भारतातील प्रमुख राममंदिरे…एक परिक्रमा!

प्रभू रामचंद्राची जन्मभूमी असलेली अयोध्या नगरी आज एखाद्या सुंदर नववधुसारखी अपार सौंदर्याने नटली आहे. मंगलपर्व सुरू झालेले आहे. पवित्र शरयू नदीचे सर्व घाट भाविकांना श्रीरामाच्या दर्शनाकरिता खुणावत आहे. आधुनिकता आणि प्राचीनता याचा अनोखा संगम जागोजागी बघायला मिळत आहे. प्रत्येक चौक, रस्ते, लहानमोठे सर्व मार्ग मंगल तोरणांनी, रांगोळ्या आणि दिव्यांनी सजलेले आहेत.

  सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेनंतर बाबरी मशिद पाडल्यावर अनेक प्रकारचे आंदोलन, उपोषण, लाठीमार, गोळीबार, दंगे, कायदेशीर बेकायदेशीर लढाया, वादविवाद या संघर्षाचे काळे पर्व आता संपलेले असून अयोध्या नगरी आता प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहे. समस्त भारतवासीयांच्याच नव्हे तर जगभरातल्या भारतीय समुदायाकरिता हे अभिमानास्पद मंगल पर्व आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ ला बाल स्वरूपातल्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येच्या नवनिर्मित विशाल मंदिरात होत आहे. या निमित्ताने आणि भारताच्या कानाकोपर्‍यात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची पूजा होत असल्याने या नववर्षात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

  भारतातील अयोध्या मंदिर भारतातील एक प्राचीन राम मंदिर आहे. वाल्मिकी रामायण असो की रामचरित मानस असो. पौराणिक काळापासून अशी मान्यता आहे की रघुवंशाच्या आद्य कुळापासून अयोध्या ही रघुवंशीय भूमी असून श्रीरामाचा जन्म याच भूमीत राजा दशरथाच्या महालात झाला. त्यामुळे अयोध्येमधील राम मंदिराला ‘रामजन्मभूमी’ म्हणून अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. उत्तर प्रदेशमधील अयोध्या या प्राचीन शहरातील शरयू नदीच्या काठी हे राममंदीर वसलेले आहे. भारतीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या तीर्थक्षेत्रापैकी एक हे मंदिर आहे. ज्यामुळे आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रामभक्तांची गर्दी असते. आता या मंदिराच्या पुनर्निर्मितीचे आणि नवनिर्मितीचे काम झालेले असून भव्य-दिव्य श्रीराम मंदिराची निर्मिती केलेली आहे. बाल स्वरूपातल्या श्रीरामाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ अतिशय उत्साहात अयोध्येला संपन्न होत आहे ही समस्त भारतीयाकरिता गौरवाची बाब आहे.

  मध्यप्रदेशातल्या ओरछापासून पाचशे किलोमीटरवर असलेल्या आणि अयोध्येचे ओरछासोबतचे सहाशे वर्षापासून फार जवळचे नातेसंबंध आहे. भारतातील हे असे एकमेव मंदिर ‘रामराजा मंदिर’ म्हणून ओळखले जाते. कारण या मंदीरामध्ये श्रीरामाची ‘राजा’ म्हणून पूजा केली जाते व रोज सशस्त्र मानवंदना दिली जाते. हे मंदिर धर्मापासून अलिप्त व मुक्त आहे. हिंदू आणि मुस्लिमांकरिता हे मंदिर वंदनीय आहे. ‘कृष्ण भक्त’ आणि बुंदेलखंड ओरछाचे शासक असलेल्या राजा मधुकरशहा, ‘रामभक्त’ असलेली महाराणी कुंवरीवरी देवी गणेश यांच्या भक्ति स्पर्धेतून ओरछा येथे श्रीरामाची स्थापना झाली. सोळाव्या शतकात रामउपासक असलेली ओरछाची महाराणी कुंवंरीदेवी गणेश हिला श्रीरामाने दिव्य दर्शन दिले. त्यानंतर अयोध्येतून श्रीरामाची मूर्ती आणून ओरछा येथे चतुर्भुज मंदिर बांधले पण येथे श्रीरामाची स्थापना झाली नाही. कारण बालस्वरूपातल्या श्रीरामाने महाराणी कुंवरीदेवी गणेश सोबतच महालात राहण्याचा आग्रह धरला आणि तिचा पदर सोडला नाही. राणीचा महाल म्हणजेच आजचे विख्यात ‘रामराजा मंदिर’ आहे. काहींच्या म्हणण्यानुसार महाराणी कुंवरीवरी देवी गणेश हिच्या मांडीवर प्रभू रामचंद्र बालस्वरूपात प्रकट झालेत. असेही म्हणतात एकवीस दिवसांचे तप करूनच भगवान श्रीराम ओरछा येथे येण्यास तयार झालेत.

