नाट्यसमीक्षेची चिरेबंदी लेखणी!

कमलाकर नाडकर्णी हे गेली पाच दशके नाट्यसमीक्षा करणारे रंगधर्मी. मराठी नाट्यसमीक्षेला मानाचे व हक्काचे स्थान त्यांच्या लेखणीमुळे मिळाले. कुणाचीही मुलाहिजा न बाळगता निर्भिड व परिपूर्ण समीक्षा करताना त्यासोबत असलेली मिश्कील शैली थक्क करून सोडायची. महाराष्ट्रभरात 'जिथे नाटक तिथे पोहचणारे' नाडकर्णी म्हणजे रंगभूमीवरल्या एका युगाचे साक्षीदारच!

काही माणसं भेटीपूर्वी जशी वाटतात, त्याहीपेक्षा प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्यांच्याबद्दलची मनातली प्रतिमा पूर्ण पूसली जाते. खोटी ठरते. ‘सामना’चे ते दिवस. ३५ वर्षापूर्वी नाट्यसमीक्षकाचा मुखवटा माझ्यावर अलगद चढविला गेला आणि पहिल्याच नाटकाच्या पत्रकार परिषदेत दादर टीटी इथल्या एका हॉटेलात कमलाकर नाडकर्णी भेटले!

एक रागीट, वादळी, स्पष्टवक्ता, चिडखोर, एकाकी अशी त्यांची असलेली ‘ऐकीव’ प्रतिमा क्षणार्धात पुरती पुसली गेली. उलट एक मिश्कील, अभ्यासू, टोप्या उडविणारा, मनाने तरुण असा एक जवळचा श्रेष्ठ ज्येष्ठ सहकारी जसा गवसला होता. बरेच दिवसानंतर भेटलेल्या दोस्ताचा आनंद त्यांच्या देहबोलीत होता. भरभरून ते बोलतच होते.

राजकारण, मुंबई, हॉटेल, कोकणातले पदार्थ, गणपती उत्सव… वगैरे… वगैरे… नाटकाच्या निमित्ताने आमची भेट होत होती, पण गेली काही वर्षे ते जसे अज्ञातवासातच होते. त्यांनी केलेली नाट्यपरीक्षणे, लेख, भेटीगाठी याचा संदर्भ, आठवणी या कायम सोबत होत्या आणि आहेत. त्या कदापि विसरता येणं शक्य नाही. ‘कमलाकर बोलतोय….’ हा त्यांचा फोनवरला हुकमी आवाज यापुढे कधी ऐकू येणार नाही…

‘नाटकं ठेवणीतली’ – या पुस्तक निर्मितीसाठी २००८-०९ च्या सुमारास त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मुक्काम ठोकला होता. स्वतःला जुन्या पुस्तकात जणू कोंडून घेतले होते. अनेक अंधारात गेलेल्या नाटकांची माहिती, लेख त्यावरले भाष्य हे जमा केले. कोकणातल्या वामन पंडित यांच्या पंडित पब्लिकेशनतर्फे या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. आता या पुस्तकाची एक प्रत माझ्या हाती ‘भेट’ म्हणून मिळाली. मी पुस्तक खरेदी करू नये, असा त्यांचा आदेशच होता. पण काही महिने या ना त्या कारणांनी भेट झाली नाही.

एके दिवशी संध्याकाळी फोन खणखणला. ‘कुठे आहात? कमलाकर बोलतोय. गडावरून (कार्यालयातून!) निघणार कधी? ‘शिवाजी’ला या!’ आणि त्यांना शिवाजी मंदिरात बुकींगवर भेटलो. तो दिवस होता १० जुलै २०१०. आठवणीने पिशवीतून आणलेले पुस्तक माझ्या हाती ‘सप्रेम भेट’ लिहून स्वाक्षरीसह दिले. ‘हे तुमच्या संग्रही ठेवा. परीक्षणाची प्रत ही प्रकाशकाकडून स्वतंत्र मिळेल!’ असेही ते म्हणाले. माझ्याहाती पुस्तक मिळावे. म्हणून त्यांचा हा प्रेमळ खटाटोप अखेर पूर्ण झाला. नंतर पुस्तकावर, त्यावरील परीक्षणावरही फोनवर बरेचदा बोलणीही झाली.

एका प्रदीर्घ कालखंडाचे ते रंगसाक्षीदार होते. बेधडक नाट्यसमीक्षा त्यांची होती. कुणाचाही दबाव, दोस्ती, भिडभाड ते बाळगत नसत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे परीक्षण करताना त्यांनी ‘द ग्रेट बाबासाहेब पुरंदरे सर्कस!’ असे वर्णन केले तर रत्नाकर मतकरी यांच्या ‘माझं काय चुकलं’ या नाट्याचे शीर्षक त्यांनी ‘तेच तर सांगतोय!’ असं सांगून मतकरी यांची विकेट घेतली.

एखाद्या नाटकाचे परीक्षण दोन भागात करण्याचा हटके प्रकारही त्यांनी केला. जो नाट्यसमीक्षेच्या वाटेवरला एकमेव ठरला. मोहन वाघ यांच्या ‘चंद्रलेखा’ संस्थेने पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘स्वामी’ या ऐतिहासिक नाटकाचा भव्य-दिव्य प्रयोग केला होता. त्यावर दोन भागात परीक्षण आले.

