जसा संग तसा रंग

आजकाल मोबाईलची सोबत (कंपनी) अधिक आवडीची झाली आहे. जगात सत्संगाला मोठे महत्त्व आहे.

  स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब शिंपल्यामध्ये पडल्यास ते मोती बनतात, जर ते थेंब पानावर पडले तर दव आणि सापाच्या तोंडात पडले तर त्याचे विष बनते. थेंब पावसाचे आहेत; परंतु जशी सोबत मिळाली तसे रूप बनले. जर एखाद्या परिस दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला तर ते सोने होते आणि जर लोखंडाला पाणी लागले तर गंज पकडतो. आपलं सुद्धा तसेच नाही का? जशी संगत धरू तसे जीवन बनत जाईल. पण मनुष्य जीवन मौल्यवान आहे. त्याचे मूल्य आपण जाणून घ्यावे.

  आधुनिक जगामध्ये विज्ञानाने आपल्याला बरीच संसाधने उपलब्ध करून दिली आहेत, ज्यामुळे जगातल्या काना-कोपऱ्यातल्या बर्‍याच बातम्या आपल्याला मिळतात. ऐकण्याची आणि पाहण्याची आवड असल्यामुळे आज प्रत्येक जण मोबाईल पाहण्यात मग्न आहे. हे एक साधन आहे, त्यात चांगल्या आणि वाईट सर्व गोष्टी मिळतात. काहीजण याचा वापर ज्ञानाचा साठा वाढवण्यासाठी करतात आणि काही वाईट गोष्टी. आपण कोणत्या गोष्टी आपल्याजवळ साठवत आहेत ते नीट पहावे. आजचा तरुण वर्ग चुकीच्या गोष्टी पाहून, आपली मानसिकता कमकुवत करुन आपले मन रोगी बनवत आहे. म्हणून कोणत्या गोष्टींचा संग करावा ह्याची थोडीशी सावधगिरी बाळगावी.

  महाभारतात असे दर्शविले गेले आहे की कर्ण आणि अर्जुन एकाच आईचे (कुंतीचे) पुत्र, दोघेही अव्वल दर्जाचे धनुर्धर. अर्जुनापेक्षा कर्ण अधिक सामर्थ्यवान; पण दोघांची संगत निराळी. अर्जुनाला श्रीकृष्णाची साथ लाभल्यामुळे महाभारताच्या युद्धामध्ये विजय मिळाला. आणि कर्णाची मैत्री दुर्योधनाशी झाली. खरं तर कर्णामध्ये बरीच वैशिष्ट्ये होती, पण दुर्योधनाबरोबर राहून काही वाईट गोष्टीही त्यांनी स्वीकारल्या. दुर्योधनाच्या उपकारामुळे कर्णाला असत्याचा मार्ग निवडावा लागला. तेच दुसऱ्या ठिकाणी अर्जुनाला पाहिले तर त्याची स्वामी भक्ति व निर्मळ मनामुळे भयंकर युद्धातही विजय मिळविला. कर्णाचा दुसरा अर्थ कान आहे. बर्‍याच वेळा आपण फक्त ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. ज्यामुळे खूप गैरसमज ही होतात; परंतु अर्जुनाने केवळ ऐकण्यावरच नाही तर पाहण्यावर विश्वास ठेवला. श्रीकृष्णाने एक महान रूप दाखवल्यावर अर्जुनाची श्रद्धा आणखी वाढली. त्यानंतर त्यांनी श्रीकृष्णाच्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवला. आपण सुद्धा पाहणे आणि ऐकणे यावर विश्वास ठेवावा. चांगल्या गोष्टी ऐकून मनाला त्यावर स्थिर करावे. ज्यामुळे आपल्या कल्पना शक्तिचा विकास तीव्र गतीने होईल.

  आपल्याला कर्म आणि विचारांनी श्रेष्ठ व्हायचे आहे आणि दुसऱ्याना बनवायचे ही आहे. जसे कचरा रस्त्यावर पडला असेल तर आपण त्याला पाहत बसत नाहीत, त्याचप्रमाणे आपल्या जीवनात काही वाईट गोष्टी घडल्या असतील तर आपण त्यातून आवश्यक बाबी लक्षात ठेऊन बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जावे. ‘कमींशी माझे काही काम नाही’. या वाक्यावर दृढ रहावे. या मार्गावर अनेक अडथळे येतील पण मला त्यामुळे कुठेही थांबायचे नाही आणि मागे वळून बघायचे नाही, फक्त पुढे आणि पुढे जायचे आहे.

  आपल्या मनामध्येही आपण बरीच दृश्ये, प्रसंग साठवून ठेवली आहेत पण काय लक्षात ठेवावे किंवा काय विसरून जावे याचे ज्ञान जरूर असावे. कारण माणूस आपल्या आतील जगात जास्त जगतो. म्हणून आपले जग उत्कृष्ट बनवा. सुगंधित फुले ज्याप्रमाणे मनाला आकर्षित करतात, आनंद देतात, त्याच प्रकारे चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा आनंद मिळवावा. आनंदात राहणे किंवा दुःखात जीवन जगणे ही आपली निवड आहे. पांढर्‍या कपड्याला पाण्याच्या कोणत्याही रंगात बुडवले तर त्यावर त्याच प्रकारचा रंग चढतो. आपल्याला कोणता रंग लावून घ्यायचा आहे ते आपणच ठरवावे. कारण ‘जशी संगत तशी रंगत’.

  तसेच अनेक प्रकारची सोबत आपण निवडू शकतो. काही स्वतःला चांगल्या पुस्तकांशी जोडतात, काही गुरूबरोबर, तर काही व्यसनाना सोबती बनवतात. आजकाल मोबाईलची सोबत (कंपनी) अधिक आवडीची झाली आहे. जगात सत्संगाला मोठे महत्त्व आहे. काही लोक गीता, भागवत, रामायण कथा ऐकण्यासाठी त्यांचा वेळ देतात, खरंतर हाच वेळ कुठेही घालवता आला असता; परंतु चांगल्या कंपनीत जाण्यात आणि चांगल्या गोष्टी ऐकण्यात त्यांची रुचि असते. चांगुलपणा माणसाला चांगल्या वाटेकडे नेतो आणि चुकीची आवड चुकीच्या मार्गावर ‘सत का संग तारे कुसंग डुबोए’ अशी एक म्हण आहे.
  जेव्हा आपले मन परमात्म्याच्या आठवणीने भारावून जाते, तेव्हा आपण शांतीचा आणि शक्तीचा अनुभव करतो तसेच या जगापासून अलिप्त होतो. अगदी गर्दीत, अगदी आवाजातही अलौकिक आनंद मिळतो. ईश्वराच्या शक्तींचा स्पर्श जेव्हा बुद्धीला होतो तेव्हा ती दिव्य व तीक्ष्ण होते. अशी बुद्धी वेळेवर अचूक निर्णय घेण्याचे सामर्थ्य ठेवते. ईश्वराचे सान्निध्य मनुष्याला दिव्यगुणानी भरपूर करते. म्हणून ज्याने आपले जीवन श्रेष्ठ व उज्ज्वल बनेल अशी साथ निवडावी व जीवनाचा मार्ग सरळ बनवावा.

  – नीता बेन