पहिली कसोटी देवाला!

मोठा सामना खेळताना आपण नेहमीच दबावाखाली असतो. कारण प्रत्येकाला आपल्याला वैयक्तिक कामगिरीची काळजी असते. प्रत्येकाला संघात अढळस्थान कसे राहील याची काळजी वाटत असते. त्यासाठी संघाच्या यशाचा बळी द्यायला आपण तयार असतो. आपण ‘फिअरलेस’ होण्याऐवजी हरायला घाबरतो. कारण पराभवानंतर अनेकांचे शिरकाण होते.

  गतसप्ताहात क्रिकेटमध्ये दोन आश्चर्यकारक निकाल लागले. ज्या निकालांनी कसोटी क्रिकेटला नवसंजीवनी दिली. अशा अनिश्चित निकालांसाठी खरंतर ‘अॅशेस’ मालिका परिचित आहे. यावेळी एका निकालामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ होता; जो विजयाच्या समिप येऊन हरला. तो सामना जिंकला एकेकाळच्या कसोटी क्रिकेटच्या विश्वविजेत्या आणि सध्या तळाला गटांगळ्या खाणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने. दुसरी कसोटी होती संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवूनही भारतात, आपल्याच आखाड्यात पराभूत झालेल्या भारतीय संघाची. त्या कसोटीत इंग्लंड संघ जिंकला.

  खरं तर भारतात पाहुणा संघ पराभवानेच मालिकेची सुरुवात करीत असतो. भारताच्या खेळपट्‌ट्या आणि हवामान याच्याशी समरस होण्याआधीच कोणताही भारतीय संघ प्रतिस्पर्ध्यांना पराभवाचे एक-दोन ठोसे देतोच देतो. पण यावेळी तसे घडले नाही. अलिकडच्या परंपरेनुसार आपण फिरकीला पोषक अशी, कोरडी-ठणठणीत खेळपट्‌टी बनवली. आपण पहिल्या डावात १९० धावांची भरभक्कम आघाडीही घेतली. नंतर मात्र माशी शिंकली. चौथ्या डावात आपल्याला फलंदाजी करायची होती. जे विद्यमान भारतीय फलंदाजीसाठी आव्हानात्मक होतेच. पण त्याआधी आपण इंग्लंडला त्यांच्या दुसऱ्या डावात मोकळे सोडले. म्हणजे कसोटीच्या तिसऱ्या डावात बाजी पाहुण्यांनीच आपल्यावर उलटविली.

  त्याची दोन कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे इंग्लंडची ‘बाझ बॉल थिअरी’. हरायला घाबरायचे नाही हा दृष्टीकोन आणि दुसरी गोष्ट रोहित शर्माचे अनाकलनीय नेतृत्व. कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या कप्तानाचे नेतृत्वगुण दिसून येतात. जेव्हा कसोटीत समोर तुल्यबळ संघ उभा ठाकतो; तेव्हा तुमच्या नेतृत्वाचा कस लागतो. जेथे रोहित शर्मा कमी पडला. भारताचा कप्तान कमी पडला.

