अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतरचे राजकारण !

रामाची जी लाट देशभरात उसळलेली दिसते आहे, त्याचा लाभ निर्विवादपणाने भाजपला होणार आहे; हे दिसत असताना विरोधकांची त्याला तोड कोणती असू शकेल याचे उत्तर अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांना सापडले नाही.

  रामाची जी लाट देशभरात उसळलेली दिसते आहे, त्याचा लाभ निर्विवादपणाने भाजपला होणार आहे; हे दिसत असताना विरोधकांची त्याला तोड कोणती असू शकेल याचे उत्तर अद्याप महाविकास आघाडीच्या नेत्यांना सापडले नाही. शरद पवारांनीही निमंत्रण नाकारताना हा भाजपचा कार्यक्रम होता, मोदींची चमकोगिरी होती असे शेरे जरी मारले असले; तरी त्याचबरोबर आम्ही फेब्रुवारीत अयोध्येला येणार हेही मंदिर समितीला कळवून टाकलेले आहे.

  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा परिणाम म्हणायचा की काय याचे विश्लेषण करावे लागले; नंतर विरोधी गोटात लगेचच दोन मोठ्या स्फोटक राजकीय घडामोडी झाल्या. इंडिया आघाडीला सुरुंग लावताना पंजाबमध्ये ‘आप’ने; तर बंगालमध्ये ममतांनी काँग्रेसला दूर सारले आहे. लोकसभेसाठी काँग्रेसला जागा सोडणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आहे. आता उत्तर प्रदेशात अखिलेश यादव तशीच भूमिका घेणार अशी चिन्हे दिसत असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चिंता लागल्यास नवल नाही. त्यावेळी अजूनही मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना सन्मानाने निमंत्रण देण्याचे औदार्य ना शरद पवार दाखवत आहे, ना काँग्रेसचे नेते. अशा स्थितीत प्राणप्रतिष्ठेनंतर होणारी लोकसभेची निवडणूक मोदींसाठी आणखी सोपी करण्याकडेच विरोधकांचा कल दिसू लागलेला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

  प्रत्येक पंतप्रधानांच्या कारकीर्दीत एक दोन अत्यंत महत्वाच्या अशा घटना घडतात, त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून काही महत्वाच्या गोष्टी होतात ज्याच्या खुणा इतिहासावर उमटलेल्या दिसतात. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंनी स्वातंत्र्यानंतरच्या मार्गाचे एक भव्य दिव्य स्वप्न दाखवले, नियतीचा करार हे त्यांचे भाषण आजही संसदीय इतिहासात गुंजत राहिले आहे. नंतरचे पंतप्रधान शास्त्रीजींनी देशात हरित क्रांती आणतानाच, कणखर नेतृत्वाचा सुखद अनुभव देत पाकिस्तानची आक्रमणाची खुमखुमी जिरवून दाखवली. त्यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने पार कराची आणि इस्लामबादच्या सीमांपर्यंत मजल मारली होती.

  इंदिरा गांधीनी तर अनेक बँक राष्ट्रीयीकरणासारख्या अनेक ऐतिहासिक घटना घडवल्या, पण त्यांची नोंद १९७१ च्या रणरागिणी म्हणून नक्कीच राहील. त्यांनी बांगलादेशाची निर्मिती करताना थेट जगाचा नकाशाच बदलून दाखवला.

  राजीव गांधींनी माहिती क्रांती आणली आणि त्यांनीच अयोध्येतील राम मंदिरीची कुलुपबंद कवाडे खुली केली. नरसिंहरावांची नोंद आर्थिक क्रांतीचे जनक अशी तर राहीलच, पण बाबरी कोसळताना पाहणारे पंतप्रधान अशीही राहील. अटलबिहारी वाजपेयींनी दिलेला अणुचाचण्यांचा आदेश आणि रस्ते उभारणीवर दिलेला जोर हा स्मरणात राहील.

  मनमोहन सिंगांनी अत्यंत कठीण आर्थिक कोंडीतून देशाला वाचवण्याचे कसब दाखवले हे इतिहास विसरणार नाही. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळातली अत्यंत महत्वाचा व देशाला हालवून सोडणारा क्षण म्हणून २२ जानेवारी २०२४ च्या दुपारी साडेबारा वाजताची नोंद नक्कीच होईल.

  देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाने कधीही केली नसेल, अशी अत्यंत भक्तीभावाने उपास-तापास केल्यानंतर, व्रत धारण केल्यानंतर बालक रामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येत पार पडली आणि देश कृतार्थ झाला. नरेंद्र मोदींनी जी अनेक कामे गेल्या दहा वर्षात देशात केली, त्यात मानसिकता बदलण्याला त्यांनी मोठे प्राधान्य दिले. आधी त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची काम न करण्याची अथवा कामात नकारात्मकता ठेवण्याची मानसिकता बदलवली. केंद्र सरकारी योजनांचा पैसा हा लोकांच्या हातात येण्याच्या आधी वाटेतच गायब होतो ही मानिसकता त्यांनी बदलली आणि केंद्रीय योजनांचा पैसा हा लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यातच येतो ही नवीन स्थिती पैदा केली. गावे आणि महानगरातील रस्ते हे दुर्गंधीने भरलेलेच असायचे, कारण लोकांना उघड्यावर शौच कऱण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, ही मानसिकता मोदींनी बदलवली आणि देश स्वच्छेतेकडे एकेका पावलाने चालू लागला. आता ऐतिहासिक अन्याय हे कधीच पुसले धुतले जात नाहीत कारण इतिहासाची चक्रे उलटी फिरवणे अशक्य असते ही मानसिकता त्यांनी बदलून दाखवली आहे.

