राजरंग : विधान परिषदेचे अग्निदिव्य

महाविकास आघाडी सरकारसमोर प्रत्येक वेळी नवा विषय येतो. ज्या विषयाचा अभ्यास केला, त्यापेक्षा वेगळीच प्रश्नपत्रिका समोर आलेल्या विद्यार्थ्यासारखा मग सत्ताधाऱ्यांचा गोंधळ उडतो. तर कधी हुशार विद्यार्थ्यासारखे पैकीच्या पैकी गुण घेतले जातात. नुकतीच राज्यसभेची परीक्षा आटोपली. या परीक्षेत काठावर उत्तीर्ण झालेल्या आघाडीला आता विधान परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. राज्यसभेच्या निवडणुकीतून काही धडा घेतला तर ठीक अन्यथा विधान परिषदेचे हे अग्निदिव्य कसे पार होईल, याबाबत उत्सुकता आहे.

  उद्या विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान होईल. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि त्यांच्यापेक्षाही विरोधकांनी कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच, हा भाजपचा स्वभाव झाला आहे. त्यांच्या या स्वभावाला आघाडीकडून होणाऱ्या चुका किंवा दुर्लक्ष यामुळे खतपाणी मिळते.

  महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकीकडे असतानाही भाजपचा होणारा विजय आघाडीच्या कार्यकर्त्यांना नेमस्त करण्यास भाग पाडतो. राज्यसभा निवडणुकीच्या निकालाने अनेक प्रश्नांना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नैराश्य येण्याच्या कारणांना जन्म दिला आहे. आधीच आघाडीच्या आमदारांमध्ये नैराश्य होते, त्यामुळे राज्यसभेचा निकाल असा लागला, हा भाग वेगळा. पण पुढच्या अनेक राजकीय घडामोडींना या निकालाने कारण दिले आहे.

  आघाडी सरकारला स्थापन होऊन आता तीन वर्ष होतील. या कालावधीत आघाडी सरकरसमोर आव्हानांचे डोंगरच उभे होते. काही आव्हाने आघाडीने पार पाडली तर काहींमध्ये सपशेल अपयश आले. राज्यसभेच्या निवडणुकीत धक्का मिळाल्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अवघड परीक्षेला आघाडीला सामोरे जावे लागेल.

  भाजपचे नेते कायमस्वरुपी ‘इलेक्शन मोड’ मध्येच असतात. एका निवडणुकीचा निकाल जाहीर होतानाच भाजपकडून लगेच दुसऱ्या निवडणुकीची व्युहरचना केली जात असावी. त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीच्या निकालाचा जल्लोष करतानाच आता ‘विधान परिषद’ असे संकेत भाजपने दिले.

  त्याचवेळी आघाडी त्या निकालामुळे झालेल्या गोंधळातून बाहेर यायलाच तयार नव्हती. आधीच नाराज असलेल्या आमदारांना आपण आणखी नाराज करीत आहोत, आपल्याच सरकारपासून त्यांना दूर लोटतो आहोत, हेच कदाचित अशा आरोपांच्या धुराळ्यात शिवसेनेच्या प्रवक्त्यांच्या ध्यानातच आले नसावे.

  अपक्ष घोड्यांना भाजपकडून मिळालेले हरभरे याची विनाकारण चर्चा निवडणुकीनंतर घडवून आणण्यात आली. हे करत असताना आमदारांवर दबाव वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. उलट असलेल्या मतदानात आघाडीविरोधात भूमिका घेणाऱ्या आमदारांसह काहींनी विधान परिषदेच्या गुप्त मतदानात काय करायचे, हे ठरवूनही टाकले असेल.

  परिषदेच्या दहा जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले. २८५ आमदारांचे मतदान होईल. तुरुंगात असलेले अनिल देशमुख आणि बिनखात्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या निवडणुकीतील मतदानाचा फैसला कदाचित आला असेल. पण त्यांची गैरहजेरी गृहीत धरता २७ मतांचा कोटा प्रत्येक उमेदवारासाठी ठरविण्यात आला आहे. या लढतीत आघाडी म्हणून तीन पक्षांना थेट भाजपशी भिडायचे आहेच पण आघाडीतील आपसातील काही हिशेबही या निमित्ताने चुकते होण्याची शक्यता आहे.

  भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमशा पडवी यांना पाडण्याचा प्रयत्न होईल. राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना कशा प्रकारे वाचवेल, यासाठी त्यांना झुंजावे लागेल. सर्वाधिक मतांची किंवा मदतीची गरज आहे, ती काँग्रेसला. कोट्यानुसार त्यांची एक जागा पक्की असली तरीही लक्ष्मण ढोबळे की भाई जगताप, हे त्यांना ठरवावे लागणार आहे. कारण राज्यसभेतील नाराजीमुळे काँग्रेसला शिवसेना किती मदत करेल हा प्रश्न आहे.

  आघाडीतील तिन्ही पक्षांचे आपापले पाहण्याचे समीकरण लागू झाल्यास आघाडीतील दोन्ही काँग्रेसचे प्रत्येकी एक – एक उमेदवार अडचणीत येतील. भाजपने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांच्या जोडीला प्रसाद लाड यांना रिंगणात उतरवले. भाजपच्या चार जागा नक्की निवडून येणाऱ्या आहेत. पण प्रसाद लाड यांना निवडून येण्याची शाश्वती असल्याशिवाय फडणवीसांनी रिंगणात उतरवले नसते.

  शरद पवार म्हणाले त्याप्रमाणे राज्यसभेच्या निवडणूक निकालांनी सर्वांनाच आत्मचिंतनाचा कौल दिला. पण त्यासोबतच पवारांनी ‘माणसं जोडण्याच्या कले’चाही संदर्भही दिला. ही कला अर्थात सत्ताधाऱ्यांनी आत्मसात करावी, असेच त्यांना सुचवायचे असेल. आमदारांना सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी जोडून ठेवणे आणि आपलंस करणं हेच आवश्यक आहे.

  ते न झाल्यामुळे राज्यसभेत भाजपच्या पारड्यात पडलेली मते ही अपक्षांची नाराजी आहे. ती नाराजी दूर करण्याऐवजी काँग्रेसने तर त्याची दखलच घेतली नाही. तर शिवसेनेने नाराज आमदारांवरच आगपाखड केली. त्याचा परिणाम परिषदेच्या निवडणुकीत दिसेल. आघाडीने त्यासाठी एकत्रित येऊन रणनीती आखली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे या अग्निदिव्यातून आघाडी सरकारला कसा मार्ग सापडेल, हे बघणे उत्सुकतेचे असेल.

  विशाल राजे

  vishalvkings@gmail.com