सीएनजी विक्री केंद्राची उभारणी

उद्योजक व्हा! या वर्षी 'उद्योजक व्हा', हे नवे सदर सुरु करत आहोत. केंद्र शासन व विविध राज्य शासनाच्या वेगवेगळया योजनांमार्फत उद्योग/व्यवसाय स्थापन करण्यासाठीच्या योजना राबवल्या जातात. त्यांचा लाभ घेऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करता येतात. या योजनांची माहिती दर १५ दिवसाला दिली जाईल.

  सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस वितरणात गुजरात गॅस कंपनी आघाडीवर आहे. ही गुजरात शासनाच्या अंतर्गत कार्यरत असणारी कंपनी असून या कंपनीचे गुजरात राज्यात मोठे जाळे आहे. कंपनीने आता महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सीएनजी विक्री केंद्रांचं जाळं निर्माण करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी इच्छूक उद्योजक व गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागितले आहेत. प्रारंभी ही केंद्रे पालघर व ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात उघडली जातील.

  सीएनजीचे फायदे
  सीएनजी इंधन हा सध्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेलला पर्यायी इंधन म्हणून वापरण्याकडे कल वाढताना दिसतो. हे इंधन पेट्रोलपेक्षा दुप्‍पट व डिझेलपेक्षा १.४ पट स्वस्‍त पडते. सीएनजी विषारी नसल्याने अपायकारक नाही. हा वायू प्रदुषण मुक्त, हरीत स्वरुपाचा आहे. सीएनजी हे हवेपेक्षा हलके असल्याने या वायूची गळती एखादेवेळेस सुरु झाल्यास हा वायू जमिनीवर पसरण्याऐवजी तत्काळ हवेत मिसळतो. त्यामुळे आगीचा धोका टळतो. जमिनीवरील प्रदुषणास आळा बसतो. या वायूमध्ये काही सुवासिक द्रव्य टाकत असल्याने त्यातून एलपीजी गॅस सारखा गंध येतो. त्यामुळे त्याची गळती सहजतेनं लक्षात येते.

  केंद्राचे स्वरुप
  गुजरात गॅस कंपनीची केंद्रे, ‘फूलडिलर फूल ओन्डडिलर ऑपरेशन-एफडीओडीओ ( संपूर्ण वितरक, संपूर्ण मालकीचे कार्यान्वयन)’ या तत्वावर चालवले जातील. यामध्ये जमीन हस्तगत करणे किंवा भाडेतत्वावर घेणे, केंद्राची उभारणी, केद्राचे प्रत्यक्ष कार्य सुरु करणे, सीएनजीची वाहतूक, वितरण, कार्यान्वयन, केंद्राची देखभाल-दुरुस्ती आदी बाबी वितरकानं करावयाची आहेत.

  प्रस्ताव कोण करु शकतो?
  (१) २१ वर्षावरील कोणताही भारतीय नागरिक
  (२) भारतीय भागिदारी अधीनियमानुसार नोंदवलेल्या भागिदारी कंपनीमधील कोणताही भागिदार
  (३) संस्था अधीनियम (सोसायटी रजिस्ट्रेशन)१८६० नुसार नोंदणी केलेल्या संस्था/ कंपनी
  (४) कंपनी अधीनियम १९५६ नुसार नोंदणी केलेल्या खाजगी संस्था/कंपनी, धर्मादाय संस्था इत्यादी
  अर्ज प्रक्रियेचे टप्पे
  (या केंद्रांसाठी ऑनलाईन अर्ज)
  (१) गुजरात गॅस लिमीटेडच्या संकेतस्थळावर जाऊन भ्रमणध्वनी अथवा व्यक्तीगत ईमेलचा वापर करुन नोंदणी करा.
  (२) ही नोंदणी केल्यावर ओटीपी येईल. तो सादर केल्यावर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.
  (३) अर्जाचे शुल्क २५ हजार रुपये असून ते डिमांड ड्राफ्टने पाठवावे लागेल ऑनलाईन अर्जात डिमांड ड्राफ्टची माहिती नोंदवा.
  (४) अर्जाची प्रिंट काढा व त्यावर सही करुन ही प्रत पोस्टाने/कुरीअरने पाठवावी लागेल. सोबत मूळ डिमांड ड्राफ्ट जोडा.
  प्रस्ताव पाठवाण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ आहे. अर्जाचे शुल्क वगळता कोणतीही ठेव भरावी लागत नाही. प्रस्ताव अंतिमरीत्या सादर करण्यापूर्वी त्यात दुरुस्ती अथवा सुधारणा करता येतात. प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यात नमूद विविध टप्प्यांची कायदशीर छाननी होईल. यासाठी कालावधी ठरवण्यात आला आहे. ही सगळी प्रक्रिया वर्षभरात पूर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष सीएनजीची विक्री सुरु होईल. ही विक्री सुरु झाल्यावर केंद्र चालवण्याचा प्रारंभीचा कालावधी १५ वर्षाचा राहील.
  एकापेक्षा जास्त केंद्रांसाठी अर्ज करता येतो. मात्र प्रत्येक विक्री केंद्राच्या प्रस्तावासोबत २५ हजाराचं शुल्क भरावं लागतं. अर्जा सादर करण्याची शेवटची तारीख- २९ फेब्रुवारी २०२४
  हा प्रस्ताव सादर करण्यासाठी पोर्टल -https://cng2023.gujaratgas.com/UserLogin/Login#
  संकेतस्थळ-https://cng2023.gujaratgas.com/ संपर्क- २, शांती सदन सोसायटी, परिमल गार्डन, एलीसब्रिज, अहमदाबाद- ३८०००६, दूरध्वनी- ०७९-२६४६२९८०

  – सुरेश वांदिले