वाद मंदिर, मशिदीच्या जागांचा

वैभवशाली इतिहासाचा अभिमान असायला हवा; परंतु त्याचबरोबर अन्य प्रश्न संपल्यासारखं केवळ मंदिर-मशिदींच्या जागांचे वाद उकरून काढून त्यातून हाती काय लागणार, हे ही तपासलं पाहिजे.

  वैभवशाली इतिहासाचा अभिमान असायला हवा; परंतु त्याचबरोबर अन्य प्रश्न संपल्यासारखं केवळ मंदिर-मशिदींच्या जागांचे वाद उकरून काढून त्यातून हाती काय लागणार, हे ही तपासलं पाहिजे. इतिहासाची मढी किती उकरून काढणार असा प्रश्न काहीजण उपस्थित करतात. अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सुटल्यानंतर तरी अन्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं जाईल, असं वाटलं होतं; परंतु एकंदरित मंदिर-मशिदीच्या जागांचे वाद आपल्याला कधीच अन्य प्रश्नांच्या सोडवणुकीवर लक्ष केंद्रित करू देणार नाहीत, असं चित्र आहे.

  अयोध्येतील वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर तिथल्या मंदिर, मशिदीचा प्रश्न निकाली काढण्यात तीन दशकं गेली. आता राम मंदिराचं बांधकाम चालू आहे. मशिदीचं बांधकामही सुरू होणार आहे. मुघल राज्यकर्त्यांनी उद्दामपणे मंदिरं पाडून त्याजागी मशिदी उभारल्या. वास्तविक अन्य ठिकाणी जागा उपलब्ध होणं सहजशक्य असताना त्यांनी हिंदूंमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी मंदिरं पाडली. मुगल गेल्यानंतर ब्रिटिशांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पाच दशकांत मंदिर, मशिदीच्या जागेवरून वाद झाले; परंतु ते फार ताणले गेले नाही.

  देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर हिंदूंना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी एक नेता मिळाला. ज्या ज्या ठिकाणी मंदिर पाडून तिथं मशिदी बांधल्या गेल्या, त्या त्या जागांवर दावे करायला सुरुवात झाली. खरंतर देशात एकाचवेळी पुरातत्व विभागाकडून अशा किती जागांवर मंदिरं पाडून मशिदी बांधल्या, त्याचे दस्तावेज तयार करायला हवेत. एकदा हे काम झालं, की एकाच वेळी सर्व प्रश्न बाजूला ठेवून कालबद्ध पद्धतीनं मंदिर-मशिदीच्या प्रश्नांचा निकाल लावून नंतर केवळ विकास आणि विकास यावरच लक्ष केंद्रित करायला हवं.

  आता दर काही महिन्यांनी मंदिर-मशिदीच्या जागांचा प्रश्न उपस्थित होतो. जागांवर दावा केला जातो. दोन्ही धर्मात त्यामुळं तणाव, असुरक्षेची भावना तयार होते. सामाजिक तणाव, दंगली होतात. सध्याही काशी येथील
  ज्ञानवापी मशिदीची न्यायालयाच्या आदेशानं पाहणी सुरू आहे. काही लोकांकडून नेहमीप्रमाणं त्याला विरोध केला जात आहे. १६६९ मध्ये औरंगजेबानं काशी विश्वनाथाचं मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मशीद बांधण्याचा आदेश दिला. साहजिकच या मशिदीच्या बांधकामामध्ये, भिंतींमध्ये व परिसरात मूर्ती व मंदिराच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. काशी विश्वनाथाचं मंदिर हे कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचं केंद्र आहे.

  १६७० मध्ये औरंगजेबानं मथुरा येथील श्रीकृष्ण मंदिर पाडून तिथं मशीद बांधण्याचे आदेश दिले होते. श्रीकृष्ण जन्मभूमी व तेथील मंदिर हे कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान आहे. ईदगाह मशीद अन्यत्र स्थानांतरित करण्यात यावी व मंदिराची जागा मंदिराला परत मिळावी, अशा आशयाची याचिका मंदिराच्या वतीनं न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बाबरानं १५२८ मध्ये अयोध्येतील प्रभू रामाचे मंदिर पाडून तिथं बाबरी ढाचा बनविला होता. शेकडो वर्षांच्या लढाईनंतर आज तिथं मंदिर निर्माण सुरू आहे. दिल्ली येथील कुतुबमिनार परिसरात असलेल्या कुव्वत उल इस्लाम या मशिदीच्या परिसरात देवी-देवतांच्या अनेक मूर्ती आढळून आलेल्या आहेत. या मूर्ती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिल्लीतील साकेत न्यायालयानं दिलेला आहे.

