रामअवतारी ‘खेळ’ अवतरला!

मराठी रंगभूमीच्या मुहूर्तावर १८१ वर्षापूर्वी ‘सीता स्वयंवर' या नाटकाने प्रवेश केला. आज अयोध्या नगरीतल्या श्रीरामाच्या दर्शनाने तो मुहूर्त सार्थकी लागला. पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर श्रीरामाची प्रतिष्ठापना झालीय. एका अलौकिक नाट्याच्या पाऊलखुणा रंगइतिहासाला उजाळा देताहेत. रामअवतारी खेळाच्या युगाला जय श्रीराम!

  हिंदुंचे आराध्य दैवत, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची प्रतिष्ठापना अयोध्यानगरीत गेल्याच आठवड्यात झाली. एक ऐतिहासिक क्षण उभ्या जगाने अनुभवला. श्रीप्रभू श्रीरामाला वनवास जसा संघर्षमय होता तसाच श्रीरामाची प्रतिष्ठापनाही एका संघर्षचा इतिहासच आहे. पाचशे वर्षानंतर श्रीराम जन्मस्थळी अखेर प्रगटले. रामायणातूनच म्हणजे रामायणातील कथानकातून मराठी रंगभूमीचा पाया मजबुतीने रचला गेला आहे. त्यालाही १८० वर्षांची परंपरा आहे. रामायणाप्रमाणे महाभारतातील व्यक्तिरेखाही आजवर मराठी रंगभूमीवर दिसल्या आहेत. रामायणातील ‘सीता स्वयंवर’ हे नाटक ५ नोव्हेंबर १८४३ या दिवशी सांगलीत सादर करण्यात आले आणि वैभवशाली मराठी नाट्य परंपरेचे जनकत्व हे विष्णुदास भावे यांच्याकडे चालून आले. कथानक व संवाद असणारे हे पहिले मराठी नाटक मानले गेले. नाटकाचा शुभारंभ आणि प्रतिष्ठापना ही ‘राम’नामातूनच झालीय, असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. त्याकाळी ‘नाटक’ हा शब्द रुढ नव्हता तर प्रयोगाला ‘खेळ’ असं म्हटलं जात होतं. तर ‘सीता स्वयंवराचा’ खेळ रंगला आणि नाटकाचे एक दालन खुले झाले, ज्याने गेली १८१ वर्षाचा रंगप्रवास केलाय. १८१ वर्षाच्या प्रवाहात ‘रामायण’ ही कथा विविध रुपात, शैलीत, विषय- आशयात रसिकांपूढे आलीय. पण मराठी नाटकाचा मूळ विषय होता रामायणातील सीता स्वयंवर !

  खऱ्या अर्थाने पहिले अर्वाचिन मराठी नाटक ५ नोव्हेंबरला सादर झाले. म्हणून हा दिवस मराठी रंगभूमीदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. विष्णुदास भावे यांनी ‘सीता स्वयंवर’ यानंतर रामायणावरच दहाएक नाटके सादर केली. तो काळ पेशवाई संपलेला. शेवटचे बाजीराव पेशवे हे इंग्रज सरकारचे जणू पेन्शनर झालेले. मराठी सरदारांनी आपल्या हक्काच्या मुलखात आसने स्थिर केलेली. मराठे सरदारांपैकी श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांनी सांगली संस्थानाची सूत्रे हाती घेतलेली. तिथे विष्णुदास भावे नोकरीला होते. कर्नाटकातील दशावतारी खेळ हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने झाले. गणेश मंदिरातील हे खेळ बघून चिंतामणरावांना विचित्र वाटले. विद्रूप सोंग, विचित्र भाषा, धांगडधिंगा त्यांनी त्यात बघितला. या ऐवजी चांगल्या पौराणिक कथा घेऊन नाट्य रूपाने आणण्याची इच्छा त्यांनी विष्णुपंतांपुढे व्यक्त केली आणि ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा जन्म झाला.

  ‘रामायण’ कथेतील नाट्याने विष्णुपंतांच्या प्रतिभेला जणू व जसे आव्हानच मिळाले. प्रत्येक घटनेत नाट्य त्यांना सापडले. प्रेरणा मिळाली ‘सीता स्वयंवर’नंतर ते शांत बसते नाहीत. राजाश्रय आणि रसिकाश्रय यातून ही कला सांगलीपासून उभ्या महाराष्ट्रात पोहचली.

  ‘सीता स्वयंवर’या नाटकाचे नव्या तंत्रमंत्रासह, प्रयोग हे यापूर्वी व आजवर अनेक अभ्यासकांनी केले आहेत. विशेषत: नाट्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, कॉलेज यांनी त्यात काही नव्या तंत्राचीभर टाकून आविष्कार केला आहे. मध्यंतरी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे ‘सीता स्वयंवर’चा प्रयोग झाल्याचे स्मरते. प्रवीण भोळे यांनी संहिता आणि दिग्दर्शन केले होते. त्यामागे असणारे संशोधन लाखमोलाचे.

  रंगमंचावर साक्षात राम आणि रसिकांमधून प्रगटणारा रावण यात होता. दोघांच्या प्रवेशापासूनच नाट्य रंगतदार करण्याचा प्रयोग त्यात होता. नृत्य, संवाद, रंगभूषा, वेशभूषा हे सारंकाही एका युगात अलगद घेऊन जाणारं होतं.

