दिवाळीचे फटाके, नागपुरात फुटणार!

डेंग्यू झाला म्हणून गेल्या दोन आठवड्यात मंत्रालयातही उपमुख्यमंत्री पवार दादा गेले नव्हते. मंत्रिमंडळ बैठकींना गेले नव्हते. जरांगेंचे उपोषण संपण्याच्या प्रयत्नात दिसले नव्हते. त्यमुळे त्याच डेंग्युच्या कारणाआड दादा लपतील व बारामती काटेवाडीच्या दिवाळीत दिसणार नाहीत अशीही अटकळ बंधली जात होती. मात्र ती फोल ठरली. हे राजकारणाचे रंग नेमके काय दाखवत आहेत ? दिल्लीत नेमके काय शिजले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच विविध खात्यांमधील निधिवाटपातील अडचणींचा पाढा दादांनी शहांपुढे वाचला म्हणतात. लोकसभेच्या जागा वाटपाचाही मुद्दा त्या चर्रेत असणारच. शिंदे- फडणवीस-पवार सरकारमधील राजकीय रस्सीखेच गेले काही महिने सुरु आहेच. हे सारे प्रश्न कधी व कसे सुटणार, अशी अस्वस्थता आमदारांमध्येही दिसते. या साऱ्यामध्ये दिवाळीमध्ये अनेक फटाके आणि आपटीबार पेरले गेले आहेत. त्यांचे आवाज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ऐकायला मिळणार आहेत...

    सागर हा समुद्राकाठीचा बंगला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान. २०१९ ला मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्ष नेता या नात्याने त्यांना हा शासकीय बंगला मिळाला आणि गेल्या चार वर्षातील राज्यातील सर्व राजकीय घडामोडींचे केंद्र याच सागर बंगल्यात राहिले. त्या अर्थाने हा एक ऐतिहासिक बंगला ठरला आहे. सागर आणि शेजारचा मेघदूत बंगला ही दोन्ही निवासस्थाने सध्या उपमुख्यमंत्री वापरत आहेत. या बंगल्यांच्या मागच्या बाजूच्या भव्य हिरवळीवर त्यांनी पत्रकारांना दिवाळी फराळासाठी बोलावले आणि तिथे बऱ्याच मनमोकळ्या गप्पा केल्या. पण सुरुवातीलाच त्यांनी सर्वांना शुभेच्छा देताना हे स्पष्ट केले की, ‘आपण दिवाळीवर, फराळावर व फटाक्यांवर बोलू, पण आज राजकीय काही बोलायचे नाही!’ अर्थात फडणवीस आणि महाराष्ट्राचे राजकारण हे निरनिराळे होऊ शकत नाहीत. शिवाय गृहमंत्री या नात्यानेही त्यांच्याकडे राज्याची मोठी जबाबदारी आहेच. सहाजिकच अनेक प्रश्न हे सध्याच्या आणि भावी राजकारणा विषयीच येत राहिले.

    एक प्रश्न त्यांना असा आला की, ‘अशाच एका दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही पत्रकारांशी जी प्रश्नोत्तरे केलीत त्यानंतर मोठे राजकीय महाभारत घडले. महाविकास आघाडीची स्थापना झाली व तुमची सत्ता गेली. आता या दिवाळीच्या प्रश्नोत्तरानंतर काय घडेल ?!’ संदर्भ होता अर्थातच २०१९ च्या निवडणुकीनंतर सरकार स्थापन होण्यात अडचणी वाढत असताना वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जी पत्रकार परिषद झाली, त्यातील प्रश्नोत्तरांचा होता. त्यात शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते फडणवीस यांच्या संबंधात दुरावा आलेला आहे हे स्पष्ट झाले. शिवसेना नेते आपले फोन घेत नाहीत, आपले त्यांचे संभाषण थांबले आहे अशा अर्थाचे फडणवीस २०१९ च्या दिवाळीत बोलले होते. त्या साऱ्या संदर्भात आजचे फडणवीसांचे उत्तर असे होते की, ‘तेव्हा जे काही घडले त्यामुळेच तर मी म्हणालो की काहीच राजकीय आज बोलायचे नाही. जर मी त्या घटनेपासून काही धडा घेतला नसेल तर काय उपयोग मला मग पुन्हा पहिल्या यत्तेत जावं लागेल.’

