‘सीईओ फॅक्ट्रीत’ प्रवेशाची संधी

या संस्थेत मास्टर ऑफ मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासोबतच इतरही अभ्यासक्रम चालवले जातात. मास्टर ऑफ मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. मात्र या संस्थेतील (१) एम.एस्सी इन फायनान्स आणि (२) मास्टर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या संस्थेमार्फत स्वत:ची परीक्षा घेतली जाते.

    जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च ही मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी, व्यवस्थापन विषयक शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रमुख संस्थांपैकी एक. हा संस्थेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. या संस्थेत प्रवेश मिळालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना देशातील नामवंत कंपन्या, उद्योग, व्यवसाय बँका यामध्ये सुलभतेने उच्चपदस्थ नोकरी मिळते. या सर्वांना उत्तम पॅकेजसुध्दा मिळते. या संस्थेचा बरेचदा उल्लेख, ‘सीईओ फॅक्टरी (कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निर्माण करणारी संस्था किंवा कारखाना. असे वर्णन करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे या संस्थेतील अनेक पदवीधर देश- विदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये सध्या सीईओ या पदावर कार्यरत आहेत.)’ असा केला जातो.
    या संस्थेत मास्टर ऑफ मॅनेजमेंट या अभ्यासक्रमासोबतच इतरही अभ्यासक्रम चालवले जातात. मास्टर ऑफ मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या सीईटी या परीक्षेतील गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. मात्र या संस्थेतील (१) एम.एस्सी इन फायनान्स आणि (२) मास्टर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या संस्थेमार्फत स्वत:ची परीक्षा घेतली जाते.
    मास्टर्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षाचा असून कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्याला तो करता येतो. या अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२३ आहे. अर्ज ऑनलाईनच करावा लागतो.

    प्रवेश प्रकिया

    या अभ्यासक्रमाला दोन पध्दतीने प्रवेश दिला जातो.
    (१) शासनामार्फत घेणाऱ्या एमबीए/एमएमएस सीईटी परीक्षेत खुल्या संवर्गातील ज्या उमदेवारांना ८५ पर्सेंटाईल आणि राखीव संवर्गातील ज्या उमेदवांराना ७५ पर्सेंटाइल मिळाले त्यांना आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या कॉमन ॲडमिशन टेस्ट (कॅट) ही परीक्षा दिलेल्या ज्या उमदेवारांना ९० पर्सेंटाईल आणि राखीव संवर्गातील ज्या उमेदवांराना ८० पर्सेंटाइल मिळाले त्यांना केवळ मुलाखत द्यावी लागेल.

    (२) या दोन्ही परीक्षा न दिलेल्या उमेदवारांना संस्थेमार्फत घेण्यात येणारी चाळणी परीक्षा द्यावी लागेल. ही परीक्षा १६ सप्टेंबर २०२३ रोजी या संस्थेच्या मुंबई येथील कॅम्पसमध्ये घेतली जाईल.

    चाळणी परीक्षा- वस्तुनिष्ट आणि बहुपर्यायी स्वरुपाची असेल. प्रत्येकी १ गुण असणारे १०० प्रश्न विचारले जातील. चुकलेल्या उत्तराचे ०.२५ टक्के गुण कपात केले जातील.

    व्यक्तिमत्व चाचणीसाठी निवड होण्यासाठी खुल्या संवर्गातील उमेदवारास या परीक्षेत किमान ५० आणि राखीव संवर्गातील उमेदवारास किमान ४५ गुण मिळणे आवश्यक आहे.

    व्यक्तिमत्व चाचणीला १०० गुण आहेत. यामध्ये मुलाखतीला ४० गुण, समुह कृती (ग्रुप ॲक्टिव्हिटी) ला ५० गुण आणि लेखन क्षमता चाचणीला १० गुण अशी वर्गवारी आहे. यामध्ये ३०० शब्दांमध्ये, हा अभ्यासक्रम कां करु इच्छिता? (स्टेटमेंट ऑफ परपोज) या विषयावर निबंध लिहावा लागेल.

    समुह कृतीमध्ये उमेदवारांची इतरांसोबतची वर्तणूक, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, समुहकृतीतील रस, पुढाकार, तार्किक विचारसरणी या घटकांचा समावेश आहे. १० ते १२ उमेदवारांचा समुह करुन त्यांना एखादे कार्य सोपवले जाते.

    अर्हता- खुला संवर्ग (१) १० वी- ६० टक्के किंवा त्याहून अधिक, (२) १२ वी ६० टक्के किंवा त्याहून अधिक, (३) पदवी ५० टक्के किंवा त्याहून अधिक. राखीव संवर्ग (१) १०वी – ५५ टक्के किंवा त्याहून अधिक,(२) १२वी ५५ टक्के किंवा त्याहून अधिक (३) पदवी ४५ टक्के किंवा त्याहून अधिक

    प्लेसमेंट
    हा अभ्यासक्रम करणाऱ्या उमेदवारांना (१) टाटा प्रोजेक्ट, (२) थरमॅक्स, (३) वेदांता, (४) व्ही गार्ड, (५) व्ही आय, (६) विरतुसा, (७) टाटा डिजिटल, (८) सियाराम, (९) सोडेक्स, (१०) टाटा कॅपिटल, (११) मॉर्गन स्टॅन्ले, (१२) महिंद्रा, (१३) महिंद्रा लॉजिस्टिक्स, (१४) लँडमार्क, (१५) मर्सर, (१६) मेन्सा, (१६) मायकेल पेज, (१७) एनव्हेंट, (१८) रेमेंड्स, (१९) प्युमा, (२०) पॉझिटिव्ह मुव्हस, (२१) हिरो, (२२) एचपी, (२३) इन कॉर्प, (२४) इंडेजिन, (२५) जॉन्सन ॲण्ड जॉन्सन, (२६) कोटक लाइफ, (२७) केपीएमजी, (२८) एचडीएफसी इर्गो, (२९) एचसीएल, (३०) जीएसके, (३१) गोदरेज, (३२) एमिरेट्स, (३३) एफसीए, (३४) फ्लेक्झ्‍िालोन, (३५) बजाज फिनसर्व्ह, (३६) इगल बर्गमन, (३७) केपजेमिनी , (३८) क्रेडिट ॲग्रिकोल, (३९) ॲस्टर, अमॅझॉन, (४०) एअर लिक्विड, (४१) ॲग्रोस्टार, (४२) अदानी पॉवर, (४३) अदानी विल्मर, (४४) आदित्य बिर्ला-हिंडाल्को, (४५) अल्ट्राटेक, (४६) ग्रॅसिम, (४७) फॅशन ॲण्ड रिटेल या कंपन्यामंध्ये प्लेसमेंट मिळाले आहे.

    एक नवी संधी
    मास्टर ऑफ मॅनेजमेंट आणि एम.एस्सी फायनान्स या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आता संपलेली आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाला नसेल त्यांना, मास्टर इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाच्या रुपाने या संस्थेत प्रवेश मिळवण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम हा साधारणत: सीईटी किंवा कॅट परीक्षेसारखाच आहे. त्यामुळे या दोन्ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी  झटून सराव केला तर त्यांना या परीक्षेत यश मिळू शकते.

    संपर्क- संचालक जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, डी.एन.हाऊस, १६४ बॅकबे रिक्लेमेशन, एच टी पारेख मार्ग चर्चगेट, मुंबई-४०००२०,संकेतस्थळ- www.jbims.edu

    सुरेश वांदिले