जाणून घ्या गणपतीच्या वाहनांची माहिती….

आज गणेश चतुर्थी आहे. हा उत्सव चतुर्थी ते भाद्रपद महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. असा विश्वास आहे की या १० दिवसांत बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी येतात आणि त्यांचे दु: ख दूर करतात.

आज गणेश चतुर्थी आहे. हा उत्सव चतुर्थी ते भाद्रपद महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत साजरा केला जातो. असा विश्वास आहे की या १० दिवसांत बाप्पा आपल्या भक्तांच्या घरी येतात आणि त्यांचे दु: ख दूर करतात. यामुळे लोक मनोभावे गणपती बाप्पाची आपल्या घरात प्राणप्रतिष्ठा करतात. १० दिवस असणारा हा पाहुणा गणपती मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सर्वांनाच लळा जाऊन जातो. गणपती दिसायला मोठा असतो तरी त्याचे वाहन एकदम छोटे आहे हे तर सर्वांनाट ठाऊक आहे. पण गणपती बाप्पाच्या या छोट्या वाहनाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपतीचे वाहन असणारा उंदीर म्हणजेच मूषक याची माहिती आज जाणून घेऊयात….
गणपती बाप्पा ची मूर्ती पहिली की समोर दिसतात ते गणपतीचे सुपाएवढे कान, लाडूसारखे गोल पोट आणि पायाशी असलेला मूषकराज म्हणजेच उंदीर. हा उंदीर आपण गणपतीचे वाहन आहे असे समजतो परंतु गणपतीच्या ज्या प्राचीन मूर्ती आढळतात त्यामध्ये त्यात वाहन दिसत नाही. मुद्गल पुराणात गणेशाचे आठ अवतार वर्णिले आहेत त्यातील पाच अवतारात मात्र उंदीर हे गणपतीचे वाहन आहे तर अन्य अवतारात वक्रतुंड गणेशाचे वाहन सिंह, विकटाचे वाहन मोर तर विघ्नराज गणपतीचे वाहन शेष नाग आहे. गणेश पुराणात गणेशाचे चार अवतार वर्णिले आहेत. त्यात धुम्रकेतूचे वाहन घोडा, गजाननाचे वाहन उंदीर, महोत्कटाचे वाहन सिंह तर मयुरेश्वराचे वाहन मोर आहे. जैन ग्रंथात उंदीर, हत्ती, कासव आणि मोर अशी गणपतीची वाहने आहेत. मात्र पश्चिम आणि मध्य भारतातील गणेश शिल्पात उंदीर हेच गणपतीचे मुख्य वाहन आहे.
देशातील अनेक राज्यात गणपतीचे वाहन म्हणून उंदराचीच ओळख आहे. उंदीर हा गणपती बाप्पाचे वाहन असल्याने बहुतांश मुर्त्यांमध्ये उंदराचे वास्तव्य आहे असे असले तरी काही काही मुर्त्यांमध्ये उंदरासोबतच गरुड, मोर, नाग हे देखील दिसतात. आजकाल लहान मुलांसाठी विशेष रूपाने मूर्ती तयार केली जातात. ज्यामध्ये अनेक कार्टून कॅरेक्टरचा देखील समावेश असतो.