    देवेंद्र फडणवीस हे गेले काही दिवस महाराष्ट्रात कमी आणि देशाच्या चारी टोकांना अधिक कार्यरत झाले आहेत. पक्षाने त्यांच्याकडे मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील पक्ष प्रचाराची मोठी जबाबदारी दिलेली आहे. मध्यप्रदेशातील प्रचार संपवूनच ते दिवाळीच्या अखेरच्या दिवशी मुंबईत आले होते आणि नंतर लगेच राजस्थानातील प्रचाराच्या अंतिम टप्प्यासाठी जयपूरकडे जाणार आहेत.

    फडणवीसांचे असे देशभरात दौरे सुरु असाताना महाराष्ट्रातील राजकारणात जो अस्वस्थपणा आरक्षणाच्या प्रश्नी आलेला आहे, तो काही कमी होत नाही. उलट स्थिती थोडी अवघड होताना दिसते आहे. जालन्याचे मनोज जरांगे पाटील हे राज्याच्या दुसऱ्या दौऱ्यावर निघाले आहेत आणि त्यांना मिळणारा जनतेचा प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतो आहे. परवाचीच एक बातमी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची झोप उडवणीरी अशी आहे.

    दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी जरांगे पाटील मराठवाड्यातून बाहेर पडले. सध्या ते पश्चिम महाराष्ट्रात फिरत आहेत. सोलापुरातील करमाळा तालुक्यातील आडबाजूच्या वांगी गावात सायंकाळी ७ वाजता जरांगे पाटील येणार असे ठरले होते. पण दुपारी २ पासूनच आजूबाजूच्या परिसरातून आणि जिल्ह्यांमधून करमाळ्यातील वांगी गावाकडे जनता लोटलेली होती. जरांगे पाटील हे बुधवारी सांयकाळी ७ वाजता येण्याऐवजी गुरुवारी पहाटे ४ वाजता तिथे पोचले. कडाक्याच्या थंडीच्या त्या रात्रीही, सुमारे लाखभरांचा जनसमुदाय तिथे बसून होता. वाट पाहात होता….!

    एखाद्या मोठ्या नावाजलेल्या राष्ट्रीय लोकनेत्यालाही असे भाग्य लाभत नाही. यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. लोक जरांगेना पाहाण्यासाठी, ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांच्या एका शब्दासाठी जनता भुकेली आहे. ही प्रचंड मोठी ताकद घेऊन आज जरांगे मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी उभ्या केलेल्या जनरोषाचा तीव्र झोत सत्तारूढांकडे सर्वाधिक आणि काही प्रमाणात अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यंच्या विरोधातही वळतो आहे.

    मराठ्यांच्या आरक्षण उठावाची प्रतिक्रिया म्हणून सर्वपक्षीय ओबीसी नेते एकवटले आहेत आणि त्यांनी आता जालन्यातूनच ओबीसी ऐक्याची हाक दिलेली आहे. छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि प्रकाश अण्णा शेंडगे म्हणजेच माळी, वंजारी, धनगर अशा मोठ्या इतर मागास समाजाचे नेते एकत्र मैदानात उतरले आहेत. या राजकारणाचे रूपांतर पुढे जातीय युद्धात होणार का, असा मोठा अस्वस्थ करणारा प्रश्न राज्यापुढे उभा राहणार आहे.

