
जगाच्या पाठीवर बलवान “लोकशाही”च्या टिमटिम्या मिरवणाऱ्या भारत देशाने व महाराष्ट्र राज्याने पुन्हा एकदा “गरीबीला” न्याय मिळत नाही आणि “श्रीमंता”ला तो कुठंही मिळतो; त्यासोबतच “यंत्रणा” हिरवी कागद दाखवून कशी वाकवता व पिळता येते. याच हिरव्या कागदाच्या जीवावर चार भिंतीच जीवन देखील किती चंदेरी व सुखकर होत, हेही एका ललित ड्रग्स प्रकरणाने पाहयला लावले. त्यासोबतच प्रथमच उघड-उघड एका प्रकरणातील आरोपीने ३ यंत्रणाच्या बोगस अन् भोंगळ कारभार देखील दाखवून दिला. त्याने यंत्रणेचा बुरखाच फाडला असही म्हणता येईल. राज्यात या-ना त्या कारणाने गाजत असलेल्या ललित पाटील प्रकरण दररोज नव-नवे मोड घेत आहे. परंतु, नव्या घडामोडीत याप्रकरणाचे मुळ हरवलं जात नाही ना, यावर लक्ष ठेवण गरजेचं आहे.
ललित पाटील प्रकरणाने पोलीस दल, आरोग्य विभाग आणि कारागृह विभागाची सद्य व्यवस्था दाखवून दिली आहे. ललितला २०२० मध्ये पकडले. त्याप्रकरणात तो १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत केवळ पाच दिवस पोलिसांच्या ताब्यात होता. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. कारागृहात गेल्यानंतर त्याच्या ड्रग्सप्रकरणाला खऱ्या अर्थाने बळ मिळाले, असे आता पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात दिसत आहे. तत्पुर्वी २०२० मध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यात २२ आरोपी शोधले. त्यात ललित प्रमुख आहे किंवा तो ड्रग्स बनवितो, असे दिसून आले नव्हते. त्यामुळे तो कारागृहात गेल्यानंतर ड्रग्सचा खऱ्या अर्थाने माफिया बनल्याचेही सिद्ध झाले आहे.
ललित पाटीलने श्रीमंतीच्या जोरावर तीनही यंत्रणा विकतच घेतल्या, असेच म्हणावे लागेल. येरवडा कारागृहात त्याची व लोहारे याची भेट झाली. त्यांनी तिथे प्लॅनिंग केले आणि एमडी बनविण्याचा कट कारागृहात रचला. केमिकल इंजिनिअर लोहारे याने त्याला एमडी कसे बनवायचे, हे सांगितले. ललितेने हा फॉर्मिला घेतला व लोहारेचा साथीदार हरीश पंत याच्या मदतीने भूषण व इतरांना दिला. हे सर्व घडलं कारागृहातून. आता कारागृहात देखील ललितने मोबाईलचा वापर केल्याचे पोलीस बोलत आहेत. त्याशिवाय या गोष्टी शक्य नसल्याचे सांगितले जाते. फॉर्मूला मिळताच नोव्हेंबर २०२२ मध्ये ड्रग्सचा कारखाना सुरू झाला. अनेक महिने ड्रग्सची तस्करी केल्यानंतर ललितकडे पैशांची आवक मोठ्या प्रमाणात झाली. कारागृहात बसून इतकं होऊ शकत म्हंटल्यानंतर ललित सारख्याने बाकी सर्व सोपचं केलं.
कारागृहातून गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी म्हणून तो ससून रुग्णालयात दाखल झाला. खरा प्रश्न असा आहे, कैद्यांच्या आजारासाठी कारागृहातही डॉक्टर आहेत. तिथेच उपचार होतात. खुप गंभीर आजार असेल किंवा ऑपरेशन तसेच सर्जरी करायची असल्यास एखाद्या कैद्याला ससूनमध्ये रेफर केले जाते. कारागृहाची वैद्यकीय यंत्रणा म्हणजे, डॉक्टरांची समिती तसा रिपोर्ट देते व कैद्याला ससूनमध्ये पाठविला जाते. त्यामुळे खरच ललितला ससून रुग्णालयातील उपचारांची गरज होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
इतकच नाही, तर रुग्णालयात जाण्याचं सेटल झालं की, पुणे पोलिसांच्या कोर्ट कंपनीला कारागृहाकडून एक पत्र दिले जाते.या पत्रावर संबंधित अधिकारी निर्णय घेऊन “दवापार्टी”देतात. त्यानूसार कैद्याला रुग्णालयात आणल जातं. परंतु, गमंत वेगळीच आहे, कारागृहाच मिटवल्यानंतर संबंधिताचा “माणूस” (खासगी व्यक्ती) कोर्ट कंपनीला येऊन भेटतो दवापार्टीसाठी जे “लागतं” ते ठरवतो आणि त्यानंतरच दवापार्टी मिळते. कोर्ट कंपनीचा हा ठरलेला अलिखीत नियम देखील आता यामुळे उघड झाला आहे. यासोबतच माहितीनुसार, कारागृहात बाहेर उपचार घेण्यासाठी अनेक कैदी अर्ज करतात, पण “पुर्तता” केल्यानंतर त्या अर्जाला मान्यता मिळते.
