गगनभेदी ‘मॅकबेथ’ प्रयोगशाळेत!

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धा म्हणजे रंगकर्मींची हक्काची प्रयोगशाळाच. या स्पर्धेला वारसा आहे, प्रतिष्ठा आहे. व्यावसायिक रंगभूमीला याच नाट्यशाळेतून दिग्गज रंगकर्मी आजवर मिळाले आहेत. यंदाच्या ६२व्या स्पर्धेत जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर याचे ‘मॅकबेथ' या गाजलेल्या नाटकाची प्रयोगासाठी निवड करण्यात आली आणि एका गगनभेदी नाटकाला पुन्हा एकदा उजाळा मिळाला…

  जीवन हे एखाद्या चालत्या सावलीसारखं आहे. जणू एखादा सामान्य नट काहीकाळ रंगभू‌मीवर येतो, मानानं वावरतो आणि चरफडत निघून जातो. पुन्हा त्याचं नावसुध्दा ऐकू येत नाही. जणू व जशी एखाद्या मुर्खानं सांगितलेली गोष्ट. नुसताच गोंधळ आणि गदारोळ! कशालाच काही अर्थ नाही!

  – असा निष्कर्ष इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपिअर याने ‘मॅकबेथ’ या नाटकात मांडलाय. ज्यातून शेक्सपिअरचा मानवी जीवनाकडे आणि एकूणच जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा दिसून येतो. त्यांची नाटके, त्यातील संवाद, त्याचे अर्थ अन्वयार्थ आजही लावण्यात येत आहेत. जगातली कुठलीही रंगभूमी असो, आजही शेक्सपिअरच्या संहिता या सादर करण्यात पुढे येतात. याला मराठी रंगभूमीही अपवाद नाही.

  महाराष्ट्रात राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे रंगकर्मींची प्रयोगशाळा अशी ओळख आहे. त्यातही हौशी नाट्यसंस्थांना या नाटककाराच्या संहिता या हाती घेण्याचा मोह होतो. यंदाच्या वर्षात शेक्सपिअरची ‘मॅकबेथ’ ही स्पर्धेत प्रगटली. त्याचे रुपांतर परशुराम देशपांडे यांचे होते. बेस्ट कला- क्रीडा केंद्राची निर्मिती आणि प्रसिद्धी सोनावणे याचे दिग्दर्शन त्याला लाभलेलं नवा ‘मॅकबेथ’ नव्या पिढीला या स्पर्धेच्या निमित्ताने बघायला मिळाला. पहाडासारखी व्यक्तिमत्वे आणि त्याचे वैचारिक संघर्ष – याचे दर्शन झाले. जे पुन्हा एकदा शेक्सपिअरच्या नाटकांच्या दिशेने नव्या चष्म्यातून बघण्याचा मोह होणं, तसं स्वाभाविकच !
  ‘मॅकबेथ’ हा मराठी भाषेत ‘मानाजीराव’ या रूपात सर्वप्रथम १८९८ साली अवतरला. त्याचे रुपांतर शिवराम महादेव परांजपे यांनी केलेले. त्यानंतर लक्ष्मण नारायण जोशी यांनी ‘डाकिन विलास’ हे नाटक १८९९ साली लिहीले. त्याचे प्रयोग हे मुंबई मराठी साहित्य संघातर्फे केल्याची नोंद आहे. पूढे साक्षात वि. वा. शिरवाडकर यांनी ‘राजमुकूट’ केले आणि भरजरी भाषेतला ‘मॅकबेथ’ अवतरला. त्याचेही प्रयोग पुन्हा एकदा मुंबई मराठी साहित्य संघाने केले. १९५४-५५ च्या सुमारास गिरगावात नाट्यप्रयोगासाठी दर्दी रसिकांनी तसेच अभ्यासकांनी एकच गर्दी केल्याच्या आठवणी नोंदविल्या आहेत. ‘आंतरनाट्य’ या प्रायोगिक नाट्य चळवळीनेही ‘मॅकबेथ’वर नाट्य करण्याचे ठरविले आणि अरुण नाईक यांनी संहिता तयार केली १९८८ चा सुमार. काही प्रयोग गाजले.