  प्रभू रामचंद्र वनवासात असताना आजच्या तेलंगणा राज्यातील गोदावरी नदीतून प्रवास केला होता. हा प्रवास भद्राचलमच्या मार्गामधून झालेला असल्याने आणि श्रीरामाचा पावन पदस्पर्श नदीपार झाल्याने ही पुण्यभूमी झाली. तेलंगणात ‘भगवान सीता रामचंद्र स्वामी’ मंदिराचा उदय झाला. मेरू आणि मेनका यांचा पुत्र असलेल्या ‘भद्रा’ने येथे श्रीरामाची येथे घोर तपस्या केल्याने या भूमीला भद्राचलम म्हणतात. येथून ३५ किलोमीटरवर असलेल्या ‘पर्णशाळा’ येथे राम, लक्ष्मण आणि सीता यांचा काही काळ निवास होता. रामनवमीच्या दिवशी येथे श्रीराम आणि सीतेचा विवाह मोठ्या उत्साहात साजरा केल्या जातो. सतराव्या शतकात भद्राचलमचे संत संगीतकार असलेले कांचरला गोपन्ना यांनी सकारी खजिन्यातून हे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांना गोलकुंडा येथे एका काल कोठारीत सुलतानाने कैद केले. मान्यता अशी आहे की, चमत्कारिकरित्या श्रीरामाने खर्च झालेले सर्व धन गोपन्नाच्या संरक्षणार्थ सुलतानाच्या खजिन्यात जमा केलेले आणि गोपन्नाची कैदेतून सुटका झाली. त्यानंतर गोपन्ना हे ‘रामदास’ आणि तेलगु भाषेत राम स्तुतीचे शेकडो गाणे आणि भजने लिहलीत.

  महाराष्ट्र नागपूरच्या ईशान्येस साठ किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर ‘रामटेक’ नावाचे असेच एक निसर्गसंपन्न आणि विहंगम दृश्याने परिपूर्ण असलेले ठिकाण आहे. येथील उंच गडावर सुंदर ‘गडमंदिर’ आहे. शहराच्या पूर्वेला असलेल्या या उंच डोंगरावर प्रभू रामचंद्राचे सहाशे वर्ष जुने प्राचीन मंदिर आहे. मंदिरच्या अगोदर या स्थळावर प्रभू रामचंद्राची पावले होती आणि अनेक पूर्व पिढ्यांनी त्याचे दर्शन घेतलेले आहे अशी माहिती गावकर्‍यांकडून प्राप्त झाली. वानरांचा सर्वत्र संचार आहे यात सर्व प्रथम लक्ष्मणाचे मंदिर आहे. जितके धार्मिक तितकेच ऐतिहासिक. निसर्गाने या डोंगराला भरभरून वरदान दिलेले असल्याने आणि प्रभू रामचंद्रांचा या डोंगराला परिस स्पर्श झाला असल्याने रोज शेकडो भाविक रामाचे दर्शन घेतात आणि असंख्य पर्यटक रामटेकला भेट देत असतात.

  प्रभू रामचंद्र हे वनवासात असताना या डोंगरावर आलेत आणि येथे जवळच अगस्त्य ऋषिंचा आश्रमात श्रीरामांचा पावसाळया मुळे चार महीने मुकाम होता.येथेच सीतेने आपला पहिलं स्वयंपाक तयार केला होता. आजही येथे ‘सीता की रसोई’मध्ये अन्नदान केले जाते. आपले शरीर श्रीरामाने या एकांत ठिकाणी ‘टेकविले’ आणि त्यांचा डोळा लागला ..! ‘राम’ या ठिकाणी ‘टेकले’ म्हणून या स्थळाला ‘रामटेक’ म्हणतात..! रामाचा डोंगर म्हणजे रामटेक ..! येथेच श्रीरामाने शंबुकाचा वध केलेला होता. त्यामुळे साहजिकच ही प्रभू रामचंद्राची भूमी झाली. याला ‘तपोगिरी’ ‘सिंदूरगिरी’ आणि ‘शेंदराचा डोंगर’ असेही म्हटल्या जाते..! महाकवी कालिदासाची प्रसिद्ध साहित्य कलाकृती ‘मेघदूत’ची निर्मिती येथेच झाली आहे. १८ व्या शतकात नागपूर वसविणार्‍या भोसले राजेंच्या अधिपत्याखाली हा परिसर आला आणि भोसले घराण्याचे कुलदैवत म्हणून येथे प्रभुरामचंद्राच्या मूर्तीची स्थापना करून मंदिर बांधण्यात आले.

