
अमरावती जिल्ह्यातीलच नांदगाव खंडे तालुक्यातील लोणी टाकळी या गावात महाराजांचा जन्म ६ जुलाई १८८१ ला झाला. वडिलांचे नाव गोंदुजी मोहोड आणि आईचे नाव अलोकाबाई; पण त्यांना आईचे वात्सल्यसुद्धा जास्त मिळाले नाही. ते चार वर्षाचे असतानाच आईचे निधन झाले. आठ-नऊ महिन्याचे असतानाच त्यांचे डोळे आले. पण त्यांना देण्यात आलेले एक चुकीचे आयुर्वेदिक औषध डोळ्यात टाकल्यामुळे त्यांची बाह्यह्यष्टी गेली आणि त्यांना कायमचे अंधत्व आले..!
पण त्यांचा उल्लेख सर्वत्र जन्मांध असाच केल्या जातो. आईचे माहेर माधान असल्याने त्यांचे संपूर्ण बालपण माधान गावातच गेले. काही काळानंतर त्यांना आपल्या ‘मेंदू’च्या सामर्थ्याच्या साक्षात्काराची प्रचिती आली आणि मध्यरात्रीनंतर ते घोर समाधीत जायला लागले. दृष्टी नसल्याचा कधीच त्यांनी बाऊ केला नाही. त्यांच्या दृष्टी जरी गेलेली असली तरी अंतरदृष्टी आणि स्पर्शज्ञान कायम होते. याच जोरावर त्यांनी ज्ञानलालसेतून न भुतो न भविष्यती अशी ज्ञानसंपदा विविध विषयावरच्या साहित्याच्या रूपाने विदर्भाच्या मातीत जन्माला घातली. एक नवीन साहित्यसृष्टी निर्माण केली. या साहित्यसृष्टीत संगीत, वेद वेदान्त, तत्वज्ञान, आधुनिक विज्ञान, वैद्यकशास्त्र, साहित्यशास्त्र, थिओसॉफी, पाश्चात्त्य तत्वज्ञान, सांख्य, योग, न्याय, मिमांसा, शेती अशा चौफर विषयावरच्या अविश्वसनीय १३४ पेक्षा जास्त ग्रंथांची अनेक भाषात अद्भुत रचना त्यांनी जन्मांध असुनही केली हे विस्मयकारक आहे. ते एक सर्वश्रेष्ठ तत्वज्ञ होते… समन्वय महर्षि होते..! एक सखोल चिंतक होते..! स्पेन्सरचे तत्वज्ञान, डार्विनचा उत्क्रांतीवाद यांच्या परंपरागत सिद्धांताला महाराजांनी खोडुन काढले. आर्य हा “वंश” असून तो बाहेरून आला हे मॅक्समुलरचे तत्वज्ञानच त्यांना मान्य नव्हते.
हजारो वर्षापूर्वीचा वैदिक धर्मच हा विश्वव्यापक होता याच मतांवर ते ठाम होते. म्हणूनच आधुनिक काळातील ते द्रष्टे संत ठरतात. आध्यात्मिक क्षेत्रात “दृष्टान्त” हा परवलीचा शब्द मानल्या जातो व तो सुद्धा एक अनुभवाचा भाग आहे. लहानशा वयातच त्यांना ज्ञानेश्वर माऊलीने दृष्टान्त दिला आणि त्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. त्यांचे जीवन पार बदलुन गेले. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणायला लागले. कधीही कुठेही चमत्कार त्यांनी केले नाहीत. बुवाबाजी आणि अंधश्रद्धेवर आपल्या साहित्यातून कठोर प्रहार केले. साहित्यातील त्यांचे समन्वय विचार जगातील बहुतेक सर्व सामाजिक घटकात बंधुभाव निर्माण करणारे आहेत. भारतातील उत्तर, दक्षिण, क्षुद्र, ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर यांच्यात फुट पाडणाऱ्या सिद्धांतांना नष्ट करणारे त्यांचे साहित्य आहे. म्हणूनच अभ्यासकांना त्यांचे ग्रंथ आकर्षित करतात. त्यामुळेच गुलाबराव महाराजांच्या ज्ञानगंगेच्या साहित्यावर आतापर्यंत एकूण तेरा अभ्यासकांनी पीएचडी केलेली आहे. यात नागपूरचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉ. कृ.मा. घटाटे यांचा सुद्धा समावेश आहे.
