तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरताय? तर ‘या’ गोष्टी एकदा जाणून घ्याच, फायदाच फायदा अन्यथा तोटाच…!

क्रेडिट कार्ड वापराचा मुख्य फायदा म्हणजे जवळ पैसे नसताना फक्त एका स्वाईपवरून कोणतीही वस्तू अथवा सेवांचे लाभ घेता येतो. ही खरेदी केल्यावर त्यासाठी 45-50 दिवसांचा कालावधीही दिला जातो. तोही कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना.

  पुणे / कृपादान आवळे : सध्या कोणतेही आर्थिक व्यवहार करताना रोख रक्कम नसेल तर ऑनलाईन किंवा डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. पण डिजिटलच्या युगात ऑनलाईन व्यवहारही वाढले आहेत. असे असताना हेच व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात क्रेडिट कार्डचा वापर हा आपल्यासाठी फायद्याचा जरी वाटत असला तरीही त्याचा वापर करताना आणखीच सतर्कता बाळगावी लागते. तसे न केल्यास आर्थिक फटका बसण्याची जास्त शक्यता असते.

  क्रेडिट कार्ड अर्थात कोणतेही पैसे आपल्या जवळ नसताना एकप्रकारच्या छोटी उधारीच असते. याचा अर्थ असा की जर आपण एखादी खरेदी केली, त्यासाठी आपल्याला लगेच पैसे द्यावे लागणार नाहीत. पण साधारणपणे 45 ते 50 दिवसांचा कालावधी रिपेमेंट अर्थात त्याचा परतावा करण्यासाठी दिला जातो. ही बाब नक्कीच चांगली आहे. मात्र, जर चुकूनही त्याचा परतावा करण्यास आपण दिरंगाई केली तर मग त्याचा फायदा कमी पण तोटाच अधिक होणार हे मात्र नक्की.

  काय आहेत क्रेडिट कार्डचे फायदे?

  – क्रेडिट कार्ड वापराचा मुख्य फायदा म्हणजे जवळ पैसे नसताना फक्त एका स्वाईपवरून कोणतीही वस्तू अथवा सेवांचे लाभ घेता येतो. ही खरेदी केल्यावर त्यासाठी 45-50 दिवसांचा कालावधीही दिला जातो. तोही कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना.

  – सातत्याने खरेदी केल्यास प्रत्येक खरेदीच्या कॅटेगरीनुसार रिवॉर्ड पॉईंट्सही मिळतात. त्याचा वापर आपण पैशांमध्येही रुपांतरित करू शकतो.

  – यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सातत्याने खरेदी करून त्याचे पेमेंट वेळेवर करतो, तेव्हा आपली पत अर्थात सिबिल स्कोअर वाढण्यास मदत होते. जे आपली आर्थिक कुवत ठरवण्यास फायदेशीर ठरते.

  – चांगला सिबिल स्कोअर असल्यास कर्ज मिळण्यासही जास्त अडचण निर्माण होत नाही. अगदी जलद प्रोसेस होण्याची जास्त शक्यता असते.

  – विशेष बाब म्हणजे चांगली परतफेड करत असू तर आपल्याला संबंधित बँकांकडून क्रेडिट कार्डवरच लोन दिले जाते. तेही प्री-अप्रूव्हड् अर्थात कोणत्याही कागदपत्र अथवा मंजुरीशिवाय. ही ऑफर अडचणीच्या काळात चांगलीच फायदेशीर ठरू शकते.

  क्रेडिट कार्ड वापरताना काय टाळावं?

  – सर्वात आधी हे लक्षात घ्यावं की कोणतीही बँक आपल्या क्रेडिट कार्ड होल्डरची माहिती कधीही फोन करून विचारत नाही. त्यामुळे फोनवरून अशा कोणत्याही संदर्भात विचारणा झाल्यास अधिक बोलणं टाळावं.

  – काही अडचण अथवा तक्रार असल्यास बँकेत प्रत्यक्ष जाऊन किंवा फोन करायचा असल्यास कार्डवरच बँकेकडून देण्यात आलेल्या नंबरवर फोन करून माहिती घ्यावी.

  – सध्या गुगलवरून नंबर शोधण्याचे प्रमाण वाढले आहे, पण हे टाळणं गरजेचे आहे. कारण यातून दिशाभूल होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी, मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

  – बँकेच्या प्रत्येक क्रेडिट कार्डधारकाला त्यांचं कार्ड वापरून एटीएम सेंटरमधून पैसे काढण्याची मुभा दिली जाते. पण हे कोणत्याही परिस्थितीत टाळणं गरजेचंच आहे. कारण, जेव्हा अशाप्रकारे पैसे आपण काढतो, तेव्हा त्या प्रत्येक दिवसाचे शुल्क लागू शकते. त्यामुळे रक्कम कमी पण देणंच जास्त असं होऊ शकतं. म्हणून हे टाळावं.

  रूपे कार्डला द्या प्राधान्य

  –  सध्या अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड उपलब्ध आहेत. त्यात मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, प्लॅटिनम कार्ड अशा कॅटेगरीज् आहेत. पण रूपे कार्डला (Rupay Card) प्राधान्य दिल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.

  –  कारण, हे कार्ड इतर कार्डच्या सारखं नसून, हे कार्ड आपल्या ‘गुगल पे’शी लिंक करता येतं. त्यामुळे कोणत्याही शुल्काविना आपल्याला फक्त एका स्कॅनवरून फायदा घेता येऊ शकतो.