हे दिव्य पार करून ललित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या ससूनमध्ये दाखल झाला. आता ससूनमध्येही वॉर्ड क्रमांक १६ हा खास कैद्यांसाठी आहे. त्याठिकाणीच कैद्यांवर उपचार होतात. (वॉर्ड क्रमांक १६, एकप्रकारे जेलच असते) तो इथे दाखल झाल्यानंतर हळू-हळू त्याने बस्तान बसविले आणि कारागृहातून सुरू केलेल्या ड्रग्सची रुग्णालयात बसून विक्री सुरू केली. तत्पुर्वी वॉर्ड क्रमांक १६ ला २४ तास कोर्ट कंपनीचा बंदोबस्त असतो. १ अधिकारी व दोन कर्मचारी १२ तासासाठी इथे असतात. त्यांच्याकडून देखरेख ठेवली जाते.
त्यानंतर ललितने इथून ड्रग्स रॅकेटची सुत्रे चालवली. श्रीमंतासाठी सर्व काही हे उगीच म्हंटल जात नाही. त्याने हवा तितका पैसा खर्च करून हे बस्तान बसविले. इतकच नाही, आता ललित रुग्णालयातून शेजार-पाजरच्या बड्या-बड्या हॉटेलातही गेला असल्याचे समोर आले आहे. त्यासोबतच आतमध्ये तो सिगारेटचे झुरकेही घेत असल्याचे समोर आले. त्याला सर्व काही वॉर्डात मिळत होतं. उपचार घेणाऱ्या या कैद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्वत्र सीसीटीव्ही आहेत. त्या खोलीत सीसीटीव्ही आहेत पण ते भिंतीकडे असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आले. त्यामुळे ससून अन् कोर्ट कंपनी या कैद्यांवर किती मेहरबान होती, हेही दिसून येते.
ललितने ससूनमध्ये जूनपासून मुक्काम ठोकला होता. मात्र, त्याला नेमका कोणता आजार झाला हे अजूनही उघड झालेले नाही. इथे राहून तो दोन आयफोन वापर होता. विशेष म्हणजे, तो वायफायद्वारे इन्स्टा व इतर सोशल मिडीयामार्फत साथीदारांच्या संपर्कात होता. त्यावरूनच रॅकेटची सुत्रे हलवत असत. त्याला अभिषेक भेटल्याचे पुरावे मिळाले आहेत. या कालावधीत अनेकवेळा मैत्रीण प्रज्ञा आणि अर्चनाला भेटल्याचेही आता समोर आले आहे. त्यामुळे त्याने सुट कशी मिळवली, हे उघड झाले आहे.
एका ललितने एकाचवेळी तीन यंत्रणांचा वापर कशा पद्धतीने केला, हे यावरून दिसून आले आहे. त्यासोबतच यंत्रणा हिरवी पत्ती दाखवल्यानंतर कशी वाकवता येते हे देखील दिसून आले. आता ललितला कोणी मदत केली, याबाबत राजकीय क्षेत्रात धुराळा उडाला आहे. पण, खऱ्या अर्थाने कोणत्याही प्रकरणात राजकीय व्यक्तीच नाव आलं की, त्या गुन्ह्याचा तपास पुर्णत्वास जात नाही, हे देखील ललित पाटील प्रकरणात गप्पा मारताना एका अधिकाऱ्याने बोलून दाखविले. त्यामुळे यंत्रणाचा खरा शत्रु कोण समजायचा ?
ललितला अटक केल्यानंतर ऑन कॅमेरा त्याने थेट मी पळालो नाही, मला पळवलं. यात कोण-कोण सामील आहे, हेही मी उघड करणार असे सांगितल्याने तर राजकारणात अन् यंत्रणांची तारंबळच उडाली. गृहमंत्र्यांना याप्रकरणात विचारल्यानंतर त्यांनीही लवकरच सर्व उघड होईल आणि दोषींवर कारवाईच होईल असे सांगत, गय कोणाची होणार नाही असे म्हंटले. याप्रकरणात गृहमंत्री पत्रकार परिषद घेणार आणि त्यात ललित पाटीलबाबत बॉम्ब टाकणार, अशी अटकळ देखील बांधली गेली. त्यामुळे सर्व काही समोर येईल असे वाटले होते. परंतु, गृहमंत्र्यांनी २०२० चे प्रकरण सांगत यावर अधिक भाष्य टाळलं.
खर तर ते ललितने कसा पळ काढला व त्याला कोणी मदत केली, याची माहिती देतील अशी अपेक्षा होती. परंतु, राजकीय मात करत त्यांनी याला सध्या तरी पुर्णविराम दिला आहे. पुणे पोलिसांनी कित्येक महिने सुरू असलेल्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पण, सध्या पुणे पोलीसच विलन ठरले आहेत. बोटांवर मोजता येतील एवढ्या कोर्ट कंपनीतील कर्मचाऱ्यांमुळे पुर्ण पोलीस दल बदनाम झाले. तस पाहिलं तर पुणे पोलिसांनी लागलीच संबंधित कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. पण अद्याप तरी ससून व कारागृह विभागाने याप्रकरणात कोणावर कारवाई केलेले ऐकविन्यात नाही. मात्र, एका ललित प्रकरणाने यंत्रणांचा बुरखा फाडला आहे. यानिमित्ताने तरी ही यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला पाहिजेच, पण यात सामील सर्वांचा चेहरा देखील समोर येणे अपेक्षित आहे.
– अक्षय फाटक