कथा : लेडी सेनॉक्सची कर्मकहाणी

शल्यविशारद डग्लसबद्दल लोकांना हेवा न वाटेल तरच नवल! त्यामुळे, एका दिवशी बाईसाहेबांनी जेव्हा जाहीर केलं की यापुढे त्या सदैव चेहरा झाकून बुरख्यात राहणार, तेव्हा साहजिकच सर्वत्र त्याबद्दल चर्चा सुरू झाली. आता तिचा चेहरा कोणालाच दिसणार नव्हता.

  आपल्या हलक्या चारित्र्यामुळे कुविख्यात असलेली लेडी सेनॉक्स आणि डग्लस स्टोन यांच्यात असलेले संबंध जगजाहीर झाले होते. ती सदस्य असलेल्या अद्ययावत छानछोकी करणाऱ्या स्त्रियांच्या अनेक वर्तुळांत आणि त्याच्या अलौकिक शल्यचिकित्सेमुळे ज्या असंख्य संस्थांमध्ये त्याचा अभिमानास्पद सहभाग होता, अशा सर्वांपासून ती गोष्ट लपून राहिली नव्हती. शल्यविशारद डग्लसबद्दल लोकांना हेवा न वाटेल तरच नवल! त्यामुळे, एका दिवशी बाईसाहेबांनी जेव्हा जाहीर केलं की यापुढे त्या सदैव चेहरा झाकून बुरख्यात राहणार, तेव्हा साहजिकच सर्वत्र त्याबद्दल चर्चा सुरू झाली. आता तिचा चेहरा कोणालाच दिसणार नव्हता.

  इंग्लंडमध्ये एकेकाळी तो प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला मान्यवर पुरुष होता. इथे सांगितली जाणारी ती घटना जेव्हा घडली, तेव्हा तो फक्त ३९ वर्षांचा होता. त्यामुळे त्यानं प्रत्यक्ष शिखर गाठलं का नाही, याबद्दल सांगणे थोडे अवघडच होते. त्याला सर्जन म्हणून चांगलं ओळखणाऱ्या लोकांची खात्री होती की, अन्य १०-१२ क्षेत्रांमध्येही तो तितकाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त वेगानं यशस्वी झाला असता. एक सैनिक म्हणा, वकील किवा इंजिनियर म्हणा, किंवा अगदी कुठल्याही उद्योग व्यवसायाची त्यानं निवड केली असती तरी उच्च दर्जाचं यश त्यानं प्राप्त केलं असतं. महान बनण्यासाठीच त्याचा जन्म झालेला होता. अन्य कोणीही जी कामं किंवा योजना करायला धजणार नाही, ती तो लीलया पार पाडत असे. शस्त्रक्रियांमध्येही त्याचा हात कोणी धरु शकत नव्हतं. त्याचे चाकू-सुरे रुग्णावर अशा रीतीनं चालत की मृत्यू घाबरून चार पावलं दूर राही. ते पाहून साहाय्यक डॉक्टर्ससुद्धा पांढरेफटक पडत.

  त्याचं उत्पन्न प्रचंड होतं. लंडनमधल्या सगळ्या व्यावसायिकांत त्याचा वरून तिसरा क्रमांक होता. मात्र मौजमजेतच तो खूप पैसे उधळत असे. पंचेंद्रियांची सुखं तो अनुभवत असे; आणि त्यातच अचानक लेडी सेनॉक्सबद्दल वेड्यासारखी आसक्ती निर्माण झाली. त्यांची एकदाच भेट झाली, नजरानजर झाली आणि काही कुजबुजते शब्द! तो एकदम थरारुन गेला. लंडनमधल्या अत्यंत देखण्या पुरुषांपैकी तो एक होता; पण तिच्यासाठी तो ‘एकटाच’ नव्हता. नवनवीन अनुभव घेण्याची तिला आवड होती. तिच्याभोवती पिंगा घालणाऱ्या बहुतेकांना प्रतिसाद देण्याचं औदार्य तिच्यात होतं. तिचे यजमान, उमराव सेनॉक्स हे ३६ वर्षाचे असताना ५० वर्षांचे दिसत, हे त्याचं कारण किंवा परिणाम असण्याची शक्यता होती.

  हे उमराव स्वभावानं शांत आणि अबोल होते. पातळ ओठ आणि जाड भुवया, हे त्यांचं वैशिष्ट्य. बागकाम आणि बराच वेळ घरातच काढणे, ही त्यांची आवड होती. एकेकाळी त्यांना नाटकात काम करायची आवड होती. त्यामुळे लंडनमधलं एक नाट्यगृहदेखील त्यांनी भाड्यानं घेतलं होतं. तिथेच त्यांची आणि कुमारी मेरियन डॉसन यांची पहिली भेट झाली. त्यांनी तिचा हात मागितला; आपली पदवी (उमरावीण बाई) आणि परगाण्यातील एक तृतीयांश भाग देऊ केला. लग्न झाल्यानंतर त्यांना आधीचा छंद आवडेनासा झाला. त्यांच्यात असलेले अभिनयाचे गुण – मन वळवायचा कितीही प्रयत्न केला तरी पडद्याआड गेले. लहान कुदळ आणि खुरपं घेऊन फुलाफळांच्या झाडांना पाणी घालण्यात त्यांना अधिक आनंद वाटू लागला.

