‘चला हवा येऊ द्या’ वेळीच शो संपला म्हणायचे…

दादा कोंडके नेहमीच म्हणत, एखाद्याला रडवणे एक वेळ सोपे आहे, पण हसवणं कठीण. दादांच्या या मताशी मी नेहमीच सहमत असे. इतकेच नव्हे तर, 'विनोदी व्यक्तिरेखा साकारण्यात टायमिंग आणि उच्चार हे घटक खूपच महत्वाचे असूनही त्या दृष्टीकोनातून कलाकाराकडे का पाहिले जात नाही' अशी खंत लक्ष्मीकांत बेर्डे व्यक्त करीत असे. या अनुभवी कलाकारांच्या बोलण्यातील तथ्य आज आठवायचे कारण म्हणजे, नऊ वर्ष मोठ्याच प्रमाणावर रसिकांचे मनसोक्त मनमुराद मनोरंजन करणारा 'चला हवा येऊ द्या'चं हसवणं थांबणं.

  ‘चला हवा येऊ द्या’चं यश कशात होतं?
  पंचेस, पंचेस आणि पंचेस यात जास्त होते. ते भलेही पटकथेनुसार असतील; पण त्यासाठी ‘टायमिंग’ महत्वाचे असते. त्याला सपोर्ट सिस्टीम होती, काही विशेष पाहुणे, पोस्टमनचं पत्र आणि सर्वात महत्वाचं टीम वर्क.

  मुळात नऊ वर्षांपूर्वी निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लय भारी’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने काय करावे बरे करावे, या प्रश्नातून या शोची कल्पना सुचली आणि शोला नाव काय द्यायचं या प्रश्नावर उत्तर म्हणून निशिकांत कामतची भूमिका असलेल्या ‘चल हवा आने दे’ या हिंदी चित्रपटावरुन हे नाव सुचले. तात्पर्य, फार विचारपूर्वक तयारी करुन शो सुरु करणे आणि असा उत्स्फूर्त शो सुचणे यात फरक आहे. बरीच पूर्वतयारी म्हणजे ‘हे नको, ते नको’ असं होत असते आणि मग सुरुवातीच्या काही भागात प्रेक्षकांचा अंदाज, शोचा टीआरपी, चॅनेलचा रस आणि स्पाॅन्सर्डची तयारी हे सगळेच घटक महत्वाचे असतात. बदलत राहतात. ‘चला हवा…’च्या बाबतीत तसे काहीच नसल्याने एक प्रकारची मिळालेली मोकळीक पथ्यावर पडली. एकेक भाग पुढे जात राहताना कोणीही म्हणजे खुद्द झी, यातले कलाकार आणि रसिकांनीही विचार केला नसेल की नऊ वर्षाच्या कामाची जणू हमी मिळेल. हीच तर यशाची खरी गंमत असते.

  शो जस जसा पुढे गेला तेव्हाच नवीन चित्रपट अथवा नाटकाचे प्रमोशन, एखाद्या जुन्या चित्रपटाचे धमाल विडंबन, स्त्री रुपात पुरुष कलाकार आणि एखादे फक्कडबाज नृत्य असा सेटअप आकाराला आला. सोमवार- मंगळवार मनोरंजनाची हमी मिळाली. ती तशीच टिकवणे जास्त आव्हानात्मक असते. आमिर खान, शाहरुख खान, अजय देवगन, काजोल, अनुष्का शर्मा, अक्षयकुमार, रणवीर सिंग असे हिंदीतील स्टार्सना आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनला याच शोचा प्लॅटफॉर्म महत्वाचा वाटला हे यशच. त्यातील पंचेस या सेलिब्रिटीजना किती समजले आणि म्हणून ते हसले हा प्रश्नच. पण देशभरातील उपग्रह वाहिनीवरील सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणून हिंदीतील सेलिब्रिटीजना त्यात सातत्याने यावेसे वाटले हे मोठेच यश. त्यातील किती जणांना मराठीतील पंचेस समजले आणि त्यांना खोटं खोटं हसावे लागले नाही हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. यापेक्षा नाना पाटेकरचे खरेपण लक्षवेधक ठरले. त्याने या खेळात आपली झालेली नक्कल एन्जाॅय केली.

