
मागासवर्गीय, ओबीसी, भटके विमुक्त अशांची ताकद भाजपच्या पाठी उभे करणारे गोपिनाथ मुंडे होते. त्यांनी वापरलेला माळी, धनगर व वंजारी हा 'माधव' फॉर्म्युला राजकारणात प्रसिद्द आहे. अलिकडे ‘मा’ भुजबळांबरोबर मोठ्या संख्येने स्थिरावलेला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर, ‘ध’ बाजूला जाऊ शकतो. आता जर टोकाचा निर्णय मुंडे कन्येने घेतला आणि पंकजा यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात ‘व’ बाजूला झाले तर काय करायचे असा यक्षप्रश्न भाजप नेत्यांना सतावणार आहे...
परवाच्या दसऱ्याला राज्यात चार मोठे मेळावे झाले आणि त्यात चार नेत्यांनी निवडणुकीचे जणू रणशिंगच फुंकले. पहिले दोन मेळावे होते शिवसेनेचे. एक मूळ ठाकरेंच्या सेनेचा मेळावा. त्यात प्रमुख वक्ते होते उद्धव बाळासाहेब ठाकरे. दुसरा मेळावाही शिवसेनेचाच, पण या दुसऱ्या सेनेला देशाच्या निवडणूक आयोगाची मान्यता लाभलेली असल्याने अधिकृत पक्ष नाव आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह हे एकनाथ शिंदेंच्या व्यासपीठावर मिरवत होते.
तिसरा मेळावा होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि त्यातील प्रमुख वक्ते होते अर्थातच सरसंघचालक मोहनजी भागवत. हा मेळावा प्रथेप्रमाणे नागपूरच्या संघ मुख्यालयात रेशिमबागेत पार पडला. तर चौथा मेळावा होता बीड-नगर सीमेवरील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांनी घेतलेला.
च्या भारतीय जनता पक्षासाठी हा चौथा मेळावा लक्षणीय होता.तिसरा मेळावा आणि शिवसेनेचे दोन्ही मेळावे हे अनेक दशकांची प्रदीर्घ परंपरा लाभलेले आहेत. संघाचा मेळावा हा अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण असतो. संघ स्थापनेपासून दसऱ्याचे मोठे संचलन व पाठोपाठ सरसंघ चालकांनी केलेले मार्गदर्शन यासाठी नागपूरचा दसरा प्रख्यात आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी देशावर राज्य केले त्यालाही आता दशकांची परंपरा लाभलेली आहे. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे दोघेही ९० च्या दशकात देशाच्या राजकारणात अग्रणी असताना संघाची काळी टोपी आणि तेव्हाच्या गणवेषातील अर्धी खाकी चड्डी परिधान करून संघस्थानावर दिसत असत. संघाच्या स्वयंसेवकांनी देशाच्या अनेक राज्यात सत्तास्थाने भूषवतानाही संघाच्या गणवेषात वावरण्यात कमीपणा मानला नाही. हीच प्रथा परंपरा आजही कायम असल्याचे परवा दिसून आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे पॉवरफुल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही नेते भागवतांचे प्रबोधन ऐकण्यासाठी काळी टोपी व आताच्या गणवेषातील खाकी फुलपॅंट परिधान करून पहिल्या रांगेत विराजमान होते.
सरसंघचालकांनी दसऱ्याच्या संबोधनातून महत्वपूर्ण संदेश असा दिला की स्वयंसेवकांनी भाजपाला ताकद दिली पहिजे आणि मणिपूरमध्ये पुन्हा शांतता नांदवण्याची जबाबदारी पेलून भरपूर काम केले पाहिजे.
विशेषतः मणीपूरबाबतची मोहन भागवतांची विधाने अत्यंत महत्वूर्ण आणि लक्षणीय होती. ते म्हणाले की “मणिपूर सध्या शांत होत आहे. पण आपापसांत हा वाद कसा झाला ? गेल्या अनेक वर्षांपासून तिथे मैतेई व कुकीसोबत राहात होते. अचानक वाद कसा झाला ? ते भारताचं सीमेवरचं राज्य आहे. तिथे असे वाद होणं यात बाहेरच्या शक्तींचाच फायदा आहे. बाहेरचेच लोक होते का हे सगळं करणारे?” असा प्रश्न मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकार मजबूत आहे आणि तत्परही आहे. खुद्द गृहमंत्री तिथे तीन दिवस जाऊन राहिले. सर्व प्रयत्न केले. देशाचं सरकार तिथे शांततेसाठी कटिबद्ध आहे. पण तरीही वाद चालू राहिले. कारण शांतीचा प्रयत्न चालू असतानाच कुठलातरी वाद निर्माण केला जात होता. हिंसा भडकवणारे हे लोक कोण होते ? हे होत नाहीये, हे केलं जात आहे”, असंही मोहन भागवत यांनी बजावले आहे.