  विष्णुदास भावे यांची मंगलाचरणसह नाटकांची एक यादी उपलब्ध आहे. त्यात ‘रामायणातील आख्याने’ या शीर्षकाखाली दिलेले खेळ यानुसार :- दशरथ विवाह, श्रावण वध, पुत्रकामेष्टी यज्ञ, रामजन्म, अहिल्योद्धार, सीता स्वयंवर, भार्गव गर्व मोचन, रामाचा वनप्रवेश, भरतभाव, शूर्पणखा विटंबन, सीताहरण, जटायू वध, रामविरह, वालीवध, हनुमानमारुती, सीताशुद्धी, लंका दहन, अंगद शिष्टायी, धूपरराव, कुंभकर्ण, असुर वध, इंद्रजित वध, सुलोचना सहगमन अहि-मही वध, लक्ष्मणआख्यान, रावण वध, बिभीषण राज्य स्थापन, सुखद मोचन, भरतभेट रामराज्याभिषेक, अश्वमेध यज्ञ, लवांकुश आख्यान – यावरुन रामायणातील प्रत्येक वळणावर नाट्य आहे आणि ते मनोरंजनासोबत शिकवणही देते हे दिसून येतेय.

  नाट्यतज्ञ प्रवीण भोळे हे एका मुलाखतीत या नाटकाबद्दल म्हणाले होते, सीता स्वयंवर आणि विष्णुदास भावे ही नावे मराठी नाटकाबद्दल लाख मोलाची आहेत. कारण सीता स्वयंवर हा मराठीतला पहिला अ-पारंपरिक, अ-लोक, अ-विधी असा नाटकीय प्रयोग होता. याआधी मराठी परंपरेत दशावतारासारखी, पारंपारिक, तमाशासारखी लोककला, गोंधळ जाग्रणासारखी विधीनाट्ये अस्तित्वात होतीच. सण उत्सवांच्या निमित्याचे त्याचे गावोगावी प्रयोग हे होतच होते. पण भावे यांचे नाटक सर्वांपेक्षा वेगळे होते. ते जसे देवळात झाले तसे मैदानातही झाले. ब्रिटीशांनी आणलेल्या कमानी मंचावरही झाले. विष्णुदासांनी पहिली नाटक कंपनी स्थापन केली आणि नाटक हे पोट्यापाण्याचा व्यवसायही झाला!

  रामकथेवर आधारीत अशी दोन नाटके संस्कृतमध्ये भासांची होती असा अभ्यासकांचा दावा आहे. त्यांची नावे अभिषेक आणि प्रतिभा. त्यात वालीवध, राज्याभिषेक, वनवास, सीताहरण हे प्रसंग आहेत. महावीर चरित्र व उत्तररामचरित्र ही देखिल दोन नाटके जी भवभूतीची होती. अर्थात ती देखिल रामायणावरच आधारित होती. यशोवर्मवाचे रामाभ्युदय आणि राजशेखरचे वालरामायण – ही सुध्दा नाटके होती. पण जी म्हणावी तेवढी प्रकाशात आली नाहीत. संस्कृत काव्याचा त्याला प्रामुख्याने आधार होता. काळाच्या ओघात ही नाटके नाटके त्याची संहिता तळागाळापर्यंत पोहचू शकली नाही पण भावेंची नाटके ही आजही अभ्यासकांपर्यंत आहेत. पिढ्यान् पिढ्यांनी त्यावर संशोधन केलय आणि ‘सीता स्वयंवर’चे तर प्रयोगही एक अभ्यास म्हणून होतांना दिसतोय.

  ‘रामअवतारी खेळ’ हा प्रकार सुरू झाला. त्यावेळी नाटकाला ‘खेळ’ म्हटलं जात होतं. विष्णूदासांनी असे दहाएक खेळ तयार केले. त्यात रामकथा मांडली. प्रत्येक खेळातल वेगळेपण होतं. देव आणि दानव असे दोन गट त्यात असायचे. हे रामायणाचे खेळ श्रीमंतांना त्यांनी दाखविले. यांची पसंती मिळविली. त्याचा एकमेव आधार त्यांना होता. पूर्वी ‘नाटक’ हा शब्द नव्हता त्याऐवजी ‘खेळ’ असा उल्लेख होत होता. दुर्दैवाने श्रीमंतांचे निधन १९६५च्या सुमारास झाले आणि आश्रय तूटला. पण सांगलीतल्या श्रीमंत पटवर्धन यांच्यामुळे नाट्यक्षेत्राला बळकटी मिळाली आणि रामायणातील प्रत्येक कथानकाला नाट्यरूपही प्रथमच मिळाले.

  मराठी रंगभूमीचे जनक, रामअवतारी खेळाचे निर्माते; मराठी व्यावसायिक रंगभूमीचे जनक, कळसूत्री बाहुल्यांचे निर्माते आद्य संहिताकार, रंगभूषाकार – अशा अनेक दालनांचे जनकत्व हे विष्णुदास भावे यांच्याकडे जाते. आजही त्या आविष्कारावर संशोधन करण्यात येतय. रामकथा ही त्यांच्यातल्या कलाकाराला कायम आव्हान देत होती. त्यातूनच पहिल्या नाटकाचा शुभारंभही त्यातून झालाय. सांगली ‘महाराष्ट्राची नाट्यपंढरी’ आणि विष्णुदास भावे हे ‘महाराष्ट्राचे भरतमुनी’ ही ओळख मिळाली. जी आजही प्रत्येक नाट्यप्रेमींना भूषण वाटते. रामकथा जशी चित्रातून, शिल्पातून, कथा-कादंबरीतून पोहचत आहे त्याचप्रकारे या कथेने रंगमंचावरही आपला आविष्कार केलाय. जो हिंदुस्थानी जीवनशैलीवर, भाष्य करतोय. रसिकांना आनंद देतोय. तूर्त ‘सीतास्वयंवरा’पुरते नाटक हे या जागराच्या निमित्ताने निवडले आहे. जय‌ श्रीराम !

  – संजय डहाळे