  इंग्लंड संघाकडे आक्रमक फलंदाजीचे डावपेच आखणारा कप्तान होता, प्रशिक्षक होता. स्ट्रोक्स स्वत: एक आक्रमक फलंदाज आहेच. ती आक्रमकता त्याच्या नेतृत्व गुणातही उतरली आहे. ‘बाझ बॉल’ क्रिकेटला पाठींबा देणारे क्रिकेट बोर्डही पाठीशी आहे. ज्या क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारीही वरच्या पातळीवरचे क्रिकेट खेळलेले आहेत. ज्यांना क्रिकेट या खेळाचीही जाण आहे, अशा क्रिकेट बोर्डाने दाखविलेला विश्वास हा खेळाडूंसाठी प्रोत्साहनदायक आणि उत्साहकारक असतो. अशा लोकांकडून प्रशिक्षक आणि कप्तानाला पाठबळ मिळाले तर त्याचे नेतृत्वही निडर-बेडर बनते. मोठा कप्तान जो असतो जो डावपेचांचे फासे टाकताना घाबरत नाही; जुगार खेळताना कचरत नाही. मात्र, हा जुगार खेळतानाही त्यापाठी ‘लॉजिक’ असावे लागते. ठाम योजना असाव्या लागतात. ज्या इंग्लंड संघांच्या कप्तानाकडे होत्या, त्यांनी भारताच्या फिरकी गोलंदाजीवर आक्रमण केले. कुलदीप यादव हा मनगटी फिरकी गोलंदाज भारताने खेळविला नाही. त्यामुळे अश्विव, जाडेजा, अक्षर पटेल हे तिघेही फिरकी गोलंदाज बोटाने चेंडू वळविणारे होते; ही खात्री त्यांना होती. त्यामुळे इंग्लंडच्या सर्वच फलंदाजांनी फलंदाजी करताना ‘कॅलक्युलेटिव्ह’ जुगार खेळला. जो त्यांना पहिल्या कसोटीत तरी फलदायी ठरला. कारण कुलदीपसारखा अनप्रेडिक्टेबल फिरकी गोलंदाज त्यांच्यासमोर नव्हता.

  इंग्लंडची फलंदाजी दुसऱ्या डावात यशस्वी ठरली, त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचा ‘डेअर डेव्हिल अॅप्रोच’. प्रत्येकाने स्वीप आणि रिव्हर्स स्वीपचे फटके मारताना धोके पत्करले. भारताचा प्रमुख गोलंदाज बुमरा याच्या चेंडूवरदेखील १९६ धावांवर असताना रिव्हर्स स्वीपचा फटका मारल्याबद्दल ऑली पोपवर कुणी टिका केली नाही किंवा त्यालाही द्विशतक हुकल्याची चुटपूट लागून राहीली नाही. उलट तो बाद होऊन तंबूत परतताना त्याच्या सहकाऱ्यांनी त्याचे टाळ्या वाजवून स्वागतच केले.

  भारतीयांचा देखील असाच आवेश आपण अलिकडे पाहिला होता. मात्र, बेदरकार फलंदाजी फक्त संघाची परिस्थिती चांगली असतानाच आपण पाहिली. अडचणीच्यावेळी किंवा संघांची कोंडी झाली असता; आपला फलंदाजीचा दृष्टीकोन अचानक बदललेला आपण पाहिला. अहमदाबादला विश्वचषकाचा अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या विकेटनंतर आपण पक्के कसोटी वाचविण्यासाठी फलंदाजी करतोय असा भास होत होता. तीच आपली भूमिका अनेक सामन्यात आपली कोंडी झाली असताना कायम दिसून आली.

  याउलट इंग्लंडने काय केले; ‘बाझ बॉल’ क्रिकेट थिअरीमध्ये यावेळी त्यांनी स्वीप आणि रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांची जोड दिली. त्यांचा हा दृष्टीकोन पहिल्या कसोटीत तरी फलदायी ठरला. इंग्लंडचे काही फलंदाज या प्रयत्नात बाद झाले तर काहींचे प्रयत्न यशस्वी ठरले. मात्र ऑली पोप आणि काही फलंदाजांचे हे फटके यशस्वी ठरत गेले. सर्वच ठिकाणी क्षेत्ररक्षक ठेवता येत नाही. ऑली पोपच्या १९६ धावांच्या खेळीने भारताची पहिल्या डावातील आघाडी संपविली आणि भारतासाठी ‘पॅनिक बटन प्रेस’ झाले. भारताचे खेळाडू हैराण झाले. भारतीयांचा संयम सुटत गेला. दिडशेपुढची धावसंख्या गाठणे शेवटच्या डावात आव्हानात्मक ठरणार हे लक्षात येताच, भारतीय संघ ‘बॅकफूटवर’ गेला. बचावात्मक डावपेच लढवायला लागला. तेथेच पाहुणे जिंकले.

