आम्ही खरंच काही शिकलो?

मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला आज दीड दशकापेक्षा अधिक काळ लोटला. आजही मुंबईच्या उरावरील त्या हल्ल्याच्या जखमा ओल्या आहेत. शेकडो निरपराधांच्या रक्ताने माखलेल्या इमारती धुतल्या गेल्या असल्या तरीही तो आक्रोश, हतबलता आणि क्रौर्याच्या स्मृती आजही स्पष्ट आहेत. कसाबला फासावर लटकवला असला तरीही कसाबच्या रुपाने इथे निर्माण झालेली भीती अद्याप त्या फासावरील निर्जीव देहासारखी झुलते आहे. त्या भीतीचा जीव अद्याप गेलेला नाही... तरीही आम्ही जगतो आहोत. गेल्या १६ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले, असे म्हणत आपण बिनधास्त फिरतो आहोत... आता तर घातपाताच्या धमक्यांनासुद्धा आम्ही भीक घालत नाही.

  सोळा़ वर्षांपूर्वीचा तो थरार, मृत्यूच्या दूतांचे ते थैमान आजही अनेकांना जसेच्या तसे आठवत असेल. मुंबईतील सर्वाधिक उच्चभ्रू वस्ती किंवा परिसर मानला जाणारा परिसर यावेळी नराधम अतिरेक्यांनी लक्ष्य केला होता. दक्षिण मुंबई थरथरत होती आणि अतिरेक्यांच्या गोळ्या बेछुट वेध घेत होत्या. सर्वसामान्य नागरिकांसह बडे पोलीस अधिकारी या हल्ल्याला बळी पडले. देशाविरुद्धचे युद्ध पुकारून पाकिस्तानातून प्रशिक्षित अतिरेकी थेट देशाच्या आर्थिक राजधानीत घुसले होते. नुसतेच घुसले नव्हते तर त्यांनी त्यांच्या नियोजनानुसार हल्लासुद्धा केला होता आणि भारतीय सुरक्षा यंत्रणेला वेठीस धरुन मुंबईकरांचे शिरकाण केले होते. आजही तो प्रसंग मुंबईकरांच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ती कत्तल, ताज पॅलेस हॉटेलमधील ओलीस नाट्य आणि एकाच वेळी दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखांसह बड्या पोलीस अधिकार्‍यांचा बळी हे सगळे अस्वस्थ करणारे प्रसंग आजही स्मृतीपटलावर कायम आहेत. नेहमी धावणारी, कधीही न झोपणारी, स्वप्नांचे शहर म्हणून असंख्य लोंढ्यांना सामावून घेणारी मुंबईसुद्धा या स्मृतींनी आजही क्षणभर थबकते, थरथरते. शेकडो निरपराध लोकांचा जीव घेणारा तो हल्ला अनेक कुटुंबांना निराधार करून गेला. अनेकांच्या जखमा आजही भळभळताहेत. कसाब फासावर लटकला, पण ती भीती अद्याप कायम आहे. मुंबईवरील हल्लेखोर मारला गेला, पण त्याचे अनेक आका आजही जिवंत आहेत. मुंबई पुन्हा पूर्वपदावर आली, बेधडक पळू लागली पण त्या हल्ल्याचे ओरखडे आजही मनावर कायम आहेत. कदाचित दुसरा कोणीतरी कसाब येण्याची शक्यता, भीतीसुद्धा अद्याप कायम आहे.(?).

