स्वरगंगेचे मंतरलेले दिवस!

मराठी संगीत नाटके म्हणजे एक विलोभनीय नाट्यप्रकार. ज्याला परंपरा, वारसा आहे. एकीकडे संवाद; तर दुसरीकडे गायकीतून रसिकांसाठी सजणारी आनंददायी मैफलच! काळ बदलला पण या रंगवाटेवरली काही दर्जेदार नाटके आजही नव्या पिढीला खूणावताहेत. ‘मंदारमाला' हे साठ वर्षापूर्वी तूफान गाजलेलं नाटक. आज नव्या रंगरुपात प्रगटतय. नाटककार विद्याधर गोखले आणि संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने स्वरगंगेचे मंतरलेले दिवस साकारत आहेत.

  लतादीदींचा सूर हा पिढ्यानपिढ्या उलटल्या तरी कधी थकला नाही किंवा देवानंदचा अभिनय हा कधी त्याच्या वयाआड आला नाही किंवा सुनील गावस्करचे मैदानातलं सलामीवीर हे पद कधीही ढळल नाही. त्याचप्रकारे नाटककार विद्याधर गोखले यांचे ‘संगीत मंदारमाला’ हे नाटक आज वयाच्या ‘साठी’पर्यंत पोहचले असले तरीही त्याने कधी हाती ‘काठी’ घेतलेली नाही. आजही नव्या पिढीतल्या तरुणाईलाही जबरदस्त आकर्षित करण्याचे बळ त्यामागे आहे. आजकाल काही प्रयोगातच नाटकाचा गाशा गुंडाळण्याची वेळ येणारी ‘नाटकं’ बघितली की  ‘मंदारमाला’सारख्या नाटकांबद्दल अभिमान वाटतो.
  आज ‘संगीत मंदारमाला’ नाटकाची आठवण येण्यामागे कारण म्हणजे पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग सुरू होत आहेत. निमित्त आहे ते याचे नाटककार विद्याधर गोखले आणि नाटकात मंदारची भूमिका करणारे पं. राम मराठे या दोघांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. त्यामुळे संगीत नाटकांची संहिता आणि गायक नटाचा अभिनय या दोन्हींचे मंतरतेले दिवस जागे होत आहेत. साठ वर्षापूर्वी म्हणजे २६ मार्च १९६३ या दिवशी या नाटकाचा शुभारंभी प्रयोग झाला. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या भारत नाट्य प्रबोधन संघाने ही निर्मिती केली १०० प्रयोग झाले. नंतर नाट्यमंदारचे राजाराम शिंदे यांनी नाटक हाती घेतले आणि केवळ महाराष्ट्रापुरते प्रयोग न होता ते देशभरात करण्याचा विक्रम केला. दौऱ्यांच्या इतिहासात याची सन्मानाने नोंद होत आहे. त्यानंतर विद्याधर गोखले यांची रंगशारदा, ललितकलादर्श, भरतनाट्य संशोधन मंदिर -अशा अनेक संस्थांनी याची निर्मिती केली. संगीत नाटकाच्या एकूणच प्रवासात जी काही मरगळ आली होती ती याच्या प्रयोगामुळे दूर झाली. नाट्य प्रयोगामुळे संगीत नाटकांचे वैभव जसे कायम राहीले. या नाटकाचा शंभरावा प्रयोग हा राजधानी नवीदिल्लीत २० मार्च १९६६ या दिवशी झाला. अमराठी प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त दाद दिली. आणि सर्वात नोंद घेण्याजोगी घटना म्हणजे या प्रयोगाला तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन आणि यशवंतराव चव्हाण हे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. ‘नाट्यमंदार’ ही नाट्यसंस्था आणि ‘मंदारमाला’ हे नाटक – दोघांच्या नावाबद्दलही अनेक योगायोगाचे, शुभशकूनाचे किस्से हे नाट्यवर्तूळात सांगितले जातात.
  ‘मंदारमाला’ नाटकाच्या प्रारंभीच्या प्रयोगातील कास्टलिट याप्रमाणे- पं‌. राम मराठे (मंदार), पं. प्रसाद सावकार (मदनगोपाळ), पंढरीनाथ बेर्डे (मकरंद), शंकर घाणेकर (भैरव), सुधाताई करमरकर (चंद्रकाला), राजाराम शिंदे (मल्हार), तुकाराम बापू (प्रधान), ज्योत्स्ना मोहिते (रत्नमाला) – सारे दिग्गज कलाकार. साऱ्यांना अभिनय आणि गाणं याचा पक्का अनुभव. रत्नमाला ही भूमिका अनेक गायक अभिनेत्रीने केली‌. त्यात प्रभा अत्रे, मधुवंती दांडेकर, रजनी जोशी, जयमाला शिलेदार याचा समावेश होता.
  काही नाटकांची मुळं ही पिढ्यान् पिढ्यांशी जुळली जातात. याही नाटकाच्या २०२३ वर्षातील निर्मितीत मंदारची भूमिका ही भाग्यवान मराठे, तर मालाची भूमिका प्राजक्ता मराठे करीत आहेत आणि हे दोघे जण संगीतभूषण राम मराठे यांची नातवंडे आहेत. आपल्या आजोबांनी चढविलेला मंदारचा मुखवटा हा भाग्यवान परिधान करतोय. एक हृदय हेलावून सोडणारा हा प्रयोग ! संगीताचा वारसा पुढल्या पिढ्यांपर्यंत पोहचलाय आणि तो समर्थपणे श्रद्धेने पार पडतोय, हे चित्र दुर्मिळच !!
