visubhau bapat

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ (Kutumb Ranglay Kavyat) या कार्यक्रमाला येत्या २६ जानेवारीला ४१ वर्ष पूर्ण होत आहेत. मराठी कवितांचा साभिनय सादरीकरणाचा हा कार्यक्रम आजही लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाला ४१ वर्ष होऊनही आजही त्यात नाविन्य टिकून आहे. त्याच निमित्ताने हा कार्यक्रम सादर करणारे प्रा. विसुभाऊ बापट (Visubhau Bapat) यांची ही खास मुलाखत.

    ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ च्या पहिल्या प्रयोगाविषयी विसुभाई सांगतात की, २६ जानेवारी १९८१ ला अहमदनगर क्लबमध्ये ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चा पहिला प्रयोग झाला. अहमदनगरमधला क्लास वन ऑफिसरचा अहमदनगर क्लब आहे. तिथे माझा पहिला कार्यक्रम झाला. साभिनय कविता सादरीकरणाचा हा प्रकार आहे. साथीला तबलजी घेऊन स्वत: पेटी वाजवत विसुभाऊ हा कार्यक्रम सादर करतात.

    विसुभाऊ सांगतात की, मी स्वत: कवी नाही. महाराष्ट्रभर फिरून निरनिराळ्या कवींच्या कविता त्यांच्या अक्षरात मी संकलित केल्या आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर संकलित कवितांचा हा एकपात्री कार्यक्रम आहे.

    ते पुढे सांगतात की,हा कार्यक्रम करावा यासाठी माझ्यासमोर दोन आदर्श होते. पहिले आदर्श म्हणजे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ कार्यक्रम करणारे प्रा. लक्ष्मणराव देशपांडे आणि दुसरे ‘मी अत्रे बोलतोय’ कार्यक्रम करणारे सदानंद जोशी. या दोघांना गुरुस्थानी मानून मी हा कार्यक्रम १९८१ साली सुरु केला. प्रस्थापित कवींच्या अपरिचित कविता आणि अपरिचित कवींच्या अप्रतिम कवितांची गुंफण या कार्यक्रमात केलेली आहे.

    मी ४५ तास ऐकवू शकतो इतक्या कविता माझ्या मुखोद्गत (पाठ) आहेत. समोरचा प्रेक्षक त्या त्या ठिकाणी कसा आहे आणि तिथे प्रतिसाद कसा मिळतो त्यावरून मी कोणत्या कविता सादर करायच्या ते ठरवतो. संपूर्ण महाराष्ट्रात ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चे प्रयोग झाले आहेत. त्याशिवाय अन्य राज्यांमध्येही मराठी मंडळाच्या वतीने कार्यक्रम झाले आहेत. इतर देशांमध्येही जिथे मराठी माणसे आहेत तिथे मी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चा प्रयोग सादर केला आहे. मी १९९४मध्ये ४० दिवस इंग्लंडला होतो. त्या ४० दिवसात मी ९ कार्यक्रम केले. परदेशात अनेक ठिकाणी हा कार्यक्रम पोहोचलेला आहे.

    ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हे नाव कार्यक्रमाला कसे पडले याविषयी विसुभाऊ सांगतात की, हे नाव मी ठेवलेले नाही. डॉ. अ. वा. वर्टी नाशिकच्या प्रयोगाला १९८२ साली आले होते. नाशिकला सायखेडकर नाट्यगृहामध्ये कार्यक्रम बघितल्यानंतर वर्टी म्हणाले की, कुटुंबातल्या प्रत्येकासाठी तुम्ही कविता सादर करत आहात. लहानांसाठी बालकविता, तरुणांसाठी तारुण्यसुलभ कविता, वयस्कर लोकांसाठी अभंग आणि भक्तीगीते अशा स्वरुपातल्या कविता, स्त्रियांसाठी महिलांच्या कविता असे सगळे तुमच्या कार्यक्रमात आहे. एक कुटुंब तुम्ही रंगवता म्हणून ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ असे नामकरण करा, असे ते म्हणाले. त्याआधी ‘कुटुंब बसलंय काव्याला’ या नावाने मी कार्यक्रम करत होतो, असे विसुभाऊ म्हणाले.

    विसुभाऊ सांगतात की, अनेक कवींनी स्वत: माझा कार्यक्रम ऐकला आहे. सुरेश भटांनी माझा कार्यक्रम तीन वेळा ऐकला आहे. कुसुमाग्रजांनी त्यांच्या नाशिकच्या घरासमोर माझा कार्यक्रम ठेवला होता. प्रस्थापित बहुसंख्य कवींनी हा कार्यक्रम ऐकला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते भारत सासणे यांनी माझा कार्यक्रम ऐकला आहे. सासणे यांच्यासोबत किल्लारी भूकंपग्रस्तांना मदत उभी करण्यासाठी मी एक कार्यक्रम केला होता. त्या कार्यक्रमातील सगळे कलेक्शन आम्ही भूकंपग्रस्तांना दिले. विठ्ठल वाघ एकदा म्हणाले होते की प्रत्येक साहित्य संमेलनात हा कार्यक्रम कवींसाठी झाला पाहिजे. कवींना कविता कशा तयार करायच्या याचे मार्गदर्शन यातून मिळेल.