पहिल्याचं शीर्षक – ‘शनिवार वाड्याचा स्वामी!’ तर दुसऱ्याचं – ‘रविवार वाड्याचा स्वामी!’ अमोल पालेकर यांच्या मूळ जपानी असलेल्या ‘राशोमान’ या नाटकाचे वर्णन त्यांनी ‘ढुंग फुस्स…’ असं दिले! प्रेमानंद गज्वी यांच्या ‘डॅम इट अनु गोरे!’ या नाटकावर ‘डॅम गेला फुटून, नाटक गेले वाहून!’ असे म्हटले.

नाटक हे धरण फुटीतून वाहून गेले असा त्यांनी टोला लगावला! प्रशांत दळवी लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘सेलिब्रेशन’ नाटकावर ‘हे सेलिब्रेशन की एग्झिबिशन?’ असा सवाल समीक्षेतून करून व्हिलचेअरवरलं फिरतं प्रदर्शन! असही म्हटलं. ‘अष्टविनायक’ संस्थेचे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांचे ‘सर आले धावून’ या नाटकात लक्ष्मीकांत बेर्डे प्रमुख भूमिकेत होता. बरीच चर्चा या नाटकावर रंगली होती. त्यांच्या समीक्षेत त्यांनी ‘नाट्य गेले पळून!’ असा मथळा दिला. हे नाटक नाही. त्यात काही नावीन्य नाही, असा कडक शेराही दिला. दिवंगत पत्रकार, नाटककार जयंत पवार यांचे ‘अधांतर’ नंतर रंगभूमीवर आलेले ‘काय डेंजर वारा सुटलाय!’ याचे त्यांनी ‘सैरावैरा!’ असे उत्तरच दिले.

अधांतर नाटकाची तुलना या नाटकाशी त्यांनी करून ‘यातलं डेंजरच हरवलंय’ असही म्हटलं. महाराष्ट्र रंगभूमीने हे नाटक रंगभूमीवर आणलं होतं. एक ना दोन‌. त्यांनी केलेली नाट्यसमीक्षा जशी बोचरी, टोचरी परिपूर्ण असायची तशीच त्यांना आवडलेल्या नाटकावरही त्यांनी भरभरून स्तुती केली त्यामागे ठामपणे उभे राहिले! वाचकांना, रसिकांना नाटकाकडे बघायची एक दृष्टी देणारे नाडकर्णी म्हणजे नाट्यविद्यापीठच होते!!

नाट्यतज्ञ डॉ. कृ. रा. सावंत यांच्या तालमीत नाट्यशिक्षण घेतल्याची माझी खबर त्यांना कुणाकडून तरी कळली आणि तेव्हापासून त्यांचा संवाद वाढला. जो प्रामुख्याने फोनवर होता. ग्रीक-रोमन रंगभूमी, संगीत नाटके, बालनाट्ये, लोकनाट्याची वैशिष्ट्ये, नाट्यसंहिता, अनुवादित नाटके – हे त्यांचे जवळचे विषय असायचे. भरभरून त्यावर ते बोलत. एकदा तर टॅक्सीने दादरला त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्यासाठी गेलो खरा पण टॅक्सी उभी करून एका निर्मात्याच्या बेछूट आरोपांवर ते अर्धाएक तास बोलले. खोटेपणा-फसवेगिरी याचा त्यांना कमालीचा तिटकारा.

नाडकर्णी प्रयोगाला आलेत! म्हटलं की क्षणार्धात स्टेजवर, मेकअपरूममध्ये तणावाचे वातावरण! प्रयोगात खबरदारी घ्या, असही दबक्या आवाजात सांगितले जायचे. एक आदराची दहशतच जशी त्यांच्या लेखणीची असायची. ‘कडक समीक्षक’ आणि ‘दिलदार व्यक्ती’ असे दोन भिन्न मुखवटे हे आमच्या समीक्षकांच्या ‘पिढी’ने अनेक वर्षे अनुभविले. त्यांच्या धडक लेखणीमुळे अनेकांशी त्यांनी शत्रुत्व घेतले. खलनायक ठरले. त्याची त्यांनी कधी पर्वाही केली नाही. कारण हे ‘शत्रुत्व’ कुठेही वैयक्तिक नव्हते तर त्या नाटकाच्या निर्मितीमागल्या त्रुटींबद्दल असायचे.

दिलीप प्रभावळकर हे त्यांच्या ‘रोखठोक’ परीक्षणाला नेहमी ‘ठोकठोक’ लेखणी असंही म्हणायचे. मार्मिक विश्लेषण आणि कमालीची मिश्कील नजर त्यांच्या प्रत्येक लेखात डोकवायची. बालनाट्यातील कलाकार ते ज्येष्ठ नाट्यसमीक्षक अशा या प्रदीर्घ प्रवासात सशक्त नाटक समर्थपणे कसंकाय उभ राहिलं, हा त्यांचा शोध कायम होता. तो आज थांबलाय.

– संजय डहाळे

sanjaydahale33@gmail.com