
गेली तीन वर्षे चीनने त्यांच्या अटकेतील आॅस्ट्रेलियाची पत्रकार चेंग लेईची नुकतीच सुटका केली आहे. आॅस्ट्रेलियात २०२२ साली मजूर पक्षाचे सरकार सत्तेवर आले आणि त्या अगोदर दोन देशांतील बिघडलेले संबंध पूर्वोपदावर येण्यास सुरुवात झाली.
आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज या वर्षाच्या अखेरीस चीनच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे आॅस्ट्रेलिया प्रशासनाने जाहीर केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीनकडून चेंग लेई यांची तीन वर्षानंतर झालेली सुटका ही आॅस्ट्रेलियात डाव्या विचारसरणीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतरची उजवी बाजू. दोन देशांतील साखरपेरणीला अँथनी अल्बानीज यांचा दौरा निमित्त ठरला असला तरी त्यात डाव्या विचारांचा गोडवा अधिक आहे. २०२० साली चेंग यांना चीन सरकारने स्थानबध्द केले होते. या अगोदर १८ जानेवारी २०१९ रोजी आॅस्ट्रेलियन आणि चीनचे दुहेरी नागरिकत्व असलेल्या यांग जुन यांना अटक केली होती. परंतु अद्यापही यांग जुनची मुक्तता झालेली नाही. बंद दाराआडून दोन्ही खटले चालवल्या गेले. चेंग लेईच्या सुटकेनंतर आॅस्ट्रेलियाच्या प्रशासनाने निर्णयाचे स्वागत केले असून भविष्यात यांग जूनच्या सुटकेसाठी आशावादी असल्याचे विधान केले आहे. चेंग लेई यांची अटक यांग यांच्यानंतर होऊनही चेंगची सुटका झाली; मात्र यांग अद्यापही अटकेतच आहेत. यापूर्वी यांग जूनला २०११ साली स्थानबध्द केल्याचे प्रकाशित आहे. परंतु त्याबाबत मतमतांतरे आहेत.
चीन- आॅस्ट्रेलिया संबंधात मिठाचा खडा
२०१९ सालच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मागोवा घेतल्यास आॅस्ट्रेलियाच्या एकूण उत्पादनांपैकी चीनची बाजारपेठ ३२ टक्के आॅस्ट्रेलियाच्या उत्पादनांनी व्यापली होती. काही उत्पादने तर १०० टक्के आॅस्ट्रेलियाचीच होती. पुढील काही महिन्यात आयातीत १० टक्के अधिकची वाढ झाली. शी जिनपींग यांची सर्वच क्षेत्रातील आक्रमकता बघता याच संधीचा फायदा घेत चीनकडून आॅस्ट्रेलियाच्या उत्पादनांवर आर्थिक निर्बंध, नियम, कायदे अधिक कठोर करण्यात आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आॅस्ट्रेलियाच्या उत्पादकांनी त्यांच्या प्रशासनावर चीनला प्राधान्य देण्यासाठी दबाव निर्माण केला. प्रामुख्याने कापूस आणि कोळसा उत्पादक यात अग्रेसर होते. ऑस्ट्रेलियाच्या मध्यावर प्रचंड कर आकारणी, चीनच्या विद्यार्थ्यांना आॅस्ट्रेलियात शिक्षणासाठी परावृत्त करणे असे विविध प्रकार चीनकडून सुरु होते. आॅस्ट्रेलियाची चीन मधील निर्यात बघता आॅस्ट्रेलियाने एप्रिल २०२० साली कोविडची पाळेमुळे उगम नक्की कुठून आहे या चौकशीची मागणी केली आणि चीन-आॅस्ट्रेलिया संबंध अत्यंत विकोपाला गेले. याच दरम्यान मूळचे चीनचे असलेले परंतु आॅस्ट्रेलियाचे नागरिक म्हणून मान्यता असलेल्या चेंग लेई आणि त्यागोदर यांग जुन यांना स्थानबध्द केले आणि पुढे अधिकृतपणे अटक केली. दोघांवरही हेरगिरीचे आरोप चीनकडून करण्यात आले. बिघडलेले व्यापार संबंध आणि चीनकडून दोन आॅस्ट्रेलियन नागरिकांची अटक हा योगायोग होता की याची काही वेगळी कारणे होती ह्याबाबतीत आॅस्ट्रेलिया आणि चीनच खरे काय ते सांगू शकतील. २०१५ ते २०२२ दरम्यान आॅस्ट्रेलियाची चीनमधील निर्यात वाढली तेव्हा लिबरल पक्षाचे सरकार तिथे सत्तेत होते. स्काॅट माॅरीसन यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात चीन-आॅस्ट्रेलिया संबंध अत्यंत विकोपाला गेले.
