजा घराण्यांवर २२ राजांचे राज्य होते. राजघराण्यातील राजांना ‘जाम साहिब’ असे नाव देण्यात आले. क्रिकेटची प्रसिद्ध “रणजी ट्रॉफी” इथलेच महाराज रणजितसिंग यांच्या नावाने आहे.

  महाराज रणजितसिंग यांचा मुलगा म्हणजे श्रीदिग्विजयसिंहजी यांनी राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी ‘पुरातत्व मंडळ’ची स्थापना केली. पूर्वी येथे जंगल होते. १९४६ मध्ये, त्यांनी पुरातत्व संग्रहालयासाठी लखोटा कोठेवनचे वाटप केले. याशिवाय त्यांनी स्वतःच्या संग्रहातील काही कलाकृतीही संग्रहालय सुरू करण्यासाठी दान केल्या. अशाप्रकारे, जाम श्रीदिग्विजयसिंहजी यांच्या अंतर्दृष्टीने आणि आस्थेने, जामनगर येथील पुरातत्व संग्रहालयाची स्थापना १९४६ मध्ये झाली. ते आता १९६० पासून गुजरात राज्य सरकारच्या अंतर्गत कार्यरत आहे. लखोटाकोटाची नवीन नूतनीकरण केलेली इमारत प्रत्यक्षात १९४६ मध्ये बांधण्यात आली होती. २००१ च्या भूकंपात या इमारतीचे फारमोठे नुकसान झाले. त्यामुळे गुजरात राज्य पुरातत्व विभाग आणि जामनगर महानगरपालिकेच्या संयुक्त उपक्रमाद्वारे आवश्यक आणि भरीव पुनर्संचयित, संवर्धन आणि पुनर्वसन प्रकल्प हाती घेण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ५ मे २०१८ रोजी गौरवशाली लखोटाकोठा तसेच पुनर्रचना केलेले पुरातत्व संग्रहालय पुन्हा उघडले आणि ते लोकांसाठी लोकार्पण केले.

  या संगमवरी संग्रहालयात सरोवरातून असलेल्या अत्यंत आकर्षक मार्गावरून जावे लागते. येथे अनेक प्राचीन शिलालेख, मूर्ती, राजेमहाराजांचे मोठे पेंटिंग्स, लाकडी बांधकाम, आकर्षक रीतीने सजवून ठेवण्यात आले आहे.
  ‘घुमडी’ येथील आठव्या शतकातल्या नकाशी मूर्ती बघायला मिळतात. अनेक झरोके या सरोवराच्या मध्यभागी दिसतात. रोषणाई केलेले दोन्ही कडच्या बाजूचे रांगेतले अँगल लाइट रॅम्प वॉकसारखे रस्ते म्हणजे छोटे पूल बसण्याकरिता अनेक ओटे अनेक ‘वॉचिंग टॉवर’ अर्धवर्तुळाकार विशाल बैठक, अश्वारूढ पुतळा, सोबतीला सायंकाळी सर्वत्र रंगबेरंगी कारंजे, रोषाणाईने उजळलेले सायंकाळचे पुरातत्व संग्रहालय बघणे हा एक अपूर्व अनुभव आहे. एका गर्भश्रीमंतीत वावरत असल्याच भास येथे होतो. ही एक रम्य सायंकाळ आहे. सरोवराच्या मधोमध दोन गवतांचे बेट असून तेथे जाता येत नाही.
  दगड आणि कांस्य शिल्पे, लघु चित्रकला, काचेच्या वस्तू, नाणी, चलन प्लेट्स, तांबे प्लेट्स, प्रादेशिक कापड, नैसर्गिक इतिहासाचे नमुने ते शाही शस्त्रागारांपर्यंतच्या कलाकृतींचा विपुल संग्रह आहे.

  हे जामनगर जिल्ह्याच्या नवव्या ते २०व्या शतकातील भूतकाळाचे प्रतिनिधित्व करते ज्यात प्रिन्सली स्टेट ‘नवानगर’वर भर दिला जातो. संग्रहालयात नवानगरच्या वारसाला समर्पित एक नवीन गॅलरी देखील जोडली गेली आहे. संग्रहालय हे १० विभागांमध्ये विभागलेले आहे. या संग्रहालयाने आपला वारसा जपून ठेवला आहे. अस्सल कलाकृतींद्वारे वारशाबद्दल लोकांना शिकता येईल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.