    डिसेंबरच्या सुरुवातीलाच उत्तरेतील चार आणि दक्षिणेतील एका राज्यांत सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. त्या पाठोपाठ नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होते आहे. राज्याच्या पुढच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या आधी होणारे हे अखेरीचे नागपूर अधिवेशन आहे, त्या दृष्टीने त्याचे महत्व निराळे आहे. नागपूर अधिवेशनाचा गेल्या दोन- तीन तपांचा इतिहास हा मोठ्या राजकीय घडामोडींचा राहिला आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाचा न होणारा विस्तार, त्यात गेले सव्वा दीड वर्षे रिक्त असणारी राज्यमंत्र्यांची पदे आणि त्याचा प्रशासनावर विधिमंडळातील कामकाजावर होणारा दुष्परिणाम… असे सगळे विषय चघळले जात आहेत. त्यातच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले आहे की येणाऱ्या नागपूर अधिवेशना पूर्वी राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार व्हावा असा प्रयत्न आहे.

    नेमकी हीच मंत्रीमंडळाच्या विस्ताराची मागणी घेऊन अलिकडेच फुटीर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक शिष्ठमंडळ दिल्लीत धडकले होते. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजितदादा पवार असे दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे सारे बडे नेते हे दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिल्लीत अमित शहांच्या भेटीसाठी गेले होते. त्यातही अजितदादा हे दुपारी शरद पवारांसमवेत प्रतापराव पवारांच्या घरी स्नेह भोजनात उपस्थित होते आणि तिथूनच विशेष विमानाने ते दिल्लीकडे गेले. याचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत.

    ‘आमचे नेते शरद पवार हेच आहेत,’ असे त्यांनी स्थापन केलेल्या पक्षामधून फुटलेल्या दादा गटाचे म्हणणे आहेच. ‘थोरले पवार हे स्वतः मोदी शहांच्या भाजपा सोबत आघाडी करण्याच्या प्रयत्नात २०१४ पासूनच शरद पवार होते, पण प्रत्येक वेळी अखेरच्या क्षणी पवारांचा पाय मागे येत होता…’ असे पक्ष फुटीनंतर, दादा, पटेल व फडणवीस वारंवार सांगत आहेत. जुलैमध्ये शिंदे सरकारमध्ये भाजपच्या आशिर्वादाने सहभागी होत असतानाही अजितदादा व त्यांचे नवे मंत्री शरदरावांच्या भेटीसाठी धावले होते. स्वतः दादांनी उद्योगपती मित्राच्या घरी लपूनछपून थोरल्या साहेबांच्या भेटी घेतल्या होत्या आणि आता पवार कुटुंबियांच्या पारंपरिक एकत्र दिवाळी सणावेळी अजितदादा बारामतीत दिसणार की नाही, अशा चर्चा रंगत असतानाच दादा पुण्यात प्रकटले आणि थेट काकांच्या बरोबर भोजन घेऊन दिल्लीत अमित शाहांच्या भेटीसाठी दाखल झाले, याला काय म्हणावे, असा प्रश्न जनतेला पडलेलाच आहे.

    डेंग्यू झाला म्हणून गेल्या दोन आठवड्यात मंत्रालयातही उपमुख्यमंत्री पवार दादा गेले नव्हते, मंत्रीमंडळ बैठकींना गेले नव्हते. जरांगेचे उपोषण संपण्याच्या प्रयत्नात दिसले नव्हते. त्यमुळे त्याच डेंग्युच्या कारणाआड दादा लपतील व बारामती काटेवाडीच्या दिवाळीत दिसणार नाहीत अशीही अटकळ बंधली जात होती. मात्र ती फोल ठरली. हे राजकारणाचे रंग नेमके काय दाखवत आहेत? दिल्लीत नेमके काय शिजले आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबरोबरच विविध खात्यांमधील निधिवाटपातील अडचणींचा पाढा दादांनी शहांपुढे वाचला म्हणतात. लोकसभेच्या जागा वाटपाचाही मुद्दा त्या चर्रेत असणारच. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील राजकीय रस्सीखेच गेले काही महिने सुरु आहेच. हे सारे प्रश्न कधी व कसे सुटणार, अशी अस्वस्थता आमदारांमध्येही दिसते. या साऱ्यामध्ये दिवाळीमध्ये अनेक फटाके व आपटीबार पेरले गेले आहेत. त्यांचे आवाज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ऐकायला मिळणार आहेत…!!

    – अनिकेत जोशी