  येऊनच प्रभू पुढे नाशिकला गेले आणि अनेक वर्षे पंचवटी येथे निवास केला. पाच भव्य झाडांच्या वृक्षांच्या सावलीत मुकाम केला म्हणून या परिसराला ‘पंचवटी’ संबोधण्यात येथे. श्रीरामाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा आजही पंचवटीत आम्हाला बघायला मिळाल्या. येथील ‘काळाराम’ मंदिर भारतातील प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. संपूर्ण मंदिराचे बांधकाम व काळाराम मंदिराची निर्मिती १७८२ साली सरदार रंगराव ओढेकर यांनी केली. पूर्वी या मंदिराची बांधणी लाकडाची होती. मात्र, काळ्या दगडात हे मंदिर बांधण्यात आले. मंदिरातील श्रीरामाची मूर्तीदेखील काळ्या दगडाची असल्याने या मंदिराला ‘काळाराम मंदिर’ अशी ओळख मिळाली. असं म्हणतात की, ही श्रीरामाची मूर्ती गोदावरीत सापडली आहे.

  युद्धाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील वाली आणि सुग्रीवाची ‘किष्किंधा’ ही प्रमुख भूमी झाली. याच कर्नाटक मधील चिक्कमंगलुरू या कर्नाटकच्या उत्तर भागात थंड हवेच्या ठिकाणी कोदंडारामस्वामी मंदिर हे कल्लिंगच्या काळापासून वसलेलं आहे. काहींच्या मते काकतीय वंशाच्या बाराव्या- तेराव्या शतकात याची निर्मिती झाली. मंदिरावर अप्रतिम आकर्षक शिल्पकृती आहेत. या मंदिरामध्ये धर्नुधारी श्रीराम आणि लक्ष्मणाची मूर्ती आहे. श्रीरामाच्या धनुष्याला ‘कोदंडा’ असं म्हणतात म्हणून या मंदिराचं नाव ‘कोदंडरामस्वामी’ असे आहे. या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात चोल राजांनी केली. असं म्हणतात लंकेवरून परतल्यावर श्रीराम, लक्ष्मण आणि सीता या ठिकाणी थांबले होते.

  प्रभू रामाचा भक्ति संप्रदाय आपल्याला जम्मू काश्मिर मध्ये सुद्धा बघायला मिळतो. १८३२ साली महाराजा गुलाब सिंह रघुनाथ मंदिर यांनी जम्मू काश्मिरमध्ये या मंदिराची निर्मिती केली असून हे भारतातील एक प्रसिद्ध राम मंदिर आहे. रघुनाथ मंदिर ही संपूर्ण जम्मू काश्मिरची एक ओळख मानली जाते. रघुनाथ मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली वास्तुकला आहे. शिवाय या मंदिरातील आतील भिंतींना सोन्याचा मुलामा देण्यात आलेला आहे. या मंदिरात सात ऐतिहासिक धार्मिक स्थळे असल्यामुळे ती पाहण्यासाठी लाखों पर्यंटकांची गर्दी होत असते. या मंदिरातील रामनवमीचा उत्सव पाहण्यासारखा असतो.

  केरळमधील त्रिचुर येथील ‘गुरूवायुर’ कृष्ण मंदिरात दर्शनाचा योग आला. हे मंदिर जसे जगप्रसिद्ध आहे तसेच त्रिचुर जिल्ह्यातले ‘त्रिपायर राम मंदिर’सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे आणि श्रीरामाला समर्पित आहे. मान्यता अशी आहे की, भगवान श्रीकृष्ण रोज श्रीरामाची वैदिक पूजा करतात. कारण ही रामाची मूर्ती म्हणजे भगवान शंकराचा आणि ब्रम्हदेवाचा विग्रह आहे; तसेच, त्यांचा अंश या मूर्तीत सामावलेला आहे. श्रीरामाची ही मूर्ती समुद्राच्या किनार्‍यावर प्राप्त झालेली आहे. अतिशय सुंदर असे हे ठिकाण आहे. अशी ही देशातल्या प्रमुख राम मंदिरांची परिक्रमा.

  – श्रीकांत पवनीकर