
अमेरिकेच्या आजी- माजी राष्ट्राध्यक्षांच्या समक्ष कायदेशीर संकटे कमी होताना दिसत नाहीत. नुकतेच माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचेवर विविध गुन्ह्यात आरोप निश्चिती झाली आहे. तर दुसरीकडे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे चिरंजीव हंटर बायडेन यांच्या विरोधात तपास पूर्ण होऊन त्यांना ३ आॅक्टोबर रोजी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्या जाणार आहे.
हंटर बायडेनचे सध्याचे वय ५३ वर्षे आहे. जो बायडेन यांच्या पहिल्या पत्नीचे ते पुत्र आहेत. हंटर बायडेनचे कौटुंबिक, समाजिक आयुष्य हे अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरले. हंटर दोन वर्षांचा असताना एका अपघातात त्याची आई आणि लहान बहिणीचे निधन झाले. त्यात हंटर आणि मोठ्या भावाला जबर दुखापत सुध्दा झाली. सुदैवाने जो बायडेन तेव्हा अपघात झालेल्या गाडीत उपस्थित नव्हते. १९९६ साली पुढे हंटरने विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. १९९३ साली हंटरचा कॅथलीन नामक मैत्रिणी समवेत विवाह झाला. त्या विवाहातून हंटरला तीन अपत्ये आहेत. २३ वर्षांच्या संसारानंतर हंटर आणि पत्नी विभक्त झाले. कॅथलीन हंटरच्या बायकोने दिलेल्या एका मुलाखतीत हंटर हा दारु, अमली पदार्थ, विवाहबाह्य संबंध, वेश्यागमन यावर अमाप खर्च करत होता. घरखर्च आणि कौटुंबिक जबाबदारी हाताळण्यात हंटर अपयशी ठरला याच कारणामुळे कॅथलीन आणि हंटर यांच्यात घटस्फोट झाला. हंटर हा अल्पवयीन काळातच दारु, अमली पदार्थांच्या आहारी गेला. व्यसनमुक्ती केंद्रात हंटर बायडेनवर अनेकदा उपचार झालेत. अमेरिकेच्या राखीव नौदलात हंटरची निवड झाली, परंतु दुसऱ्याच दिवशी हंटर अमली पदार्थांच्या वैद्यकीय चाचणीत दोषी आढळला. मोठ्या भावाचे कर्करोगाने निधन झाल्यावर हंटरची व्यस्नाधीनता अधिकच वाढली होती. २०१९ साली डीएनए चाचणीत हंटर एका नृत्यांगनेच्या मुलाचा पिता असल्याचे समोर आले. परंतु पितृत्वाचा कायदेशीर लढा हंटर समोपचाराने मिटवण्यास यशस्वी ठरला. काही प्रकाशित बातम्यांनुसार हंटरचा घटस्फोट होण्यागोदर दोन वर्ष तो हॅलाई बायडेन या आपल्या मृत भावाच्या पत्नीसमवेत संबंधात होता. आपल्या वहिनी समवेतचे संबंध त्या दोघांनी समोपचाराने निकाली काढले. पुढे २०१९ साली हंटरने आणि दक्षिण आफ्रिकी चित्रपट निर्माती मेलिस्सा कोहेन समवेत विवाह केला. त्या विवाहातून त्यांना एक अपत्य आहे. वडील म्हणून जो बायडेन यांनी मुलाच्या बाबतीत झालेल्या विरोधकांच्या आरोपांवर अंमली पदार्थ सेवन आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपडलेल्या हंटरचा आपल्याला अभिमान असल्याचा आवर्जून उल्लेख केला. उप राष्ट्राध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी मुलासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले परंतु वडील म्हणून जो बायडेन कदाचित अपयशी ठरले.
हंटर बायडेन एमबीएनए बँकेचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना जो बायडेन यांनी बँकेला दिवाळखोर जाहीर करुन बँक आॅफ अमेरिकेत विलीनीकरणास मदत केल्याचा आरोप आहे. या व्यतिरिक्त उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मिळालेली देणगी, चीन आणि युक्रेनस्थित अनेक आर्थिक गैरव्यव्हारांचे हंटर बायडेन वर आरोप आहेत. वडिलांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे हंटर बायडेनला झालेला आर्थिक फायदा असे काही आर्थिक गैरव्यव्हारांचे आरोप झालेले आहेत. गेल्या पाच वर्षापासून हंटर बायडेनविरोधात विविध प्रकरणात चौकशी सुरु आहे. सरकारी अभियोक्ता म्हणून ट्रम्प यांनी नियुक्त केलेले सरकारी वकील डेव्हिड विईस यांची नियुक्ती बायडेन यांनी कायम ठेवली आहे. ६ सप्टेंबर २०२३ रोजी विईस यांनी हंटर बायडेन विरोधात पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात आरोप ठेवणार असल्याचे जाहीर केले. अमेरिकेत बंदूक वापरण्याची मुभा आहे, परंतु अमली पदार्थांच्या अमलाखाली असलेल्या व्यक्तीस पिस्तूल बाळगता येत नाही. हंटर बायडेन यांनी त्याबाबत अर्ज करताना अमली पदार्थांचे सेवन करत नसल्याची माहिती अर्जात दिल्याने ते शिक्षेस पात्र ठरु शकतात. याबाबतीत आरोप निश्चितीत सरकारी वकील आणि हंटर बायडेन यांच्यात कायदेशीर एकमत न झाल्याने प्रकरण न्यायालयाच्या कक्षेत जाईल. मुलाच्या बेकायदेशीर वर्तवणूकीचा परिणाम म्हणून सभागृहाचे अध्यक्ष केविन मॅककार्थी यांनी १२ सप्टेंबर रोजी जो बायडेनविरोधात महाभियोगाची चौकशी सुरु झाल्याचे जाहीर केले. १४ सप्टेंबर रोजी सरकारी वकीलांनी अंमली पदार्थ सेवनाबाबत खोटी माहिती देत पिस्तूल खरेदी केल्याचा आरोप निश्चित केल्याचे जाहीर केले. हंटर बायडेन यांचे वकीलांनी नियोजित सुनावणीत हंटर त्याबाबत निर्दोष असल्याचे न्यायालयास कळवणार असल्याचे जाहीर केल्याने त्या गुन्ह्यात आता खटला अटळ आहे. हंटर बायडेनला या गुन्ह्यात शिक्षा झाल्यास कमाल २५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकेल. आयकर न भरल्याच्या प्रकरणात अद्याप स्पष्टता आलेली नसून लवकरच त्याबाबत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
हंटर बायडेनवर झालेली आरोप निश्चिती, फौजदारी खटला याकारणास्तव जो बायडेन यांची कारकीर्द धोक्यात आली आहे की काय? याचे उत्तर बायडेन यांना पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतच मिळेल. हंटर यांची कारकीर्द, गुन्ह्यांचे आरोप बघता प्रदीर्घ काळ अमेरिकेच्या राजकारणावर प्रभाव असलेल्या जो बायडेन यांच्यासाठी राजकीय कसोटीचा काळ असणार आहे. पुढील वर्ष अमेरिकेत निवडणुकीचे असल्याने या सगळ्या आजी माजी राष्ट्राध्यक्षांच्या कायदेशीर प्रकरणांना अधिकच महत्व आले आहे. जो बायडेन यांचेवर अप्रत्यक्ष; तर ट्रम्प यांचेवर प्रत्यक्ष आरोप आहेत. याअगोदर ट्रम्प हे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहेत. त्यात आता बायडेन यांचेवर ती वेळ आली आहे.
– अॅड. प्रतीक राजूरकर