  मोठा सामना खेळताना आपण नेहमीच दबावाखाली असतो. कारण प्रत्येकाला आपल्याला वैयक्तिक कामगिरीची काळजी असते. प्रत्येकाला संघात अढळस्थान कसे राहील याची काळजी वाटत असते. त्यासाठी संघाच्या यशाचा बळी द्यायला आपण तयार असतो. आपण ‘फिअरलेस’ होण्याऐवजी हरायला घाबरतो. कारण पराभवानंतर अनेकांचे शिरकाण होते. त्यामुळे मैदानातील आपल्या वाघांची शेळी होते.

  इंग्लंड संघांने भारताच्या या कच्च्या दुव्याचा यावेळी आधीच अभ्यास केला होता. ग्रॅहमगूचची १९८७च्या विश्वचषक उपांत्य सामन्यातील खेळी आठवून पाहा. कूकच्या नेतृत्वाखाली भारतात मालिका जिंकणाऱ्या केविन पीटरसनची मुंबईतील शतकी खेळी आठवा.

  गूचने स्वीपच्या फटक्यांची झाडू मारून भारताला विश्वचषकाबाहेर काढले होते. पीटरसनच्या आक्रमणापुढे शरणागती पत्करलेल्या भारताने ती कसोटी मालिका आघाडी घेतल्यानंतरही गमाविली होती. यावेळी तेच तंत्र इंग्लंड संघ वापरतोय. स्वीपच्या फटक्यांना आता रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांची जोड लाभली. एवढाच काय तो फरक. या दृष्टीकोनाला ‘फिअरलेस बॅटिंग अॅप्रोच’ने भारतालाच निरुत्तर केले.

  इंग्लंडच्या गोलंदाजीची व्यूहरचना देखील कशी होती पाहा. इंग्लंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लिच हा त्यांच्या फिरकी गोलंदाजीच्या आक्रमणाचा सेनानी आहे असे आपण समजत होतो. पहिल्या डावात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. पाठदुखीच्या आजारातून नुकताच तो बाहेर पडला होता. पण यावेळी जॅक लिच हा त्यांचे फिरकीचे प्रमुख अस्त्र नव्हते. त्यांनी त्यांचा मोहरा यावेळी लिचच्या पाठी ठेवला होता. पहिल्या कसोटीत पदार्पण करणारा टॉम हार्टली हा त्यांचा हुकमी एक्का होता. उंचपुरा, साडेसहा फूट उंचीचा, हाय आर्म अॅक्शनने डावखुरी फिरकी गोलंदाजी करणारा, आपल्या नीलेश कुलकर्णीसारखा. भारतीय फलंदाज या हार्टलीसमोर दुसऱ्या डावात गोंधळले. कारण आपल्या फलंदाजांची स्थानिक क्रिकेट खेळायची सवय हळूहळू कमी होत चालली आहे. त्यांना खेळपट्‌टी तुटली की वळणारे चेंडू खेळताना मग त्रास होतो. एकाच जागी खिळून उभे राहतात. फूटवर्क काम करीत नाही. समोरच्या गोलंदाजालाच ‘सेट’ व्हायची संधी देतात. आपल्या फलंदाजांनीच हार्डलीला स्थिरावण्याची संधी दिली.

  हार्टली ६२ धावात ७ बळी आणि वेस्ट इंडिजचा शमार जोसेफ (६८ धावात ७ बळी) या दोघांनी दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघांना त्यांच्याच मैदानात लोळविले. कसोटी क्रिकेटमधील ही कामगिरी यापुढे कायमची स्मरणात राहणार आहे. कारण कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट आहे. मर्यादित षटकांच्या किंवा १०-२०-षटकांच्या क्रिकेट लिग पैसा मिळवून देतात. पण क्रिकेटचा दर्जा टिकवून ठेवत नाहीत.

  – विनायक दळवी