‘रामायण’ मालिकेच्या आठवणीत रमले प्रेम सागर

चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शनचा छोटा पडदा यांचा सामाजिक, सांस्कृतिक परिणाम हा काही वेळा अनेक वर्ष झाली तरी चर्चेत असतो. सागर आर्ट्सच्या रामानंद सागर निर्मित व दिग्दर्शित 'रामायण' या पौराणिक मालिकेबाबतही हेच घडले.

  रविवार, २५ जानेवारी १९८७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता ही मालिका राष्ट्रीय दूरदर्शनवर प्रक्षेपित झाली आणि जणू एक नवीन इतिहास घडला. त्यानंतर एकूण ७८ रविवार याच वेळेस ही मालिका प्रक्षेपित होत असतानाच देशभरात सगळीकडे एक प्रकारची संचारबंदी अर्थात कर्फ्यू लागल्याचे वातावरण असे. समाजातील सर्व स्तरातील रसिक दूरदर्शनवर ‘रामायण’ मालिका पाहण्यात मग्न असत. आजही या मालिका आणि तिच्या लोकप्रियतेबद्दल भरभरुन लिहिले, बोलले, ऐकले जाते. कोरोनाच्या काळातही ही मालिका आवर्जून प्रक्षेपित केली गेली. याच यशावर आणि एकूणच या मालिकेची निर्मिती यावर रामानंद सागर यांचे सुपुत्र आणि दिग्दर्शक व छायाचित्रणकार प्रेम सागर यांनी अनेक गोष्टींवर फोकस टाकला आहे.

  प्रेम सागर या मुलाखतीत सांगतात, माझे वडील रामानंद सागर यांची अतिशय प्रामाणिक भावना होती की, आपण अथवा सागर आर्ट्सने या मालिकेची जाणीवपूर्वक निर्मिती केली असे नव्हे तर एक प्रकारे देवाचीच इच्छा होती की माझ्याकडून ही गोष्ट घडावी, ते घडले. मी एक प्रकारचे पोस्टमनचे काम केले आणि त्यात यश प्राप्त झाले इतकेच. शहरातील एकादा युवक गावाकडच्या आपल्या आईला मनिऑर्डर पाठवतो, ती गावातील पोस्टमन त्या स्रीपर्यंत पोहचवतो. तेव्हा ती स्री त्याच्या हातावर साखर अथवा अन्य काही गोड पदार्थ ठेवते. खरं तर पोस्टमनने आपले फक्त कर्तव्य बजावतो त्याचं त्याला चांगले फळ मिळते इतकेच. तेच आपण केले आणि लोकप्रियता मिळाली असे माझे पापा म्हणत, असे प्रेम सागर या मुलाखतीत म्हणाले.