  वसंत कानेटकरांचे ‘गगनभेदी’ हे नाटक. जे नाट्यप्रवासात मैलाचे निशाण ठरले. त्यात कानेटकरांनी शेक्सपिअरच्या गाजलेल्या चार शोकांतिकांचे मिश्रण कल्पकतेने केले आहे. त्याचा पहिला अंक हा ‘हॅम्लेट’वर आधारीत तो संपल्यावर ‘मॅकबेथ’ सुरु होतो, नंतर ऑथेल्लो आणि शेवट ‘किंग लिअर’. या गाजलेल्या नाटकांचे एका सूत्रात मांडलेले नाट्य आजही नाट्यअभ्यासकांना थक्क करून सोडतात, वाचकांनाही आगळावेगळा नाट्यानुभव देतात. कानेटकरांनी चाळीस एक नाटके रंगभूमीला दिली. नावीन्याच्या ध्यासाने त्यांच्यातला नाटककार कायम अस्वस्थ असायचा. नाशिकचा ‘शिवाई’ बंगल्यात हा महान नाटककार बघतांना मन प्रसन्न व्हायचं. नाट्यसृष्टीत ‘कानेटकरी युग’ त्यांनी निर्माण केलेलं. त्यांनीही ‘मॅकबेथ’ला जवळून बघितलं जस होतं. प्रा. मधुकर तोरडमल यांनी ‘गगनभेदी’ साकार केली होती. ते ऐके ठिकाणी म्हणतात‌ – ‘गगनभेदी’च्या बाबतीत माझ्यातल्या नटाला खूप मदतच झाली. ती कानेटकरांमुळेच! ‘हॅम्लेट ते लिअर’चा प्रवास आणि तोही ‘ऑथेल्लो व मॅकबेथ’ अशी आडवळणांची स्टेशने घेत करण्याची ही तशी तारेवरली कसरत त्यानीच प्रथम लेखक म्हणून केली. ही अफलातून कल्पना त्यांच्याच प्रतिभेचे फळ आहे. एका अमूर्त कल्पनेला रंगमंचावर मूर्त स्वरूप देणे ही किती गोष्ट आहे. याची पुरेपूर कल्पना यातून आली!’

  मॅकबेथ हा राजा डंकनच्या सैन्यातील एक महत्वाकांक्षी, शूर असलेला स्कॉटीश सेनापती आहे. तो स्कॉटलंडचा राजा होणारच! अशी तीन जादुगारांची भविष्यवाणी होते आणि तो क्रूर अत्याचारी संतापी बनतो. आपल्या पत्नीच्या मदतीने तो राजा डंकनला मारतो. एकीकडे वीरता जरी असली तरी दुसरीकडे हिंसकता असणारा हा योद्धा. कथेत पूढे मैकडफ हा मॅकबेथला युद्धाचं आव्हान देतो. अथवा शरण येण्यास सांगतो. काळ, वेळ बदलते- ‘शरण येऊन अपमानित जीवन जवण्यापेक्षा मरणच पत्करलेलं बरं!’ असं सजून मॅकबेथ युद्धभूमीवर जातो. मॅकबेथची जगण्याची वासना पूर्ण उडलेली असते. तो आता जिंकण्याकरता लढत नाही. तीन चेटकीण आणि बायको यांच्या दृष्ट विचारांचा राग त्याला नडलेला असतो. एक चांगला योद्धा पण असंगांशी संग केल्याने तो संपतो. वाईट शक्तींच्या नादी लागलाने वाया जातो.

  मॅकबेथचे म्हातारे जन्मदाते बाप येतात. आपला मुलगा धारातीर्थ पडल्याने बघतात. ते एकच प्रश्न तिथे विचारतात. ‘त्याला जखमा छातीवर होत्या की पाठीवर?’ सगळ्या जखमा या समोरच छातीवर होत्या. त्यावर बाप म्हणतो- ‘मॅकबेथच्या जीवाचं अक्षरशः आज सोनं झालय. त्याला मर्दाचा मरण आलय. आता त्याच्यासाठी दुःख करणं म्हणजे वीराचा अपमान ठरेल!’