  २६/११ च्या हल्ल्याच्या बातम्या, वर्णनं आणि त्यावेळी प्रत्यक्ष नराधमांनी केलेला संहार पाहणारे, अनुभवणारे आणि एका क्षणाने मृत्यूला हुलकावणी दिलेले या सगळ्यांचे अनुभव आजही अस्वस्थ करतात. क्षणापूर्वी कोणासोबत तरी ताज हॉटेलमध्ये चर्चा करणार्‍यांनी आपली गाडी काढली आणि तिकडे ओलीस नाट्य घडले. त्यात अनेकांनी आप्त गमावले. परदेशी पर्यटकसुद्धा ओलीस असल्यामुळे या हल्ल्याचे परिणाम दूरदेशीसुद्धा जाणवले. आजही मुंबईत येणार्‍या परदेशी पर्यटकांना त्या हल्ल्याची वाचून तरी माहिती असते. असे हल्ले समाजमनावर खोलवर परिणाम करतात. भीती निर्माण करतात. त्यासाठीच अशा प्रकारे अतिरेकी हल्ले केले जातात. निरपराध लोकांमधील कोणत्या वर्गात दहशत निर्माण करायचे, याचे नियोजन या सगळ्यामागे दिसत असते. मुंबईने पोसलेल्या देशद्रोही दाऊद इब्राहिमने केलेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये सर्वसामान्यांच्या मनात दहशत माजविण्याचे षडयंत्र स्पष्ट दिसते, तसे श्रीमंतांच्या मुंबईत धमाके करण्याचा कट कसाबच्या हल्ल्यामागे उघड होतो. हल्ल्यांमागील टार्गेट ग्रुप आणि त्या हल्ल्यांचे उद्देश स्पष्ट होतात. दहशत माजविणे हाच अंतिम उद्देश अतिरेक्याचा असतो. त्यामुळे अतिरेकी हल्ला कुठे झाला, कोणाचे नुकसान झाले, अतिरेकी स्थानिकांची बोट घेऊन आले की टॅक्सीने आले. अतिरेकी पाकिस्तानात पोसला गेला की मुंबईत, या सगळ्या तपासाच्या कंगोर्‍यांना सर्वसामान्यांच्या लेखी काही फारसे महत्व नसते. पण या सगळ्याचे विश्‍लेषण, अभ्यास करून पुन्हा असे प्रकार होऊ नये, याची दक्षता यंत्रणांनी घ्यायची असते. सर्वसामान्य नागरिकाला त्याच्या सुक्षिततेची हमी सरकारने द्यायची असते. आज खरंच ते शक्य आहे? १६ वर्षानंतर तरी मुंबई सुरक्षित आहे, असा दावा आपण, आपली यंत्रणा आणि आपले सरकार करू शकेल? आपण त्या हल्ल्यावरुन खरंच काही शिकलो आहोत का?

  सागरी सुरक्षा
  दोन दिवस आधी मच्छीमार संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेले एक पत्र आपले डोळे खाडकन उघडण्यासाठी पुरेसे ठरावे. मुंबईची सागरी सुरक्षा आजही रामभरोसे आहे, असा त्या पत्राचा आशय आहे. कसाब आणि त्याचे साथीदार पाकिस्तानातून थेट मुंंबईत आले ते स्थानिक मच्छीमाराची बोट घेऊन वगैरे सगळ्या बाबी या हल्ल्याच्या तपासात उघड झालेल्या आहेत. सागरी सुरक्षेच्या बाबतीत आपण कमजोर आहोत, हे एकदा नव्हे दोनदा सिद्ध झाले आहे. एकीकडे शिवरायांच्या आरमाराचा अभिमान व्यक्त करत असताना त्यांनी मुहूर्तमेढ रोवलेल्या, सरखेल कान्होजी आंग्रे यांनी रक्षलेल्या समुद्री सीमा आज आमच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज यंत्रणा सुरक्षित ठेऊ शकत नाहीत.

  मुंबईतील बॉम्बस्फोटासाठी आलेले आरडीएक्स रायगडच्या शेखाडी खाडीतून आले होते आणि त्यावेळच्या भ्रष्ट पोलीस यंत्रणेने ती स्फोटकं मुंबईपर्यंत आणण्यात मदत केली होती. काय तर म्हणे त्यांना स्फोटकं असल्याची कल्पना नव्हती. त्यांना वाटले दाऊदचा नेहमीप्रमाणे तस्करीचा काहीतरी माल असावा, असे किस्से अनेकदा अधिकार्‍यांच्या चर्चांमध्ये, त्यावेळच्या तपासात सहभागी असलेल्यांकडून ऑफ दी रेकॉर्ड ऐकायला मिळतात. यंत्रणेने पोसलेला दाऊद मुंबई उद्ध्वस्त करून गेला. विस्तीर्ण समुद्र किनार्‍याचा उपयोग या अतिरेक्यांनी एकदा नव्हे दोनदा केल्याचे स्पष्ट झाले. त्यातून आपण काही शिकलो आहोत का, असा प्रश्‍न जर कोणी विचारला तर उत्तर नकारार्थी येईल.
  मुंबईतीलच नव्हे राज्यातील ७५० किलोमिटरचा सागरी किनारा म्हणजे आओ जाओ घर तुम्हारा, या प्रकारचा आहे. आजही घारापुरी, मांडवा, गोवा किंवा कुठूनही मुंबईत सागरी मार्गाने आल्यानंतर काहीही तपासणी होत नाही. मुंबईतून बोटीने जायचे असेल तर बॅगा किमान स्कॅन तरी होतात. पण बाहेरून सागरी मार्गाने मुंबईत आलेल्यांना काहीही घेऊन येण्याची जणू मुभा आहे, अशा थाटात मोकळेपणाने सोडले जाते. दोनदा हल्ले झाल्यानंतर, सर्वसामान्यांना वेठीस धरल्यानंतरही तटरक्षक, नौदल, स्थानिक पोलीस सुस्त असल्याचे दिसतात.

