पुरस्कार निमित्तमात्र!

आजच्या 'हायटेक स्पोर्ट्स ट्रेनिंग' युगामध्ये हे ऐकायलाच कसं तरी वाटतं. गुरुकुल पद्धत किंवा घरकुल पद्धत आहे तरी काय? प्रवीण सावंत म्हणत होते, ही गुरुकुल पद्धत प्राचिन काळापासूनच, पूर्वापार चालत असलेली पद्धत आहे. रामायण, महाभारतातदेखील युद्धकलेपासून अन्य कला शिकविण्यासाठी गुरूसोबत, घरापासून दूर गुरूकुलात राहण्याची पद्धत होती. तीच पद्धत दृष्टी आर्चरी अॅकॅडमी राबवते.

  देशातील सर्वोत्तम व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान होतो; तो एक आगळावेगळा सोहळा असतो. क्रीडाक्षेत्रातील सर्वोत्तम खेळाडू आणि प्रशिक्षकांचा देखील गौरव करण्याची आपल्या देशाची उज्ज्वल परंपरा आहे. द्रोणाचार्य, अर्जुन, खेल रत्न, मेजर ध्यानचंद पुरस्कारांनी जेव्हा मान्यवर खेळाडूंना गौरविले जाते, तो एक अविस्मरणीय क्षण असतो. त्या एका व्यक्तीच्या, खेळाडूच्या गौरवगाथेसाठी अनेकांनी प्रयत्न केलेले असतात. घरच्यांपासून प्रशिक्षक, फिझिओ, ट्रेनर, प्रशासकीय यंत्रणेतील माणसांचे हातभार त्या यशापाठी असतात. जेव्हा क्रिकेटपटू व्यतिरिक्त खेळाडूंचा गौरव अशा सर्वोत्तम क्रीडापुरस्कारांनी होतो; त्यावेळी अन्य खेळाडूंसाठीही आशेचा किरण दिसायला लागतो. आपल्या पाठीही देश, सरकार, खेळातील अधिकारी आणि घरचे उभे आहेत, हा विश्वास दृढ व्हायला लागतो.
  हाच विश्वास अधिक घट्‌ट होतो जेव्हा, वॉर्डबॉय ते पोलिस कॉन्स्टेबल असा प्रवास करणारा प्रवीण सावंत, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील मुलांना हुडकून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तिरंदाज घडवून आपले, स्वत:चे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करतो. ओजस देवतळे आणि अदिती स्वामी यांनी हॅंगशू येथील एशियाडमध्ये भारताला पाच पदके मिळवून दिली. त्यातील चार सुवर्णपदके होती. ओजसने वैयक्तिक, मिक्स टिम आणि पुरुषांच्या सांघिकमध्ये सुवर्णपदके पटकाविली. आदितीने महिलांच्या सांघिकचे सुवर्ण आणि वैयक्तिक प्रकारात कांस्य पदक पटकाविले. असे २०-२२ ओजस आणि आदिती सध्या दृष्टी आर्चरी अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. जेथे प्रवीण सावंत प्रशिक्षक आहेत. प्रवीण सावंत यांच्या ओजस आणि आदिती या दोन शिष्यांच्या नावाची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

  हा प्रवीण सावंत मोठा हिकमती माणूस. बिजींग ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांचे झालेले पतन पाहून अस्वस्थ झाला. अवघा एकच भारतीय स्पर्धक तिरंदाजी स्पर्धेत उतरला होता. प्रवीण सावंत यांना आश्चर्य वाटले. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा भारत देशातून फक्त एकच स्पर्धक ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतो? हे शल्य त्यांच्या जिव्हारी लागले. तिरंदाजी होण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. मात्र घरच्या गरिबीमुळे त्याला हा महागडा खेळ काही खेळता येत नव्हता. वाईच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याने वॉर्डबॉयची नोकरी पत्करली. पगार महिना १५०० रुपये फक्त. वॉर्डबॉयचे कामही सोपे नव्हते. १२ तासाची नाईट शिफ्ट करून, प्रवीण ४५ किलोमीटर्स दूरवर असलेल्या साताऱ्याच्या एका आर्चरी अॅकॅडमीमध्ये बसने दररोज जायचा. बांबूपासून बनविलेल्या धनुष्याने सराव करायचा. झोपेची पुरती वाट लागलेली होती.

  दरम्यान भारतात तिरंदाजीला चांगले दिवस यायला लागले होते. २०११ साली प्रवीणला पोलिसात नोकरी लागली. तेथेही प्रवीणचे दिवसा तिरंदाजी प्रशिक्षण आणि रात्री सातारा पोलीस हेडक्वार्ट्समध्ये गार्डची नोकरी. प्रवीणने पगाराच्या पैशातून सेकंडहॅन्ड धनुष्य घेतले. स्वत: शिकता शिकता तो इतरांनाही मार्गदर्शन करायला लागला. त्याच भूमिकेतून तो कधी प्रशिक्षक बनला ते त्यालाही कळले नाही. २०१७ साली प्रवीणने दृष्टी आर्चरी अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षक म्हणून नोकरी पत्करली.

