
गणपती महोत्सवानंतर प्रदीर्घ काळ म्हणजे पाच दिवस चालणारा आणि शरीराच्या रोमारोमात उत्साह जागविणारा हा सण म्हणजे दिवाळी. वर्षभर आपण घराची जितकी साफसफाई करत नाही तितकी साफ सफाई आपण दिवाळीला करतो आणि सारे कुटुंब या विशेष कामात गुंतून जाते. घराचा कोपरान कोपरा डोळ्यात तेल घालून आपण साफ करतो. अडगळीचे सर्वच सामान, जुने कपडे, उपयोगात न येणार्या वस्तु कबाडीवाल्याला देऊन दिवाळीच्या निमित्ताने घर सजविण्याकरिता स्वच्छ करतो.
भारतात दिवाळी हा सण म्हणजे सर्व सणांचा राजा. दिव्यांचा सण आणि प्रकाशाचा उत्सव..! हेमचंद्राच्या नोंदीनुसार दिवाळीचे प्राचीन नाव ‘यक्षरात्री’ असे असून नीलमत पुराणानुसार या सणाला ‘दीपमाला’ असे म्हटले जाते. प्रभू रामचंद्र, सीता माई, भाऊ लक्ष्मण यांच्या चौदा वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर आणि राम- रावण युद्धाच्या समाप्तीनंतर अयोध्येला परतण्याचा दिवस म्हणजे दिवाळी अशी पारंपरिक मान्यता आहे. अयोध्येच्या लोकांनी या वेळेस अंधारातला मार्ग उजळण्या करिता हजारो दिवे लावले, त्याचे प्रतीक म्हणजे आजची दिवाळी. पांडव तेरा वर्षाच्या वनवासातून कार्तिक अमावास्येला हस्तिनापूरला परतल्यानंतर त्यांचे महाल आणि घर हजारो तेजस्वी दिव्यांनी लोकांनी सजविले होते. तेव्हापासून दिवाळी सुरू झाली असेही मानणारा मोठा वर्ग आहे. त्याचेच प्रतीक म्हणजे दिवाळी. समुद्र मंथनातून लक्ष्मीची उत्पत्ति झाल्यानंतर तिच्या रूपावर मोहित होऊन भगवान विष्णु यांनी तिच्या सोबत लग्न केले. लक्ष्मी ही दुधाळ महासागरची कन्या होती आणि तिचा जन्मसुद्धा कार्तिक महिन्याच्या अमावास्येला झाला, अशी कथा लहानपणापासून ऐकत आलो आहोत. हेच आहे दिवाळीचे प्रतीक. नरक चतुर्दशी या दिवशी भगवान विष्णुने श्रीकृष्णाचे रूप घेऊन नरकासुराच्या कैदेतून सोळा सहस्त्र स्त्रियांना मुक्त केले आणि त्याचा वध केला तोच हा दिवस आहे. मुक्तीचा आनंद आणि दुष्टांचा नाश म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्याचे प्रतीक म्हणजे दिवाळी.
