
खरंतर २०१९ साली तमाम क्रिकेट विश्व ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होतं त्या प्रश्नाचे उत्तर आज अहमदाबादमध्ये मिळाले. त्यावेळी इंग्लंड संघ विजेता ठरला असला तरीही मनाने कोणीही ती गोष्ट मानायला तयार नव्हतं. आणि प्रत्येकाला न्यूझीलंड संघ हरला नाही असंच वाटत होतं. क्रिकेट रसिकांच्या त्या भावनांचा आदर नियतीने अहमदाबादच्या स्टेडियमवर केला. तब्बल ४५ दिवस चालणाऱ्या क्रिकेट विश्वातील एका मोठ्या महोत्सवाची गुरुवारी अशी सनसनाटी सुरुवात झाली. क्रिकेट विश्व प्रतीक्षेत असलेल्या गेल्या चार वर्षाच्या प्रश्नाच उत्तरही मिळालं.
१४ जुलै २०१९ स्थळ होते इंग्लंडच्या क्रिकेटच्या पंढरीचा प्लॉट- मैदानाचा लॉर्ड. लॉर्ड्स मैदानावर एक क्रिकेटची रोमहर्षक झुंज सुरू होती, इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघात. यजमान इंग्लंड संघ त्याआधी त्यांनीच आयोजित केलेल्या स्पर्धेत जिंकला नव्हता; मात्र यावेळी इंग्लंडचा संघ चांगल्यात फॉर्ममध्ये होता आणि अंतिम फेरीत त्यांनी न्यूझीलंडचा डाव मर्यादित धावसंख्येवर रोखल्यानंतर विजय त्यांना अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होता. असं म्हणतात की क्रिकेटची अनिश्चितता अशा वेळी निश्चितच मैदानात अवतरते आणि झालं ही तसंच. सुरुवातीला २४१ ही सहज गाठण्यायोग्य धावसंख्येनंतर कठीण वाटायला लागली आणि मग एखाद्या रहस्यपटात शोभेल असे घटनाक्रम लॉर्ड्सवर घडत गेले.
पहिल्या डावातील धावसंख्याही सारखीच एक- एक षटकाच्या खेळानंतरची धावसंख्याही सारखीच आणि मग इंग्लंडच्या पारड्यात विजेतेपदाचे पडलेले झुकते माप. लॉर्ड्सवरच्या कुणालाही ही गोष्ट रुचली, नाही आवडली नाही. इंग्लंडने विश्वचषक तर जिंकला: परंतु जगातील तमाम क्रिकेट रसिकांची हृदय न्यूझीलंडने जिंकली होती.
हे दोन संघ २०२३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत
तो रहस्यपट तेथेच थांबला नव्हता. तमाम क्रिकेट रसिकांच्या डोक्यात गेली चार वर्ष ती घटना सतत आठवण करून देत होती आणि त्या रहस्यपटाचा पुढचा अंक गुरुवारी अहमदाबादला सुरू झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन संघ २०२३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले. त्या थरार नाट्याचा अपूर्ण दुसरा अंक आज गुरुवारी अहमदाबाद मध्ये सुरू झाला.
क्रिकेट विश्वातील एका मोठ्या महोत्सवाची सुरुवात
खरंतर २०१९ साली तमाम क्रिकेट विश्व ज्या प्रश्नाचे उत्तर शोधत होतं त्या प्रश्नाचे उत्तर आज अहमदाबादमध्ये मिळाले. त्यावेळी इंग्लंड संघ विजेता ठरला असला तरीही मनाने कोणीही ती गोष्ट मानायला तयार नव्हतं. आणि प्रत्येकाला न्यूझीलंड संघ हरला नाही असंच वाटत होतं. क्रिकेट रसिकांच्या त्या भावनांचा आदर नियतीने अहमदाबादच्या स्टेडियमवर केला. तब्बल ४५ दिवस चालणाऱ्या क्रिकेट विश्वातील एका मोठ्या महोत्सवाची गुरुवारी अशी सनसनाटी सुरुवात झाली. क्रिकेट विश्व प्रतीक्षेत असलेल्या गेल्या चार वर्षाच्या प्रश्नाच उत्तरही मिळालं.
न्यूझीलंडची लोकसंख्या तशी बेताचीच
न्यूझीलंडची लोकसंख्या तशी बेताचीच. आपल्या देशातील एखाद्या राज्याइतकी देखील नाही. मात्र, तरीही न्यूझीलंड हा देश तीन खेळांमध्ये सातत्याने चमकत आहे, त्यापैकी रग्बी हा एक खेळ आहे आणि क्रिकेट या खेळाची लोकप्रियता त्या देशात तिसऱ्या क्रमांकाची आहे. नोकरीनिमित्त न्यूझीलंडमध्ये आलेल्या अनेक वंशाच्या, देशाच्या धर्माच्या लोकांनी बराच काळ वास्तव्य केले आहे. अशा लोकांची युवापिढी न्यूझीलंड संघाच्या क्रिकेटच्या यशाला हातभार लावत आहे.
