कानेटकरांची ‘पॉप्युलर’ नाटके!

नाटककाराला प्रकाशकामुळे अमरत्व मिळते. त्याच्या संहितांवर पिढ्यान्पि ढ्यांना आविष्कार करण्याची संधी आणि प्रेरणाही मिळते. मराठमोळ्या अक्षररंग वाटेवर पॉप्युलर प्रकाशनने इतिहास उभा केलाय. कल्पक नाटककार वसंत कानेटकर यांच्या संहितांना संजीवन दिलय. पॉप्युलर प्रकाशनच्या यंदाच्या शताब्दी वर्षात कानेटकरांची नाटके हे एक स्वतंत्र असे वैभवशाली दालनच आहे. त्याला उजाळा…

  अनेक दर्जेदार मराठी नाटकात रंगमंचावरला आविष्कार आणि त्याचे साहित्य म्हणून श्रेष्ठत्व, हे गच्च भरलेले असते; त्यामुळे नाटकाचा प्रयोग आणि पुस्तकही लक्षवेधी ठरते. संग्राह्य होते. चांगला संहितेशिवाय जसा प्रयोग रंगणार नाही, तसेच साहित्यकृती म्हणून वाङ्‌मयातही त्याला प्रवेश मिळणार नाही. मराठी नाटककारांमध्ये एक संमृद्ध अशी परंपरा आहे त्यामुळे नाटकाचे प्रयोग जरी थांबले तरीही त्याचे पुस्तक हे वाचकांना आनंद देते. समाधान देते.

  एक काळ असा होता की, शुभारंभी प्रयोग म्हटला की नाटकाचे पुस्तकही प्रयोगाच्या वेळी रसिकांसाठी उपलब्ध असायचे. नाटक बघायला येणारा रसिक हा नाटकाचे पूस्तक हाती घेऊनच नाटक ‘एन्जाॅय’ करायचा आणि घरी त्या पुस्तकाचा आनंद घ्यायचा. दिवंगत नाट्यसमीक्षक कमलाकर नाडकर्णी हे प्रयोगाला पोहचताच नाटकाची संहिता ही निर्मात्यांकडे मागत असत. याची आठवण आज येते. चोख पाठांतराशिवाय नाटक करता येणे शक्य नव्हते आणि नाही. पण बदलत्या काळात ‘उत्स्फूर्तता’ या नावाखाली नाटकाची संहिता ही प्रत्येक प्रयोगाप्रमाणे बदलत असलेली दिसते. एका दिग्दर्शकाने नाटककाराची ‘वनलाईन’ जिवंत ठेवून पूर्ण नाटक हे बदलल्याची तक्रार नुकतीच खासगीत केली, पण काही वर्षापूर्वी असा प्रकार नव्हता. एखादी ऑडीशन जरी घ्यायची ठरली तरी नाटककाराची संमती मिळवावी लागत होती. असो.

  नाट्यजागरात आज नाटकांच्या संहितांची आठवण प्रामुख्याने येण्यामागे खास कारण आहे. ‘पॉप्युलर प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे यंदाचे म्हणजे २०२३ हे वर्ष शताब्दी वर्ष म्हणून  होते. जे डिसेंबरमध्ये संपत आहे. मराठी नाटकांच्या पूस्तकाला प्रतिष्ठा मिळवून देणारी आणि हक्काचा आधार असलेली ही प्रकाशन संस्था. त्यांनी एका कालखंडात दिग्गज नाटककारांच्या संहितेला पूस्तकरुप दिले आणि एक दालन संमृध्द केले. त्यातही नाटककार वसंत कानेटकरा़च्या नाटकांना त्यांनी ‘पुस्तक’ म्हणून मानाचे पान दिले. जे वैभवी साहित्यकृती म्हणून सिद्ध झाले.

