जगभरात दिवाळीचा प्रकाश !

दिवाळी हा आनंदाचा, चैतन्याचा सण आहे. त्याला पौराणिक संदर्भ आहेतच; पण वर्तमानात देखील सर्वांत झगमगाटाचा सण म्हणजे दिवाळी. भारतात सर्वत्र हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या सणाला बाजारपेठेत जेवढी उलाढाल होत असेल तेवढी अन्य कोणत्याच सणाला होत नसावी. एका अर्थाने सामान्यांच्या क्रयशक्तीचा अंदाज त्यावरून येऊ शकतो.

  दिवाळीत लक्ष्मी पूजन केले जाते. त्या अर्थाने दिवाळी हा समृद्धीचे दर्शन घडविणारा सण. हा सण अस्सल भारतीय. दीपांच्या माळा, आकाशदिवे, फटाक्यांची आतषबाजी याने आसमंत उजळून निघालेला असतो. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’, म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे या भारतीय तत्वज्ञानाचे प्रतीक म्हणजे दिवाळी. साहजिकच हा सण भारतात सगळीकडे धुमधडाक्यात साजरा होतो यात नवल नाही.

  जसेजसे भारतीय अन्य देशांत वास्तव्य करू लागले; तेथे भारतीय वंशाच्या लोकांच्या दोन-तीन पिढ्या राहिल्या; तसतसे भारतीय सण तेथेही साजरे होऊ लागले. अर्थात सुरुवातीला ते घरगुती स्तरावर किंवा भारतीय समुदायापुरते मर्यादित होते. मात्र त्या त्या देशांत भारतीयांचे प्रमाण वाढले, शासकीय स्तरावर भारतीयांचा सहभाग वाढला, द्विपक्षीय संबंध दृढ होऊ लागले, जागतिकीकरणामुळे आणि माहिती-तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे जग जवळ आले तसतसे हे सण परदेशात मोठ्या प्रमाणावर साजरे होऊ लागले. दिवाळी त्याला अपवाद नाही. अमेरिकेपासून युरोप, दक्षिण आफ्रिका, सिंगापूरसारखे आशियातील देश यांत दिवाळी तितक्याच उत्साहाने साजरी होते. किंबहुना काही देशांत तर भारतात असते तशी दिवाळीची सार्वजनिक सुटी असते.

  ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना येथे गेल्या वर्षी सिटी मॉलमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. यंदा दिवाळीच्या एक आठवडा अगोदरच व्हिएन्नामध्ये सुमारे हजार जणांनी एकत्र येत दिवाळी साजरी केली. व्हिएन्नामधील हिंदू मंदिर सोसायटी या संघटनेने हा दीपोत्सव आयोजित केला होता. १९९८ पासून ही संघटना तेथे दिवाळी साजरी करीत आली आहे. ऑस्ट्रियात सुमारे दहा हजार भारतीय वास्तव्यास आहेत आणि त्यातील चार हजार व्हिएन्नामध्ये वास्तव्य करतात. यावेळच्या दीपोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे या उत्सवात त्या शहराच्या उपमहापौरांनी लावलेली उपस्थिती. जर्मनीत गेल्या वर्षी फ्रँकफर्ट येथे संसदेत दिवाळीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. तेथील राहुल कुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. राहुल कुमार हे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून गेलेले पहिलेच भारतीय आहेत. त्यांनी जर्मन प्रशासनाशी चर्चा करून दिवाळी सणाला संसदेत प्रविष्ट केले. या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यात आले; पूजा करण्यात आली. हे अर्थातच भारतीय परंपरेनुसार. जर्मनीतच यावेळी आणखी एक महत्वाची घडामोड घडणार आहे. कृष्णमूर्ती नावाचे भारतीय सुमारे पन्नास वर्षांपूर्वी जर्मनीतील बर्लिन येथे वास्तव्यास गेले. जवळपास वीस वर्षांपूर्वी त्यांच्या मनात तेथे गणपतीचे मंदिर बांधावे अशी कल्पना आली. अर्थात हे दान-देणगीच्या आधारावरच. या मंदिराचे बांधकाम अनेकदा निधीच्या अभावी रखडले. मात्र, आता वीस वर्षांनी का होईना त्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि देवांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना त्या देवळात या दिवाळीत होईल. कृष्णमूर्ती यांच्या दृष्टीने ही दिवाळी अनोखी; तशीच तेथील भारतीयांसाठी देखील.
  कॅनडात फटाके उडविण्यास जरी निर्बंध असले तरी दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते. गेल्या आठवड्यात भारतीय-कॅनडियन समुदायाने दिवाळीचा उत्सव साजरा केला. तेथील खासदार चंद्रशेखर आर्य यांनी संसद परिसरात दीपावली उत्सव आयोजित केला होता. भारत-कॅनडा संबंध सध्या दुरावलेले असले तरी तेथे दिवाळी साजरी होण्यातील उत्साहात कसर नव्हती. आर्य यांनी ओम लिहिलेला ध्वज उभारला. ओटावा, मॉन्ट्रियल, टोरोंटो येथील भारतीय मोठ्या संख्येने या सोहळ्यास हजर होते. कॅनडातील हिंदू आणि भारतीय-कॅनडियन अशा साठहून अधिक संघटनांनी या सोहळ्याच्या आयोजनात सहभाग घेतला होता हे विशेष. भारतावर टीका करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हेही या सोहळ्यात सहभागी झाले होते; त्यांनी भारतीयांना शुभेच्छाही दिल्या. हा सण सकारात्मकता साजरी करण्याचा आहे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या. दुरावलेल्या संबंधांचे सावट या सोहळ्यावर पडलेले दिसले नाही.

  दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांपैकी निम्मे हे हिंदू आहेत; साहजिकच तेथे दसरा-दिवाळी सण साजरे होतात. दक्षिण आफ्रिका हिंदू महासभा या संघटनेतर्फे दिवाळी सोहळ्याचे आयोजन केले जाते. १९९८ पासून डर्बन वार्षिक सोहळा आयोजित केला जातो आणि दक्षिण आफ्रिकेच्या सर्व भागातून भारतीय त्यात सहभागी होतात. योगाभ्यास, सांस्कृतिक कार्यक्रम, भारतीय चित्रपटांचे प्रदर्शन अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन यात केलेले असते. केवळ हिंदूच नाहीत तर दक्षिण आफ्रिकेतील अन्य समुदाय देखील यात सहभागी होतात. प्रिटोरिया येथे गेल्या आठवड्यात झालेल्या दिवाळी आयोजनाला सात हजार जणांनी उपस्थिती लावली. जोहान्सबर्ग येथे भारताच्या कोंसेल जनरलने दिवाळी उत्सवाचे आयोजन केले होते आणि त्यात तेथील महापौर उपस्थित होते. अर्थात भारतात तेलाचे दिवे लावण्यात येतात त्याऐवजी तेथे इलेक्टॉनिक दिवे लावण्यात आले आणि दिवाळी पर्यावरणपूरक साजरी करण्यात आली. मात्र हा सण तेथे भारतीय किंवा हिंदूंपुरता आता मर्यादित राहिलेला नाही हा त्यातील उल्लेखनीय भाग.

  मलेशिया, फिजी, गयाना, त्रिनिदाद, सिंगापूर, म्यानमार, नेपाळ इत्यादी काही देशांत दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केलीच जाते असे नाही तर तेथे अधिकृत सुटी देण्यात येते. यात भर पडली ती पाकिस्तानची. वास्तविक स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानात होळी आणि दिवाळीला सार्वजनिक सुटी देण्याची पद्धत होती. कालांतराने तेथे या सणांना देण्यात येणारी सुटी वैकल्पिक करण्यात आली होती. मात्र २०१६ साली सिंध प्रांतातील अल्पसंख्यांकांसाठी राखीव जागेवरून संसदेवर निवडून गेलेले रमेश कुमार वांकवानी यांनी दिवाळीला आणि होळीला सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात यावी असा प्रस्ताव संसदेत मांडला. त्यावरून बराच काहूर उठला. मात्र अखेरीस तो प्रस्ताव संमत झाला.

  नेपाळमध्ये दिवाळी साजरी करण्यात येते यात नवल नाही. तेथे हिंदूंचे प्रमाण ८० टक्क्यांहून अधिक आहे. भारतात दिवाळी साजरी होते त्याच पद्धतीने दिव्यांचा माळा, रांगोळी अशा पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात येते. सौदी अरेबियात जवळपास ३० लाख भारतीय राहतात. अर्थात सौदीत धार्मिक कायदे कडक असल्याने दिवाळीसारखे सण साजरे करण्यावर काहीशा मर्यादा पडत असल्या तरी या निमित्ताने भारतीय रेस्टोरंटमध्ये भारतीय मिष्टान्नाची रेलचेल असते. सिंगापूरमध्ये लिटिल इंडिया भागात दिवाळी धडाक्यात साजरी करण्यात येते आणि भारतीय लोक आपल्या कोरियन, चिनी, जर्मन शेजाऱ्यांना आपल्या आनंदात सामील करून घेतात. दिवे, रांगोळी असा थाट तेथेही असतो; बाजारपेठा सजलेल्या असतात आणि सजावटींनी घरे उजळून निघालेली असतात.