  प्रत्येक यंत्रणेच्या हद्दी आखलेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या ह÷द्दीत राहून दुर्लक्षच करताना दिसतो, हे मच्छीमारांच्या त्या पत्रातून स्पष्ट होते. २६/११ च्या हल्ल्यानंतर मुंबई – महाराष्ट्राच्या सागरी सीमा अशा काही तकडबंद करायला हव्या होत्या. पुन्हा हा मार्ग असुरक्षित आहे, किंवा अतिरेक्यांसाठी सोपा आहे, असे वाटायला नको होते. पण दुर्दैवाने तसे झालेेले दिसत नाही. गेट वे ऑफ इंडिया असो किंवा रो-रो पॅक्स टर्मिनल, रेवस बंदर असो किंवा उरण, धरमतर, नवी मुंबई सगळीकडे सुरक्षेच्या नावाने बोंब. देशातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जेएनपीटीबाबत तर बोलायलाच नको. पोलादी पडद्याआड तिथे चालणार्‍या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा तिथले गब्बर झालेले कंत्राटदारच सांगत असतात.

  रेल्वे, रस्ते मार्गही रामभरोसे
  जो प्रकार सागरी मार्गाचा तोच प्रकार रेल्वे आणि रस्ते मार्गाच्या बाबतही आहे. मुंबईतील कोणत्याही रेल्वे स्थानकावर बॅग तपासणी यंत्र नाही. जी आहेत किंवा होती, ती बंद पडलेली आहेत. बॅग तपासणी यंत्रामुळे गर्दी वाढते, म्हणून ती बंद करण्यात आली, हे त्यामागचे मख्खपणाचे, निर्बुद्धपणाचे अधिकार्‍यांचे उत्तर असते. कोणत्याही रेल्वे स्थानकावर प्रत्येक दिशेने मोकळे रस्ते, खुली प्रवेशव्दारे, फलाटापर्यंत आलेले फेरीवाले आता अजून कोणत्या दुर्घटनेची वाट पाहताहेत, असा प्रश्‍न पडतो. रेल्वे स्थानके कात टाकताहेत, कोट्यवधींचा खर्च त्यांच्या सौंदर्यीकरणावर होतोय, पण सुरक्षेचे काय, हे भले मोठे प्रश्‍नचिन्ह अद्याप कायम दिसते.

  तोच प्रकार रस्ते वाहतुकीचा. रस्त्यांवरील तपासणी नाके हा प्रकारच बंद झाला आहे. आहे ते केवळ वाहतूक पोलिसांच्या वसुलीचे अड्डे. रस्त्याच्या वळणावर, न दिसणार्‍या कोपर्‍यावर उभे राहायचे आणि सिग्नल तोडला की वाहनचालकाला चलानचा धाक दाखवत वसुली करायची, हा धंदा राजरोसपणे सुरु असतो. चक्क राज्याच्या पोलीस मुख्यालयाच्या कोपर्‍यावरसुद्धा असा प्रकार सुरु असतो, तिथे इतर ठिकाणचे काय सांगावे? पण प्रचंड मोठ्या संख्येने फिरणार्‍या डिलीव्हरी बॉयची कधी तपासणी झाली, ओला, उबेरचे लोगो लावून जाणारे किती टॅक्सीचालक खरोखर परवानाधारक आहेत, याची तपासणी कधी आरटीओने केल्याचे ऐकीवात नाही. शहरात काळ्या काचा लावून जाणार्‍या व्हीआयपी नंबरच्या गाड्यांची चौकशी झाली, एखाद्या कारची डिक्की उघडून कधी तपासणी होताना दिसत नाही. गुजरात, कर्नाटक मार्गे गुटखा येतो, तो कधीतरी पकडला जातो. पण रस्ते मार्गाने अजून काय येऊ पाहते किंवा येते यावर लक्ष कोण देणार?

  लांडगा आला रे आला
  सचिन वाझे आणि प्रदीप शर्मासारख्या अधिकार्‍यांनी पोलीस विभागाची आब्रू वेशीवर टांगली. मुंबई पोलीस म्हणून जो दरारा गुन्हेगारांवर नव्हे पण सामान्यांच्या मनात निर्माण झाला होता, तो गमावण्याचे पातक अँटेलियासमोरील स्फोटकांच्या प्रकरणाने केले. आता तर मुंबई पोलिसांना अज्ञात धमक्या येतात. मुंबईवरील हल्ल्याच्या गेल्या वर्षभराचा हिशेब करायचा तर डझनभर धमक्या कदाचित आल्या असाव्यात. पोलिसांना फोन करून धमकी देणारा कधीतरी एखादा मनोविकृत आढळतो. पण इतरांचे काय? मुंबईवर हल्ला करावा, हा अतिरेकी विचारच मुळात का येतो? अशा धमक्या देणार्‍यांची अटक, कोठडी, जामीन, सुटका अशी सगळी प्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या मनातील हल्ल्याचा तो विचार निघून जात असेल? अनेक अनुत्तरित प्रश्‍न आहेत.

