‘मन में है विश्वास’

ज्योती मोहिते ही एक छान विद्यार्थिनी होती. फारशी बोलकी नसली तरी शांतपणे लेक्चर्स व इतर ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायची. एकदा ती समुपदेशनासाठी आली. खाली मान घालून रडत राहिली. थोड्या वेळाने तिने बोलायला सुरुवात केली. तिच्या तुटक तुटक बोलण्यातून मला जे काही कहाणी कळली, ती थोडक्यात अशी होती.

  ज्योतीच्या घरची आर्थिक परिस्थिती खरोखरच खूप बिकट होती. तिच्याहून लहान शिकणारी भावंडे, वडिलांची नुकतीच गेलेली नोकरी, आईचे आजारपण या सगळ्यांमुळे ज्योती खूपच बेजार झाली होती. ती छोट्या मोठ्या नोकऱ्याही शोधत होती आणि करत होती. ज्योतीचे म्हणणे असे होते की, तिला काहीच करावेसे वाटत नाही, तिला काही करता येत नाही, काही करण्याचा तिला आत्मविश्वास वाटत नाही. अगदी साधा नोकरीचा अर्ज द्यायचा म्हटले तरी, तिचे हात थरथरायला लागतात. ज्योतीचे हे म्हणणे ऐकून एक एक मुद्दा हळूहळू उलगडायला सुरुवात केली.

  त्यात सर्वात प्रथम आत्मविश्वास ही संकल्पना समजून घ्यायचे असे आम्ही ठरवले. आपल्याला अनेकदा असे वाटते की आत्मविश्वास आहे किंवा नाही या दोनच शक्यता असतात. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट. पण नीट विचार करता आपल्या असे लक्षात येईल की, आत्मविश्वास ही एक प्रवाही संकल्पना आहे. आत्मविश्वास हा नेहमीच काहीतरी कृतीशी निगडित असतो.

  उदाहरणार्थ एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्याला पोहायचा आत्मविश्वास असतो; परंतु गणित सोडवण्याचा आत्मविश्वास त्याच्याकडे नसेल. म्हणजेच काय तर जी कृती आपण पुन्हा पुन्हा करतो त्याची उजळणी, सराव करतो ती गोष्ट, कृती करण्यात आपल्याला सहजता येते व यालाच आपण आत्मविश्वास असे म्हणतो.

  अमुक एक गोष्टीविषयी आत्मविश्वास आहे म्हणून ती व्यक्ती आत्मविश्वास घेऊनच आलेली आहे असं कधीच नसतं. म्हणूनच ‘आत्मविश्वास ही सतत मिळवण्याची सतत सरावाने आत्मसात करण्याची एक शक्ती आहे.’ ते सतत करण्याचे एक जीवन कौशल्य आहे. ज्योतीला मी म्हटले की, तुला समुपदेशन घ्यावेसे वाटले. आपल्याला समुपदेशनामधून काही दिशा मिळू शकेल असा कुठेतरी विश्वास वाटला याचाच अर्थ सुक्तावस्थेत असलेला, लपलेला का होईना आत्मविश्वास तुझ्या मनामध्ये नक्कीच आहे. याच लपलेल्या विश्वासाला आपल्याला अधिक प्रकट करायचा आहे. त्यासाठी थोडेसे विचार बदलावे लागतील किंवा आपण ठरवलेले ध्येय ती अजून छोटी छोटी करावी लागतील.

  ज्योतीने कॉम्प्युटर व टॅली शिकायला सुरुवात केली. किमान एकातरी महाविद्यालयातील कार्यक्रमात तिने सभासद राहायचे कबूल केले. मला वेळ होईल का? मला लोकांशी बोलायला जमेल का? या प्रश्नांची उत्तरे कौन्सिलिंग सेशनमध्ये न शोधता प्रत्यक्ष करून बघून शोधायची असेही ठरवले. जिथे कुठे अडचण वाटेल तिथे माझ्याशी आपणहून बोलायला यावे असे मी तिच्याकडून वचन घेतले.

  ज्योतीला कॉम्प्युटरमध्ये खूपच रस वाटू लागला होता. मग तिच्या वर्गातल्या एका मुलीला तिला येत असलेली कॉप्यूटर कौशल्य मी शिकवायला सांगितले. ही युक्ती खूपच उपयोगी आली. त्या मुलीला शिकवता शिकवता तिच्याशी बोलता बोलता ज्योतीला हळूहळू लोकांशी बोलणे सहज वाटू लागले. आता ज्योतीला नीट बोलता येऊ लागले तसेच कॉम्प्युटर कौशल्य असल्याने ज्योतीला नोकरीही मिळाली.

  ज्योतीची प्रगती बघून खूप छान वाटत होते. यथावकाश ती पदवीधर झाली आणि आपल्या पायावरही उभी राहिली. ज्योती काही वर्षांनी लग्नाचे आमंत्रण द्यायला आली. बिचकत समुपदेशनासाठी आलेली ज्योती, माझ्यात कसा आत्मविश्वास नाहीच असे मला ठासून म्हणणारी ज्योती, आणि आज माझ्यापुढे हसतमुख उभी असलेली, स्वतःचे लग्न स्वतः ठरवून पत्रिका घेऊन आलेली, दोन्ही घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणारी ज्योती, यात खूपच फरक होता. आत्मविश्वास जणू काही तिच्या मनातून ओसंडत होता. म्हणजेच काय तर आत्मविश्वास ही सतत करायची, सतत मिळवायची गोष्ट आहे.