  अवीट गोडीची यातली १५ गाणी म्हणजे एक स्वरसुंदर अशी मैफलच ! ज्या गाण्यांसाठी मैलोन मैल प्रवास करुन दर्दी रसिक हे प्रयोग हाऊसफुल्ल करायचे. जय शंकरा गंगाधरा; सोहम हर डमरु बाजे, जयोस्तूते उषादेवते, हरि मेरो जीवन पान आधार, कोण असशी तू नकळे मजला, आणि सर्वात कळस म्हणजे- बसंत की बहार आयी ! नाट्यगीतांच्या दुनियेतले हे एक पर्वच! जे रसिकांनी डोक्यावर घेतले. जुगलबंदी ऐकण्यासाठी रसिक वेळ, पैसा याचा विचार करायचे नाहीत. पं. राम मराठे, यांच्यासह प्रसाद सावकार, ज्योत्स्ना मोहिते यांनी बहार उडविली आजही नवी पिढी त्या वाटेवरून जाण्याचा ‘प्रयोग’ करतेय. हे महत्वाचे!
  मूळचे नाटक हे तसे सहाएक तासांचे आहे- ‘वन्समोअर’ तर ठरलेलेच ! पण बदलत्या काळात संकलन करुन ते तीन अंकी करण्यात आलय. तरीही चारएक तासांचा कालावधी त्याला लागतोय. गोखले अण्णांची सशक्त संहिता ही जमेची बाजू. आजही अभ्यासकांना, ही भारावून सोडते. विजय गोखले यांचे नव्या नाट्यनिर्मितीत मागदर्शनही आहे. गेले अनेक महिने नाटकाची तालीम सूरु आहे. जन्मशताब्दी पूरते हे नाटक रंगभूमीवर न आणता पूढेही हा संगीत नाटकांचा ठेवा आकाराला यावा, यासाठी पडद्यामागे प्रयत्न हे सुरू आहेत.
  या नाटकाच्या जाहीरातीही त्याकाळी चर्चेत होत्या. कल्पक आणि नावीन्यपूर्ण असल्याने रसिकांना नाट्यगृहापर्यंत आणण्याचे त्यात कौशल्य होते. त्यावेळी पु. वि. गाडगीळ यांची रॅडिकल पब्लिसिटी ही जाहीरात कंपनी होती. त्यांनी भल्यामोठ्या जाहीरातींना सजविले. बहुत दिन नच भेटलो सुंदरीला किंवा प्रिये पहा रात्रीचा समय सरून किंवा अंगे भिजली जलधारांनी!’ या शीर्षकांचा वापर त्यात होता. त्याचा बुकींगवर सकारात्मक परिणाम झाला. काही समीक्षकांनी त्यावेळी ‘मद्रासी चित्रपटाप्रमाणे कथानक’ अशी टिकाही केली होती पण हाऊसफुल्ल प्रयोगांमुळे त्यांना परस्पर चोख प्रत्यूतरही मिळाले!
  पं. राम मराठे यांचा एक किस्सा सांगितला जातो. मित्रांसाठी, रसिकांसाठी कुठेही सज्ज असणारे हे संगीतभूषणच होते. दादर मुक्कामी असलेले श्रीकृष्ण दुग्धालयाचे वारसदार अतुल फणसे यांची लोणावळा येथे मुंज होती. साऱ्यांचेच एकमत आणि आग्रह झाला की पंडित राम मराठे यांची मैफल ठेवायची. त्याखेरीज मुंज परिपूर्ण होणार नाही. ठरले. लोणावळ्यात मैफल रंगली. शेवटी मूंज असणाऱ्या अतुलला रामभाऊंनी विचारले. ‘तुझ्यासाठी काय म्हणू? तत्काळ त्या बालकाने उत्तर दिले ‘जय शंकरा गंगाधरा !’ आणि रामभाऊंनी ताल धरला. आठवर्षाच्या कोवळ्या मुलासाठी गाणं म्हटल. तो काळ म्हणजे ‘मंदारमाला’मय होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हे नाटक गाजलेलं. हे भाग्य या नाटकाच्या नाशिबात साऱ्यांनीच अनुभवले. रागांचा आणि बंदिशांचा प्रचंड खजिनाच त्यांच्याकडे असल्याने अशा शेकडो मैफली रंगल्या.
  ‘मंदारमाला’ नाटकाने राजाराम शिंदे यांना निर्माता बनविले. ४ एप्रिल १९६५ हा दिवस. जो गुढीपाडवा. तिथपासून ‘नाट्यमंदार’चे निर्माते म्हणून ओळख त्यांना मिळाली. त्याच्या अनेक आठवणी आप्पा नेहमी सांगायचे. ‘गुढीपाडव्याच्या दिवशी लोकांनी आपल्या घरांवर रंगीबेरंगी गुढ्या उभारल्या. आणि माझ्याही आयुष्यात भाग्याची गुढी या नाटकाने उभारली. ही यशाची गुढी माझी आहे. हे मला आणि विद्याधर गोखले यांना फक्त माहित होतं.’
  स्वर्गातील गंधर्वालाही हेवा वाटावा, असे हे नाटक आणि त्याची सुरांची रंगलेली मैफलच. जी एक रंगवाट ठरली… ज्यातून अनेकांच्या जीवनात आनंदाच्या गुढ्या या उभारल्या गेल्या. यातील पदाप्रमाणे – बसंत की बहार आयी; तरुवन बन बेलारियां
  फूल रही डालरियां, मोर बोले कोयलियां
  नौ बहार छाई… कलियतेस भ्रमरा खेले
  घुंघटका पट खोले, कली- कली मुसकाई
  रंगरंग सुख पायी!
  – संजय डहाळे