  सेटवरचा हा खेळ अनेक शहरांत स्टेजवरही रंगला. तेव्हा त्यात जास्त मोकळीक जाणवली आणि मैदानाभरच्या खच्चून गर्दीने तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हे सगळंच एक प्रकारचे टाॅनिक असते. कधी राजकीय नेत्यांनीही आपल्यावरील विनोदांना दाद दिली. सचिन तेंडुलकरने तर खूपच रंग भरला. आठवणीत रहावेत असे अनेक भाग झाले.

  या शोमधील पब्लिसिटीने पिक्चर हमखास हिट होतो अशा समजूतीने मुक्त मनोरंजनात स्पीड ब्रेकर येत राहिले. काहीजण या शोमध्ये येण्यासाठीच चित्रपट निर्मिती करतात अशीही गोष्ट चर्चेत आली. आपला तेवढाच क्लोजअप सोशल मिडियात पोस्ट करण्याच्या वृत्तीने ते खरंही वाटू लागलं. मला वाटतं, सतत प्रमोशन होत राहिल्याने या शोचा पोत बिघडला. आणि तोचतोचपणाने लोकप्रियता उतरु लागली. पुरुष पात्राने स्त्री रुपात सातत्याने वावरणेही मग अनावश्यक वाटू लागले. हास्यास्पद ठरु लागले. पूर्ण शो पाहण्यापेक्षा सोशल मिडियात त्याचे छोटे छोटे भाग पाहण्यात मजा येऊ लागली. दिवसभरचा कामाचा शीण हलका करण्यासाठी सोमवार- मंगळवारी हे झक्कास मनोरंजन होते. अनेकदा ‘लोटपोट’ हसवलेही. हसवणे ही अतिशय अवघड कला आहे, हंसे होण्याची भीती असते. ते क्वचितच झाले.

  या खेळात अनेक गोष्टी मिसळल्या होत्या. सरपंचाकडून पाहुण्याची फिरकी, दिलेला पुष्पगुच्छ परत घेणे. फिरकी घेत घेत ओळख करुन देणे, गंमतशीर पत्रकार परिषदा (त्यात भरपूर पंचेस होते. क्वचित मीडियाची फिरकीही घेतली जाई.), अनेक कलाकारांची माहित नसलेली वैशिष्ट्ये उघड करीत धमाल आणणे (त्यांच्या जवळच्या नातेवाईक वा मित्रांना फोन करुन गोडी गुलाबीने ती मिळवली जात ही कला चांगलीच साध्य झाली होती), आणि भावपूर्ण पत्र अशा जमेच्या गोष्टींनी हा खेळ जमला.

  यातील अनेक कलाकारांना स्वतःची ओळख निर्माण करता आली. एकदा या प्रत्येकाचा स्ट्रगल दिसून आला. त्यांचे कुटुंबीय, त्यांचा संसार या गोष्टीही लक्षात राहिल्या. यातील अनेक कलाकारांनी प्रशस्त घर आणि देखणी गाडी घेतली. ही आर्थिक सुबत्ता खूपच महत्वाची.

  प्रत्येक शो कधी तरी थांबवावा लागतोच अथवा त्यात काही महत्वाचे बदल करीत त्याचा कालावधी वाढवावा लागतो.
  या शोमधील सेलिब्रिटीजनी (नऊ वर्षात कलाकार ते सेलिब्रिटीज असा त्यांनी यशस्वी प्रवास केला) हळूहळू रंगभूमी, चित्रपट यातून प्रवास सुरु केला आहेच, आता त्यासाठीच त्यांना अधिकाधिक फोकस रहावे लागेल, ते सगळे कलाकार, लेखक, तंत्रज्ञ आणि कामगार यांना शुभेच्छा देऊयात. नऊ वर्षांची सवय एकदम सुटणार नाही. आणि चला हवा…ची ओळख सतत सोबत असणार. आपण रसिकही सोशल मीडियावर याच शोचा काही धमाल रंग पाहून फ्रेश होऊच…

   

  – दिलीप ठाकूर