अशा अनेक पौराणिक धार्मिक कथा असलेला हा दिवस आपण साजरा करत आहोत. गणपती महोत्सवानंतर प्रदीर्घ काळ म्हणजे पाच दिवस चालणारा आणि शरीराच्या रोमारोमात उत्साह जागविणारा हा सण म्हणजे दिवाळी. वर्षभर आपण घराची जितकी साफसफाई करत नाही तितकी साफ सफाई आपण दिवाळीला करतो आणि सारे कुटुंब या विशेष कामात गुंतून जाते. घराचा कोपरान कोपरा डोळ्यात तेल घालून आपण साफ करतो. अडगळीचे सर्वच सामान, जुने कपडे, उपयोगात न येणार्या वस्तु कबाडीवाल्याला देऊन दिवाळीच्या निमित्ताने घर सजविण्याकरिता स्वच्छ करतो. ९ नोव्हेंबरपासून म्हणजे वसुबारसपासून दीपोत्सवाला सुरवात झालेली आहे आणि भाऊबीजेनंतर दिवाळीची समाप्ती होते. या दिवाळीच्या काळात श्रीगणेशाची आणि लक्ष्मीची प्रदोष काळात विशेष पूजा आणि आराधना केली जाते. संपूर्ण घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून जाते. घराच्या कानाकोपर्यात या प्रकाशपर्वाची किरणे पोहचत असतात आणि प्रत्येक कोपरा या प्रकाशने न्हाऊन निघतो. घरच्या साफसफाईची पिढीजात आणि पारंपारिक मान्यता अशी आहे की, लक्ष्मीचे आगमन घरात झाल्या नंतर घरात ज्या ज्या ठिकाणी तिला स्वच्छता आणि प्रकाश दिसतो त्या त्या ठिकाणी ती विराजमान होते आणि आर्थिक सुख समृद्धीचा आशिर्वाद देते. म्हणून दिवाळीच्या प्रकाश पर्वात सर्वत्र आत बाहेर सर्वत्र मातीचे दिवे लाऊन घराचा प्रत्येक स्वच्छ झालेला कोपरा न्हाऊन निघतो. सनातन धर्मात मातीच्या दिव्याचे विशेष महत्व आहे. कारण मातीच्या दिव्याला पंचतत्वाचे प्रतीक मानले गेले आहे. या पंचतत्वाचा उपयोग दिव्यांच्या निर्मिती करिता केला जातो. हे दिवे तयार करण्याकरिता पृथ्वी, आकाश, वायू, जल आणि अग्नीचा उपयोग केला जातो. याच पाच तत्वाने मनुष्याची आणि प्रकृतीची निर्मिती झाली आहे.
हा सर्वांचाच लाडका सण असल्याने दिवाळीपूर्वी घराची रंगरगोटी, आवराआवर, नवीन कपड्यांची खरेदी, दागिन्यांची खरेदी, चविष्ट फराळ आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा प्रसन्न वातावरणात प्रत्येकाच्या घरी लक्ष्मीचे आगमन होते. आपला देश कृषिप्रधान असल्याने गाय आणि वासरू यांची ‘गोधन’ म्हणून पूजा करून आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना गोड धोड खाऊ घालून दिवाळीची सुरवात होते. यालाच ‘वसुबारस’ ‘गोवर्धन पूजा’ असेही म्हणतात. धनत्रयोदशीला नवीन सोने खरेदी करण्याची परंपरा असून त्यामुळे आर्थिक संपन्नता येते. तिन्ही सांजेला धनाची पूजा करून धणे आणि गुळाचा प्रसाद देवासमोर ठेवल्या जातो. याच दिवशी सायंकाळी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते आणि कुटुंबात अपमृत्यु टाळावे या करिता यमदेवाची मंत्ररूपी प्रार्थना केली जाते.
कार्तिक अमावस्येचा लक्ष्मी पूजन हा दिवाळी हा प्रमुख दिवस म्हणजे दिवाळीचा केंद्र बिन्दु असून अभ्यंगस्नान करून या पवित्र दिवसाची सुरवात होते. लक्ष्मीच्या मूर्तीची सायंकाळी पूजा करून लक्ष्मीचा आशिर्वाद घेतला जातो. संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातने सोन नाणं-रोकड यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतो. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी (केरसुणी) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो. बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा. साडेतीन मुहुर्तापैकी एक असून अनेक नवीन प्रकल्प, बांधकामाची सुरवात या दिवशी केले जाते. नवीन संकल्प केले जातात. भाऊबीजेला नवीन वस्त्रे देऊन आणि ओवाळणीने दिवाळीची सांगता होते.
यासोबतच दिवाळीत लहान मुलांच्या आनंदाला उधाण आलेले असते. सुगंधित अभ्यंग स्नान, विशेष फराळ, आकाश कंदील तयार करणे आणि घरासमोर अंगणात रांगोळ्या काढणे याला विशेष महत्व आहे. कारण ते लक्ष्मीच्या आगमनाचे स्वागत आहे. दिवाळीचा मातीचा किल्ला तयार करणे आणि आप्त मित्रमंडळींना भेट वस्तु देणे याचा आनंद काही वेगळाच आहे. आता तर विदर्भात अनेक ठिकाणी ‘सुंदर किल्ला स्पर्धा’ होते आणि त्याला छान प्रतिसाद मिळतो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी आनंद.
दिपावलीच्या अनेक सुखद आठवणी पुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
– श्रीकांत पवनीकर