    या कार्यक्रमाने काही रेकॉर्ड केले आहेत. त्याविषयी ते म्हणाले, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’चा दिड हजारावा प्रयोग ३१ मे २००३ वा दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले इथे झाला. सलग ११ तास मराठी कविता मी ऐकवल्या. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. मराठी कविता लिम्का रेकॉर्डमध्ये पोहोचली, हे ते अभिमानाने सांगतात. त्यानंतर माझी पत्नी उमा आणि मुलगी तन्वी यांच्या आग्रहाखातर दुसरा एक मोठा प्रयोग २७ सप्टेंबर २००९ ला रवींद्र नाट्य मंदिरात झाला. तिथे सलग १५ तास मराठी कविता मी ऐकवल्या. असे करुन माझा आधीचा लिम्का रेकॉर्ड मीच मोडला. याशिवाय वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये कार्यक्रमाची नोंद झाली. वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ इंडियामध्ये कार्यक्रमाची नोंद झाली. १५ तासांच्या रेकॉर्डचे वैशिष्ट्य हे होते की यात एकही कविता रिपीट केलेली नाही. एकही कविता वाचलेली नाही, सगळ्या मुखोद्गत कविता सादर केल्या. त्यामुळे लाँगेस्ट रिसायटल पोएट्री ऑफ मराठी असा उल्लेख तिन्ही ठिकाणी झालेला आहे.

    बाबा आमटेंच्या तीन पिढ्यांमध्ये माझे कार्यक्रम झाले आहेत. स्वत: बाबा आमटेंनी माझा कार्यक्रम १९८३ साली लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा इथे आयोजित केला होता. त्यांनी तो स्वत: ऐकला होता. त्यानंतर २००० च्या दरम्यान प्रकाश आमटे, विकास आमटे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता.पुढे दिगंत आमटेंनी आयोजित केला.

    विश्वविक्रमी ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ कार्यक्रमाचा, विसुभाऊंचा शासनाने कधीच सन्मान केला नाही. विसुभाऊ खंत व्यक्त करत सांगतात की, एकपात्री प्रयोगांकडे सगळेच दुर्लक्ष करतात त्याप्रमाणे शासनही करते. एकपात्रीसाठी कुणीही वाली नाही.
    मी कायम लेटेस्ट कविता कार्यक्रमात सादर करत असतो. कवितांचे माझे कलेक्शन सुरु आहे. मी मातृभाषेसाठी, मराठीसाठी हे काम करतो. मराठी कविता काय ऐकायच्या असा प्रश्न विचारणारे लोक कार्यक्रमाला तीन तास येऊन बसतात आणि कार्यक्रमात तल्लीन होऊन जातात. विसुभाऊ याविषयी एक जुनी आठवण सांगतात की, मुंबईतल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवाजी मंदिरला कार्यक्रम झाला. त्यावेळी १० मिनिटे येतो म्हणून आर आर पाटील (आबा) कार्यक्रमाला आले आणि त्यांनी साडेतीन तास कार्यक्रम एन्जॉय केला. शरद पवारांपासून, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे,राज ठाकरे, नितीन गडकरीपर्यंत अनेकांनी कार्यक्रम ऐकला आहे. विलासराव देशमुख यांनीही माझा कार्यक्रम ऐकला आहे. आनंद दिघे माझ्या कार्यक्रमाचे फॅन होते. ठाण्यात कुठेही कार्यक्रम आहे हे त्यांना कळले की ते म्हणायचे विसुभाऊ मला भेटल्याशिवाय जायचे नाही. मी कधीही येईन पण कार्यक्रम संपल्यावर माझी वाट पाहा. कधी कधी रात्री २ वाजतासुद्धा आमच्या भेटी झाल्या आहेत.

    विसुभाऊ पुढे म्हणाले की, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ व्यतिरिक्त ‘ओंकार काव्यदर्शन’ नावाचा शालेय कार्यक्रम मी सादर करतो. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातल्या कविता आणि काही इतर कविता यात सादर होतात. याची सुरुवात १९७६ साली मी शिकत असताना झाली आहे. काही वेळा दिवसाला चार –चार शाळांमध्ये हा कार्यक्रम मी केला आहे. एक दिड तासाच्या या कार्यक्रमाचे आजपर्यंत १४००० प्रयोग झाले आहेत. यात साडेबाराशे आदिवासी आश्रमशाळा, अंधशाळा, रिमांड होम, यांच्यासाठी मी हा कार्यक्रम विनामूल्य सादर केला आहे. अनुताई वाघ यांच्या सांगण्यावरून हे कार्यक्रम मी सादर केले आहेत. आजवर ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चे ३०७२ प्रयोग झाले आहेत. आता २२ तारखेला कोल्हापूरजवळ कुसगावला माझा ३०७३ वा प्रयोग असेल, असे विसुभाऊ आनंदाने सांगतात. ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ या कार्यक्रमाचा रंग अधिकाधिक बहरत जावो, मराठी कविता लोकांमध्ये रुजत राहो, हीच सदिच्छा.
    – साधना दिपक राजवाडकर
    sanarajwadkar@gmail.com