नेहराची नकारघंटा; द्रविडला मुदतवाढ!

खरं तर, बीसीसीआयच्या मनात प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा भरला होता. पण त्याने स्पष्ट नकारच देऊन टाकला. नेहराच्या प्रशिक्षकपदाच्या, आयपीएलमधील कामावर बीसीसीआयची मंडळी खूश होती म्हणे. ट्वेन्टी-२० या फॉर्म्याटला यशस्वी प्रशिक्षक त्यांना मुख्य भारतीय संघांसाठी हवा होता. जो भारतीय कसोटी क्रिकेट संघांची बांधणी करील.

  खरं तर प्रत्येक विश्वचषक हा पिटुकल्या क्रिकेट विश्वात प्रचंड उलथापालथ करीत असतो. विजेत्या देशाच्या क्रिकेटचा अपवाद वगळता अन्य देशांमध्ये पराजयाची, अपयशाची कारणे शोधण्यासाठी समित्या नेमल्या जातात. कप्तानाचा बळी दिला जातो, प्रशिक्षकाची हकालपट्‌टी होते. खरं तर भारतातही गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीतील अपयशानंतर असे वारे वहायला लागले होते. मात्र ते सारं भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकात सलग १० विजय मिळवून अंतिम फेरी गाठल्यानंतर विसरायला लावलं होतं. मात्र अंतिम विजय हा अंतिम असतो. हातातोंडाशी आलेला यशाचा कप निसटल्यानंतरचं दु:ख सहन होत नाही आणि स्पष्टही सांगता येत नाही. अशी अवस्था बीसीसीआयचीही झाली होती. राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाल या विश्वचषकाने अनायसे संपतच होता. अंतिम फेरीतील अपयशानंतर रोहित शर्माला कप्तान म्हणून चिकटलेली कल्पक, हुशार कप्तान, धाडसी डावपेच लढविणारा कप्तान आदी विशेषण नंतर काही पाहण्यात आली नाहीत. अंतिम अपयशाचा एवढा पगडा भारतीयांवर पडला आहे. ज्यांना याच संघांच्या आधीच्या १० विजयांची आठवण करून द्यावी लागते.

  विश्वचषक जिंकलाय असे आपण वावरत होतो. ज्योतिषांपासून क्रिकेट पंडितांपर्यंत सर्वांनीच भारतीय संघालाच विजेता ठरवून टाकले होते. जेव्हा सर्वांचे अंदाज चुकले तेव्हा त्यांच्या व भारतीय संघाच्या अपयशाचे खापर सट्‌टाबाजारावर फोडून बरेच जण मोकळे झाले. भारतीय संघही आपल्यासारखाच हाडामासाचा आहे. त्यालाही मन आहे. ते एखाद्या क्षणी दडपणाखाली येऊन चुका करू शकतो याची शक्यताच कुणी गृहित धरीत नाही. प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियासारखा असेल तर तो अंतिम फेरीत आणखी घातक असतो. कारण तो आधीच्या सामन्यातील पराभवातून शिकून पुढे आलेला असतो. आपले दोष सलग विजयामुळे झाकले गेले होते.

  असो; भारतीय संघाच्या हाती विश्वचषक लागला नाही, या दु:खातून भारतीय क्रिकेट रसिक सावरलेही. कारण तत्काळ क्रिकेट मालिका तीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरूही झाली.

  विश्वचषक अपयश विसरून सारेच कामाला लागले. कप्तानाची खुर्ची वाचली. प्रशिक्षकाचा करार न संपता पुढे वाढविण्यात आला. भारतीय उपखंडातील क्रिकेट वेड्यांच्या देशात असे अभावानेच घडते.

  यावेळी घडले त्यापाठी ही काही गोष्टी आहेत. बीसीसीआयने द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून व्ही.व्ही.एस.लक्ष्मण याच्यावर लक्ष केंद्रित केले होते. पण लक्ष्मण यांनी आयत्यावेळी आपली भूमिका बदलली. त्यांना सध्याचे बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अॅकादमीचे अध्यक्षपद भूषविण्यात अधिक स्वारस्य आहे. कारण सध्याचे भारतीय क्रिकेट संघांचे देशांतर्गत आणि परदेशातील दौरे पाहता, कोणत्याही प्रशिक्षकाला संघावर प्रयोग करणे, नवा उमेदिचा संघ उभारणे शक्य होणार नाही. त्यातही वेस्ट इंडिज व अमेरिकेतील संयुक्त ट्वेन्टी-२० विश्वचषक जूनमध्ये होणार आहे. म्हणजे नव्या प्रशिक्षकाने सुत्रे हाती घेऊन अर्धे वर्षदेखील होते न होते तोच सूळावर जायचा संभाव्य धोका स्पष्ट दिसत होता. अशा परिस्थितीत कोणताही सुज्ञ माणूस भारतीय क्रिकेट संघाच्या या प्रशिक्षकपदाच्या काटेरी सिंहासनावर बसविण्यास धजावणार नाही.

