गौरवशाली परंपरेला भारतीयत्वाचे कोंदण !

छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ज्या अष्टकोनी आकारात होती, त्यावरूनच प्रेरणा घेऊन ध्वजाची रचना करण्यात आली होती. आता त्याच मालिकेतील पुढचे पाऊल पडले असून नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल असे मोदींनी जाहीर केले आहे. शिवाय नौदलातील हुद्द्यांचे भारतीयीकरण होईल असेही जाहीर केले आहे.

  कोणत्याही स्वतंत्र, सार्वभौम आणि स्वाभिमानी राष्ट्राला गुलामीचे कोणतेही अवशेष शिल्लक असू नयेत असे वाटत असते. भारतावर ब्रिटिशांची राजवट सुमारे दीडशे वर्षे होती. या काळात दोन जागतिक महायुद्धे झाली. ब्रिटन त्यात सामील असल्याने भारतातून सामरिक आणि मनुष्यबळाची रसद पुरविणे हे ब्रिटिशांचे धोरण होते. साहजिकच संरक्षण दलांशी निगडित चिन्हांवर ब्रिटिशांच्या परंपरेचा पगडा होता. स्वातंत्र्यानंतर त्यात काही अंशी बदल झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. नौदलाच्या अधिकारांच्या हुद्द्यांचे भारतीयीकरण करण्यात येईल ही एक घोषणा आणि नौदल अधिकाऱ्यांच्या गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा विलसेल हे दुसरी घोषणा. या घोषणा करण्यास असणारे औचित्यही दुहेरी होते. एक तर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण मोदींच्या हस्ते झाले; आणि दुसरे म्हणजे नौदल दिनाच्या निमित्ताने मोदींनी या घोषणा केल्या.

  रॉयल इंडियन मरीन या नावाने ब्रिटिशांनी भारतात नौदल उभारले होते. १९३४ साली या दलाचे नामांतर झाले आणि त्यास रॉयल इंडियन नेव्ही असे नामाभिधान मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या नौदलाची विभागणी रॉयल इंडियन नेव्ही आणि रॉयल पाकिस्तान नेव्ही अशी करण्यात आली. १९५० साली भारत प्रजासत्ताक झाले आणि नौदलाच्या नावातून रॉयल हा शब्द वगळण्यात आला. नौदलाच्या भारतीयीकरणाचे ते पहिले पाऊल. नौदलाच्या मुद्रेवरील मुकुटाची जागा अशोक स्तंभावरील सिंहांच्या प्रतिमेने घेतली. तेव्हा नौदलाच्या प्रतीकांचे भारतीयीकरण आता प्रथमच होत आहे असे मानण्याचे कारण नाही. ही प्रक्रिया असते आणि वेळोवेळी त्यातून बदल होत असतात. स्वातंत्र्यानंतर नौदलाने युद्धांमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. १९६१ साली गोवा मुक्तीच्या लढ्यात नौदलाच्या आयएनएस राजपूत आणि आयएनएस कृपाण या युद्धनौकांनी बजावलेली भूमिका कळीची ठरली होती. १९७१ च्या युद्धात तर भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या युद्धनौकांना जलसमाधी दिली किंवा त्यांचे अतोनात नुकसान करून पाकिस्तानचे सागरी सामर्थ्य नेस्तनाबूत केले. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका गाजली ती याच युद्धातील योगदानामुळे. हे सगळे घडले ते १९७१ च्या डिसेंबर महिन्यात आणि म्हणून ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणूनस साजरा करण्यात येतो. अशा भारतीय नौदलाशी निगडित कोणतेही प्रतीक हे ब्रिटिशांच्या राजवटीशी निगडित असता कामा नये ही अपेक्षा आक्षेपार्ह नाही. मात्र त्याच तत्वाला धरून अनेक बदल भूतकाळात झाले आहेत हे येथे नमूद करावयास हवे.