  युध्द जिंकणारा मॅकडफन हा मॅकबेथचं शीर हे नवा राजा माल्कमला अर्पण करतो. एका क्रौर्यचा शेवट झाला असं सांगतो. अशा प्रकारे स्कॉटलंड प्रांत हा जुलमी राजवटीत मुक्त होतो. राज्यारोहण समारंभासाठी नगारे वाजवतात. साऱ्यांना निमंत्रणे देण्यात येतात. अशाप्रकारे ‘मॅकबेथ’ हा शेक्सपिअरने एका कथेतून मांडला आहे. या वाटेवर अनेक उपकथानके त्यात अनेक व्यक्तिरेखा त्यात प्रकाशात येतात. एक काळ जागा होतो आणि शूरवीर ‘मॅकबेथ’ नायक तसेच खलनायकही होतो. सारी शेक्सपिअरची कमाल !

  ‘मॅकबेथ’ या नाटकाच्या पडद्यामागे अनेक दंतकथा आहेत. ज्या अंधश्रध्देकडे झुकलेल्या दिसतात. अस म्हटलं जातं की हे नाटक शापीत आहे. त्याच्या शीर्षकाचा उच्चार केल्यास संकटांचा सामना करावा लागतो किंवा नाटकाचे नाव घेतल्यास दृष्ट प्रवृत्या जन्म घेतात. याचा अनुभव काही परकीय नाटकवाल्यांनी घेतल्याचे सांगण्यात येते. पण त्याची सत्यता कुणी पडताळून बघितलेली नाही. ‘द स्कॉटिश प्ले किंवा ‘स्कॉटिश किंग’ – असे विशेषण लावून नाटकाचे प्रयोग लावण्यात आल्याचा तपशिल आहे.

  ‘मॅकबेथ’च्या लिखाणाला कालावधीही उलट-सुलट सांगण्यात येतो. काही संशोधकांच्या मते १५९९ साली नाट्यलेखन झालंय तर काही जणांनी १६०३ वर्षापूर्वी लेखन झाल्याचे सांगतात. नाटकाच्या लेखन व प्रयोगा बद्दलही परस्पर विरुद्ध दावे संशोधक करतात. ऑथेल्लो, हॅम्लेट आणि किंग लिअर या नाटकाच्या समकालीन हे नाटक असल्याचेही म्हटले आहे. १६२३ आणि १६०६ – या दोन वर्षात हे नाटक छापण्यात आलय. त्यात काही जोड देण्यात आले, असेही स्कॉटिश म्हणतात.

  या नाटकात रंगमंचावर जी पात्रे प्रगटतात त्यात- मॅकबेथ (शुर सरदार), मॅकबेथची बायको ग्रूच (पाताळयंत्री स्त्री), बॅववो- (एक शूर सरदार), मॅकडफ (सुभेदार), डोनालबईन (राजा डंकनचा दूसरा मुलगा) सोबत तीन चेटकीण यासह डझनभर पात्रे आहेत. याचा पहिला प्रवेश स्कॉटलंडच्या माळरानातून सूरु होतो. तिथे चेटकीण जमल्या आहेत. दुसरा प्रवेश हा राजा डंकनच्या राजदरबारातला… असे हे नाटक एकेका प्रसंगातून उलगडत जातात.

  तात्यासाहेब शिरवाडकर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, तेच खरे. ‘शेक्सपिअरची नाटके म्हणजे एक चिरंतन आव्हानच ! कितीही केले तरी पूर्णपणे समाधान कोणालाही मिळून देणारा हा भन्नाट नाटककार ! येथे जसे चढणाराला दुःख असते आणि पाडणारालाही समाधान असते. येथे व्यवहाराचे सारे हिशेब पांगळे पडतात. शिल्लक उरते ती गौरीशंकर जिंकू पाहणाऱ्या गिर्यारोहकाची निर्भेळ जिद्द, पराक्रमांची आकांक्षा! द ग्रेट शेक्सपिअर त्याचा पूर्णपणे शोध घेणेही आव्हानच!

  -नव्या पिढीच्या हौशी रंगकर्मींनी शेक्सपिअरचे ‘मॅकबेथ’ रंगभूमीवर स्पर्धेत सादर करून एका गाजलेल्या जागतिक नाटकाला सलामच केलाय. शेक्सपिअरच्या नाटकांना मराठी रसिक, नाटकवाले हे कधीही विसरणार नाहीत !

  – संजय डहाळे