  आपल्या बायकोचे ‘उद्योग’ कळूनही ते तिकडे दुर्लक्ष करत होते, का तिच्यावर अंध प्रेम करणारे मूर्ख होते? या विषयावर घरोघर आणि महिला मंडळांमध्ये चर्चा चालत असे. पुरुष मात्र डॉक्टरच्या वागणुकीबद्दल ‘कडवट पण साधी’ असं वर्णन करत असत. फक्त एकच, फारसं न बोलणारा, सदस्य त्याचं कौतुक करत असे. विद्यापीठात एकदा झालेल्या दोघांच्या भेटीत त्याचं डॉक्टरबद्दल चांगलं मत बनलं होतं.

  पण जेव्हा डग्लस स्टोन खूपच लोकप्रिय बनला, तेव्हा उमराव सेनॉक्स यांचा संशय आणि अज्ञान हे पूर्णपणे नाहीसं झालं. स्टोन आणि त्यांची पत्नी यांच्या जवळीकीचा फारच गवगवा झाला. सर्जनच्या काही मित्रांनी त्याला सावधगिरीचे इशारेही दिले. त्याचं व्यावसायिक स्थान धोक्यात येण्याचाही धोका होता. तो मात्र अशा लोकांना शिव्या घाले. आपल्या प्रेयसीला तो सोन्यानाण्याचा महागड्या वस्तू भेट म्हणून देई. दर संध्याकाळी ‘महाराज’ तिच्या घरी जात. आणि ती दुपारच्या वेळी त्याच्या घोडागाडीतून गावभर फिरत असे. दोघांनीही त्यांच्यातले संबंध दडवण्याचा बिलकूल प्रयत्न केला नाही; परंतु एक लहानसा प्रसंग घडला आणि त्यांच्यावर हे सगळं थांबवण्याची वेळ आली.

  हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीची रात्र होती. मधूनच पावसाची सरही कोसळत होती. डग्लस स्टोन जेवण उरकून त्याच्या अभ्यासिकेत शेकोटीजवळ बसला होता. आपल्या आरामखुर्चीत मागेपुढे होताना तो मधूनच स्वत:शी हसत होता. त्याला खूष असायला तसं कारणही होतं. त्याच्या सहा डॉक्टर सहकाऱ्यांचा विरोध असतानाही त्यानं दोन अत्यंत अवघड शस्त्रक्रिया त्या दिवशी यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. हे विलक्षण कौशल्य असलेला दुसरा कोणी विशारद देशभरात ऐकिवात नव्हता.
  पण त्यानं लेडी सेनॉक्सला त्या रात्री भेटायचं वचन दिलं होतं, आणि साडेआठ तर वाजून गेले होते. गाडी तयार ठेवण्याची सूचना देण्यासाठी तो घंटा वाजवणार, एवढ्यातच घराच्या मुख्य दरवाज्यावर कोणीतरी हलक्या थापा मारत असल्याचा आवाज आला. नंतर दार जोरात बंद झाल्याचाही.