यांग जुन अटक
यांग जुनला २०१९ साली विमातळावरुन अटक करण्यात आली होती. यांगच्या अटकेचे कुठलेही सबळ कारण चीनकडून देण्यात आलेले नाही. केवळ हेरगिरी या अस्पष्ट आणि मोघम कारणे जाहीर करण्यात आली. त्याबाबत आस्ट्रेलियाने तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावर चीनकडून आमच्या देशांतर्गत कायदेशीर प्रक्रियेत इतरांनी अकारण दखल न देता त्याचा सन्मान करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यांग ब्लाॅगर लेखक म्हणून प्रसिध्द आहे. डेमाॅक्रसी पेडलर नावाने तो लेखन करत होता. मे २०२१ साली आॅस्ट्रेलिया पराराष्ट्र खात्यातील अधिकाऱ्यांना न्यायालयात शिरकाव करण्यास चीनकडून मज्जाव करण्यात आला. इतकेच नव्हे तर यांगच्या नातेवाईकांचे अर्जसुध्दा फेटाळण्यात आले. विशेष म्हणजे यांगचा खटला हा एक दिवस चालणार होता. अश्या परिस्थितीत बंद दाराआड चालेल्या खटल्याचा निकाल अपेक्षित असतो. याच कारणास्तव चीन मध्ये खटल्यातील दोषींचे प्रमाण ९९ टक्के आहे. यांगचा खटला संपल्यानंतरसुध्दा त्याबाबत चीनकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. गेली चार वर्षे यांग चीन मधील तुरूंगात असून अभ्यासकांच्या मते हेरगिरीच्या गुन्ह्यात त्याची शिक्षा दहा वर्षांपर्यंत असू शकेल. या अगोदर यांग चीन प्रशासनात कार्यरत होता, १९९९ साली त्याला आॅस्ट्रेलियाचे नागरिकत्व प्राप्त झाले आहे. परंतु चीनने यांग चीन प्रशासनात कार्यरत नसल्याचे जाहीर केले आहे आणि तो चीनचा नागरीक सुध्दा नाही अशी भूमिका घेतली आहे.
चेंग लेई अटक आणि सुटका
चेंग लेई बाबतीत पण चीनकडून अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली होती. यांग जुनबाबत जी कायदेशीर प्रक्रिया अवलंबिली त्याच पद्धतीने चेंग लेईची न्यायालयीन प्रक्रिया अंमलात आणल्या गेली. चेंग लेई यांची तीन वर्षानंतर तुरूंगात सुटका केल्यावरसुध्दा चीन न्यायालयाने चेंग हेरगिरी खटल्यात काय निकाल दिला हे अद्यापही उघड करण्यात आलेले नाही. चेंग लेई यांच्या सुटकेनंतर आॅस्ट्रेलिया प्रशासनाने कायदेशीर प्रक्रिया संपुष्टात आल्याने त्यांची सुटका झाली असल्याचे असमाधानकारक उत्तर दिल्याने प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकच संभ्रम वाढला आहे. चेंग लेई या चीनचे एक प्रतिष्ठित माध्यम इंग्रजी बातमीपत्र सीजीटीएन येथे निवेदीका म्हणून कार्यरत होत्या. आॅगस्ट २०२० साली चेंग यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले. सहा महिने त्यांचेवर कुठल्याच प्रकारे कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली नव्हती. चेंगच्या अटकेची माहिती बाहेर आल्यावर त्या कार्यरत असलेल्या सीजीटीएन वृत्त संस्थेने त्यांच्याबाबतची माहिती आपल्या संकेतस्थळावरुन काढून टाकली. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गुन्ह्यात चेंग यांना अटक झाली असल्याची अस्पष्ट माहिती चीनकडून जाहीर करण्यात आली. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी चेंग यांची अधिकृत अटक जाहीर करण्यात आली. १९ महिन्यांच्या अटकेनंतर ३१ मार्च २०२२ रोजी चेंग यांच्यावर चीनच्या न्यायालयात खटला चालवला गेला. आॅस्ट्रेलियाच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांना तिथे प्रवेश नाकारण्यात आला. तब्बल पाच वेळा चेंग यांच्या शिक्षेचा कालावधी वाढवण्यात आला. अखेर ११ आॅक्टोबर रोजी त्यांची सुटका झाल्याचे जाहीर करण्यात आले. अटकेच्या सुटकेतून चीन आॅस्ट्रेलियाची साखरपेरणी झाल्याचे आंतरराष्ट्रीय संकेत मिळताहेत. यांग जुनची सुटका झाल्यास त्यावर शिक्कामोर्तब होईल. एकीकडे कट्टर विचारसरणी असलेल्या देशात युध्द सुरु असतांना डाव्यांची साखर पेरणी महत्वाची ठरते.
– अॅड प्रतीक राजूरकर