दिवाळी अंक आणि पुस्तकं टिकतील, तरच भाषा टिकेल!

वाचन संपेल ही भीती मला कधीही वाटत नाही. आज वाचनाची साधनं बदलली आहेत; मात्र वाचक संपलेला नाही, असं मनोगत सिनेपत्रकारिता, ललित लेखन आणि संपादन या तिन्ही क्षेत्रांत गेली ५० वर्षं भरीव कामगिरी करणाऱ्या अरुणा अंतरकर यांनी व्यक्त केलं.

    अरुणा अंतरकर यांना लेखनाचा वारसा त्यांचे वडील ‘हंस-मोहिनी-नवल’ या सुविख्यात मासिकांचे संस्थापक-संपादक अनंत अंतरकर यांच्याकडून लाभला. विविध मराठी वृत्तपत्र, प्रसिद्ध इंग्रजी नियतकालिके, दूरदर्शन, आकाशवाणी, वाहिन्या या ठिकाणी आपल्या विविधांगी आणि कसदार लेखनाचा ठसा त्यांनी उमटवला आहे.

    वाचन, लेखन ही माणसाची अन्न-पाण्याप्रमाणे मूलभूत गरज नाही. मनुष्य ते आपल्या आवडीनं स्वीकारतो आणि एकदा स्वीकारलं की या गोष्टी कायम त्याची साथ देतात. त्यामुळे पुस्तकं ही त्याची नेहमीच सोबती असतात. याविषयी अंतरकर म्हणाल्या, ‘काही माणसांना सिनेमा थिएटरमध्ये गेल्याशिवाय सिनेमा पाहिल्याचं समाधान वाटत नाही. त्यामुळे ते कधी टीव्हीवर सिनेमा बघत नाहीत. अगदी तसंच काही माणसांना पुस्तक घेऊन वाचल्याशिवाय समाधान होत नाही, ही माणसं आवर्जून पुस्तकच वाचतात. अशी माणसं आजही आहेत. त्यामुळे वाचन संपेल, ही भीती मला कधीही वाटत नाही. फक्त आता वाचनाची तऱ्हा बदलली आहे. साधनं बदलली आहेत. लोकं पुस्तकं आणि मासिकांचं वाचन करत नसली तरी ती फेसबुक किंवा यु-ट्यूबवर वाचतच असतात. सध्या समाजमाध्यमांवर सातत्यानं लोकं लिहित आणि वाचतही आहेत. मात्र वाचन हे भाषा आणि विचार म्हणून वाचत नाहीत. तर बऱ्याच वेळा माहिती किंवा विरंगुळा म्हणून वाचलं जातं. त्यामुळे त्याची सखोलता कमी झाली आहे. लेखकांनी अभ्यास वाढवून लेखन केलं पाहिजे आणि वाचकांनी अभ्यास वाढवून ते लेखन वाचलं पाहिजे.’

    मराठीमध्ये पुस्तकांच्या बरोबरीने दिवाळी अंकांचीही समृद्ध परंपरा आहे. आपल्या साहित्य संस्कृतीचे ते एक वैशिष्ट्य आहे. काळाच्या ओघात साप्ताहिकं, मासिकं बंद पडली असली तरी आजही वार्षिक अंकाच्या स्वरूपात दिवाळी अंकांची परंपरा संपादकांनी आणि प्रकाशकांनी जाणीवपूर्वक जपली आहे. त्यातीलच एक म्हणजे उत्कृष्ट आणि दर्जेदार साहित्य देणारे हंस, मोहिनी आणि नवल हे दिवाळी अंक. एकाच ध्यासानं भारावलेल्या अंतरकर कुटुंबाची ही ओळख आहे. याविषयी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या की, ‘आपल्याकडे दिवाळीत प्रवास, दागिने, कपडालत्ता, पार्ट्या, फटाके या सगळ्यासाठी पैसा असतो; मात्र पुस्तकं किंवा दिवाळी अंक घेण्यासाठी नसतो. कारण सण साजरा करण्यात वाचनाचाही समावेश हवा, हे काही आपल्या अंगी भिनलेलं नाही. सरकार साहित्य संमेलनाला अनुदान देण्याचं सत्कार्य करतं, तसंच सहकार्य सरकारनं दिवाळी अंकांना जाहिराती देऊन करावं. शेवटी दिवाळी अंक हेही एक प्रकारचं साहित्य संमेलनच आहे. कारण लेखक आणि वाचक इथे एकत्र येतात आणि तेही विनासायास… इतर क्षेत्रातील प्रायोजकांनीही असाच सक्रिय पाठिंबा देण्याचा विचार करायला हरकत नाही. आपली मासिकं आणि पुस्तकं टिकतील तेव्हाच आपली भाषा टिकेल. भाषा टिकायला आणि वाढायला दिवाळी अंक हेही एक साधन आहे.’

    गेल्या काही वर्षांपासून वाचन संस्कृतीचं जतन करणार्‍या ग्रंथालयांची स्थिती चिंताजनक असल्याचं सांगून त्या म्हणाल्या, ‘दोन-तीन वर्षांपूर्वी वाचकांची प्राणवायू वाहिनी असलेल्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या १६ शाखा एका वर्षी एकदम बंद झाल्या, असं मी वाचल्याचं आठवतं. हा मला मोठा झटका वाटतो. त्याला अनेक कारण असतील. ती शोधून काढली पाहिजेत. मात्र आताच्या काळात तुम्हाला जी काही गोष्ट करायचीय त्याला पर्याय उपलब्ध आहेत. ग्रंथालयात जाणारा वाचक आपल्याला दिसतो; पण घरी पुस्तकं मागवून वाचणारा वाचक आपल्याला दिसत नाही. मुंबईत फुटपाथवर बऱ्याच ठिकाणी पुस्तकांची दुकानं आहेत. ती डिपॉझिट घेऊन पुस्तकं वाचायला देतात आणि अनेकजण अशा प्रकारे पुस्तकं घेऊन वाचतात. रेल्वेच्या प्रवासातही पुस्तक, वर्तमानपत्र वाचणारी माणसं आपण बघतो. कोण, कुठे आणि कसं वाचन करतो, यापेक्षा वाचन करतो याला महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं तर कोणत्या ना, कोणत्या प्रकारे वाचन संस्कृती आजही अबाधित आहे, खुशाल आहे.’

    -अनघा सावंत