  तो क्षण भारतीय किंवा महाराष्ट्राच्या तिरंदाजीला कलाटणी देणारा ठरला. कारण दृष्टी आर्चरी अॅकॅडमीची तिरंदाजी शिकविण्याची पद्धत आगळी वेगळी, अगदी जगावेगळी होती. गुरुकुल किंवा घरकुल पद्धतीने ही अॅकॅडमी काम करते.
  आजच्या ‘हायटेक स्पोर्ट्स ट्रेनिंग’ युगामध्ये हे ऐकायलाच कसं तरी वाटतं. गुरुकुल पद्धत किंवा घरकुल पद्धत आहे तरी काय? प्रवीण सावंत म्हणत होते, ही गुरुकुल पद्धत प्राचिन काळापासूनच, पूर्वापार चालत असलेली पद्धत आहे. रामायण, महाभारतातदेखील युद्धकलेपासून अन्य कला शिकविण्यासाठी गुरूसोबत, घरापासून दूर गुरूकुलात राहण्याची पद्धत होती. तीच पद्धत दृष्टी आर्चरी अॅकॅडमी राबवते.

  खरं तर तिरंदाजी हा प्रकारच मूळात प्राचिन काळात अधिक प्रचलित आणि वापरात असलेला प्रकार. युद्धांमध्ये धनुर्धारी योद्ध्याची पतच मोठी असायची. आम्ही काही वेगळे करीत नाही; आपली प्राचिन कला, निसर्गाच्या सान्निध्यात घरापासून अंतर ठेवून शिकतो एवढेच.
  प्रवीण सावंत म्हणत होते, मैदान हेच या मुलांचे घर आहे. त्यांच्याकडे मोबाईलदेखील दिला जात नाही. चार भिंतींच्या आत शिकण्याची तिरंदाजी ही कला किंवा खेळ नाही. आम्ही प्रशिक्षकदेखील त्यांच्यासोबत रहातो. त्यांच्यासोबतच जेवतो. खुल्या वातावरणात, तणावरहीत अशी प्रशिक्षण पद्धती आहे. आम्ही मुलांना फार काही आधुनिक देऊ शकत नाही. मात्र त्यांच्यात जिंकण्याची प्रचंड जिद्द निर्माण करू शकतो. प्रत्येकाला भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पाहण्याचे सुचवू शकतो. कधी कधी मध्यरात्री किंवा पहाटेच मुलांना उठवितो आणि बाहेर आकाशाखाली आणतो. त्यांना खुल्या डोळ्यांनी भारतासाठी स्वप्न पाहण्यास सांगतो.

  सुखसोयींशिवाय जर तुम्ही स्वप्न सत्यात उतरविण्याची जिद्द बाळगली तरच यशस्वी होऊ शकता. अर्जुनाप्रमाणे एकच लक्ष्य नजरेसमोर असले पाहिजे. बाकी साऱ्या गोष्टी गौण असतात. वेळेप्रसंगी आमचे तिरंदाज आणि आम्ही प्रशिक्षक बकऱ्यांच्या खुराड्यामध्येही राहिलो आहोत. सांगण्याचा हेतू हा की लक्ष्य फक्त भारतासाठी पदके आणण्याचे असताना दररोजचे राहणीमान, फारसे निर्णायक ठरत नाही. धनुष्य-बाण आणि समोर १० पैकी १० गुण मिळविण्याचे एकच लक्ष्य असते. अन्य लोभ, प्रलोभने, अमिषे यांपासून चार हात लांब राहीलो तर लक्ष्याच्या जवळ जाणे सोपे असते. ही आमची गुरुकूल पद्धत.

  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, मौलाना अब्दुल आझाद ट्रॉफी, ध्यानचंद पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आदींसाठी शिफारस करण्यात आलेल्या भारताच्या अनेक दर्जेदार खेळाडूंचे गुरू जवळपास असेच आहेत. काही गुरुंनी प्रशिक्षण पद्धतीला आधुनिक यंत्रणेची जोड दिली आहे. काहींनी आधुनिक क्रीडा साहित्याची तर काहींनी अधिकाधिक स्पर्धांमधील सहभागाची. मात्र कुणापुढेही हात न पसरता स्वत:चे भारतासाठी पदके मिळविण्याचे स्वप्न जगणारा प्रवीण सावंत यांच्यासारखा प्रशिक्षक आगळावेगळाच. तिरंदाजी हा आदिवासी भागातला, आदिवासींच्या रोमारोमात भिनलेला खेळ आहे. त्या खेळाची जोपासना देखील तशाच मोकळ्या वातावरणातच व्हायला हवी. आज देशात चार भिंतीतही तिरंदाजी प्रशिक्षण दिले जाते. मात्र जंगलात, डोंगरदऱ्यात आणि खुल्या आकाशाखाली या खेळाचे प्रशिक्षण दिले तर काय होऊ शकते ही एक नवी ‘दृष्टी’ प्रवीण सावंत यांच्या आर्चरी अॅकॅडमीने आपल्याला दिली आहे.

  – विनायक दळवी