  पूर्वी हल्ल्याची धमकी आल्यानंतर पोलीस बंदोबस्त वाढलेला दिसायचा. नाकाबंदी अधिक सक्त केलेली असायची. आता तसे काही दिसत नाही. कोणीतरी वेड्याने अशी धमकी दिली असावी, असा कयास सर्वसामान्य आणि पोलीससुद्धा काढतात. म्हणूनच
  मुंबईवरील हल्ल्याच्या धमकीचा प्रकार हा लांडगा आला रे आला, अशा स्वरुपाचा होऊ नये, हीच मनोमन प्रार्थना.

  ड्रग्ज हा हल्लाच
  मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यांपेक्षाही घातक जर कोणता हल्ला सध्या करण्यात येत असेल तर तो ड्रग्जचा. अमली पदार्थांचे रॅकेट मोठ्या प्रमाणात केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यात फैललेले अनेक घटनांमधून दिसते. कोट्यवधींचे ड्रग्ज पकडले जात आहेत, याचा अर्थ तितकेच किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात ड्रग्ज येत आहेत. अमली पदार्थांच्या या व्यवसायात भुरट्यांपासून देशद्रोह्यांपयर्र्ंत अनेकांचा सहभाग आहे. मागे एनसीबीने केलेल्या कारवाईत अनेक मोठे चेहरेही समोर आले होते. ड्रग्ज रॅकेटवर हल्ला झाल्यानंतर एनसीबीवर तुटून पडणारे राजकारणी आणि लोकप्रतिनिधीही आपण पाहिले होते. आतासुद्धा ड्रग्ज माफीयांचे कोणाशी संबंध? हा प्रश्‍न प्रतिष्ठित राजकारण्यांना अडचणीचा ठरू शकतो.

  परंतु, ज्या प्रकारे अतिरेकी हल्ला असतो, त्याच प्रकारे ड्रग्जचा हल्ला सुरु आहे. त्याचे घातक परिणाम गोळीबारासारखे तत्काळ दिसणारे नाहीत. पण पिढ्या बर्बाद होताहेत. अनेक कुटुंब त्याच्या विळख्यात सापडलेत. ड्रग्जचा कोट्यवधीचा व्यापार सुरु आहे आणि त्यातील पैसा पुन्हा देशद्रोही कारवायांसाठी वापरला जाणार आहे, हे समजू नये, इतक्या आपल्या यंत्रणा सुस्तावलेल्या नक्कीच नाहीत.

  सरकारी यंत्रणांनी ठरवले तर काहीही बेकायदेशीर होऊ शकणार नाही, हा विश्‍वास आजही कायम आहे. कोट्यवधींचे ड्रग्जच काय पण गुटख्याची एक पुडीसुद्धा कोणी आणू शकणार नाही. सुरक्षा यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी स्वार्थ सोडयला हवा. हल्ल्यानंतर जागृत होणारे देशप्रेम कायम जपायला हवे. त्यांच्या डोळ्यासमोर घडणारे कोणतेही बेकायदेशीर कृत्य माझ्या शहरावर, माझ्या लोकांवर दूरगामी काय परिणाम करेल, याची जाणीव ठेवायला हवी. पण ही नेणीव काही काळापुरतीच असते. बरं, हा प्रकार केवळ सुरक्षा यंत्रणांचाच नाही. तर सर्वसामान्यांचाही आहे. आपल्याला काय करायचे, असे म्हणत असामाजिक तत्वांकडे दुर्लक्ष करणारे सर्वसामान्य लोकही तितकेच दोषी म्हणावे लागतील. आपल्या भोवतालच्या परिसरात तरी निदान डोळसपणे वावरणार्‍या लोकांमुळेही असुरक्षिततेचा धोका बर्‍यापैकी कमी होऊ शकतो. पण आम्हाला वेळ नाही किंवा नस्त्या झंझटीत पडण्याची इच्छा नाही. अशा वेळी मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या… २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, लष्करी अधिकारी आणि मृत्यूमुखी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आज श्रद्धांजली अर्पण करताना आम्ही आपापली जबाबदारी ओळखत नाही, तोपर्यंत आम्ही सुरक्षित आहोत, हे म्हणणे धाडसाचे ठरेल.

  – विशाल राजे