हटके डिझाइन… हटके करिअर

विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश मिळाल्यास चार वर्षानंतर म्हणजे या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. या संस्थेत देशातील नामवंत कंपन्या प्लेसमेंटसाठी जातात.

  डिझायनिंग या विषयातील विविध शाखांचे शिक्षण – प्रशिक्षण देणारी महत्वाची संस्था म्हणजे सिम्बॉसीस युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत कार्यरत असणारी सिम्बॉसीस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन. या क्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या आणि तसा कल, आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश मिळाल्यास चार वर्षानंतर म्हणजे या अभ्यासक्रमाच्या पूर्ततेनंतर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या उत्तमोत्तम संधी मिळू शकतात. या संस्थेत देशातील नामवंत कंपन्या प्लेसमेंटसाठी जातात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार त्याला उत्तम पॅकेजही मिळते
  प्रवेश प्रकिया

  (१)अर्हता-
  या संस्थेतील डिझाइन अभ्यासक्रमांना कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण किंवा यंदा म्हणजेच २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षात १२ वीला बसणारे विद्यार्थी प्रवेश मिळवू शकतात. खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ५० टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. १०+३ अशा कालावधीचा पदविका अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीसुध्दा या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवू शकतात.

  (२) चाळणी परीक्षा- या सर्वांना संस्थेमार्फत घेणारी चाळणी परीक्षा (सिम्बॉयसीस एन्ट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाइन) द्यावी लागते. (या परिक्षेत विशिष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो. इतर कोणत्याही मार्गाने प्रवेश दिला जात नाही. हे गुण फक्त एकाच वर्षासाठी ग्राह्य धरले जातात.) अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ डिसेंबर २०२३.

  (३) पोर्टफोलिओ- यंदाच्या वर्षापासून परीक्षेच्या गुणांसोबतच पोर्टफोलिओचा विचार केला जाणार आहे. याचा अर्थ- प्रत्येक विद्यार्थ्याने डिजिटली त्याची सर्जनशील कामगिरी सादर करावी लागेल. यामध्ये रेखाचित्र, बहुवीध माध्यमांमधील चित्रे, डिजिटल चित्रे, विविध साहित्याचे कलात्मक कोलाज (एकत्रीकरण) टुडी आणि थ्रीडी वस्तू, छायाचित्रे, शिल्प, धाग्यांपासून बनवेलल्या कलाकृती, कलेपासून प्रेरणा घेतलेल्या वस्तू, उपकरणे आदींचा समावेश करता येतो. हे सगळं १५ स्लाईडव्दारे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सादर करावे लागेल. हे साहित्य ५ एमबीच्या पीडीएफमध्ये रुपांतरीत करावयाचे आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे सर्वोत्कृष्ट कलाकार्य किंवा कलाकुसर सादर करावी लागेल. हे सर्जनशील कार्य नेहमीपेक्षा वेगळे अपेक्षित राहील.

  या चाळणी परीक्षेत विद्यार्थ्यांची सर्जनशील कल, कौशल्य आणि अभिकल्प शिक्षणाची आवड आणि कोणत्याही प्रकारची अभिकल्प निर्मिती करावयाची असल्यास त्यासाठी आवश्यक अनुकूलक्षमता (ॲडाप्टॅबिलिटी) लक्षात घेतली जाते.

  (४) परीक्षा कालावधी-चाळणी परीक्षेचा कालावधी साठ मिनिटे. यामध्ये ६० प्रश्नांचा समावेश असतो. हे प्रश्न अभिकल्प, पर्यावरण, हस्तकला आणि संस्कृती, कला, गणित आणि विज्ञानाचे मूलभूत तार्किक ज्ञान, समस्यांची सोडवणूक, दृष्यात्मक संवेदनशीलता आणि निर्णयक्षमता, निरीक्षण-आकलन-युक्तिवाद क्षमता या विषय घटकांवर विचारले जातात. हे प्रश्न रिकाम्या जागा भरा, प्रतिमा स्वरुपात, आणि उताऱ्यावर आधारीत असतील. ही ऑनलाइन परीक्षा १४ जानेवारी २०२४ रोजी घेतली जाईल. गुणवत्ता यादितील क्रंमांकानुसार निवड केली जाते. स्पेशलायझेशन या संस्थेत पुढील स्पेशलायझेशनची संधी उपलब्ध आहे-

  शाखा आणि स्पेशलयाझेशन
  (अ) कम्युनिकेशन डिझाइन-
  (१) ग्रॅफिक डिझाइन- विद्यार्थ्यांना ग्रॅफिक डिझायनर, बँडिंग, ॲडव्हर्टायजिंग, कार्पोरेट डिझाइन, एडिटोरिअल डिझाइन, वेब डिझाइन, डिजिटल कंटेट, पॅकेजिंग ॲण्ड लोगो डिझाइन ॲण्ड डिजिटल मीडिआ फार्म्याटमध्ये करिअर संधी मिळू शकते. (२) व्हिडिओ फिल्म डिझाइन- फिल्मिंग इक्विपमेंट्स, डिझाइन सेट्स, आयडेंटिफाय लोकेशन, ग्रॅफिक्स, प्रॉप्स, लायटिंग, कॅमेरा अँगल्स, कॉस्चुम, या क्षेत्रात संधी मिळू शकते, (३) ॲनिमेशन फिल्म डिझाइन – शॅार्ट फिल्म, ॲनिमेटेड ग्रॅफिक्स, मोशन ग्रॅफिक्स, स्पेशल इफेक्ट्स, व्हिडिओ गेम, कार्टून्स, स्टंट्स, सेट डिझाइन, दृष्याव्दारे स्टोरीटेलिंग, प्री आणि पोस्ट प्रॉडक्शन, डिझाइन या क्षेत्रात संधी मिळू शकते. (४) युझर एक्झपिरिअन्स डिझाइन

  (ब) इंडस्ट्रिअल डिझाइन- (१) प्रॉडक्ट डिझाइन, (२) इंटरेरिअर स्पेस डिझाइन, (३) फॅशन डिझाइन- हा अभ्यासक्रम केल्यावर फॅशन डिझायनर, पॅटर्न मेकर, गार्मेंट मॅन्युफॅक्चर, फॅशन मर्कंडायझर, क्रॅफ्ट मेकर आदी संधी मिळू शकतात.
  (४) फॅशन कम्युनिकेशन – हा अभ्यासक्रम केल्यावर विद्यार्थ्यांना फॅशन स्टायलिस्ट, रिटेल स्पेस डिझायनर, व्हिज्युएल मर्कंडायजर्स, इव्हेंट डिझायनर्स, आर्ट डायरेक्टर, फॅशन फोरकास्टर, ग्रॅफिक डिझायनर अशा संधी मिळू शकतात.
  संपर्क- सिम्बॉयसीस इंस्टिट्यूट ऑफ डिझाइन,सर्वे नंबर- २३१/४ ए, विमान नगर, पुणे- ४११०१४, दूरध्वनी- ०२०-२६५५७२००,
  संकेतस्थळ- www.sid.edu.in, ईमेल- info@ sid.edu.in

  – सुरेश वांदिले