२०२३… अबब, केवढे फिल्मी वाद विवाद

सिनेमाचं जग आणि वाद विवाद, भांडणे यांचे नाते खूपच जुने. पिक्चर चालत वा पडत राहतील हो, गाॅसिप्स कायमच हवे अशी मानसिकता रुजलीय. त्यातले वाद खरे किती, त्यात तथ्य किती, पब्लिसिटी स्टंट कोणते, मीडियात स्टार म्हणून चमकण्यासाठी कोणते याचा शोध बोध घेणे काहीसं अवघड. अनेकदा पिक्चर रिलीज होईपर्यंत वाद, कधी पिक्चर रिलीज झाल्यावर आकांडतांडव; तर कधी पिक्चर फ्लाॅप होताच शांतता... वाद गायब. फक्त नोंद कायम.

  आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मीडियात काही क्षणातच एक बातमी दूरपर्यंत (जगभरात म्हटलं तरी चालेल) जातेय. ती समजून त्यावर काही बोलावे वा ऐकावे, निष्कर्ष काढावा तोच दुसरी बातमी. सिनेमाच्या बाबतीत तर वाद आणि अफवा यांच्यातील फरक स्पष्ट होईपर्यंत आणखीन एक काॅन्ट्रोव्हर्सी. २०२३ मध्ये वादांचा फारच सुकाळ रंगला. त्यातील काहींवर धावता फोकस.

  ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरवरुनच सोशल मीडियात तीव्र नापसंती व्यक्त झाल्याने सिनेमावर प्रचंड खर्च करुन नव्याने तांत्रिक करामत करुन तो पडद्यावर येतोय तोच पब्लिकने अक्षरश: हुर्यो उडवली. रामायणाची थट्टाच केलीत, रुपेरी पडद्यावरील प्रतिमा आक्षेपार्ह आहेत अशी तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि चित्रपटगृहावरची गर्दी वेगाने ओसरली. खुर्च्या रिकाम्या झाल्यादेखिल. पिक्चर फ्लाॅप होणं नवीन नाही. अनेक वर्ष ते घडतेय. या अपयशाचा फारच आवाज झाला. आणि मग भयाण शांतता.

  सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘केरळ स्टोरी’तील हिंदू युवतींचे पध्दतशीरपणे केले जात असलेल्या मुस्लिम धर्मांतरचा वाद खूपच गाजला. राजकारणातही याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या चित्रपटावरचा वाद फिल्मी नव्हता. एक भयावह वास्तव होते.

  ‘ओ माय गाॅड२’मधील काही प्रसंगावरुन उत्तरेकडील महाकलेश्वर मंदिराने तीव्र आक्षेप घेतला. ‘पठाण’मधील शाहरुख खान व दीपिका पदुकोण यांच्यावरील बेशरम रंग या गाण्यातील दीपिकाच्या केशरी रंगाच्या बिकीनीवरुन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात प्रचंड मोठे वादळ निर्माण होताच कॉम्प्युटरच्या सहाय्याने रंग बदलण्यात आला. हा वाद चित्रपटाला भरपूर कव्हरेज देणारा ठरला आणि चित्रपट रसिकांकडून उत्फूर्त स्वागत झाल्याने चित्रपट सुपरहिट ठरला.

  ‘ॲनिमल’मधील प्रचंड कौर्य आणि वादग्रस्त कामूक पदार्थ यावरुन अनेकांनी नापसंती व्यक्त केली. सेन्सॉरने या दृश्याना परवानगी दिलीच कशी यावरुन उलटसुलट मते व्यक्त झाली. भारतीय चित्रपटाचा भयावह चेहरा असेही म्हटले गेले. हा चित्रपट सहकुटुंब पाहू शकत नाही अशी भावना व्यक्त झाली. या चक्रीवादळात चित्रपट मात्र न सापडता २०२३ चा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला.

  रक्षिता मंदान्ना हिच्या आधुनिक तंत्रज्ञानाने केलेल्या ‘डीपफेक’ फोटोचा वाद गाजला. अमिताभ बच्चननेही तीव्र नाराजी व्यक्त केली. आणखीन काही अभिनेत्रींबद्दल असेच घडले. तांत्रिक प्रगती कशी मारक यावरुन प्रतिक्रिया उमटल्या.

  ‘टीकू वेड शेरु’मधील नवाऊद्दीन सिद्दीकी व अवनीत कौर यांच्यातील चुंबन दृश्य, जी करदा या चित्रपटातील तमन्ना भाटीयाचा बोल्ड लूक, रणवीर सिंगचे एका मासिकासाठीचे नग्न फोटोसेशन, ७२ हुर्ये, अजमेर ९२ या चित्रपटांचे विषय यावरुन वाद निर्माण झाला. तर अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’च्या यशाच्या पार्टीत शाहरुख खान आल्याने तो व सनी देओल यांच्यातील यश चोप्रा दिग्दर्शित ‘डर’ (१९९३)च्या वेळेस झालेला वाद पूर्णपणे मिटला, असेही काही सकारात्मक घडले.

  सोशल मीडियात कशावरुन वाद निर्माण केला जाईल हे सांगता येत नाही. सीसीटीव्ही आणि मोबाईल कॅमेरा यांच्यामुळे अनेक घडामोडी जणू स्कॅनिंगखाली आल्यात. आणि सोशल मिडियात कोणीही व्यक्त होत असल्याने तर कोणाला काय खटकेल आणि कशावरुन वाद निर्माण होईल हे काहीच सांगता येत नाही. पियूष रानडे आणि सुरुची आडारकर यांच्या अनपेक्षित लग्नाचा सगळ्यानाच धक्का बसला. कारण पियूषचं हे तिसरं लग्न आणि या लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी त्याची घटस्फोटित दुसरी पत्नी मयूरी वाघने आपल्या नवीन घरात प्रवेश केला. यातून सोशल मीडियात फारच मोठ्या प्रमाणात उलटसुलट मते व्यक्त झाली; पण पियूष व सुरुची यांनी प्रतिक्रियांचा भाग खुला ठेवला. लोकांना जसं पाहिजे तसं व्यक्त होऊ द्यात असा त्याचा दृष्टीकोन राहिला. २०२३ मधील वादांतील हीदेखील एक बाजू आहे.

  एखाद्या सेलिब्रिटीजचा विमानतळावर चाहत्याला चुकून धक्का लागला तरी वाद आणि चित्रपटात आदर्शना चुकीच्या पध्दत वा माहितीने साकारले असेल तरी वाद अशी ही चित्रपट क्षेत्रातील वाद विवादाची दोन टोके आहेत. संदर्भ वा तपशील द्यायचे तर ते खूपच देता येतील. नवीन वर्षांत यात वाढच होईल पण वाद विवादांची कारणे नवीन असू देत. अन्यथा हेच वाद बोथट होत जातील.

  – दिलीप ठाकूर