  अयोध्येतील राम मंदिराची उभारणी करून आणि तिथे रामलल्लाची देखणी भावपूर्ण मूर्ती स्थापित करून मोदींनी इतिहास घडवला. सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये रामाचे जन्मस्थान हे बाबरी जिथे उभी होती तिथेच असल्याचा निर्वाळा दिला. न्यायालयाने ती सर्व पावणे तीन एकरांची जागा हिंदु पक्षाच्या स्वाधीन केली आणि एक स्वतंत्र विश्वस्थ निधी स्थापन करून त्यांच्याकडे जागा सोपवा, तिथे मंदिर उभारणीसाठी परवानग्या द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिले.

  त्यानंतर विद्तुत्वेगाने हालचाली कऱण्याचे कसब आणि योजकता पंतप्रदान नरेंद्र मोदींनी दाखवली. त्यांनी अवघ्या तीन-साडेतीन वर्षात भव्य दिव्य मंदिराची उभारणी तर केलीच पण तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही थाटात, मंदिराला साजेशा भव्य दिव्य समारंभात करून दाखवली. तो कार्यक्रम टीव्हीचाय पडद्यावरून तममा देशवासियांबरोबरच जगभरातील भारतीयांनी डोळे भरून पाहिला.

  रामजन्मभूमी आंदोलनाच्या शंभर-सव्वाशे वर्षांच्या इतिहासात अनेकदा रक्तरंजित प्रसंग उद्भवले. दंगली झाल्या. विवादास्पद ढांचा असणारी बाबरी मशीद तोडण्याचे मोठे आंदोलन झाले. त्या आधी कारसेवकांवर मुलायम सिंगांच्या सरकारने गोळीबार करून डझनावारी कारसेवकांना हौताम्य दिले. बाबरी पडल्यानंतर देशभरात हिंदू-मुसलमान दंगली उसळल्या. देशद्रोही अतिरेक्यांनी मुंबईत भयंकर बाँबस्फोटांची मालिका घडवली. या साऱ्या कटु इतिहासाच्या जखमा भरून काढण्याचे काम त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याने घडले आहे का? हा आता खरा प्रश्न आहे. मोदींनी इतिहास नक्कीच घडवला आहे; पण त्यांच्या राजवटीत ती सारी कटुता जर पुसली गेली आणि देशभरात ऐक्याचे समरसतेचे सौहार्द्राचे वातावरण करण्यात जर भाजपा सरकारला आणि त्यांच्या मागे ठाम उभ्या असणाऱ्या रा. स्व. संघ परिवाराला यश आले तर आणि तरच मोदींचे इतिहासाताली स्थान नक्की होईल. अयोध्येत उपस्थित राहण्याचे निमंत्रण सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते, ज्यांना विरोधी पक्ष नेत्याचा दर्जा आहे, ते अधिररंजन चौधरी या तिघांना अयोध्येचे निमंत्रण होते; पण ते त्यांनी नाकारले. खरेतर सोनिया व खर्गे अयोध्येत उपस्थित राहिले असते तर त्यांच्याकडेही मीडियाचा फोकस नक्कीच गेला असता.

  सोनियांनी तिथे हजर राहणे याला एक मोठे निराळे महत्व आले असते. खरेतर बाबा राघव दास या काँग्रेसच्या एका आमदाराने मुळात रामलल्लांची स्थापना अयोध्येतील बाबरी मशिदीत १९४९ च्या डिसेंबर महिन्यात करून टाकली होती. १९८९ मध्ये राजीव गांधींनी मंदिराचे कुलप उघडले होते आणि नरसिंहरावांनी १९९२ मध्ये बाबरी पडू दिली होती. या साऱ्या श्रेयावर काँग्रेसला हक्क दाखवता आला असता आणि भाजपचे त्या दृष्टीने महत्व कमी करण्याची संधीही काँग्रेसला कदाचित घेता आली असती.

  ठाकरेंनी काळाराम मंदिरात महाआरती करून राज्यातील जनतेपर्यंत हा संदेश जरूर पोचवला आहे की, ते रामभक्तीत भाजपपेक्षा कांकणभरही कमी नाहीत.
  अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा परिणाम म्हणायचा की काय याचे विश्लेषण करावे लागले पण नंतर विरोधी गोटात लगेचच दोन मोठ्या स्फोटक राजकीय घडामोडी झाल्या. इंडिया आघाडीला सुरुंग लावताना पंजाबमध्ये ‘आप’ने तर बंगालमध्ये ममतांनी काँग्रेसला दूर सारले आहे. लोकसभेसाठी काँग्रेसला जागा सोडणार नाही ही भूमिका त्यांनी घेतली आहे. आता उत्तर प्रदेशात अखिलेश यादव तशीच भूमिका घेणार अशी चिन्हे दिसत असनाता महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चिंता लागल्यास नवल नाही.

  त्यावेळी अजूनही मविआमध्ये प्रकाश आंबेडकरांना सन्मानाने निमंत्रण देण्याचे औदार्य ना शरद पवार दाखवत आहेत, ना काँग्रेसचे नेते. अशा स्थितीत प्राणप्रतिष्ठेनंतर होणारी लोकसभेची निवडणूक मोदींसाठी आणखी सोपी करण्याकडेच विरोधकांचा कल दिसू लागलेला आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरू नये.

  – अनिकेत जोशी