  या प्रतिकांमधील उल्लेखनीय चिन्ह म्हणजे नौदलाचा ध्वज. युद्धनौका, नौदलाच्या अन्य नौकांवर हा ध्वज फडकत असतो. सागरात या नौका असतात तेव्हा त्या ध्वजावरून या नौका कोणत्या देशाच्या हे समजत असते. या ध्वजामध्ये गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात मोठा बदल करण्यात आला. तत्पूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी भारतामधून वसाहतवादी प्रतीके संपुष्टात आली पाहिजेत असे सूतोवाच केले होते. त्यानंतर लगेचच नौदलाच्या धवजात बदल झाला हा योगायोग नव्हे. अर्थात नौदलाच्या ध्वजाच्या ‘भारतीयीकरणाचा’ हा काही पहिलाच प्रयोग अथवा निर्णय नव्हे. ब्रिटिशांकडून नौदल भारताला मिळाले असल्याने नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिश परंपरेनुसार जॉर्जचा क्रॉस होता. स्वातंत्र्यानंतर ध्वजावरील ब्रिटिश राष्ट्रध्वजाची जागा भारतीय तिरंग्याने घेणे क्रमप्राप्तच होते. मात्र जॉर्जचा क्रॉस हे वसाहतवादी वारशाचे प्रतीक. त्यात बदल व्हायला हवा असा मतप्रवाह होता. ती सूचना प्रत्यक्षात येण्यास २००१ साल उजाडावे लागले. योगायोग असा की त्यावेळी केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. नौदलाच्या ध्वजात त्यावेळी मोठे बदल करण्यात आले. एक तर जॉर्जच्या क्रॉसला मूठमाती देण्यात आली. शिवाय ध्वजाची रंगसंगती बदलण्यात आली; मात्र ध्वजावरील चिन्हे निळ्या रंगात आणि समुद्राच्या पाण्याचा, आकाशाचा रंग देखील निळा त्यामुळे ध्वजावरील चिन्हे ठसठशीतपणे दिसत नाहीत असे नौदलातील अधिकाऱ्यांचे मत होते.

  तेव्हा २००४ साली पुन्हा ध्वज अगोदरच्या स्वरूपात स्वीकारण्यात आला आणि जॉर्जचा क्रॉस ध्वजावर पुन्हा अवतरला. २०१४ साली ध्वजावर सत्यमेव जयते या ब्रीदाचा देवनागरी लिपीत समावेश करण्यात आला. गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात आयएनएस विक्रांत नौदलात सामील झाली. त्या प्रसंगी मोदींनी नौदलाच्या नव्या ध्वजाचे अनावरण केले. ध्वजावरून जॉर्जचा क्रॉस कायमस्वरूपी अस्तंगत झाला आणि त्याजागी अष्टकोनी आकारात भारतीय नौदलाचे प्रतीक समाविष्ट करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ज्या अष्टकोनी आकारात होती त्यावरूनच प्रेरणा घेऊन ध्वजाची रचना करण्यात आली होती. आता त्याच मालिकेतील पुढचे पाऊल पडले असून नौदलाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा असेल असे मोदींनी जाहीर केले आहे. शिवाय नौदलातील हुद्द्यांचे भारतीयीकरण होईल असेही जाहीर केले आहे. शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते. सागरी सुरक्षा आणि सज्जता याचे महत्व शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकातच ओळखले होते आणि त्यांनी आरमार उभारले होते. ‘ज्याचं आरमार त्याचा समुद्र; आरमार हे एक स्वतंत्र्य राज्यांगच आहे’ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सूत्र होते. स्वतंत्र, सामर्थ्यवान आरमार निर्माण झाल्याशिवाय स्वराज्याला पूर्णत्व येणार नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले होते. त्या वेळच्या परकीय सत्तांमध्ये मोघल, सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे होते. यापैकी मोघल सोडले, तर इतर तिघांचा पश्चिम किनाऱ्यावर धाक होता. आणि मराठ्यांच्या व्यापाराला हा मोठा अडथळा होता. त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमारनिर्मितीचा विचार केला आणि तो कृतीत उतरविला. आरमारासाठी बळकट जलदुर्गाची निर्मिती त्यांनी केली. सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी इत्यादी जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेखी आरमाराच्या असणाऱ्या महत्वाची साक्ष देतील. सामर्थ्यशाली आरमार उभारून महाराजांनी स्वराज्याला बळकटी आणली. तेव्हा अशा द्रष्ट्या राजाची प्रेरणा नौदलाला आजच्या काळातही मिळावी या दृष्टीने मोदींनी केलेल्या घोषणांकडे पाहिले पाहिजे; त्यांचे स्वागत केले पाहिजे.