  या सगळ्यांत सर्वाधिक उत्सुकता असावी ती ब्रिटन आणि अमेरिकेत दिवाळी कशी साजरी होते याची. याचे कारण तेथे भारतीयांची असणारी मोठी संख्या. ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक हे अर्थमंत्री असताना डाउनिंग स्ट्रीटवर दिव्याची ज्योत प्रज्वलित करून दिवाळी साजरी करीत असत. आता तर ते पंतप्रधान झाले आहेत आणि योगायोग असा की गेल्या वर्षी दिवाळीच्याच सुमारास त्यांना ब्रिटनचे हे सर्वोच्च पद मिळाले. त्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी थेट १०, डाउनिंग स्ट्रीट या पंतप्रधानाच्या अधिकृत निवासस्थानी दिवाळी साजरी केली. दिवाळीची सार्वजनिक सुटी नसली तरी लायकेस्टर, बर्मिंगहॅम अशा शहरांमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. ब्रिटनमध्ये मंदिरांना दिव्याची देखणी आरास करण्यात येते. ट्रॅफल्गार स्क्वेयर येथेही भारतीय मोठ्या प्रमाणावर एकत्र येऊन दिवाळी साजरी करतात. यंदाही तो उत्सव साजरा करण्यात आला. तिथे पाऊस पडत असूनही भारतीयांनी पावसाला न जुमानता उत्सवात भाग घेतला. लंडनचे महापौर सादिक खान यांनी तर भारतानंतर सर्वांत मोठ्या प्रमाणावर दिवाळी ब्रिटनमध्ये साजरी होईल असे म्हटले.

  अमेरिकेत जॉर्ज बुश अध्यक्ष असल्यापासून म्हणजे २००३ साली व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी होऊ लागली. २००७ साली अमेरिकी काँग्रेसने दिवाळीला सणाचा दर्जा दिला तर २००९ साली अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्वतः दिवाळी उत्सवात सहभाग घेतला. ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळीचा दिवा प्रज्वलित करणारे ते पहिले अमेरिकी अध्यक्ष ठरले. त्यांनंतरच्या अध्यक्षांनी ती प्रथा कायम ठेवली. तत्पूर्वी २०१५ साली ओबामा भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी मुंबईत लहान मुलांच्या सान्निध्यात दिवाळी सोहळ्यात सहभाग घेतला होता. दोन देशांमधील समान सांस्कृतिक परंपरांचे प्रतीक म्हणजे दिवाळी अशी प्रतिक्रिया त्यावेळी ओबामा यांनी दिली होती. विद्यमान अध्यक्ष जो बायडेन यांनी २०१६ साली अमेरिकेचे उपाध्यक्ष असतानाही दिवाळी सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकांची तयारी सुरु होती आणि डोनाल्ड ट्रम्प प्रचार करीत होते. ‘ट्रम्प यांच्या प्रचाराने निर्माण केलेल्या अंधारात दिवाळीचे दिवे प्रकाश निर्माण करतील’, अशी अपेक्षा बायडेन यांनी व्यक्त केली होती. अर्थात नंतर ट्रम्प निवडून आले आणि व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याचा प्रघात त्यांनी सुरूच ठेवला. अमेरिकेच्या निरनिराळ्या भागातील भारतीय समुदाय दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरो करतो.

  लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को, ह्युस्टन, डेन्व्हर, फिलाडेल्फिया, वॉशिग्टन, डल्लास इत्यादी ठिकाणी दिवाळी साजरी होते. काही वर्षांपूर्वी पर्यंत या सोहळ्याचा परिणाम तेथील बाजारपेठेत दिसून येत नसे. आठ वर्षांपूर्वी सत्पथी सिंग यांनी ब्राऊन गर्ल मॅगझीनमध्ये लिहिताना असे नमूद केले होते ‘दिवाळीच्या सणाकडे अद्याप व्यावसायिक-दुकानदार यांचे म्हणावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. भारतीय-अमेरिकी समुदाय मोठ्या प्रमाणावर असूनही हे घडत आहे’. याचा परिणाम असावा किंवा अन्य काही घटक असावेत पण अमेरिकेच्या अनेक प्रांतांतील बाजारपेठा आता दिवाळीसाठी सज्ज असतात. अनेक ब्रँड दिवाळीसाठी आपल्या वस्तू बाजारात आवर्जून आणतात. दिवाळीची अमेरिकेत सर्व प्रांतांत सार्वजनिक सुटी नसते. पेन्सिल्व्हेनिया हे पहिले राज्य होते जेथे दिवाळीसाठी सार्वजनिक सुटी देण्यात आली. नुकतेच न्यू यॉर्क प्रतिनिधी मंडळाने देखील दिवाळीच्या सुटीचा प्रस्ताव संमत केला आहे. ब्रुक्लीन क्वीन्स डे ची असणारी सुटी रद्द करून आता दिवाळीची सार्वजनिक सुटी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. अर्थात यंदा दिवाळीचा पहिला दिवस रविवारीच येत असल्याने ही सार्वजनिक सुटी खऱ्या अर्थाने पुढील वर्षी लागू होईल. इस्रायलच्या भारतातील राजदूतांनी देखील दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि इस्रायलचे जे ओलीस हमासच्या ताब्यात आहेत त्यांच्यासाठी भारतीयांनी दिवा लावावा असे आवाहन केले आहे. तर कॅनडियन कवी रुपी कौर यांनी व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या दिवाळी सोहळ्याचे निमंत्रण बायडेन प्रशासनाने इस्रायलला दिलेल्या पाठिंब्याचा निषेध म्हणून नाकारले आहे. युध्दाचे पडसाद दिवाळीसारख्या सणात देखील उमटतात त्याची ही उदाहरणे.

  – राहुल गोखले