  संपूर्ण देशभरात अशी हजारो मंदिरं असतील त्यांना कधीतरी मुस्लिम शासकांनी तोडून त्याठिकाणी मशिदी बनविण्यात आलेल्या आहेत. यात प्रामुख्यानं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले सोमनाथ येथील मंदिर, पाटण गुजरात येथील रुद्र महालय मंदिर, पाटण गुजरात येथे असलेले मोढेरा येथील सूर्य मंदिर, अनंतनाग काश्मीर येथील मार्तंड मंदिर, मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, हम्पी कर्नाटक येथील मंदिरं ही सर्व मुस्लिम आक्रमकांच्या धर्मांध तडाख्यात उद्ध्वस्त झालेली प्रसिद्ध मंदिरं आहेत. अफजल खानानं पंढरपूरचा विठोबा आणि तुळजापूरचं भवानी मंदिर भग्न केलं.

  अनादिकाळापासून भारतावर परकीय आक्रमकांची आक्रमणं झाली आहेत. कधी शक, कधी हूण, कधी कुशाण, कधी यवन, तर कधी मुगल आक्रमकांची आक्रमणं झाली आहेत. अधिकांश आक्रमकांचा उद्देश हा राजकीय सत्ताप्राप्ती व साम्राज्यवाद हा होता; परंतु मुघल आक्रमकांचा उद्देश धार्मिक साम्राज्यवाद होता. फक्त राजकीय विजय त्यांना अभिप्रेत नव्हता तर धार्मिक विजयही त्यांना हवा होता आणि म्हणूनच त्यांनी इथल्या राज्यांना जिंकण्याबरोबरच इथल्या लोकांचं धर्म परिवर्तन व त्यांच्या श्रद्धास्थानांची म्हणजे मंदिरांची तोडफोड करून त्यातून मशिदी उभ्या केल्या. सोमनाथचं मंदिर वारंवार आक्रमकांनी तोडल्यानंतरही पुन:पुन्हा बनविण्यात आलं; परंतु ते भाग्य भारतातल्या सर्वच मंदिरांच्या नशिबी आलं नाही.

  अनेक हिंदू संघटना आणि इतिहासकार ताज महाल, पुराना किला, जामा मशीद आणि मुस्लिम शासकांनी उभारलेल्या इतर अनेक इमारती हिंदूंच्या असल्याचं मानतात. ताज महालाच्या २२ खोल्या उघडण्याबाबत आता याचिका दाखल झाली असून, त्यावरचा निकाल प्रलंबित आहे. बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर आता काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद वाद शिगेला पोहोचला आहे. वाराणसीतील न्यायालयाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचं काम पुरातत्व खात्याच्या वतीनं सुरू आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यावर टीका केली असून, हे कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. अर्थात त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा व्यक्त करता येत नाही.

  काशी विश्वनाथ मंदिर आणि त्याच परिसरात असलेल्या ज्ञानवापी मशिदीचं प्रकरण वाराणसीच्या स्थानिक न्यायालयात १९९१ पासून सुरू असताना आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची सुनावणी अलाहाबाद उच्च न्यायालयात सुरू आहे; पण माता शृंगार गौरी मंदिराचं प्रकरण फक्त सात महिने जुनं आहे. १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाराणसीच्या पाच महिलांनी वाराणसीच्या न्यायालयात शृंगार गौरी मंदिरात दररोज दर्शन आणि पूजा करण्याच्या मागणीसाठी दावा दाखल केला होता. जो न्यायालयानं मान्य करत, परिस्थिती जाणून घेण्यासाठी वकिलांचा एक आयोग नेमण्याचा आदेश दिला होता.

  विरोधकांना नोटिसा बजावण्याबरोबरच पुढील सुनावणीही निश्चित करण्यात आली, मात्र दोन-दोन वेळा न्यायालयीन आयुक्त बॅकफूटवर गेल्यानं वादग्रस्त जागेची पाहणी होऊ शकली नाही. वाराणसीमधील ज्ञानवापी श्रृंगार कॉम्प्लेक्स परिसरातल्या ज्ञानवापी मशिदीवर स्वस्तिकांच्या दोन खुणा आढळून आल्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान या खुणा आढळून आल्या असून सध्या त्याची व्हिडीओग्राफी करण्याचं काम सुरू आहे.

  दिल्लीस्थित राखी सिंग, लक्ष्मी देवी, सीता साहू आणि इतर महिलांनी मशिदीच्या बाहेरील भिंतीवर ज्या हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत, त्यांची पूजा करण्याची परवानगी मागितल्याच्या याचिकेनंतर वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण केलं जात आहे. ज्ञानवापी मशीद ही अनधिकृत असल्याचा दावा एका याचिकेत करण्यात आला होता. मशिदीच्या जागी आधी मंदिर होतं. मुगल बादशाह औरंगजेबनं आपल्या कार्यकाळामध्ये हे मंदिर पाडून इथं मशीद बांधल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता.