  ‘एक गृहस्थ तुम्हाला भेटायला बाहेर आला आहे, सर,’ त्याचा बटलर म्हणाला.
  ‘स्वत:साठी?’
  ‘नाही सर; मला वाटतं तो आपल्याला घेऊन जायला आला आहे?’
  ‘आता खूप उशीर झाला आहे,’ डग्लस चिडून ओरडला. ‘मी जाणार नाही.’
  ‘हे त्याचं कार्ड आहे सर.’
  बटलरनं सोन्याच्या ट्रेमधून मालकांना ते दिलं. एका पंतप्रधानांच्या पत्नीचं नाव त्यावर हातानं लिहिलेलं दिसत होतं.
  ‘‘‘हामिल अली, स्मिर्ना.’’ हं! हा गृहस्थ तुर्की दिसतो.’
  ‘होय सर. तो परदेशातून आलाय असं वाटतं. बटलर एका लहानसर, वयस्क माणसाला घेऊन खोलीत आला.
  ‘नमस्ते!’ बटलरनं दार बंद केल्यावर डग्लस म्हणाला. ‘तुम्ही इंग्रजी बोलू शकता, वाटतं?’
  ‘हो, सर. मी आशिया मायनरचा आहे, पण सावकाश बोललं तर मला इंग्रजी येतं.’
  ‘बाहेर कुठेतरी जायचं आहे का?’
  ‘होय, सर. तुम्ही माझ्या बायकोला बघावं, असं मला तीव्रतेनं वाटतं.’
  ‘मी सकाळी येऊ शकतो, कारण आत्ता माझी एक भेट ठरलेली आहे. त्यामुळे, आज रात्री तुमच्या बायकोला बघणं अवघड आहे.’
  आलेल्या तुर्कानं न बोलता एक कृती केली. त्यानं चामडी बॅग उघडून टेबलावर सोन्याचा नाण्यांची रास ओतली.
  ‘हे शंभर पौंड आहेत,’ तो म्हणाला, ‘मी तुम्हाला शब्द देतो की एक तासापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. मी गाडी आणलेली आहे.’
  डग्लसनं आपल्या घड्याळाकडे नजर टाकली. एका तासामुळे फारसं बिघडणार नव्हतं. अजूनही रात्री तो ‘लेडी’ला भेटू शकत होता. पूर्वी यापेक्षाही उशीर झालेला होता आणि तपासण्यासाठी मिळणारी रक्कम फारच मोठी होती. उधळ्या स्वभावामुळे अलीकडे कर्जदारांनी त्याच्याकडे पैशांचा तगादा लावलेला होता. ही संधी सोडण्यात अर्थ नव्हता ‘आपण जावं हे उत्तम!’ त्यानं ठरवलं.
  ‘आजार काय आहे?’ त्यानं विचारलं.
  ‘ओह! फारच वाईट गोष्ट आहे! फार वाईट! तुम्ही कदाचित ‘‘अल्मोहेडस’’च्या खंजीरांबद्दल ऐकलं नसेल ना?’
  ‘कधीच नाही.’
  ‘पूर्वेकडे ते जुन्या काळापासून प्रसिद्ध आणि वापरात आहेत. त्याचा आकार आणि खास करुन मूठ वैशिष्टपूर्ण असते. मी प्राचीन वस्तूंचा विक्रेता आहे, समजलं! आणि तेवढ्यासाठी इंग्लंडला आलो आहे. पण पुढच्या आठवड्यात मी परत जाणार आहे. माझ्याबरोबर मी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या, आणि त्यातल्या थोड्याच आता शिल्लक आहे. दुर्दैवानं त्यातच तो एक खंजीर आहे.’
  ‘मी खोलीत माझ्या वस्तू ठेवतो, तिथे आज माझी बायको चक्कर येऊन पडली, आणि त्या शापित खंजिरामुळे तिचा खालचा ओठ कापला गेला?
  ‘अच्छा!’ डग्लस उभा राहत म्हणाला. ‘ती जखम मी शिवून टाकावी, अशी तुमची इच्छा आहे?’
  ‘छे, छे! त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.’
  ‘मग काय?’
  ‘या खंजिरांना विष लावलेलं असतं.’
  ‘विष?’
  ‘होय, आणि कोणीही माणूस- मग तो पूर्वेचा असो वा पश्चिमेचा- आता सांगू शकत नाही की ते विष कोणतं आहे, किंवा त्यावर उपाय काय? माझ्या वडिलांचा सुद्धा हाच उद्योग होता. अशा विषारी शस्त्रांबाबत काय करायचं, हे मला त्यांच्यामुळेच ठाऊक आहे.’
  ‘लक्षणं काय आहेत?’
  ‘गाढ झोप आणि तीस तासांत मृत्यू!’
  ‘तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यावर काहीच उपाय नाही. मग मला एवढी रक्कम द्यायचं काय कारण?’
  ‘कुठल्याही औषधाचा काहीही उपयोग नाही, पण सुरीचा होऊ शकतो?’
  ‘तो कसा काय?
  ‘ते विष हळूहळू शरीरात पसरतं. अनेक तास ते जखमेमधेच राहतं.’
  ‘मग, स्वच्छ धुतल्यामुळे ते विष निघून जाऊ शकेल?’
  ‘सापाच्या चाव्याप्रमाणे ते फारच सूक्ष्म, अदृष्य आणि प्राणघातक असतं.’
  ‘मग, जखमेला छेद देणं- ती कापून काढणं?’
  ‘अगदी बरोबर! ती जर बोटाला असेल, तर ते कापून टाकणे. माझे वडील नेहमी असंच म्हणायचे. पण ही जखम कुठे आहे – खालचा ओठ – ते बघा ना! आणि ती माझी बायको आहे. किती भयानक!’

  (पूर्वार्ध)

  – मूळ लेखक : सर ऑर्थर कॉनन डॉयल
  स्वैर अनुवाद : रवींद्र गुर्जर
  rvgurjar123@gmail.com