अनेक महिन्यांपासून धुमसणाऱ्या मणिपूरला शांत करण्यासाठी नेमकं काय करता येईल? यावर मोहन भागवत यांनी भूमिका मांडली. “तिथे लोकांची मनं दुखावली आहेत. फक्त शांती नाही, आता समाजाला जोडण्याचंही काम करावं लागेल. संघाचे स्वयंसेवक आधीही तेच करत होते, आजही तेच करत आहेत. अशा स्थितीतही समाजात फूट निर्माण होऊ नये, यासाठी तिथे जिवावर उदार होऊन काम करत आहेत. मणिपूरमध्ये स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान आहे. पण तिथे सगळ्यांना काम करावं लागेल. सरकारची इच्छाशक्ती तर आहेच. पण त्याचबरोबर प्रशासनाच्या कृतीशीलतेचीही गरज आहे. अविश्वास कमी करण्यासाठी तिथल्या नेतृत्वालाही काम करावं लागेल”, असं मोहन भागवत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेत आल्यापासून सलग दुसऱ्या वर्षीही शिवाजीपार्क मैदानाचा हट्ट् सोडून दिला. मागील वर्षी त्यांनी आपल्या अधिकृत शिवसेनेचा मेळावा बीकेसी मैदानात हलवला. आता तिकडे बुलेट ट्रेनच्या कामाने गती घेतलेली असताना कोणतीच सभा यापुढे बीकेसीत होऊ शकणार नाही. दुसरे मैदान निवडायचे किंवा शिवाजी पार्कचाच हट्ट धरायचा असे पर्याय खरेतर मुख्यमंत्र्यांच्या पक्षापुढे नक्कीच होते. त्यांनी दुसरा पर्याय निवडला, यात शिंदेंच्या नेतृत्वाची परिपक्वताही प्रकट होते. कारण शिंदेंनी शिवतीर्थाचा आग्रह सोडला नसता तर ठाकरे सेना जिद्दीला पडेली असती व मुंबई तसेच बाहेरच्या अनेक शहरातंतही कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी साधार भीती होती. ५७ वर्षांची, “एक मैदान, एक वक्ता व एक संघटना” हे बिरूद मिरवण्याची संधी उद्धव ठाकरेंना शिंदेंनी त्याच भूमिकेतन देऊन टाकली.
पण पर्याय म्हणून नाईलाजाने स्वीकारलेल्या आझाद मैदानावरून बोललताना ठाकरेंना नमवणे हेच शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचे ध्येय असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून टाकले. त्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा उपयोग करून घेण्याचा मनसुबा मुख्यमंत्र्यांचा दिसतो. खरेतर मुंबईसह सर्व २३ महानगरपालिकांचाय तसेच सर्वच स्तानिक स्वराज्य संस्तांच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियात गटांगळ्या घेत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यातून ठाकरेंनी कितीही आव्हाने दिली व ती स्वीकारण्याचे सरकारने ठरवले तरीही कोर्टात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीच्या आधी घेतल्या जण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वातील भाजपप्रणित रालोआला ४५ जागा मिळवून देण्याची ग्वाही शिंदेंनी देऊन टाकली.
इंडिया आघाडी या दहा तोंडी रावणाचं दहन केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा आपण देणार आणि मोदींना बळकटी देणार. बाळासाहेब म्हणाले होते की एकदिवस मला पंतप्रधान बनवा, मी राममंदिर बांधतो आणि कश्मीरमधील ३७० कलम हटवतो. आता मोदींनी राम मंदिर बांधलं आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली आणि आपल्या सर्वांना उद्घाटनाला जायचं आहे. विरोधक कोणत्या तोंडाने जातील माहीत नाही. मोदींच्या हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्यापाठीमागे उभा राहील, असे एकनाथ शिंदेंनी जाहीर करुन टाकले.
एक मोठाच नाट्यपूर्ण प्रसंग आझाद मैदानात घडला. त्यासाटी एकनाथ शिंदे भाषण थांबवून व्यसपीठावर थेट शिवाजी महारांच्या प्रतिमेसमोर गेले आणि तिथून त्यांनी जाहीर केले की ‘मराठा समाजला न्यायालयात टिकेल असे मराठा आरक्षण देण्याची सफथ मी शिवरायांच्या साक्षीने घेतो आहे.!’ पण तरीही दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून तिकडे जालन्यात पुन्हा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि त्यांनी शिंदे-फडणवीस-पवारांना आता जुमानणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तो एक पेचप्रसंग सरकारसाठी अवघड बनणारच आहे.