  प्रदर्शनातील संग्रहामध्ये नवव्या ते २०व्या शतकादरम्यानच्या काळातील शिल्पांचा समावेश आहे. हे मुख्यत्वे पुरातत्व मंडळाकडून संग्रहालयाने मिळवले होते. ज्यांनी आजूबाजूच्या घुमडी, पाचतर, बरणा, लवाडिया, वसई, खंबालिया इत्यादी तालुक्यांमधून ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व असलेल्या या शिल्पांचा संग्रह आहे.
  शिल्पे मुख्यत्वे हिंदू धर्माच्या ३ पंथांचे प्रतिनिधित्व करतात जसे की शैव, वैष्णव आणि जैन धर्म, जेथे स्पेक्ट्रममध्ये विविध देवता, देवी, अर्ध-देवता तसेच सजावटीच्या वास्तुशास्त्रीय आराम आहेत. गणेश, त्रिमूर्ती, महिषासुरमर्दिनी, भैरवी, विष्णू, वराह, गजलक्ष्मी आणि सूर्याची शिल्पे हे काही उल्लेखनीय उल्लेख आहेत.

  कोठाच्या दुस-या स्तरावर, या विभागात गुजरातच्या संस्थानांपैकी एक असलेल्या जुनागढचे तत्कालीन नवाब मुहम्मद महाबत खान तिसरे यांच्याशी संबंधित काचेच्या वस्तूंचा उत्कृष्ट संग्रह आहे. १९२० च्या दरम्यान जुनागडला दुसऱ्या महायुद्धापर्यंत भेट देणाऱ्या अनेक पुरातन वस्तू विक्रेत्यांकडून नवाबाने ते विकत घेतल्या होत्या. संग्रहातील बहुतेक वस्तू म्हणजे ताट, जग, किटली, वाट्या आणि विविध आकार आणि आकारांचे कंटेनर यासारख्या घरगुती वस्तू आहेत.

  सर्व वस्तू वेगवेगळ्या रंगीत काचेच्या पारदर्शक किंवा अर्धपारदर्शक बनवल्या गेल्या आहेत आणि कोरलेल्या किंवा मुलामा चढवलेल्या आकृतिबंधांनी सजवलेल्या आहेत. यापैकी बहुतेक आकृतिबंध सजीव रंगात रंगवलेले आहेत आणि काही सोने आणि चांदीच्या पानांनी सुशोभित केलेले आहेत. येथे नैसर्गिक इतिहासाचे अनेक नमुने बघायला मिळतात. सरपटणाऱ्या प्राण्यांचे सांगाडे उघड्या प्रांगणात ठेवलेले आहे आहेत. हे नमुने मगरीचे, हिप्पोचे आणि मोठ्या ब्लू व्हेलचे (बालेनेप्टोरा) आहेत. ब्लू व्हेलचा नमुना १९७६ मध्ये जामनगरजवळील सलल्या या सागरी भागातून गोळा करण्यात आला होता. ताम्रपटांवरील अनेक ऐतिहासिक नोंदी, प्राचीन गावे, पाठच्या चित्रकलेचा वारसा व राजे महाराजांचा इतिहास येथे बघायला मिळतो.

  जडेजा राजघराण्यातील पहिला शासक जाम श्रीरावलजी ते जाम श्रीजसाजी तिसरा, ज्याने ही चित्रे तयार केली होती. त्याच्यापर्यंतच्या सर्व शासकांची चित्रे येथे प्रदर्शित केली आहेत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात या प्रदेशात विकसित झालेल्या सौराष्ट्र शैलीमध्ये स्थानिक कलाकाराने पोर्ट्रेट बनवले होते. प्रदर्शनातील संपूर्ण संग्रह विविध राजवंश, प्रदेश आणि कालखंडातील नाण्यांद्वारे चलनाचा इतिहास उलगडतो.

  येथे जाम शासक आणि मुघल यांच्यात झालेल्या १५९१ च्या भूचरमोरीच्या प्रसिद्ध लढाईचे चित्रण करणारी १८ फूट लांब कॅनव्हास पेंटिंग देखील प्रदर्शित केली आहे.
  सर्व प्रदर्शनांमध्ये फ्रेंच शिल्पकार जॉर्जेस चौवेल (1886-1962) याने बनवलेली ‘जगलर’ आणि ‘अप्सरा’ नावाची कांस्य शिल्पे आहेत. अलंकारिक कार्याची अभिव्यक्ती म्हणून आधुनिकतावादी दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या शिल्पकारांच्या पहिल्या पिढीतील ते होते. एकूणच, हा संग्रह आपल्याला कारागिरीसाठी तसेच भारताच्या राजेशाही भूतकाळातील समृद्ध आणि विलासी जीवनासाठी एक रंगीबेरंगी अंतर्दृष्टी देतो.

  येथे आतले फोटो घेण्याची सक्त मनाई आहे. पण परिचय दिल्यानंतर लेखक व मुक्त पत्रकार म्हणून डॉ. धिरज चौधरी क्युरेटर व मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी भरपूर माहिती दिली व कार्यालयाचे दोन सहकारी देऊन संपूर्ण संग्रहालय फिरवून आणले.
  असे हे सरोवरात असलेले आणि विशाल आकर्षक बगीच्यात वसलेले सुंदर लखोटा पॅलेस म्हणजे जामनगरची अस्मिताच.

  श्रीकांत पवनीकर