  तथापि कोणत्याही मुद्द्याला राजकीय रंग देण्याची खोड सर्वानाच लागली असल्याने याही विषयाला राजकीय रंग आलाच. वाजपेयी यांच्या काळात नौदलाच्या धवजावरून जॉर्जचा क्रॉस काढून टाकला होता तो २००४ साली ध्वजावर पुन्हा अवतरला. हे कृत्य मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने केले असे आरोप लगेचच व्हायला लागले. मात्र अभ्यासकांनी खोलात जाऊन तारखांचा शोध घेतला तेव्हा तथ्य स्पष्ट झाले. २००४ साली जेव्हा तो क्रॉस पुन्हा ध्वजावर अवतरला तेव्हाही वाजपेयी यांचेच सरकार सत्तेत होते. याचे कारण हा बदल झाला २५ एप्रिल २००४ रोजी आणि मनमोहन सिंग सरकार सत्तेत आले ते २००४ सालच्या २२ मे रोजी. राजकारणात तथ्यांपेक्षा वातावरणनिर्मितीला आलेले अतिरिक्त महत्व पाहता अशा वावड्या वेगाने पसरतात आणि सामान्यजन त्यावर विश्वास ठेवतात हा त्यातील चिंतेचा भाग. नौदलाच्या ध्वजावरून जॉर्जचा क्रॉस हटविण्यासाठी पुढाकार आणि पाठपुरावा हा तत्कालीन नौदल प्रमुखांनी केला होता. त्यानंतर त्या बदललेल्या ध्वजाच्या रंगसंगतीवरून नाराजी पसरली आणि ऍडमिरल माधवेंद्र सिंग नौदलाचे प्रमुख असताना नौदलाच्या ध्वजावर जॉर्जचा क्रॉस परतला. एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत निवृत्त नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांनी व्यक्त केलेले मत दखल घावे असे. त्यांनी म्हटले आहे की, भाजप सरकार सत्तेत असतानाच जॉर्जचा क्रॉस नौदलाच्या ध्वजावर परतला असला तरी हे विषय नौदलाचे अंतर्गत विषय आहेत. सामन्यतः नौदलाच्या अंतर्गत विषयांमध्ये पंतप्रधान हस्तक्षेप करीत नाहीत.’ अरुण प्रकाश यांचे हे मत यासाठी महत्वाचे की गेल्या वर्षी ध्वजाचे केलेले अनावरण, आता गणवेशावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश करण्याची घोषणा किंवा नौदलाच्या हुद्द्यांच्या भारतीयीकरणाची घोषणा हे सगळे मोदींनी पंतप्रधान म्हणून केले. ऑस्ट्रेलियाने आपल्या नौदल ध्वजावरून जॉर्ज क्रॉस १९६८ साली, तर न्यूझीलंडने १९६९ साली हटविला. ही राष्ट्रकुल राष्ट्रे असूनही त्यांनी हे पूर्वीच केले. भारतात ते व्हायला २०२२ साल उजाडायला लागले हे सांगून काँग्रेसवर घणाघात करणे हा या गाजावाजामागील उद्देश लपलेला नाही. भारतीय नौदलाला गौरवशाली परंपरा लाभली आहे आणि तिला भारतीयत्वाचे कोंदण लाभत असेल तर ते स्वागतार्ह आहे; मात्र त्यातून राजकीय श्रेयवादाची लढाई जुंपणे शहाणपणाचेही नाही आणि अभिप्रेतही नाही एवढे भान सर्वानीच ठेवावयास हवे.

  – राहुल गोखले