  खरं तर, बीसीसीआयच्या मनात प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा भरला होता. पण त्याने स्पष्ट नकारच देऊन टाकला. नेहराच्या प्रशिक्षकपदाच्या, आयपीएलमधील कामावर बीसीसीआयची मंडळी खूश होती म्हणे. ट्वेन्टी-२० या फॉर्म्याटला यशस्वी प्रशिक्षक त्यांना मुख्य भारतीय संघांसाठी हवा होता. जो भारतीय कसोटी क्रिकेट संघांची बांधणी करील. ज्याने ५० षटकांच्या क्रिकेटचीही काळजी करायची आणि त्याच्या आवडत्या २०-२० क्रिकेटमध्येही संघाला यशस्वी करून दाखवायचे. म्हणजे आपली बीसीसीआयची मंडळी किती सूज्ञ आहेत पाहा.

  एकाच दगडात दोन नव्हे तर तीन पक्षी मारण्याचा ते प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कारण नेहरा त्यांच्यापेक्षा हुशार निघाला. मुळातच हातातील, गुजरात टायटन्सचे यशस्वी प्रशिक्षकपद सोडून यायची त्याची तयारी नव्हती. दोन महिन्यातील तणावपूर्ण मेहनतीसाठी मिळणारी बिदागी त्याला निश्चितच मोठी वाटली असणार आणि तिसरी महत्वाची गोष्ट… केवळ वर्षासाठी तो एवढी मोठी जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेणारच नाही. एखाद्या नव्या संघांची उभारणी करताना, विशेषत: देशाच्या संघांची उभारणी करताना त्याला पुरेसा अवधी लागणार आहे. अनेक गोष्टींबाबत त्याला निर्णय घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी अभ्यास अधिक करावा लागणार आहे.

  खरं तर बीसीसीआयने देखील नव्या भारतीय संघांच्या उभारणीसाठी व मार्गदर्शनासाठी राहुल द्रविड किंवा व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या काळातील खेळाडूंच्या पुढे पाहण्याची गरज आहे. कारण आजची क्रिकेटपटूंची पिढी द्रविड-लक्ष्मण यांच्या काळातील क्रिकेटच्या खूपच पुढे गेली आहे. त्याकाळचे क्रिकेट आणि आजचे क्रिकेट वेगळ्या पद्धतीने शिकवले, समजले जात आहे. त्यामुळे त्यांनी डोळ्यावर लावलेला द्रविड-लक्ष्मण पिढीचा चष्मा काढावा. नव्या पिढीतील प्रशिक्षकांची निवड करावी. त्यातील अधिक व्यावसायिक, उत्तम कामगिरी करणाऱ्यांना शोधणे गरजेचे आहे. जगभरात आता अनेक क्रिकेट लिग आणि स्पर्धांचे पेव फुटले आहे अशा ठिकाणी असे उमेदवार सापडू शकतीलही. जे भारतीय क्रिकेटपटू अलिकडेच निवृत्त झाले आहेत. त्यांच्यावर विश्वास दाखवायला हवा. त्यांनाही असं वाटायला हवे की इतर देशांपेक्षा आपण भारतीय संघासाठी काम करणे अधिक चांगले आणि लाभदायक आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटचे संघ जिंकविणे हा एक वेगळाच अभ्यास आहे. ती कला ज्याला जमली तो गेटच प्रशिक्षक म्हणावा लागेल. विशेषत: आयपीएलसारख्या स्पर्धेत विविध देशांचे व विविध प्रांतांचे खेळाडू एकत्र खेळत असतात अशी ठिकाणी यशाचा यशस्वी मंत्र सापडणे यासारखे महत कार्य नाही. मात्र, त्यासाठी चांगल्या शोध नजरेची गरज आहे. आपल्याच कंपूतील खेळाडूंची वर्णी लावण्याचे प्रकार थांबवाने लागतील. ज्याच्यावर विश्वासाने भार टाकला तर त्याने त्या विश्वासाला जागले पाहिजे. सध्या तरी भारतीय क्रिकेटमध्ये असे होताना दिसत नाही. क्रिकेटमधील जाणकार मंडळी अन्य क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकताना दिसताहेत. चांगल्या व्यक्तींची नियुक्ती होण्यासाठी आधी निवडणाऱ्यांचे हेतू स्पष्ट असावे लागतील. भारतीय संघाचा आधी आणि मग स्वत:च्या माणसांचा विचार करावा लागेल.

  – विनायक दळवी