विजयी घोडदौड थांबली
आपण १९९२ सालच्या विश्व चषकात पाहिलं होतं की दीपक पटेल नामक एक ऑफ स्पिनर ज्याने तो विश्वचषक गाजविला. उपांत्य फेरीतील अनपेक्षित पराभवानंतर न्यूझीलंडची त्या स्पर्धेतील विजयी घोडदौड थांबली होती. त्यानंतर आता जितेन पटेल किंवा एजाज पटेल या नावाने देखील न्यूझीलंडच्या धावफलकातील गोलंदाजांचे रकाने अडविले होते.
एक पंजाबी युवकदेखील फिरकी गोलंदाज
ईश सोडी हा एक पंजाबी युवकदेखील फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू या भूमिकेतून न्यूझीलंडचा डाव अनेकदा सावरताना दिसतो. आता या मालिकेत आणखी एका भारतीय वंशाच्या खेळाडूची भर पडली आहे आणि त्याने पहिल्याच पावलात तमाम क्रिकेट विश्वाला जिंकलं. इंग्लंडविरुद्ध महत्वाच्या सामन्यात त्यांनी म्हणजे रचिन रवींद्र याने शतक झळकावले आणि फिरकी गोलंदाजी करत विकेटही काढल्या.
न्यूझीलंडमध्ये स्थायिक
रचींन रवींद्र कृष्णमूर्ती…. वेलिंग्टनचा हा एक युवा क्रिकेटपटू. पालक न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले आणि न्यूझीलंडला एक युवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. रवींद्र जाडेजाप्रमाणे शरीरयष्टी – चेहरेपट्टी आणि गोलंदाजी देखील डावखुरी फिरकी गोलंदाजी. गोलंदाजी आणि फलंदाजी यामध्ये आपल्या संघाला मदत करणारा हा २३ वर्षीय खेळाडू कर्णधार केन विल्यम्सन सामन्यासाठी फिट ठरला नाही आणि रचिनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली याचे त्याने सोनं केलं.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात धुमधडाक्यात
२०२३ च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची सुरुवात तर अशी धुमधडाक्यात झाली आहे. चार वर्ष मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवलेला किंवा सलत असणाऱ्या एका प्रश्नाचे उत्तर आज मिळालं. खरंतर याला काव्यात्मक न्याय असं म्हणावं लागेल. इंग्लंड संघ जरी त्यावेळी रडीचा डाव खेळला नसला तरीही यजमान म्हणून इंग्लंडला झुकत माप मिळालं हे नाकारता येत नाही आणि त्याची प्रचिती चार वर्षांनी आली. हा विश्वचषक कसा असेल याचीही ही एक झलक होती असंच म्हणावं लागेल. कारण भारतातील खेळपट्ट्या सध्या नुकत्याच सरत असलेल्या पावसाळ्यामुळे ताज्यातवान्या आहेत. खेळपट्टीवर आणि मैदानावर गवत हिरवकंच आहे. खेळपट्टीवरील गवत जरी कापण्यात आलं असलं तरी त्या गवतात जान आहे. त्यामुळेच आपण जर पाहिलं की सराव सामन्यांमध्ये साडेतीनशे धावसंख्या अगदी सहजगत्या नोंदविली गेली आणि ती धावसंख्या पाठलाग करून गाठली देखील गेली. असंच जर चित्र किमान महिनाभर या स्पर्धेत पाहायला मिळाले तर तमाम क्रिकेट रसिकांना एका दर्जेदार फलंदाजीची मेजवानीच मिळेल असं वाटतं. कारण टी २० क्रिकेटच्या आगमनानंतर प्रत्येक देशाकडे स्फोटक असे फलंदाज निर्माण झाले आहेत आणि कायम बचावात्मक क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडनेदेखील गेल्या वर्षभरात आपला दृष्टिकोन बदलून आक्रमक स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे जागतिक क्रिकेटला एक नवी दिशा मिळत आहे. जसं १९९० नंतर म्हणजे गेल्या शतकाच्या अखेरच्या दशकात श्रीलंका संघाने आक्रमक फलंदाजीच नवीन समीकरण तयार केलं होतं अगदी तसाच प्रकार आता इंग्लंडकडून होत आहे. ही गोष्ट क्रिकेटसाठी चांगली आहे आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे जो संघ हरायला घाबरत नाही तो आपल्या गुणवत्तेचा वर्षाव सतत करत असतो. त्यामुळे चांगला खेळ पाहण्याची संधी उपलब्ध होते. यंदाच्या विश्वचषकात आपण या गोष्टीची अपेक्षा करूया. याच स्तंभात मागे म्हटल्याप्रमाणे न्यूझीलंड संघ हा यंदाच्या विश्वचषकाचा डार्क हॉर्स असेल. त्याची कारणे म्हणजे भारतामध्ये आयपीएल स्पर्धा खेळून भारतातील खेळपट्ट्या, भारताचे फिरकी गोलंदाज, त्यांना कसं खेळायचं याचे ज्ञान न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलच अवगत झाल आहे. जेव्हा त्यापैकी काही फलंदाजांना चेन्नई सुपर किंग्सतर्फे खेळताना महेंद्रसिंग धोनीसारख्या कप्तानाच्या ज्ञानाचा मिडास स्पर्श झाल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो हे सलामीच्या सामन्यातच आपण पाहिलं. धोनीच्या तालमीत तयार झालेल्या डेव्हन
कॉन्वे याने देखील झंजावाती दीड शतक फटकाविले. आयपीएल स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंची संख्या अधिक आहे आणि त्याचा लाभ यंदा त्यांना भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत होणार आहे. त्यांचे खेळाडू भारतातल्या सर्व प्रथित यश फ्रेंचाइजींच्या आयपीएल संघातर्फे खेळतात.