इतकेच नाही तर आताच्या नागपूर रामटेकच्या कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मधुसूदन पेन्ना यांनी महाराजांवर २०१५ मध्ये एक हजार संस्कृत श्लोकांचे महाकाव्य लिहून विक्रम केला. तसेच गोविंद देव गिरी यांनी वृंदावनच्या एका सत्व संपन्न संस्कृत पंडितांनी लिहिलेले दुसरे बाराशे संस्कृत श्लोकांचे महाकाव्य प्रकाशित करून आपली सेवा महाराजांचे चरणी अर्पण केली आहे. आपली पुस्तके डोक्यावर घेऊन ते गावात फिरत असत आणि लोकांकडून वाचन करून ते ऐकून घेत. अशी प्रचंड ज्ञानलालसा महाराजांमध्ये होती. भगवान श्रीकृष्णावर त्यांची अजोड प्रीती होती. कात्यायनी व्रत करून ते भगवान “श्रीकृष्णाची पत्नी” झाले. श्रीकृष्णाच्या पत्नीचा ते संपूर्ण साजशृंगार करत. स्त्रीवेष धारण करून ते अंगावर विविध दागिने घालत. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या आणि “कृष्णपत्नी” मानुन गळ्यात मंगळसुत्र सुद्धा घालत असत. म्हणूनच त्यांना “मधुरा द्वैताचार्य” असेही म्हणतात. “ज्ञानेश्वरांची भक्ति आणि कृष्णाची प्रीती” याचा अपूर्व संगम गुलाबराव महाराजांच्या व्यक्तिमत्वात दिसायला लागतो.
शेगावला गुलाबराव महाराज गेले असताना स्वतः गजानन महाराज अंगावर प्रथमच सुंदर पंचा घालुन रेल्वेस्टेशनवर त्यांना आणायला गेले. हा प्रीतिसंगम बघण्यासारखा होता. आद. भय्यासाहेब घटाटे हे मंदिराचे प्रमुख सल्लागार असून महाराजांच्या संपूर्ण साहित्याला त्यांनी मंदिरात आश्रय दिलेला असून महाराजांचे बहुतेक ग्रंथ येथे बघायला मिळतात. महाराज दरवर्षी ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला आळंदीला जायचे. त्याच मार्गावर असताना गुलाबराव महाराजांचे अवघ्या ३४ व्या वर्षी २० सप्टेंबर १९१५ ला पुण्यात त्यांनी देह ठेवला आणि आयुष्याची सांगता झाली. याच गुलाबराव महाराजांच्या माधानला महात्मा गांधींच्या मानसकन्या ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या स्व. पुज्य ताराबेन मश्रुवाला आणि त्यांच्या चार महिला सहकाऱ्यांनी महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या प्रेरणेने “कस्तुरबा सर्वोदय मंडळाची” स्थापना १९४७ साली केली. याला “कस्तुरबा धाम” सुद्धा म्हणतात. १९०९ ला ताराबेन यांचा जन्म अकोल्याच्या प्रसिद्ध मश्रुवाला या गुजराती कुटुंबाच्या श्रीमंत घराण्यात झाला.
सारेच कुटुंब महात्मा गांधीच्या कार्याने प्रभावित झालेले होते आणि हा प्रभाव ताराबेन यांच्यावर सुद्धा होता. गरीब, निराधार, परित्यक्तांची व असहाय संकटात असलेल्या कुटुंबाची मदत करण्यात आणि महिलांना सक्षम करण्यात त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची झाले. गरजुंच्या मदती करिता आणि लोकशिक्षणा करिता या आश्रमाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी २२ फेब्रुवारी हा कस्तुरबांच्या पुण्यतिथीचा दिवस आश्रमात “मातृदिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या या कार्याची दखल माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी सुद्धा घेतली आणि महिला आणि बालविकासाच्या केलेल्या सेवाकार्याकरिता जमनालाल बजाज फाऊंडेशनचा १९८२ चा पुरस्कार स्व.ताराबेन मश्रुवाला यांना पंतप्रधान स्व. इंदिरा गांधींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जवळपास वीस वर्षा पूर्वी माधानला स्व. ताराबेन यांच्या अंत्ययात्रेतही सहभागी होण्याचे आम्हाला भाग्य लाभले. प्रस्तुत लेखकाला या आश्रमात काही व्यक्तीगत कारणाने एक वर्ष राहण्याचा योग आला. असे हे स्व.प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांचे आणि तपस्विनी पुज्य स्व. ताराबेन मश्रुवाला यांच्या वास्तव्याने पावन झालेले सुंदर गाव माधान ..!
– श्रीकांत पवनीकर
sppshrikant81@gmail.com