
मी माझ्या जीवनामध्ये या गोष्टींचा अनुभव खूप वेळा केला. जसे म्हणतात ना चांगल्या कामांमध्ये विघ्न हे पडतातच तसेच या लिखाणाच्या कार्यामध्येसुद्धा अनेकानेक विरोधांना तोंड द्यावे लागले, सहन करावे लागले पण त्या विरोधामुळे माझ्यासाठी नवे मार्ग उघडले.
मनुष्याचे जीवन म्हणजे परिस्थितीची मालिका. एक परिस्थितीतून सुटकेचा श्वास घेतो न घेतो तोच एक नवीन परिस्थिती. कधी-कधी आपण सतत येणाऱ्या समस्यामुळे वैतागून जातो, हताश होतो. पण कधीतरी थोडंसं थांबून या जीवनाच्या प्रवासाला निरखून बघा. जेव्हा जेव्हा एखादी घटना आपल्या समोर आली, तेव्हा तेव्हा नुकसानापेक्षा फायदाच झालेला दिसून येईल. हा, काही गोष्टी अटळ आहेत, त्यांचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. पण अशाही वेळी आपल्या जीवनाला एक वेगळे वळण आले असेल. जे कधीही केले नव्हते ते करण्याची ताकद त्या घटनेमुळे आपल्यामध्ये आली असेल. असे अनेक फायदे झाले असतील. त्या सर्वाना बघण्याचा प्रयत्न करा. कारण प्रत्येक घटने पाठीमागे काही कारण आहे. ते होणारच होते पण त्यामुळे दुबळे न होता सबळ करण्यासाठीच त्या परिस्थिती ची रचना झाली होती असे समजावे.
आपण बघितले असेल की ज्यांना काही कारणास्तव अंधत्व आले त्यांच्या कडे स्पर्शाचे ज्ञान साधारण मनुष्यापेक्षा जास्त असते. कारण दिसत नसल्याने त्यांनी स्पर्शाचे ज्ञान जास्त वापरुन ती कला आत्मसात केली. अर्थात जीवनामध्ये काही कमी असल्यामुळे काही प्राप्त करण्याची इच्छा जागृत होते. सर्व गोष्टी सहज मिळाल्या तर काही करण्याची जिद्द समाप्त होते. म्हणून आयुष्यातल्या चढ-उतराला बघताना नकारात्मक होण्यापेक्षा त्या समस्येमुळे माझ्या आयुष्यात काय चांगले घडले हे बघण्याचा दृष्टिकोण ठेवावा.
मी माझ्या जीवनामध्ये या गोष्टींचा अनुभव खूप वेळा केला. जसे म्हणतात ना चांगल्या कामांमध्ये विघ्न हे पडतातच तसेच या लिखाणाच्या कार्यामध्येसुद्धा अनेकानेक विरोधांना तोंड द्यावे लागले, सहन करावे लागले पण त्या विरोधामुळे माझ्यासाठी नवे मार्ग उघडले. ज्याची योजना मी कधी स्वप्नातही केली नव्हती असे कार्य करण्याचे रस्ते मिळाले. लिखाण कले व्यतिरिक्त कलांचा वापर करण्याचा संधी मिळाली. पण हे ही समजले की जेव्हा आपण त्या वाईट काळातून जातो तेव्हा फक्त आपण भूतकाळ आणि वर्तमानाचा विचार करतो, भविष्यात तयार होत असलेले अप्रतिम दृश्य बघण्याची शक्ति त्यावेळी आपल्यामध्ये नसते. ईश्वराने आपल्यासाठी एक वेगळीच योजना करून ठेवली आहे हे संकल्पामध्ये सुद्धा नसते. कालांतराने ते अविस्मरणीय प्रसंग आपल्यासमोर साक्षात घडताना दिसतात तेव्हा त्याचे गुपित आपल्याला समजते. आणि त्यावेळी आपले सौभाग्य आणि ईश्वरीय योजनांची वाह वाह केल्याशिवाय राहवंत नाही. जीवन धन्य धन्य होऊन जाते.
परिस्थिती मग ती कोणत्याही प्रकारची असू दे. स्वास्थ्य, संबंध, समाज,.. प्रत्येक घटना आपल्याला काहीतरी देऊन जाते, फक्त ते बघण्याची दृष्टी आपल्याकडे हवी. जसे हंस आणि बगळा दोघही दिसायला शुभ्र रंगाचे असले तरी त्यांमध्ये किती अंतर आहे. हंस क्षीर आणि नीर या दोघांना वेगळे करू शकतो. मोती आणि दगड ह्यातले मोती निवडू शकतो. परंतु, बगळा पाण्यातले मासे पकडतो. अर्थात हंस वाईटामधून चांगले तर बगळा चांगल्यामधून वाईट निवडतो. आपणसुद्धा हंस बुद्धी घेऊन वाईट दृश्यामधून माझ्या साठी चांगले काय आहे ते बघावे. जितकी ही सवय आपण आत्मसात करू जीवनाचा आनंद आपण घेऊ शकू. पण जर चांगल्या ही वाईट काय आहे हे बघण्याची सवय असेल तर जीवनभर दुःखाचा डोंगर माथ्यावर घेऊन चालत राहू. चांगल्याचा शोध घेणारा व्यक्ति कठीण परिस्थिती मध्ये ही हसताना दिसून येईल. आणि वाईटाचा शोध घेणारा नेहमीच रडताना दिसून येईल.
आता, आपल्यालाच ठरवायचे आहे की मला या छोट्याशा आयुष्यात सुखी, आनंदी राहायचे आहे की दुःखी, उदास? कारण जशी दृष्टी तशी सृष्टि आपणच निर्माण करत असतो. जसे ज्या रंगाचा चश्मा घालू त्या रंगाचे जग आपल्याला दिसते, तशीच दृश्य बघायला मिळतात. तसेच ज्या पद्धतीच विचारसरणी असेल त्या प्रकारचे मनुष्याचे रूप दिसून येते. महाभारतमध्ये एक दृश्य दाखवले जाते की द्रोणाचार्य युधिष्ठिर आणि दुर्योधनला सांगतात की या जगामध्ये सर्वात चांगला मनुष्य कोण आहे त्याला शोधून काढा. दुर्योधन सर्व जग शोधून येतो पण त्याला कोणी सापडत नाही. गुरु द्रोणाचार्य यांना तो सांगतो की या पृथ्वी तळावर सर्वामध्ये काहीतरी अवगुण आहेत, सर्वच वाईट आहेत. मला कोणीही चांगला व्यक्ति सापडला नाही. दुसरीकडे युधिष्ठिर सर्व पृथ्वीतलावर फिरून येतो व सांगतो की इथे तर सर्वच चांगले आहेत, सर्वांमध्ये काहीतरी विशेष आहे. कोणी एक विशेष नाही; पण सर्वच आहेत. इथे कोणीही वाईट नाही. अर्थात जसे आपण तसे विश्व आपल्याला दिसते. म्हणून जर सृष्टि सुंदर बनवायची असेल तर दृष्टिकोण सकारात्मक बनवण्याची आवश्यकता आहे.
– नीता बेन