  १९५७ साली वेड्याचं घर उन्हात; नंतर १९६२ साली रायगडाला जेव्हा जाग येते; १९६१ मध्ये प्रेमा तुझा रंग कसा ?; १९७० मध्ये लेकुरे उदंड जाली; १९७८ मध्ये सुर्याची पिल्ले; १९५८ मध्ये देवाचं मनोराज्य, १९९५ साली तू तर चाफेकळी; १९६४ मध्ये मत्स्यगंधा; १९७६ मध्ये कस्तूरीमृग, आणि १९७१ साली मीरा मधूरा – ही काही नाटके. ज्याचं लेखन वसंत कानेटकर यांनी केलेले. कानेटकरांनी आजवर एकूण चाळीस एक नाटके लिहीली पण बहुतेक नाटके ही पॉप्युलर प्रकाशनने प्रसिध्द केली. हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया, छू मंतर, गगनभेदी, प्रेमाच्या गावा जावो. याचे प्रकाशन हे नीळकंठ प्रकाशन, परचुरे प्रकाशन यांनी केलय. पण गाजलेली नाटके ही पॉप्युलर प्रकाशनच्या बॅनरखाली प्रसिध्द झाली. तो काळ हा नाटककार आणि प्रकाशक यांचे कौटुंबिक संबंध असायचे. एक वेगळं नातच त्यातून दिसायचं. याचा एक किस्सा सांगितला जातो. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ हे वसंत कानेटकरांना नाशिक येथे घरी भेटायला गेले. ती भटकळ आणि कानेटकरांची शेवटची भेट ठरली. मैफल रंगली. भटकळ म्हणाले, ‘वसंतराव मी तुमचे चरित्रच नव्हे तर आत्मचरित्रही मी सहजपणे लिहू शकेन !’ – यावरून जिव्हाळ्याचे नाते किती पक्के आहे, हेच दिसून येते. व्यवहारापेक्षा साहित्यावरलं लेखक आणि प्रकाशक यांच्यातलं प्रेम अधिक होतं. जे काळाच्या ओघात आजकाल तसे दुर्मिळ झालय.

  कानेटकरांचे प्रकाशित झालेले पहिले नाटक ‘वेड्याचं घर उन्हात’ : जे १९५७ च्या राज्य नाट्यस्पर्धेत प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशने रंगभूमीवर आणले. तशी ही शोकांतिका. मराठी नाटकांच्या प्रवाहातील एक श्रेष्ठ नाट्यकृती. अस्वस्थता निर्माण करणारी संहिता म्हणून जी आजही वाचकांना भूरळ पाडते. यातली मध्यवर्ती भूमिका डॉ. श्रीराम लागू यांनी केली. दादासाहेब म्हणून डॉ. लागू गाजले. यातीत शेवटचे स्वगत म्हणजे कानेटकरांच्या भाषेचे सौंदर्यच आहे. डॉक्टरांसोबत, गणेश सोळंकी, कुसूम कुलकर्णी, श्रीकांत मोघे यांच्या प्रमुख भूमिका त्यात होत्या. भालबा केळकर यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभले होते.

  दुसरं नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्यातला ताण-तणाव यात आहे. संभाजीराजे हे दिलेरखानला जाऊन मिळतात. यावेळी या दोघांची एक गुप्त बैठक होते आणि संभाजीराजांमध्ये परिवर्तनही होते. आणि ते मराठी मुलखात पून्हा येतात. एका इतिहासाला उजाळा देण्याचे कथानक यात कानेटकरांनी मांडले आहे. नाटकाला प्रचंड यश मिळाले. या नाटकानंतर त्यांच्यातला नाटककार ‘चौफेर’ सुटला! ऐतिहासिक नाटकांचे आकर्षण वाढले. व्यावसायिकवरही एक नवा रसिकवर्ग उभा राहीला. ‘दि गोवा हिंदु असोसिएशन’ तर्फे १९६२च्या सुमारास हे नाटक रंगभूमीवर आले. मा. दत्ताराम यांचे दिग्दर्शन याला लाभलेलं. डॉ‌. काशिनाथ घाणेकर यांचा संभाजी आणि मा‌. दत्ताराम यांचा शिवाजी गाजला. अप्रतिम संवादामुळे नाट्य एक संहिता म्हणून विक्रमी ठरले. पॉप्युलर प्रकाशनने या नाटकाच्या अनेक आवृत्या प्रसिध्द केल्या.