अहमदाबादच्या स्टेडियमवरील खेळपट्टीचे स्वरूप जर पाहिले आणि आयसीसीचे खेळपट्टी विषयीचे तज्ञ अटकिंसंस यांनी विश्वचषकाच्या आरंभीच स्पष्ट केलेली एक गोष्ट जाणविली. ही गोष्ट म्हणजे यंदाच्या विश्वचषकासाठी स्पोर्टिंग विकेट किंवा खेळपट्ट्या हव्यात असा त्यांचा आग्रह असेल. किमान अहमदाबादला तरी स्पोर्टिंग विकेट होती. त्यामुळे धावांचा वर्षाव पाहायला मिळाला. इंग्लंड संघ जरी पहिल्या सामन्यात पराभूत झाला असला तरीदेखील त्यांची ‘बज बॉल’ थेअरी स्पोर्टिंग विकेटवर अधिक प्रभावीपणे फलदायी ठरू शकेल. त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात आपल्याला ४१० धावसंख्या देखील आरामात ओलांडणारा संघ कदाचित इंग्लंडचा असेल हे पाहता येईल. याचाच अर्थ अशा या स्पोर्टिंग खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या चार संघांना अधिक संधी आहे. याचा दुसरा अर्थ असा की आशियाई देशातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांना विजयासाठी काही वेळा प्रखर संघर्ष करावा लागेल. भारताचा संघ समतोल आहे, चांगला आहे; मात्र भारतीय संघ स्वतःकडे असलेल्या वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणावर किती विश्वास दाखवतो यावरच भारताची स्पर्धेतील वाटचाल अवलंबून असेल.
मोहम्मद शमी, सिराज आणि बुमरा या तीन वेगवान गोलंदाजांना एकत्रितपणे खेळवायचे धाडस भारत दाखवणार का त्याऐवजी भारतीय संघ कदाचित तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्या याच्या नावाचा विचार करू शकेल. फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत खरंतर कुलदीप-अश्विन यांना प्राधान्य देऊन जाडेजाला तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून क्रमवारीत घेणे आवश्यक आहे. मात्र, तसे न होता जाडेजाला प्राधान्याने घेतल्यास कुलदीप किंवा अश्विन यापैकी एकाला किंवा दोघांनाही संघाबाहेर बसावं लागेल. त्यामुळे भारतीय संघ सपोर्टींग खेळपट्टीवर आपले फॉर्मातले गोलंदाज खेळविण्याऐवजी बचावात्मक डावपेच खेळला तर ते आपल्या अंगलट येण्याची शक्यता अधिक आहे. तीच परिस्थिती पाकिस्तानचीदेखील आहे. पाकिस्तानचा संघ ‘अनप्रेडिक्टेबल’ आहे. हा संघ कोणत्याही तगड्या संघाला हरवू शकतो आणि त्यानंतर दुबळ्या संघ विरुद्ध लढत गमावू देखील शकतो
यंदाची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात पावसाळा सरताना जरी सुरू होत असली तरीही भारतातील सणासुदीचा हंगाम म्हणजे आयसीसीसाठी हा विश्वचषक म्हणजे लागलेली लॉटरीच आहे. कारण नवरात्री, दुर्गा पूजा आणि दिवाळी अशा सणानंतर किंवा सणादरम्यान हा विश्वचषक होत आहे. त्यामुळे उत्साह आला. त्याशिवाय आर्थिक सुबत्ता ही भारतीयांच्या खिशातून डोकावत असेल आणि अशावेळी जर भारतीय संघाने गेले एक तप हाती न लागलेल्या विश्वचषक विजयाची दिवाळी भेट जर भारतीयांना दिली तर त्यासारखा दुसरा आनंद नाही. – विनायक दळवी