  ते पुढे म्हणाले, एका बाजूस योगायोगानेच अशा काही गोष्टी घडत की पापाना वाटे की आपण कधी तरी रामायण संदर्भात काही निर्माण करु आणि दुसरीकडे त्यांना उत्तम दूरदृष्टी होती, व्हीजन होते असेही दिसते. पापाजी अगदी लहान होते तेव्हा आजारी असतानाच एका तांत्रिकाने त्यांना सांगितले, मोठेपणी तू ‘रामायण ‘ बनवशील. तेव्हापासून पापा डायरी लिहू लागले. मोठे झाल्यावर पत्रकार झाले. पापा सर्वसमावेशक विचार करत. जातीधर्म मानत नसत.जग एक परिवार आहे असं त्यांचे म्हणणं असे. मग लेखक म्हणून चित्रपटसृष्टीत आले. ‘तुम्ही रामायण बनवणार ‘ असे अधूनमधून कोणी काही म्हणायचा आणि रामायण बनवणार अशी सदिच्छा व्यक्त करे. योगायोगानेच ते पुढे घडले. व्हीजनच्या बाबतीत सांगायचे तर रामानंद सागरजी धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान इत्यादींच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘चरस’चे युरोपमधील विविध देशांत चित्रीकरण करीत असताना स्वित्झर्लंडवरुन फ्रान्स येथे गेलो असता एका हाॅटेलमध्ये बसलो असता एका विदेशी नागरिकाने आपल्याकडील बॅगेतून एक मोठी वस्तू काढली. आम्ही पाहिलं तर तो रंगीत टी. व्ही. होता. आम्हाला विलक्षण आश्चर्य वाटले. आपल्या देशात तेव्हा कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट टी. व्ही. होता आणि आणखीन सहा वर्षांनी आपल्या देशात रंगीत टी. व्ही. आला. पण रंगीत दूरदर्शन पाहून पापानी आम्हास सांगितले की, मी या छोट्या पडद्याकडे वळतोय. घुंघट, आरजू, ऑखे, गीत, ललकार विशेष उल्लेखनीय चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन केलेले ‘मुव्हीज मुघल’ मोठ्या पडद्याकडून छोट्या पडद्याकडे वळणार? यांना अचानक काय झालं असाच आमचा प्रश्न होता. पण रामानंदजींकडे दूरदृष्टी होती. भविष्यात रंगीत दूरदर्शन येणार, नवीन तंत्रज्ञान येणार, तेच नवीन काळाचे देणे आहे हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांचे म्हणणे होते, राम, कृष्ण आणि दुर्गा यांच्यावर मी आदर्श ठरतील अशा मालिका निर्माण करणार.आता नवीन माध्यमात पाऊल टाकायचे तर पैसा हवा. खर्च खूपच मोठा आहे. पापांचा जगभरातील अनेक देशात मित्रपरिवार होता, आवर्जून मदतीचा हात पुढे करणारे अनेक जण होते. मी इंग्लंड, अमेरिका वगैरे अनेक देशात गेलो, अनेक जण माझ्या पापांना वेड्यात काढत. राज कपूर दिग्दर्शित ‘बरसात ‘च्या लेखनापासून चित्रपट क्षेत्रात असलेल्या आणि दिग्दर्शनातही चांगला ठसा उमटवलेल्या रामानंद सागर यांना झालयं काय? सटीया गये है क्या? असा प्रश्न विचारत. पण पापाजी ठाम होते, आपण एकिकडे चित्रपट निर्मिती करायची आणि त्याच वेळेस त्या बरोबरीने मालिकाही निर्माण करायची. पण तेवढी आर्थिक ताकद हवी. म्हणून मग काटकसर करीत मालिका निर्माण करण्याचा निर्णय आम्ही घेतला. ते वर्ष होते, १९८३. पापांच्या डोक्यात ‘रामायण’ मालिका निर्मिती अगदी पक्क होते. मग त्यालाच काही साम्य असेल काही आणि सनातन धर्माची सेवा करता येईल असे काही करावे काय यावर विचार करत असतानाच ‘बेताल पचीशी’वरुन ‘विक्रम और बेताल’ ही मालिका निर्माण करण्याचे पाऊल टाकले. पैसे वाचवण्यासाठी सगळे चित्रीकरण सागर व्हीलामध्ये केले. मी कॅमेरामन असल्याने अनेक ट्रीक अशा केल्या की त्यातील सेटची चलाखी लक्षात येऊ नये. गंमत म्हणजे, आम्ही काय भारी काम केलेय असा चक्क सकारात्मक प्रतिसाद मिळत होता. त्यात उत्तम यश प्राप्त केल्यावर ‘रामायण’ मालिकेच्या निर्मितीत पाऊल टाकले.

  हा अनुभव कसा होता? कलाकारांची निवड वगैरे?
  यावर प्रेम सागर यांनी अतिशय रंजक माहिती दिली. ते म्हणाले, विक्रम और बेताल या मालिकेतील विक्रम आदित्य साकारणाऱ्या अरुण गोविलला राम केले, राजकुमारी दीपिका चिखलिया हिला सीता केले. अशा पध्दतीने विक्रम और बेतालचे जवळपास पंचाण्णव टक्के कलाकार घेऊन ‘रामायण’ मालिकेचे शूटिंग सुरु केले. तेव्हा या गोष्टीवर भरपूर मेहनत घेऊन त्याला न्याय द्यायचा, जनसामान्यांपर्यंत ‘रामाची महती’ न्यायची हा फोकस स्पष्ट होता. पण संपूर्ण देशात इतकेच नव्हे तर अगदी विदेशातही या मालिकेने अक्षरश: अफाट लोकप्रियता संपादली. पण पहिला भाग प्रक्षेपित होईपर्यंत प्रचंड धाकधूक होती. काहीच समजत नव्हते. आमच्या सागर व्हिला बंगल्यावर आम्ही सगळे सागर कुटुंबिय आणि सागर आर्ट्सचे युनिट असे जवळपास तीस जण पहिला भाग पाह्यला बसलो. त्या काळात अधेमध्ये जाहिरात नसे. पहिला भाग संपला, आम्ही सगळेच शांत होतो आणि काही वेळातच आम्ही सगळेच इतके आणि असे आनंदलो की आमच्या लक्षात आले की, पौराणिक मालिकांचे नवीन पर्व सुरु होत आहे; आणि असेच झाले. सामाजिक, सांस्कृतिक, माध्यम क्षेत्रात यामुळे मोठीच उलाढाल झाली आणि राजकारणातही ती झाली; त्याचेच फलित म्हणजे आता अयोध्येत राम मंदिर प्रतिष्ठापना. ‘रामायण’ मालिकेने सुरु झालेला प्रवास येथपर्यंत आला आहे, प्रेम सागर विलक्षण अभिमानाने म्हणाले.

  – दिलीप ठाकूर