  ‘प्रेमा तुझा रंग कसा?’ हे नाटक जे दोन पिढ्यांमधला आणि दोघा कुटुंबातल्या घटनांवर आधारित आहे. कानेटकरांची ही एक गाजलेली सुखात्मिका. जी ‘पॉप्युलर’ने वाचकांपर्यंत पोहचविली. आजही या नाटकाचा प्रयोग करण्याचा मोह हौशी मंडळीना होतो. ‘एक लव्हेबल कॉमेडी’ असही या नाटकाचे वर्णन करण्यात येते. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन तर्फे याचे व्यावसायिकवर १९६१ च्या सुमारास प्रयोग झाले‌. भालबा केळकर यांचे दिग्दर्शन होते. चूरचूरीत संवादाचे घराघरातले हे नाट्य‌.

  ‘लेकुरे उदंड जाली’ हे कानेटकरांचे आणखीन एक नाटक. जे रसिकांनी संहिता आणि प्रयोग म्हणूनही अक्षरश: डोक्यावर घेतले. एक चिरतरुण सुखात्मिका. चाळीस वर्षांपूर्वीच्या रसिकांप्रमाणे आजही रसिक या नाटकाबद्दल बोलतात. या नाटकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. श्रीकांत मोघे यांनी राजशेखर आणि कल्पना देशपांडे यांनी मधुराणीची भूमिका केली. दि गोवा हिंदु असोसिएशनने १९६६ साली केलेल्या प्रयोगाचे दिग्दर्शन मो. ग. रांगणेकर यांनी केले. एका मध्यंतरानंतर ‘सुयोग’ने पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणले. प्रशांत दामले यांनी या भूमिकेचे सोने केले. मूळ नाटकाला जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले होते.

  सुर्याची पिल्ले, देवीचं मनोराज्य, तू तर चाफेकळी, मत्स्यगंधा, कस्तूरी मृग, मीरा मधुरा! – याही नाटकांची पूस्तके बाजारात किवा ग्रंथालयात उपलब्ध आहेत. सुर्याची पिल्ले हे एक विडंबन शैलीतलं नाट्य. देवीचं मनोराज्य यात तस कथानकापेक्षा संवादाला महत्व दिसते. तू तर चाफेकळी यात भाऊ या कवीची कुटुंबकथा मांडलीय. ‘मत्स्यगंधा’चे मूळ हे महाभारतावरुन घेतलेते. काही पूराणकथेत बदल आहेत. ‘कस्तुरीमृग’ यात देवदासीचा विषय तर ‘मीरा मधुरा’ यात जगावेगळ्या प्रेमिकांचा त्रिकोण आहे. मीरा, भोजराज आणि श्रीकृष याच्या तणावाचे चित्रण आहे. ‘कस्तूरीमृग’ हे कलावैभव नाट्यसंस्थेने निर्मित आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या यातल्या चार भूमिकांनी गाजलेल नाटक: रंगभूमीवरलं एक अप्रतिम नाट्य ठरले.

  नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी कानेटकरांच्या काही नाटकात भूमिका केल्या, त्यात वेड्याचं घर उन्हात, देवांचं मनोराज्य, इथे ओशाळला मृत्यू, हिमालयाची सावली, कस्तुरीमृग ही काही प्रमुख नाटके आहेत. त्यातून डॉक्टरांमधला ‘नटसम्राट’ घडत गेला. त्या नाटकातील शब्दांची जादू ही डॉक्टरांना कायम खूणावत राहीली. संहितेला कमालीचे महत्व देणारे डॉक्टर हे कानेटकरांचे नाटक म्हटलं की पूर्ण तयारीत वाचनापासून असायचे. आज कानेटकर नाहीत आणि डॉक्टरही नाहीत पण त्यांची नाटके संहितारुपाने साहित्यात एक इतिहास जागा ठेवत आहेत. यशस्वी नाटककार आणि यशस्वी प्रकाशक हे जणू व जसे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या आणि आहेत. वाचक, रसिक यांच्या दोन पिढ्यांमध्ये एक सेतू म्हणून त्यातील चैतन्य हे कायम पुस्तकरूपाने जिवंत आहे.

  कानेटकरांची नाटके ही पॉप्युलरने दिमाखात प्रकाशित केलीत. विविध विषयांवरली जबरदस्त व्याक्तिरेखा असणारी नाटके आजही रसिकांना नाट्य अभ्यासकांना खुणावत आहेत‌. पॉप्युलर प्रकाशनच्या शताब्दी वर्षानिमित्त अभिनंदन !

  – संजय डहाळे