इकडे शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी मात्र पुन्हा खोका रागच आळवला. गद्दारांना गाडा मारा अशी भाषाही केली. ठाकरेंनी आपल्या भाषणात शिंदे व मोदींवर घणाघाती टीका केली. मेळावा झाल्यानंतर आपण खोकासुराचं दहन करणार आहोत. खरेतर रावणही शिवभक्त होता. तरीही रामाला त्याला मारावं लागलं कारण रावण माजला होता. रावणाने सीतेला पळवलं होतं. त्याचप्रमाणे आपली शिवसेना पळवण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांवर केली. मोदींनाही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा ठाकरेंनी करून इंडिया आघाडीतील स्थान पक्के करून टाकले.
तिकडे बीड आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माजी मंत्री तथा गोपिनाथराव मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांनी जे भाषण केले ते भाजपा श्रेष्ठींसाठी धोक्याची घंटा ठरावे असेच होते. दरवर्षी दसऱ्याला वंजारी समजातील मोठे संत भगवानबाबांच्या गडावर जाऊन दर्शन घेणे व तिथे जमलेल्या समाज बांधवांपुढे जोरदार भाषण करणे ही परंपार कै. गोपिनाथ मुंडेंनी सुरु केली. पण मुंडे साहेबांच्या निधनानंतर भगवानगडाच्या महंतांनी पंकजा मुंडे यांना गडावर राजकीय सभा घेण्यास मज्जाव केला. पंकजा यांनी भगवानगडाच्या पायथ्याजवळच दुसरे भगवान भक्ती स्थान तयार केले. तिथे मुंडेंचा पुतळा व स्मारकही उभे केले. आता गेली काही वर्षे त्या नव्या गडावर पंकजाताई मेळवा घेतात व राजकीय भाष्य करतात.
परवाच्या अशाच दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी नाव न घेता भाजप श्रेष्ठींनाच लक्ष्य केले. २०१४ ला भ्रष्टाचार मुक्तीचा जागर करीत मोदी सत्तेत आले पण आता तरी ‘देश भ्रष्टाचारमुक्त झाला का?’ असा खडा सवाल मुंडे कन्येने केला आहे. पंकजा मुंडे यांना गेली काही वर्षे पक्षात डावलले जाते अशी त्यांच्या समर्थकांची भावना झाली आहे. पंकजा मुंडे यांनी बहीण प्रीतम मुंडें ऐवजी बीडची लोकसभेची जागा लढवावी असा प्रस्ताव सध्या भाजपात सुरु आहे. कारण अजितदादांबरोबर महायुतीत आलेल्या धनंजय मुंडेंनाच परळीची उमेदवारी भजापाला सोडावी लागेल. पण तो पर्याय पंकजा यांनी जाहीरपणाने धुडकावला आहे. बहीणीचे काढून मला काही घेता येणार नाही. उमेदवारी मिळवण्यासाठी मी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, असे पंकजा यांनी ठणकावले आहे. आपण भगवान गडावरून भगवान भक्ती गडाकडे आलो. श्रीकृष्णालाही मथुरा सोडावी लागली आणि द्वारकेत वसावं लागलं. तशीच आज आपलीही परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या लोकांच्या मनात काहूर आहे, लोकांच्या मनात प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं मी गेल्या काही दिवसांपासून शोधते आहे. तुमच्या मनातलं उत्तर मला माहीत आहे. तुम्ही खाली बसून ओरडत आहात, ते मी ऐकत आहे.” अशा शब्दात त्यांनी पुढची आपली वाटचाल मथुरा सोडण्याच्या दिसेने राहील असे सूचित करून टाकले आहे व तेच भाजपासाठी धक्कादायक तसेच धोकादायकही ठरणार आहे.
मागासवर्गीय, ओबीसी, भटके विमुक्त अशांची ताकद भाजपाच्या पाठी उभे करणारे गोपिनाथ मुंडे होते. त्यांनी वापरलेला माळी, धनगर व वंजारी हा “माधव” फॉर्म्युला राजकारणात प्रसिद्द आहे. अलिकडे ‘मा’ भुजबळांबरोर मोठ्या संख्येने स्थिरावलेला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर, ‘ध’ बाजूला जाऊ शकतो. आता जर टोकाचा निर्णय मुंडे कन्येने घेतला आणि पंकजा यांच्या सोबत मोठ्या प्रमाणात ‘व’ बाजूला झाले तर काय करायचे असा यक्षप्रश्न भजापा नेत्यंना सतावणार आहे…!!
– अनिकेत जोशी