  दिल्लीतील कुतुब मिनारजवळील कुव्वत-उल-इस्लाम मशीद ही २७ मंदिरांना पाडून बांधण्यात आली होती. कुतुब मिनारजवळ अनेक मंदिरांचे अवशेष सापडले आहेत. त्यात गणेश मंदिर आहे. यावरून सिद्ध होतं की, तिथं गणेशाची मंदिरे होती, असा दावा राम मंदिराच्या इतिहासाचे पुरावे शोधणारे इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मुहम्मद यांनी केला आहे. कुतुब मिनारजवळ भगवान गणेशाच्या एक नाही तर, अनेक मूर्ती आहेत. ही जागा पृथ्वीराज चौहान यांची राजधानी होती. कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यासाठी तिथली २७ मंदिरं पूर्णपणे नष्ट करण्यात आली.

  मंदिरं पाडल्यानंतर निघालेल्या दगडांपासून कुव्वत-उल-इस्लाम मशीद बांधण्यात आली होती. एवढंच नाही तर, त्या ठिकाणी अरबी भाषेत लिहिलेल्या शिलालेखांमध्येही याचा उल्लेख आढळतो. यात २७ मंदिरांना पाडून मशीद बांधल्याचं म्हटलं आहे. हे ऐतिहासिक सत्य आहे. कुतुब मिनार केवळ भारतातच बांधला गेला नाही तर त्याआधी तो समरकंद आणि गुफारामध्येही बांधला गेला होता. दिल्ली पर्यटन विभागाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे की, ७३ मीटर उंच कुतुब मिनार दिल्लीच्या शेवटच्या हिंदू राज्याच्या पराभवानंतर त्या जागेवरील २७ मंदिरं पाडल्यानंतर मिळालेल्या सामग्रीसह बांधले गेले होते.

  मशिद बांधण्यासाठी मंदिरांना तोडण्यात आलं. दिल्लीतला पहिला मुस्लिम शासक कुतुबुद्दिन ऐबक यानं इ.स.पूर्व १२०० मध्ये कुतुबमिनारचं बांधकाम सुरू केलं; मात्र फक्त तळघरच पूर्ण करू शकला होता. त्याचा उत्तराधिकारी इल्तुत्मिशनं आणखी तीन मजले जोडले आणि १३६८ मध्ये फिरोजशाह तुघलकने पाचव्या आणि शेवटच्या मजल्याचं बांधकाम केलं. देशभरात मशिदीवरील भोंग्यांविरुद्ध वातावरण तापलेलं असतानाच आता कर्नाटकातील एका मशिदीच्या खाली पुरातन मंदिराचे अवशेष सापडले आहेत. मंगळुरू शहरातील एका मशिदीचं नुतनीकरण सुरू असताना मंदिराचे अवशेष सापडले.

  याची माहिती मिळताच हिंदू संघटना आणि विश्व हिंदू परिषदेनं घटनास्थळी धाव घेतली असून या जागी पूर्वी मंदिरच असावे,असा दावा केला आहे. त्यामुळं वातावरण तापलं आहे. मंगळुरु शहराच्या बाहेरील भागात असणाऱ्या मलाली येथे जुमा मशिदीचं नुतनीकरण करण्याचं काम मुस्लिम समाजानं हाती घेतलं; मात्र नुतनीकरण करताना मशिदीखाली मंदिरासारखे अवशेष सापडले. मशिदीच्या खाली मंदिर सापडल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. हिंदू संघटना घटनास्थळी धाव घेत असून दक्षिण कन्नड आयुक्तालयांनी पुढील आदेश येईपर्यंत नुतनीकरणाचं काम ‘जैसे थे’ठेवण्याचे आदेश दिले आहे.

  सध्या जुने दस्तावेज तपासण्याचं काम सुरू असून तोपर्यंत शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.  जिल्हा प्रशासन जमिनीचे जुने रेकॉर्ड आणि मालकी हक्काबाबतचे दस्तावेज तपासत असून याबाबत वक्फ बोर्डाकडूनही रिपोर्ट मागवण्यात आले आहेत. तसंच याच्या वैधतेबाबत तपासणी करून लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. दुसरीकडं गाळणा किल्ला तसंच अन्य ठिकाणीही मंदिराच्या जागी मशिदी बांधल्याचा दावा केला जात आहे. वेगवेगळ्या वेळी सातत्यानं मंदिर-मशिदीच्या जागांवरून वाद होणं चांगलं नाही. शांतता
  आणि सुव्यवस्थेच्या काळात देशाची प्रगती चांगली होते. भावनिक मुद्द्यांना जेव्हा महत्व येतं, तेव्हा लोकांचे मूलभूत प्रश्न मागं पडतात. इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगताना ते प्रगतीच्या गळ्यातील लोढणं होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. सामोपचार आणि सामंजस्यानं पुराणकालीन वादावर तोडगा काढला पाहिजे. माथी भडकावून, धार्मिक अहंकार फुलवून काहीच साध्य होणार नाही.

  — भागा वरखडे
  warkhade.bhaga@gmail.com