  खर म्हणजे लहान मुलांकडून आयुष्याबद्दल शिकण्यासारखे खूप असते. चालायला न येणारे मूल नेहमीच अट्टाहासाने चालत राहतो. आपण पडू, आपल्याला लागेल, असा कोणताच विचार त्याच्या मनात नसतो. ध्यास घेतल्यासारखे त्याला फक्त चालायला शिकायचे असते. अगदी कालचाच प्रसंग सांगते, यावर्षीच्या वार्षिक अंतर महाविद्यालयीन गंधर्व महोत्सवामध्ये आम्ही एक गंमतीशीर कार्यशाळा ठेवली होती. ही कार्यशाळा फक्त मुलांसाठी होती.

  पोळपाटावर पोळ्या लाटणे हे कौशल्य या कार्यशाळेमध्ये शिकवले जात होते. पोळ्या लाटायच्या स्टॉलवरची मुलांची गर्दी बघून आम्हा मंडळींना खरोखरच सुखद धक्का बसला. म्हणजेच काय बॉक्सिंग, रस्सीखेच, पळापळी या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या पण पोळ्या करायचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नव्हता. तो मिळवावा म्हणूनच ही सगळी मंडळी मस्तपैकी पोळपाटवर पोळ्या लाटत होती. या सगळ्या चर्चेचा सार एकच आहे आणि ते म्हणजे ‘कर करके सीखो’.
  एन.एस.एस च्या कॅम्पमध्ये मुले खूप गाणी म्हणत असतात. एक आवडतं गाणं म्हणजे

  ‘हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब,
  हम होंगे कामयाब, एक दिन..
  मन मे है, विश्वास पुरा है,
  हम होंगे कामयाब एक दिन…’

  हा विश्वास मनामध्ये जागता ठेवता आला पाहिजे. अनेकदा या विश्वासाला तडे जातात. अनेकदा आपण आत्मसंशयने (सेल्फ डाऊट) पछाडले जातो. कितीतरी वेळा आयुष्यात येणारे अपयश, पराजय नात्यांमधली कटूता, नात्यांमधल्या अपेक्षा किंवा बिकट परिस्थिती या किंवा अशा अनेक कारणांमुळे आपण भांबावून जातो, घाबरून जातो. अशा परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःला विचारू शकतो आणि या प्रश्नाच्या उत्तरातून आपला हरवलेला विश्वास पुन्हा आपल्याला मिळू शकतो.

  तो कळीचा प्रश्न म्हणजे या बिकट परिस्थितीमधून जाणारी जगातली मी पहिलीच व्यक्ती आहे का? किंवा मी एकमेव व्यक्ती आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नकारात्मकच येते. कारण व्यासांनी खूप पूर्वी म्हणून ठेवलेले आहे की, ‘मानवी मनाच्या मानवी जीवनाच्या सगळ्या घालमेलीच, एक्सप्रेशन प्रकटीकरण महाभारतामध्ये कित्येक वर्षांपूर्वी येऊन गेलेले आहेत’.

  दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विश्वास कधी बाहेरून येत नसतो. बाहेरची एखादी गोष्ट, एखादी व्यक्ती, एखादा गुरु याला निमित्त मात्र ठरू शकतो, पण विश्वास ही विहिरीला ज्याप्रमाणे आतून पाणी येते त्याप्रमाणे मनाच्या खोल विहिरीतून उचंबळून येणारी गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत, ‘जर का तुमचा जगातल्या ३३ कोटी देवांवर विश्वास असेल पण तुमचा स्वतःवरच जर का विश्वास नसेल, तर तुमचा ईश्वरावरचा विश्वासही खोटा आहे’. म्हणजेच काय स्वतःच्या मनात डोकावत आत्मपरीक्षण करत परखडपणे, शिस्तीने पुढे जात राहिलो की आपोआप आत्मविश्वास वाढत जातो. कबीरांनी त्यांच्या भजनात, म्हटलेच आहे, साक्षात ईश्वर म्हणतात…

  ‘मोको कहाँ ढूंढें बन्दे, मैं तो तेरे पास में ।
  ना तीरथ में ना मूरत में, ना एकांत निवास में ।
  ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में ॥
  ना मैं जप में, ना मैं तप में, ना मैं व्रत उपास में ।
  ना मैं क्रिया क्रम में रहता, ना ही योग संन्यास में ॥
  नहीं प्राण में नहीं पिंड में, ना ब्रह्माण्ड आकाश में ।
  ना मैं त्रिकुटी भवर में, सब स्वांसो के स्वास में ॥
  खोजी होए तुरत मिल जाऊं एक पल की ही तलाश में ।
  कहे कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूँ विशवास में ॥’

  ईश्वरापर्यंत पोहोचायचा रस्तासुद्धा या विश्वासातून आणि आत्मविश्वासातूनच जातो. आता एक महत्त्वाची छोटीशी वाटणारी पण खूप मोठी टीप. या प्रवासाची सुरुवात केव्हातरी नीट विचार करून करायची नसते. गमतीत सांगायचे झाले तर एक जानेवारी सोमवार असेल तेव्हाच मी चांगल्या कामाला सुरुवात करेन असे म्हणणे म्हणजे स्वतःची भलामण करण्यासारखे आहे. आत्मविश्वास मिळवायचा असेल तर त्याची सुरुवात आज आत्ता लगेच करा. एखादा छोटा अभ्यास घ्या… एखादे कौशल्य घ्या, और बस चल पडो…. !!

  डॉ. सुचित्रा नाईक

  naiksuchitra27@gmail.com